विशेष लेख : कुर्रेबाज आणि दिलदार Print

 

बुधवार, १५ ऑगस्ट २०१२

विलासराव देशमुख हा बैठकीचा माणूस होता. राजकारणातील आपल्या विरोधकास शत्रू न मानण्याइतका प्रौढ समजूतदारपणा दाखवणारे जे काही मोजके नेते राज्याच्या राजकारणात होते वा आहेत, त्यांच्यात विलासरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मराठवाडय़ातील वैराण बाभुळगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेल्या राजकीय प्रवासात अनेक उंच स्थानी काम करण्याची संधी विलासरावांना मिळाली. त्या प्रत्येक टप्प्यावर विलासरावांतील राजकीय सहिष्णुता उठून दिसली.

सर्वसाधारण अनुभव असा की सत्तेच्या राजकारणात अग्रस्थानी असलेल्या नेत्याशी राजकारणबाह्य विषयांवर संवाद होऊ शकत नाही. विलासराव त्यास सन्माननीय अपवाद होते. १९९९ साली राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विलासरावांतील कलासक्त आनंदी राजकारण्याने शासकीय निवासस्थानी पं. जसराज यांच्या खासगी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पंडितजींचे गाणे हे जसे अनुभवण्याचा प्रकार होता तसेच अनुभवण्याजोगे होते ते विलासरावांचे खानदानी यजमानपण. या साऱ्या बैठकीत विलासरावांनी आपल्यातील मुख्यमंत्री कोठेही दाखवू दिला नाही. त्या मैफलीचे सरताज हे पं. जसराज होते आणि त्यांना कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडून दुय्यम वागणूक मिळणार नाही, याची जातीने काळजी विलासराव घेत होते. काव्यशास्त्रविनोदात रमावे ही त्यांची मनापासूनची आवड होती. यामुळेच अनेक राजकारण्यांप्रमाणे लेखक-कवींच्या कोंडाळय़ात त्यांना अवघडल्यासारखे होत नसे. ते आणि राज्याच्या राजकारणात ‘दो हंसो का जोडा’ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या जोडगोळीतील त्यांचे सहकारी सुशीलकुमार शिंदे यांना खासगी बैठकांत ऐकणे हा स्वतंत्र आनंद असे. कडव्या राजकारणात मुरलेल्या विलासरावांचा गझल हा आवडता प्रकार होता आणि निजामाच्या अंमलाखालील प्रदेशातून आलेले असल्यामुळे असेल, त्यांचे हिंदी उत्तम होते. अनेक राजकारण्यांना आपले संस्कृतिप्रेम दाखवण्यासाठी कागदाच्या चिटोऱ्यावर अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले काव्यतुकडे बाळगावे लागतात. विलासरावांवर ती वेळ कधी आली नाही. भाषेचे वजन म्हणजे काय, ते विलासरावांच्या भाषणातून समजून घ्यावे इतकी सहजता त्यांच्या वक्तृत्वात होती. वक्रोक्ती, व्यंग्योक्ती आदी आयुधांचा वापर करीत समोरच्यास नामोहरम करायचे; पण त्याच्या मनावर ओरखडा उठू द्यायचा नाही, हे त्यांना सहजतेने जमत असे. त्यामुळे राजकीय विरोधकांनादेखील विलासराव कधी शत्रू वाटले नाहीत. उलट त्यांच्याकडून टोपी उडवून घेण्यातही एक गंमत असे आणि ज्याची टोपी ते उडवत तोही त्या आनंदात सहजपणे सहभागी होत असे. त्यांच्याच मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्र भीषण आर्थिक संकटातून जात होता आणि त्या संदर्भात पत्रकार परिषदांत त्यांना वारंवार टोकले जात असे. अन्य एखादा असता तर यामुळे कावून गेला असता. परंतु विलासराव अत्यंत शांतपणे न कंटाळता त्याच त्याच प्रश्नांना सामोरे जात. त्यांच्या या शांतपणाने अखेर वार्ताहरांचाच संयम सुटला आणि त्यातील एकाने त्यांना हे राज्याचे आर्थिक संकट संपणार कधी, असे जाहीरपणे विचारले. त्या वेळी विलासरावांनी त्या वार्ताहरास चेहऱ्यावरचा बेरकी शांतपणा अजिबात ढळू न देता, तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणे बंद केलेत की हे संकट जाईल, असे सांगत निरुत्तर केले होते. हजरजबाबीपणाने समोरच्यास गप्प करावे आणि तसा तो निरुत्तर झाल्यावर गडगडाटी हसत सगळ्यांनाच त्यात सामावून घ्यावे, ही त्यांची खासियत होती. अनुभव असा की प्रश्न सोडवण्याइतकाच तो सोडवण्याचा आभास निर्माण करण्यात ते अत्यंत यशस्वी होत. ऐन तारुण्यात विलासराव राजकारणात मुंबईत आले. पांढरी पँट, पांढराशुभ्र शर्ट, देव आनंदच्या पिढीची याद देणारा केसांचा कोंबडा आणि पायात पांढरे बूट हा विलासरावांचा वेश असे. तोपर्यंत महाराष्ट्राचे राजकारणी धोतर, ढगळ सदरा आणि गांधीटोपी यामुळे तरी ओळखले जात किंवा वसंतराव नाईक यांच्या बंदगळा वा पाइपमुळे. राजकारण्यांचा हा आवळलेला गळा पहिल्यांदा शरद पवार यांनी सैल केला आणि त्याला तरुण केले विलासरावांनी. त्यांच्या ऐन भराच्या काळात विलासराव हे मराठी चित्रपटातील सूर्यकांत, चंद्रकांत यांच्यासारखेच नायक वाटत आणि तशी तुलना केलेली त्यांनाही आवडत असे. पांढरी पायताणे विलासरावांच्याच मराठवाडय़ातील शिवराज पाटील यांनीही घातली. तेही असेच नीटनीटके आणि स्वच्छता आणि टापटीप पाळणारेच. या दोघांत फरक हा की विलासरावांची टापटीप मानवी वाटे. पोशाखाच्या बाबतीत ते चोखंदळ होते तरी ते पोशाखी कधीच नव्हते. पुढे वयोमानपरत्वे त्यांचे पांढरे बूट गेले आणि पँटच्या जागी सलवार आली आणि पूर्ण बाह्यांच्या शर्टाऐवजी कुडता आला. प्रसंगी सफारी. आपण लोकांना कसे सामोरे जातो याबाबत ते अत्यंत चोखंदळ होते. अजागळपणा त्यांच्या स्वभावातच नव्हता. नेमकेपणा हा जसा त्यांच्या पेहेरावाचा भाग होता तसाच वागण्या-बोलण्याचाही. त्यामुळे आपण असे बोललोच नाही वा प्रसार माध्यमांनी आपल्या विधानाचा विपर्यास केला अशी वाक्ये विलासरावांच्या तोंडून आयुष्यात एकदाही निघाली नसावीत. जे काही करायचे, बोलायचे ते नेमके आणि नेटके ही आदब त्यांनी आयुष्यभर पाळली. राजकीयदृष्टय़ा विलासराव मराठवाडय़ाचेच ज्येष्ठ नेते दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या कुळीचे. विरोधकांविषयी बोलतानाही आदराने बोलायचे, कधीही कमरेखाली वार करायचा नाही, हे गुणही त्यांनी आयुष्यभर पाळले. अन्य राजकारण्यांप्रमाणे विलासरावांनी आपल्या कोणत्याही कृत्यासाठी अन्यांना, त्यातही अधिकारी वर्गाला कधीही जबाबदार धरले नाही. घेतलेल्या निर्णयाची पूर्ण जबाबदारी घेणे हे विलासरावांचे वेगळेपण. ते आयुष्यभर त्यांच्याकडून जपले गेले. ते जपायचे तर नोकरशाहीशी उत्तम संवाद असावा लागतो, परिस्थितीची जाण असावी लागते आणि प्रशासकीय नियमांचा पूर्ण अंदाज असावा लागतो. विलासरावांना तो होता. त्यांनी सांभाळलेले महसूल मंत्रिपद असो वा मुख्यमंत्रिपद. ही त्यांची जाण त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत असे. राज्याच्या प्रश्नाचीही त्यांना उत्तम जाण होती. आज काँग्रेसकडे अशी जाण असलेल्या नेत्यांची संख्या मोजण्यासाठी एकाच हाताची बोटे पुरतील. त्यातही अशी जाण असून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन हा विषय मांडण्याची कुवत आणखीही कमी जणांकडे आहे. विलासराव हे अशा मोजक्या नेत्यांमधले होते.
स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ सत्तेवर राहूनही काँग्रेसमध्ये एक प्रकारचा संकुचितपणा आलेला आहे. हा पक्ष कोणत्याही प्रकारे राज्यस्तरीय नेतृत्व वाढू देत नाही. मग ते शरद पवार असोत, मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग असोत वा विलासराव देशमुख. वास्तविक विलासरावांसारख्या नेत्यास राज्याच्या प्रश्नाची जाण होती. मुंबईसाठी काय करावे लागेल, याचा त्यांना पूर्ण अंदाज होता. त्यामुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न दाखवल्यावर २००४ साली पुन्हा सत्तेवर आलेल्या विलासरावांनी मुंबईला पडलेला झोपडय़ांचा वेढा उठवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास लाखभर झोपडय़ा तोडल्यावर काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाला अचानक कळवळा आला आणि श्रेष्ठींमार्फत ही मोहीम थांबवण्याचा आदेश आला. विलासरावांनी तो शांतपणे पाळला. या पक्षात राहायचे तर बंड वगैरेचा विचार करून चालत नाही, पक्षश्रेष्ठी करतील तेच बरोबर असेच मानावे लागते आणि मानायचे नसले तरी तेच दाखवावे लागते, याचा पूर्ण अंदाज त्यांना होता. तेव्हा श्रेष्ठीआज्ञा शिरसावंद्य मानीत आपला काळ आनंदात घालवावा हे त्यांनी हेरले होते. अशा प्रकारच्या राजकारणामुळे राज्याचे नुकसान होते, याची त्यांना जाणीव होती. परंतु सत्ताकारणात रमलेले असल्यामुळे ती सोडावी असे त्यांना कधीही वाटले नाही. क्षमता असूनही अपेक्षित उंची गाठली नसल्याची खंत क्वचितच त्यांच्या मनाला शिवली असेल.    
मनाने दिलदार आणि शेवटपर्यंत र्कुेबाज असलेला हा नेता गेले काही दिवस जायबंदी होता. तरीही त्यांना होत असलेल्या वेदना या काळातही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हत्या. तोरा तसाच होता. मान झुलवत बोलायची लकब तशीच होती. आत काय चालले आहे हे कळू न देणारा चेहराही तसाच होता. सध्याचे लोकसभा अधिवेशन संपल्यावर लोकसत्ता कार्यालयात बैठकीचा फड रंगवायचा असे त्यांनीच कळवले होते. ती बैठक आता कधीच भरणार नाही.