विशेष लेख : शिकवलेला दुष्टावा Print

डॉ. उल्हास लुकतुके, गुरुवार, १६ ऑगस्ट २०१२

दहशतवादाच्या प्रशिक्षण-केंद्रांतून केवळ शस्त्रे वा स्फोटके हाताळण्याचे शिक्षण दिले जाते असे नाही.. तिथे द्वेष शिकवला जातो, दुष्टाव्याचा अभिमान बाळगणारे आणि त्यापुढे काहीही न पाहणारे आत्मघातकी तयार केले जातात.  अशी दहशत वाढवत नेऊन, राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याचे मनसुबे दहशतवादी गटांचे म्होरक्ये आखत असतात.. पण ‘दहशतीला घाबरणारे लोक’ हा अशा दहशतवादाचा पायाच डळमळीत करण्याची ताकद सामान्य माणसांमध्ये असते. पुण्यातील अगदी कमी क्षमतेच्या बॉम्बस्फोटांच्या वेळी अशी ताकद दिसून आलीच..


मानसशास्त्र मूलभूतरीत्या फक्त एकाच प्रश्नाचा शोध  घेते, माणूस जसा वागतो तसा का वागतो? किंवा माणसे जशी वागतात तशी का वागतात? पहिला प्रश्न व्यक्तिगत मानसशास्त्राचा आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळविणे हे सामाजिक मानसशास्त्र या शाखेचे ध्येय आहे. त्यातसुद्धा माणसे टोकाला जाऊन का वागतात हा तर मोठाच कुतूहलाचा प्रश्न आहे. दहशतवादाचा अभ्यास या दृष्टीने खूप औत्सुक्याने भरलेला पैलू आहे. दहशतवादाचा वापर करणारे, त्या विचारसरणीचे पाईक यांना आपण सोयीसाठी हस्तक असे म्हणू या आणि ज्यांच्यावर दहशत वापरली जाते त्यांना प्रभावित म्हणू या. आज जे हस्तक आहेत ते पूर्वी कधी तरी साधा माणूस होतेच ना? मग असे काय घडले की ज्यामुळे ते दहशतीचा वापर करून इतरांना वेठीस धरू लागले? आणि जे प्रभावित आहेत ते कायमचे धास्तीखालीच राहतील का? भीतीच्या पोटी हस्तकांचे म्हणणे मान्य करतच राहतील का? की प्रतिआक्रमण करतील, की आणखी काही वेगळा मार्ग शोधतील?
भय आणि दहशत
वेदना किंवा दु:ख वगैरेच्या शक्यतेमुळे जी भावना निर्माण होते तिला भय म्हणतात. हस्तक दोन पद्धती वापरतात. काही निरपराध माणसांना खूप दु:ख किंवा वेदना देतात. या बळींना खूप भय वाटू लागते. या घटनेच्या प्रभावक्षेत्रातील इतर माणसे घाबरतात, चिंताग्रस्त होतात. असाच प्रयोग न जाणो आपल्यावरही होईल अशी धास्ती त्यांना वाटू लागते. हिंसेचा प्रयोग कुठे कुणावर व कधी होईल याबाबतची अनिश्चितता पण तो घडण्याची मात्र शक्यता हे दोन घटक हस्तक काळजीपूर्वक जोपासतात कारण त्यावर धास्ती सर्वामध्ये पसरणे अवलंबून असते. हिंसेचे असे प्रयोग वारंवार केले की सामान्य माणसाच्या मनात ‘कदाचित माझाही हकनाक बळी जाईल’ असा विचार घर करून बसतो. त्या विचाराच्या दबावाखाली वागणे याला दहशत असे म्हणतात. त्या दबावाखाली खचलेली साधी माणसे म्हणू लागतात की त्यापेक्षा हस्तकांना जे काही हवे असेल ते देऊन टाका. लोकांना प्रथम भिवविणे, नंतर मग त्यांना भयग्रस्त करणे, त्यानंतर त्यांना भित्रे बनवणे हा दहशतवादाचा हेतू असतो. एकदा भित्रे लोक भ्याले की मग भीतीचा बागुलबुवा दाखवून आपल्याला हवे ते पदरात पाडून घेता येते. वर आणखी, हे सर्व आम्हाला लोकांनी त्यांच्या मान्यतेने दिले आहे अशी शेखी मिरवता येते. हस्तकांनी लाटाळलेला हा फायदा बहुधा राजकीय स्वरूपाचा असतो.
दहशतवादाचे चार घटक
दहशतवाद ही वैशिष्टय़पूर्ण, लक्षणीय सामाजिक बाब आहे. तिचे परिणाम दूरगामी आहेत. म्हणून त्याबाबत नीट माहिती करून घेतली पाहिजे. दहशत आभाळातून पूर्ण तयार स्थितीत अचानकपणे वज्रासारखी पडत नाही. ती पायरीपायरीने तयार करावी लागते. नुसती धास्ती निर्माण करून भागत नाही तर तिला विशिष्ट विचारसरणीमध्ये बांधावे लागते. अशा नीट बांधलेल्या व दहशतीचे समर्थन करणाऱ्या विचारसमुच्चयाला दहशतवाद म्हणतात. नीट ठरवलेले उद्दिष्ट, ते मिळविण्यासाठी नियोजितरीत्या काम करणारे हस्तक, दहशतीने प्रभावित होणारे ठराविक लोक आणि निवडक प्रभावक्षेत्र हे दहशवादाचे चार मूळ खांब आहेत. दहशत निर्माण करण्याची विशिष्ट पद्धत हे त्यांचे हत्यार होय, किंवा साधन म्हणा. (उदा. बॉम्बस्फोट करणे इ.)
पायाचे दगड
दहशतवाद उघड होण्याआधी, तो बनत जातो तेव्हा, चार पूर्वघटकांची जरूरी असते- पूर्वग्रह (प्रेजुडिस), भेदभाव (डिसक्रिमिनेशन), हिंसाचार (व्हायोलन्स), आणि आक्रमण (संताप भावना, अग्रेशन). दहशतवाद रुजण्यासाठी समाजात आहे-रे आणि नाही-रे यामध्ये रुंद भेग असणे जरुरीचे आहे. नाही-रे वर्गामधील खदखद आहे-रे वर्गाच्या कानीसुद्धा पडत नाही अशा स्थितीमध्ये दहशतवाद फोफावतो. उलटही घडू शकते. नाही-रे वर्गाची रास्त अपेक्षा दडपून टाकण्यासाठी आहे-रे वर्ग दहशतीचा सर्रास उपयोग करू शकतो. पूर्वग्रहाचे अर्करूप ‘मी बरोबर आहे, तू बरोबर नाहीस’ या सूत्रामध्ये आहे. हे सूत्र द्वेष निर्माण करते आणि मैत्रीची शक्यता पुसून टाकते. द्वेषाबरोबर तिरस्कार येतो. विचार, भावना आणि वृत्ती (अ‍ॅटिटय़ूड) यांचे हे विषारी मिश्रण वर्तनामध्ये उतरते ते भेदभाव या रूपाने. स्वत:ला श्रेष्ठ मानणारा गट कनिष्ठ गटाला अनुदारपणे वागवतो. यातून असमाधान, त्यातून पुढे हिंसाचार व दहशतवाद निर्माण होतो. भेदभाव हे पूर्वग्रहाचे वर्तनामधील रूप आहे. पूर्वग्रहामुळे समाजात प्रवर्ग (कॅटगरी) निर्माण होतात. संधी मिळताच एक प्रवर्ग दुसऱ्यावर कुरघोडी करायला बघतो. दहशतवाद हे अशा प्रयत्नांचे अपत्य आहे.
दुसऱ्याला हेतुत: इजा करणे म्हणजे आक्रमण. दहशतवादामध्ये दुसऱ्याला केलेली इजा ही केवळ हेतुपूर्वक नसून सुनियोजितदेखील असते. इजा करण्याचा हेतूच स्वत:चा फायदा करून घेणे हा असतो. एवढेच नव्हे तर त्यामध्ये निर्दयता असते, भेसूरपणामध्ये आनंद घेण्याची वृत्ती असते, क्रौर्य आणि विकृतता असते.
दहशतवादाचा हस्तक पूर्वी कधी तरी साधा माणूस असतो. त्याच्या मनात संपन्नतेचे हेतू असतात. ते पुरे करण्यात अडथळे आले की त्याचा अपेक्षाभंग होतो. मग हवे ते मिळविण्यासाठी हिंसाचार, किंवा त्यामध्ये जे आडवे आले त्यांच्यावर सूड म्हणून आक्रमण व हिंसाचार हे येतात. आक्रमण करावे हा विचार, भावना व वृत्ती हे तिन्ही मिळून आक्रमणशीलता किंवा आक्रमण प्रवणता (प्रोननेस टु अग्रेशन) निर्माण होते. तिचे वर्तनातील रूप म्हणजे हिंसाचार (व्हायोलन्स) होय. माणसामध्ये जन्मजात आक्रमणशीलता थोडी असते. हिंसाचारामध्ये ती खतपाणी घालून पद्धतशीरपणे वाढवली जाते. दहशतवादाची प्रशिक्षण केंद्रे हे काम करीत असतात. तिथे दुष्टावा मुद्दाम शिकवला जातो. दुष्ट वर्तनाबद्दलचा अभिमान मनात ठोकून बसवला जातो. आपल्यावर पूर्वी झालेल्या कथित अन्यायाबद्दल क्रोध आणि सूड याची आग पेटवली जाते. अशी आगीने पेटलेली मने बाहेरच्या समाजात बॉम्ब फोडतात व आगी लावतात यात नवल ते काय?
फलित काय?
क्रोध, भय, धास्ती, द्वेष, तिरस्कार, विध्वंस आणि हिंसा अशा नकारार्थी घटकांवर दहशतवाद उभा आहे. यांचा वापर करून सुखी आणि वर्धिष्णु समाज कसा निर्माण करता येईल? जीवन सद्गुणशील आहे. ते दुर्गुणांवर उभे करता येणार नाही.
साधी गोष्ट बघा. पुण्यात आणि मुंबईत इतके बॉम्बस्फोट केले; इतक्या आगी लावल्या पण इथल्या समाजाने द्वेषाचे उत्तर द्वेषाने, त्वेषाचे उत्तर त्वेषाने दिले नाही. इथला समाज शांत राहिला. इथल्या लोकांनी सुजाणता दाखवली. जखमींना मदत केली. ज्यांची दुकाने जळाली, कामधंदे नष्ट झाले ते पुन्हा उभारण्यास मदत केली. जिथे मृत्यू घडले तिथे दु:खी कुटुंबांना मदत केली. एवढेच नव्हे तर चोवीस तासाच्या आत सर्व समाजजीवन सुरळीत झाले.
इथल्या समाजामध्ये विचारावर विवेक आणि वर्तनावर संयमाचा अंमल चालतो. इथे अविवेकी विचार आणि विनासंयम वर्तन यावर उभारलेला दहशतवाद यशस्वी होऊ शकणार नाही.
सर्वेऽत्र सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया: । हे खरे आहे.