विशेष लेख : मराठी माध्यम: खरे सोने Print

 

प्रा. अनिल गोरे - सोमवार, २० ऑगस्ट २०१२

राज्यातील शिक्षणाचे माध्यम ‘सेमी-इंग्रजी’ असावे याची व्यवहार्यता विशद
करणारा, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील निवृत्त ज्येष्ठ अधिकारी वसंत काळपांडे यांचा लेख ‘लोकसत्ता’त  १० ऑगस्ट रोजी, तर या लेखाचा प्रतिवाद करणारा व ‘सेमी-इंग्रजी’ हा सुवर्णमध्य नसून ‘सुवर्णमृग’ ठरतो असे नमूद करणारा श्रीमती वीणा सानेकर यांचा लेख १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे. शिक्षणाच्या माध्यमाविषयीची ही चर्चा या निमित्ताने विविधांगाने व विविध वर्तुळांतून सुरू झाली आहे. ती तशीच पुढे चालू ठेवण्यातील यथार्थता पटवून देणारा आजचा हा लेख आवर्जून प्रसिद्ध करीत आहोत.


मराठी माध्यमातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि संशोधन या प्रत्येक पातळीवर अधिक यशस्वी होताना दिसतात. बँकेच्या परीक्षा, राज्य आणि केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, नोकरी, व्यवसाय या सर्व क्षेत्रांत मराठी माध्यमाचे विद्यार्थी आघाडीवर असतात. शिक्षण संपल्यावर कारकीर्दीच्या सुरुवातीला अमराठी भाषेत व्यवहार करण्याची वेळ आल्यास त्यांना काही काळ अडचण जाणवते. ती समस्या फार काळ राहत नाही. मराठी विकसित भाषा असल्याने ज्यांना मराठी उत्तम येते त्यांना अमराठी भाषा लगेच शिकता येते. अशी मराठी भाषा ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि अधिकृत राजभाषा आहे, हे या राज्याचे भाग्य आहे.
बहुसंख्य मूळ मराठी शब्द छोटे, सोपे, सौम्य उच्चाराचे आणि जोडाक्षरविरहित असल्याने मराठी शब्द लिहिण्या-बोलण्यास कमी वेळ लागतो. प्रत्यय जोडून मराठी शब्दांची विविध रूपे होत असल्याने मराठी वाक्ये लहान असतात. शब्दांची जागा बदलली तरी बरेचदा मराठी वाक्यातील अर्थ तसाच राहतो म्हणून मराठीतून सहज माहिती व्यक्त करता येते. शिकणे, शिकवणे, उद्योग, संपर्क, संवाद, ग्रंथलेखन, आध्यात्मिक रचना, आरोग्यचिकित्सा, पर्यटन, संशोधन यांसह असंख्य क्षेत्रांत गेल्या तीन हजार वर्षांहून अधिक काळ मराठीचा वापर झाल्याने लाखो मराठी शब्द निर्माण झाले. छापील शब्दकोशात सुमारे सात लाख मराठी शब्द आहेत आणि मराठीच्या विविध बोलींमध्ये असलेले आणखी लाखो अधिक शब्द एकत्र करण्याचे काम सुरू आहे. भारतातील अनेक राजे आणि संस्थानिकांचे मुख्य कारभारी मराठी असल्याने भारताच्या सुमारे सत्तर टक्के भागात दीर्घकाळ मराठीचा वापर सुरू होता. जगाला शून्य देणारे आणि गणितातील ‘लीलावती’ या श्रेष्ठ ग्रंथाची रचना करणारे असे दोन्ही भास्कराचार्य तसेच पायथागोरस सिद्धान्त त्याच्या अगोदर काही शतके मांडणारे बौद्धायन ऋषी मराठी होते. मराठी भाषकांनी मांडलेल्या काही संकल्पनांच्या जीवावर जगातील आजचे गणित आणि जवळजवळ सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला. उत्तम आरोग्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्र ज्या खाद्यघटकांची शिफारस करते ते हजारो वर्षांपासून महाराष्ट्रीय भोजनात आहेत. मराठी भाषा, मराठी भाषक आणि महाराष्ट्राने जगाला जे जे दिले त्याची माहिती स्वतंत्र लेखातून द्यावी लागेल.
जगाच्या इतिहासात आजवर मराठी आणि फ्रेंच या दोन भाषांतून मोठय़ा प्रमाणात ज्ञाननिर्मिती झाली आणि ज्ञानकोश निर्माण झाले. अन्य भाषांमधील माहितीकोश मराठी किंवा फ्रेंच ज्ञानकोशावर आधारित असतात. लाखो विषयांवर मराठी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. संगीत नाटक, पोवाडा, कीर्तन यांसह शंभराहून अधिक प्रकार केवळ मराठी भाषेत आहेत. एखाद्या भाषेची मक्तेदारी असलेले इतके प्रकार जगभरात मराठीशिवाय इतर कोणत्याही भाषेत शोधून सापडत नाहीत.
समृद्ध, संपन्न मराठी भाषा हाताशी असूनही महाराष्ट्रातील शिक्षणाचे माध्यम इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी असावे असा सल्ला काही लोक दुर्दैवाने भोळय़ाभाबडय़ा पालकांना देतात. सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी सतत कसे वाढतात याचे रसभरीत वर्णन हे लोक नेहमी करतात. त्यांचा सल्ला ऐकून इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी माध्यम निवडले. त्यांची पाहणी समर्थ मराठी संस्थेने केली. शालान्त परीक्षेच्या राज्य गुणवत्तायादीत १९०५पासून ८१वर्षे पुण्याच्या नू.म.वि.चे विद्यार्थी ८० टक्के जागा मिळवत होते. या शाळेतील मुलांनी १९८५पासून पालकांच्या आग्रहाने सेमी इंग्रजी निवडले तेव्हापासून ही शाळा गुणवत्तायादीतून दिसेनाशी झाली. पुण्यात सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाची संख्या वाढली, पण गुणवत्ता कमी झाली. गेल्या २७ वर्षांत पुण्याचा दहावीला महाराष्ट्रात पहिला आला नसून, बारा वर्षांत पहिल्या शंभरात नाही. पुण्यानंतर गुणवत्तायादीवर लातूरच्या मराठी माध्यमाचे वर्चस्व होते. तिथेही इंग्रजीतून शिकण्याची लाट आल्यावर गुणवत्तायादीत लातूरही दिसेना. विविध विषय शाळेत इंग्रजीतून सखोल स्वरूपात न समजल्याने अनेकजण पुढील शिक्षण अर्धवट सोडतात. जेमतेम तीन ते पाच टक्के विद्यार्थी अभियांत्रिकी (इंजि.)च्या चार वर्षांत प्रत्येक वर्षी सर्व विषयांत उत्तीर्ण होतात. वैद्यकीय, व्यवस्थापन, संगणक अभ्यासक्रमांची कथाही अशीच आहे. इंग्रजी माध्यम लादल्याचा हा दुष्परिणाम आहे.
ज्या आशयासाठी मराठीतून शंभर अक्षरे लागतात, त्यासाठी इंग्रजीतून तीनशे ते पाचशे अक्षरे लागतात. अक्षरांची संख्या अधिक असल्याने इंग्रजी पाठय़पुस्तके एकदा पूर्ण वाचणेही शालेय वर्षांत शक्य होत नाही, त्यामुळे समजून घेणे अशक्य होते. मराठी इंग्रजीत शब्द समजण्यातही फरक पडतो. मराठी शब्दांचा अर्थ परिचित मराठी शब्दांवरून समजतो. स्पर्शिका, छेदिका, समद्विभुज, समभुज, अपुष्प, सपुष्प, घरगुती यांचा अर्थ स्पर्श, छेद, भुजा, पुष्प, घर या शब्दांवरून सहज समजतो. टँजंट, सिकँट, आयसोसिलस, इक्विलॅटरल, क्रिप्टोघ्ॉम, फोरेंघ्ॉम, डोमेस्टिक हे शब्द मात्र टच, कट, साईड, फ्लॉवर, हाऊस या परिचित इंग्रजी शब्दांच्या आधारे सहज समजत नाहीत. परिचित शब्दांच्या आधारे बनलेले अर्थवाही शब्द मराठीत अधिक, इंग्रजीत कमी आहेत. अर्थवाही शब्दांच्या टंचाईमुळे गणित, शास्त्र समजण्यासाठी इंग्रजी अपुरी ठरते. या विषयांच्या अभ्यासासाठी इंग्लंडमध्ये संस्कृत, फ्रेंच, जर्मन, लॅटीन ग्रंथांचा आधार घेतात. इंग्रजीतून विषय नीट समजत नसल्याने प्रगत भाषांचे साहाय्य घ्यावे लागते.
महाराष्ट्रात इंग्रजी केंद्रित शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू झाल्यापासून झालेले प्रचंड नुकसान समृद्ध मराठी भाषेच्या साहाय्याने थांबवता येईल. हे नुकसान टाळण्यासाठी १) मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी सेमी इंग्रजीचा पर्याय शाळेत न स्वीकारता घरी स्वीकारावा. मराठी माध्यम शाळेत सर्व विषय केवळ मराठीतून शिकवले जावेत आणि त्या विषयांची इंग्रजी पुस्तके अवांतर वाचन म्हणून घरी वाचावीत.
२) ज्यांनी यापूर्वी सेमी इंग्रजी पर्याय स्वीकारला आहे त्यांनी एक वर्षभर घरी गणित आणि शास्त्र विषयांचा अभ्यास कटाक्षाने मराठी पुस्तकातून करावा आणि ते जमू लागले, की पुढील वर्षी सेमी इंग्रजीचा पर्याय सोडून पूर्ण मराठी माध्यम स्वीकारावे.
३) इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी खासगी शिकवण्या लावून मुलांचे मराठी पक्के करून घ्यावे. गणित, शास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र विषयांची मराठी पुस्तके पालकांनी अगोदर वाचून दाखवावी आणि मग मुलांना वाचायला द्यावीत. अगोदर मराठीतून अभ्यास करून घेतल्यास प्रत्येक विषय इंग्रजीतून नीट कळेल.
४) इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी ही सर्व धडपड केवळ पालकांनी करण्यापेक्षा शाळेने सहकार्य करावे. वर्गात इंग्रजीसह मराठीतून शिकवून निममराठी पर्याय स्वीकारावा असा प्रस्ताव मी अनेक इंग्रजी माध्यम शाळांमध्ये दिला आहे. ही पद्धत मुलांसाठी खूप उपयुक्त ठरेल असे काही शाळांच्या मुख्याध्यापकांना पटले आहे, पण विविध गैरसमजांमुळे पालक या उत्तम योजनेला विरोध करीत आहेत. पालकांनी याचा गंभीरपणे विचार करून निममराठी पर्यायाचा लाभ घेऊन आपल्या मुलांचा अभ्यास सुधारावा, असे मी आवाहन करतो.
ज्या इंग्रजी माध्यम शाळेत निममराठी पर्याय स्वीकारला जाईल त्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमासारखे झळाळते यशही मिळेल. निम पर्यायाचे महत्त्व आणि लाभ याबाबत संस्थेच्या वतीने विनामूल्य व्याख्याने दिली जातात. पालक, शिक्षक, संस्थाचालक यांनी या नव्या विचाराला पाठिंबा द्यावा हे आवाहन!
काही अपरिहार्य कारणास्तव सोमवारी प्रसिद्ध होणारे ‘लालकिल्ला’ हे सदर आजच्या अंकात प्रसिद्ध होऊ शकत नाही.