वार्ता ग्रंथांची.. : पक्षपाती, पण उपयुक्त! Print

शनिवार, २५ ऑगस्ट २०१२

‘क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनच्या अबोटाबाद येथील बंगल्यात घुसण्यास अमेरिकी पथके जानेवारी २०११ पासून तयार होती.. अध्यक्ष बराक ओबामा यांनीच याकामी चालढकल केली- एकदा नव्हे, तीनदा त्यांनी आदेशच दिले नाहीत’ या सनसनाटी आरोपासह, ओबामांना राज्य करण्यास नालायक ठरवू पाहणारे ‘लीडिंग फ्रॉम बिहाइंड’ हे पुस्तक अमेरिकेत सध्या खपू लागले आहे. २१ ऑगस्ट रोजी बाजारात आलेल्या पुस्तकातील जो भाग भारतीय वृत्तपत्रांत प्रसिद्धीसाठी ‘प्रेस ट्रस्ट’ वृत्तसंस्थेमार्फत आला होता,

त्यात तर ओबामा प्रशासनाला ओसामा-कारवाई प्रकरणी पाकिस्तानी ‘आयएसआय’ने मदतच केली होती, असे प्रतिपादन होते. आयएसआयची तरफदारी करणे हा पुस्तकाचा हेतू नसून, ओबामा हे एकंदरीतच कामात मंद आहेत, धोरणे ठरवणे, पुढाकार घेणे त्यांना कसे जमतच नाही, याच्या सुरस कथांवरच लेखक रिचर्ड मिनिटर यांचा भर आहे. मिनिटर हे शोधपत्रकार म्हणून ओळखले जातात आणि त्यांची यापूर्वीची दोन पुस्तके न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत झळकली होती. त्यापैकी ‘लूझिंग बिन लादेन’ (२००३) हे त्यांचे पुस्तक लादेन-तपासाची माहिती देताना जॉर्ज डब्ल्यु. बुश यांचे गोडवे गाणारे होते. मात्र, ओबामांवर टीका करताना त्यांनी लादेन-कारवाईच्या तयारीबाबत यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या तारखांची उलटापालट केली आहे. खंडन न करता केलेली ही चलाखी म्हणजे ‘खोटेपणा’च, असा आरोप आता त्यांच्यावर होत आहे. परंतु पक्षपाती असले, तरी मिनिटर यांचे हेही पुस्तक ‘बेस्टसेलर’ ठरेल, कारण राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर ओबामांबद्दल उलटसुलट चर्चा करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्तच म्हणायला हवे!