विशेष लेख : रिपब्लिकन राजकारणाची फेरमांडणी हवी! Print

 

मधु कांबळे - बुधवार, ३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हा पक्ष ५५ वर्षांपूर्वी स्थापन झाला आणि पुढे त्याची शकले होत गेली. या खंडित शक्तीने एकत्र यायचे असेल, तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पक्षासाठी करून ठेवलेल्या वैचारिक मांडणीकडे पुन्हा पाहावे लागेल आणि निवडणुकांच्या व्यवहारात ‘रिपब्लिकन आघाडी’निशी किंवा स्वबळावर उतरून लाचारीचे राजकारण सोडून द्यावे लागेल,  अशी सूचना मांडणारा हा लेख..


स्वतंत्र भारताने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीला व राज्यघटनेला पूरक अशा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वैचारिक मांडणी केली होती. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी ३ ऑक्टोबर १९५७ ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली, त्याला ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. पक्षाच्या स्थापनेनंतरचा सुरुवातीचा पाच-दहा वर्षांचा कालखंड सोडला तरी या राजकीय पक्षाची काय अवस्था झाली आहे, याबद्दल खूप काही बोलून झाले आहे. नेतृत्वाची स्पर्धा, गटबाजी, आत्मकेंद्रित राजकारण, सामाजिक-आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, भावनिक प्रश्नांना अवास्तव महत्त्व, सौदेबाजी, सत्तेची हाव, कुणाच्या तरी वळचणीला राहण्याची लाचारी यावर आतापर्यंत बराच खल झाला आहे. त्यातच नव्या नव्या राजकीय युत्या, आघाडय़ा आंबेडकरी कार्यकर्त्यांना कोडय़ात टाकणाऱ्या ठरत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्षाला आज नगण्य स्थान आहे. ताकद असूनही ती वाया जात आहे, ही त्यातील खरी शोकांतिका आहे. नव्या पिढीवर चळवळीचा प्रभाव नाही, ज्यांना काही करावे असे वाटते असा तरुण वर्ग चाचपडत आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संकल्पनेला धरून बदललेल्या सामाजिक  व आर्थिक परिस्थितीत रिपब्लिकन राजकारणाची नव्याने मांडणी करण्याची आवश्यकता आहे.
डॉ. आंबेडकरांनी भारतीय जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रातच रिपब्लिकन पक्षाची व्यापक संकल्पना मांडली आहे. खुले पत्र हाच रिपब्लिकन पक्षाचा जाहीरनामा आहे आणि आजच्या राजकारणालाही तो तंतोतंत लागू आहे. रिपब्लिकन पक्षाची मूलभूत भूमिका त्यात त्यांनी मांडली आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वावर रिपब्लिकन पक्षाची उभारणी केली जाईल आणि संसदेत येणाऱ्या प्रत्येक विधेयकाची या तीन निकषांवर कसोटी पाहिली जाईल. याचाच अर्थ संसदेत तयार होणारा कोणताही कायदा स्वातंत्र्य हिरावणारा, समता नाकारणारा आणि बंधुता धुडकावणारा नसला पाहिजे, ही व्यापकता क्वचितच अन्य पक्षांच्या जाहीरनाम्यात पाहायला मिळेल. संसदीय लोकशाहीच्या रक्षणासाठी रिपब्लिकन पक्ष असेल असेही बाबासाहेबांनी म्हटले आहे.
आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या काय, याचे दाखले त्यांनी स्वत:च दिले आहेत. ब्रिटिश संविधानावरील ग्रंथात वॉल्टर बेज्हॉट यांनी ‘चर्चेवर आधारलेली शासन संस्था म्हणजे लोकशाही’ असे म्हटले होते, तर ‘लोकांचे, लोकांनी नियुक्त केलेले आणि लोकांकरिता राबणारे सरकार,’ ही अब्राहम लिंकन यांची लोकशाहीची व्याख्या जगप्रसिद्ध आहे. आंबेडकरांची लोकशाहीची व्याख्या यापेक्षा वेगळी आहे. ‘लोकांच्या आर्थिक व सामाजिक जीवनात रक्तविहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही.’ त्यांची ही लोकशाहीची संकल्पना सुस्पष्ट, व्यापक आणि भारतीय समाज व्यवस्था बदलण्यासाठी ती अधिक उपकारक आहे, असे म्हणावे लागेल. कारण लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी समाज व्यवस्थेत विषमता नसली पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. पीडित व दडपलेला वर्ग समाजात असता कामा नये. एका बाजूला सर्व हक्क व सत्तेचे केंद्रीकरण ज्यांच्या हाती झाले आहे असा एक वर्ग आणि दुसऱ्या बाजूला सर्व प्रकारचे भार वाहण्याचे काम करणारा वर्ग, अशी समाजात विभागणी असू नये. अशी विषमता, अशी अन्यायकारण विभागणी व त्यावर आधारलेली समाजरचना यामध्ये िहसात्मक क्रांतीची बीजे असतात, मग त्याचे परिमार्जन करणे लोकशाहीला अशक्य होते. नक्षलवादाच्या जन्माआधीच बाबासाहेबांनी हा इशारा दिला होता, परंतु त्याकडे कोण लक्ष देणार?
रिपब्लिकन पक्षाची मांडणी करताना बाबासाहेबांनी राजकीय व्यवहारात संविधानिक नीतीचाही आग्रह धरला आहे आणि तो सर्वच राजकीय पक्षांना व राजकारण्यांना लागू आहे. राजकारणातील वंशपरंपरा व घराणेशाही लोकशाहीच्या विरोधात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. जॉर्ज वाशिंग्टनचे त्यासाठी ते उदाहरण देतात. लोकांच्या प्रेमाखातर व आग्रहाखातर वॉशिंग्टन दोनदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले, परंतु तिसऱ्यांदा त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ही सांविधानिक नीती होय. लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी नीतिमान समाज व्यवस्थेची आवश्यकता असते असे त्यांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष म्हणजे काय याचीही व्याख्या त्यांनी केली आहे. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन मतदारांनी केलेली संघटना म्हणजे राजकीय पक्ष होय. बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेमागील थोडक्यात संकल्पना ही अशी होती. मात्र जे प्रत्यक्ष चित्र आज लोकांसमोर आहे;  ते अगदी निराशाजनक आहे.
बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची बांधणी व उभारणी करण्यात नेतृत्वाचा अंहपणा व त्यातून निर्माण होणारी गटबाजी हा सर्वात मोठा अडथळा आहे. गटबाजीत शक्तीचे विभाजन होते आणि अपयशाशिवाय दुसरे काहीही पदरात पडत नाही, त्यात कोणत्याच नेत्याचाही फायदा आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु आता झाले गेले विसरून रिपब्लिकन राजकारणाची नव्याने मांडणी करण्याचा किमान ५५ वर्षांनंतर तरी विचार व्हायला हवा. त्यासाठी काही पर्यायांचा विचार करायला हरकत नाही. सर्व नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे, अशी अजूनही रिपब्लिकन कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु प्रत्येक नेत्याची महत्त्वाकांक्षा ऐक्याच्या आड येत आहे, दुरावाही इतका वाढला आहे, की त्यामुळे ऐक्याचा प्रयोग प्राप्त परिस्थितीत यशस्वी होईल व तो टिकेल असे वाटत नाही. त्याला दुसरा पर्याय निवडणुकांमध्ये आघाडी करणे हा होऊ शकतो. उदाहरणार्थ पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे अकराहून अधिक गट आहेत. त्यांचा त्यांचा अजेंडा वेगळा आहे. परंतु निवडणुकीत डावी आघाडी म्हणून ते एकत्र येतात, त्यामुळेच त्या राज्याची प्रदीर्घ काळ सत्ता त्यांनी हातात ठेवली. रिपब्लिकन नेत्यांनी आपापले गट वेगळे ठेवावेत, परंतु निवडणूक रिपब्लिकन आघाडी म्हणून लढवावी, त्यामुळे मतविभागणी टाळून पक्षाची ताकद दाखविता येईल. रिपब्लिकन नेत्यांनी एवढा मनाचा मोठेपणा दाखविला व निवडणुकीपुरते का होईना एकत्र आले तर महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल बदलू शकतात. १९५७ व १९९६  च्या लोकसभा निवडणुकांची उदाहरणे त्यासाठी नजरेसमोर ठेवावीत. या निवडणुकांमध्ये थोडेबहुत पक्षाला यश मिळाले, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट बदलण्याची किमया एकसंध रिपब्लिकन शक्तीने करून दाखविली होती.
दुसरे असे की बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारितच रिपब्लिकन पक्षाची आताच्या बदललेल्या परिस्थितीत फेरमांडणी केली पाहिजे. पक्षाचा एक स्वंतत्र कार्यक्रम हवा. भावनिक प्रश्न थोडे बाजूला ठेवले पाहिजेत. भावनिक प्रश्नामुळे व्यापक सामाजिक सहानुभूती गमावून बसण्याचा धोका असतो आणि पक्ष विस्ताराला मर्यादा येऊ शकतात. रिपब्लिकन पक्षाने समाजातील ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करावे, इतरांचे प्रतिनिधित्व करायला इतर पक्ष आहेतच. त्यासाठी सामाजिक व आर्थिक प्रश्नावर पक्षाची सुस्पष्ट भूमिका असली पाहिजे. पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीचा पत्रक काढून निषेध करणे किंवा रस्त्यावर येऊन निदर्शने करणे म्हणजे पक्षाचा आर्थिक कार्यक्रम होऊ शकत नाही. देशाचे, राज्याचे आर्थिक धोरण काय असले पाहिजे, याची रिपब्लिकन पक्षाने मांडणी केली पाहिजे. ते धोरण बरोबर की चुकीचे हा वेगळा प्रश्न राहील.  
रिपब्लिकन पक्षाचा नेमका किती मतदार आहे हेच अजून जाणून घेण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यासाठी पुढील पाच वर्षे रिपब्लिकन पक्षाने ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, त्यात थोडे यश येईल व बरेच अपयश येईल; परंतु आपल्या खात्यावर किती मते आहेत, हे आजमावता येईल. फार तर निवडणुकीनंतर त्या त्या परिस्थितीत युती-आघाडय़ा करायला हरकत नाही. परंतु या आघाडय़ा करताना पक्षाच्या मूलभूत विचारसरणीशी प्रतारणा होणार नाही याची खबरदारी घेतली गेली पाहिजे. पक्षाची मतपेटीतील ताकद किती हे कळल्यानंतर पुढील राजकारणाची दिशा ठरविणे सोपे जाईल. राजकारणात कायम कोणी कुणाचा शत्रू वा मित्र नसतो हे खरे आहे, परंतु त्यासाठी किमान समान कार्यक्रमावर युती आधारलेली असली पाहिजे. त्याला भिकेचे वा लाचारीचे स्वरूप येऊ नये.
बाबासाहेब आंबेडकरांनी  शेवग्याच्या झाडाची गोष्ट सांगितली आहे. घरात चार धडधाकट भाऊ दारातल्या शेवग्याच्या झाडवरील शेंगांवर गुजराण करायचे. शेवग्याच्या शेंगा विकून चार भावांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार, सारे कुटुंब अर्धपोटीच असायचे. परंतु त्याची त्या भावांना कीही फिकीर नव्हती, सवयीचा गुणधर्म म्हणा. एके दिवशी त्यांच्या घरी एक सोयरा येतो. त्यालाही अर्धपोटीच झोपावे लागते. परंतु त्याला झोप लागत नाही. घरी एवढी धट्टीकट्टी माणसे असताना अशी ही परिस्थिती का, याचा तो रात्रभर विचार करतो. मग त्याच्या लक्षात येते की, दारातल्या शेवग्याच्या झाडाने या कुटुंबाला लाचार केले आहे. सोयरा पहाटे उठतो शेवग्याचे झाड तोडतो आणि निघून जातो. सकाळी बघतात तर शेवग्याचे झाड तोडलेले आहे. मग सोयऱ्याला लाखोली वहायला सुरुवात झाली. पण आता पुढे काय, खायचे काय, या प्रश्नाने चारही भाऊ चारी दिशेला निधून गेले. कष्ट करू लागले, चार पैसै हातात मिळू लागले, मुलाबाळांना पोटभर अन्न, कपडालत्ता मिळू लागला, दारिद्रय़ निघून गेले, लाचारी संपली. रिपब्लिकन राजकारणाची फेरमांडणी करताना पक्षनेतृत्वाने यापासून अवश्य बोध घ्यावा!