विशेष लेख : दीक्षा झाली, दृष्टी कधी? Print

पद्माकर कांबळे ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२

दसऱ्याच्या दिवशी १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवून आणलेले धम्मचक्र प्रवर्तन, ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यानंतरची आजची तिसरी पिढीही डोळसपणे धर्माकडे पाहू शकेल, इतकी वैचारिक साधनसामग्री डॉ. आंबेडकर यांनी निर्माण करून ठेवली होती.. ते आधार आज घेऊ पाहणारा हा लेख..


माझ्या बऱ्यापैकी परिचयाचा एक उच्चशिक्षित बौद्ध मित्र मांसाहार करीत नाही. याचं कारण विचारता त्यानं ‘गौतम बुद्ध अहिंसा तत्त्वाचे पुरस्कर्ते होते, त्यांना हिंसा मान्य नव्हती. त्यामुळे बौद्धांनी मांसाहार करणे योग्य नाही!’ असं उत्तर दिलं. कोणी काय खावे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण माझ्या या मित्राने ‘शाकाहारा’चा संबंध थेट बौद्ध धर्माशी व बुद्धाच्या तत्त्वज्ञानाशी जोडल्यामुळे त्याचा हा ‘सोवळेपणा’ मला खटकला.
बुद्धाच्या मते अहिंसा हे ‘तत्त्व’ होते, तो काही नियम नव्हता. कोणतेही तत्त्व ‘कृतिस्वातंत्र्य’ देते तसे कृतिस्वातंत्र्य नियम देत नाही. एक तर तुम्हाला नियम मोडावा लागतो किंवा नियमच तुम्हाला मोडून टाकतो. बुद्धाने भिक्षूंनाही मांसाहार करण्यास मनाई केलेली नाही. भिक्षूने स्वत: कोणत्याही प्राण्यास मारू नये. मात्र त्याच्या भिक्षापात्रात कोणी मांसापासून बनविलेले पदार्थ टाकले तर ते खाण्यास बुद्धाने प्रतिबंध केलेला नव्हता. जैनांनी शाकाहाराचा निरपवाद तत्त्व तसेच नियम म्हणून स्वीकार केला होता, तसे बुद्धाबाबत म्हणता येत नाही. त्याने ते यज्ञयागात केल्या जाणाऱ्या पशुहत्येचा निषेध केला होता. बुद्धाचे निर्वाण झाले तेही चुंद नावाच्या लोहाराने वाढलेला सुकर मद्दव नावाचा पदार्थ खाल्ल्यामुळे. (संदर्भ : भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म)
कोणतीही गोष्ट ‘आंधळे’पणाने स्वीकारली की वैचारिक गोंधळ होणे स्वाभाविक आहे. माझ्या मित्राचे हे उदाहरण याच पठडीतले. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध ‘धम्म’ स्वीकारल्यानंतरची तिसरी पिढी अस्तित्वात आहे. शाकाहाराचा आग्रह धरणारा तो माझा मित्र व मी त्याच पिढीचे प्रतिनिधी, पण दृष्टिकोन भिन्न.
गतीविना कृती
५६ वर्षांपूर्वी अशोक विजयादशमीदिनी डॉ. आंबेडकर यांनी नागपूर येथे केलेले धम्मचक्र प्रवर्तन ऐतिहासिक होते. ‘‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही,’’ अशी प्रतिज्ञा डॉ. आंबेडकरांनी १९३५ रोजी येवला येथे भरलेल्या परिषदेत केली अन् तब्बल २१ वर्षांनंतर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्या प्रतिज्ञेची पूर्तता केली. अनेक र्वष धर्मग्रंथांचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर आयुष्याच्या संध्यासमयी डॉ. आंबेडकरांनी केलेले धर्मातर ही विचारपूर्वक व गांभीर्याने केलेली कृती होती. एखाद्या राजकीय नेत्यावरील निष्ठेमुळे लाखो लोकांनी ‘स्वेच्छे’ने समारंभपूर्वक धर्मातर केल्याचे हे एकमेव उदाहरण.
नागपूर येथील धम्मदीक्षेच्या सोहळ्यानंतर दीड महिन्यातच डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या राजकीय क्षेत्रात अभिप्रेत असलेल्या संकल्पित राजकीय पक्षाची बांधणी जशी अपुरी राहिली त्याचप्रमाणे धम्म चळवळ भारतभर गतिमान करण्याच्या त्यांच्या स्वप्नाला मूर्तरूप येऊ शकले नाही.
जीवनाच्या अखेरीस ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज गॉस्पेल’ या खासगीरीत्या वितरित केलेल्या आपल्या ग्रंथात आवश्यक तेथे काटछाट करून काही ठिकाणी भर घालून तो ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या नव्या शीर्षकानिशी छापण्याचे डॉ. आंबेडकरांनी ठरविले. डॉ. आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर त्यांनीच स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ने हा ग्रंथ प्रकाशित केला; परंतु आपल्या निधनाच्या आदल्या रात्री डॉ. आंबेडकरांनी या ग्रंथासाठी लिहिलेली महत्त्वपूर्ण प्रस्तावना वगळून.
‘विवेक आणि धर्म’ यांची सांगड कशी घालायची, या डॉ. आंबेडकरांच्या चिंतनाची साक्ष हा ग्रंथ देतो. या ग्रंथात लोकरुचीसाठी अद्भुतता, अतिरंजकतेचा काही भाग दिसून येतो. परंतु बुद्धविचाराच्या, तत्त्वज्ञानाच्या बाबतीत मात्र डॉ. आंबेडकरांनी पूर्ण ‘बुद्धिवादी दृष्टिकोन’ स्वीकारला आहे. आपल्या बुद्धीच्या कसोटीवर त्यांनी ‘बौद्ध धर्म’ पारखून घेतला. त्यामुळे तत्कालीन ‘पोथीनिष्ठ बौद्धां’ना हा ‘धम्म’ रुचला नाही.
.. हे बुद्धाचे नव्हे!
या ग्रंथात बुद्धाची म्हणून समजली जाणारी वचने डॉ. आंबेडकरांनी तीन कसोटय़ा लावून पारखून घेण्याचा प्रयत्न केला. (१) जे बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे. (२) जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुत: ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही. (३) बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चिंत आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चिंत नाहीत अशी विषयांची दोन प्रकारांत वर्गवारी केली आहे. यापैकी जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात. बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ, समतावादी असा बौद्ध धम्म डॉ. आंबेडकरांना जवळचा वाटला. या ‘बौद्ध धम्मा’वर डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र ठसा उमटला आहे. ‘बुद्धिस्ट वे ऑफ लाइफ’ म्हणूनही त्याकडे पाहता येईल.
आज संख्याबळाचा विचार करता महाराष्ट्रातील एकूण दलित (राज्यघटनेच्या परिभाषेत अनुसूचित जाती) लोकसंख्येच्या तुलनेत बौद्धधर्मीय संख्येने जास्त, तुलनेने विशेष जागृत, प्रगत व संघटित आहेत. साक्षरता, उच्चशिक्षण, प्रशासन, साहित्य, शिक्षण क्षेत्र यांत त्यांनी लक्षणीय प्रगती साध्य केली आहे. बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनामुळे येथील दलितांमध्ये एक नवे आत्मभान आले, स्वतंत्र ओळख निर्माण झाली.
ही सांस्कृतिक प्रगती आहे?
परंतु आजही डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म ‘जाणणारे’ कमी आहेत. ‘‘मी सांगतो म्हणून नव्हे तर ज्यांच्या बुद्धीला पटेल त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारावा. बौद्ध होणे सोपे नाही. तुम्ही बौद्ध होत आहात याचा अर्थ तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. बौद्ध धम्माला कमीपणा येईल, असे कोणतेही काम तुमच्या हातू होता कामा नये,’’ असा डॉ. आंबेडकरांचा संदेश होता. आज दैनंदिन जीवनात, व्यवहारात आपल्या सोयीने ‘बौद्ध’ होणाऱ्यांची झपाटय़ाने वाढत आहे. लग्नविधी आणि अंत्यविधीला फक्त ‘बुद्धं शरणम् गच्छामी’ म्हणण्यापुरताच त्यांचा बौद्ध धर्म आहे. त्यांना ‘आंबेडकर’ही आरक्षणापुरतेच हवे असतात. या ‘ढोंगा’मुळे ते कोणाला कमीपणा आणतात? अन् दुसरीकडे स्वत:ला ‘कट्टर’ म्हणविणारे आहेत. ही ‘कट्टर’पणाची काय भानगड आहे? कट्टरता आणि बौद्ध धम्म याचा संबंध काय? कट्टर हिंदुत्ववादी असू शकतो, कट्टर मुस्लीम, शीख अगर ख्रिश्चन, ज्यू असू शकतो! पण बौद्धधर्मीय ‘कट्टर’ कसा असू शकतो? तो ‘सम्यक’ बौद्ध होणे का नाकारतो?
बौद्ध पद्धतीने लग्नविधी साधा, सुटसुटीत असावा, लग्नसोहळ्यात भपकेबाजपणा नसावा, असा डॉ. आंबेडकरांचा आग्रह असे. पण आज किती बौद्ध लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देतात? लग्नविधींवर केला जाणारा खर्च शक्य तितका कमी करण्याचे प्रयत्न न्या. रानडे, महात्मा जोतिराव फुले या सुधारकांनी एकोणिसाव्या शतकात केले; पण त्याला फारसे यश आले नाही, असे आजची स्थिती पाहून म्हणावे लागते. डॉ. आंबेडकरांचा प्रयत्नही आधीच्या सुधारकांच्या मालिकेला साजेसा होता. तो यशस्वी वा अयशस्वी होणे हे अखेर अनुयायांवर अवलंबून असते.
‘धर्म’ आणि ‘धम्म’ हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून न वापरता त्या दोन भिन्न संकल्पना आहेत, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. धर्म या संस्कृत शब्दाचे प्राकृत रूप म्हणजे धम्म नव्हे. या दोन शब्दांत गुणात्मक फरक आहे. धर्म (रिलीजन) वैयक्तिक असून ज्याने-त्याने तो आपल्यापुरताच मर्यादित ठेवावा. याउलट ‘धम्म’ हा मूलत: सामाजिक असतो. ‘धम्म’ म्हणजे सदाचरण. म्हणजे जीवनातील सर्व क्षेत्रांत माणसा-माणसातील व्यवहार उचित असणे होय. विश्व, ईश्वर, आत्मा बौद्ध धम्माला याच्याशी कर्तव्य नाही. ‘माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू’ असल्याचे डॉ. आंबेडकर मानतात.
बौद्ध धम्मात फक्त संघदीक्षा होती. डॉ. आंबेडकरांनी संघदीक्षेला ज्या धम्मदीक्षेची जोड दिली ती अभूतपूर्व होती. संघदीक्षा देण्याचा अधिकार फक्त बौद्ध भिक्षूलाच असे. धम्मदीक्षा घेतलेल्या कोणाही व्यक्तीला इतरांना धम्मदीक्षा देण्याचा अधिकार आहे, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. नागपुरात झालेल्या दीक्षा समारंभात त्यांनी धम्मदीक्षा घेणाऱ्या लाखो अनुयायांना २२ प्रतिज्ञा घ्यावयास सांगितले तोही प्रकार अभिनव होता. धम्मदीक्षा, ती देण्यासाठी भिक्षू असणे आवश्यक नाही, अशी त्यांनी दिलेली मुभा आणि २२ प्रतिज्ञा ही नागपूरच्या दीक्षा समारंभाची तिन्ही वैशिष्टय़े सर्वस्वी नवीन होती. ‘‘मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध, विसंगत कोणतेही आचरण करणार नाही. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही,’’ अशा आशयाच्या त्या २२ प्रतिज्ञा आहेत. आपण डॉ. आंबेडकरांचे सच्चे निष्ठावान अनुयायी आहोत, असा आज वारसा सांगणारे कितीजण प्रत्यक्षात त्या २२ प्रतिज्ञांचे पालन करीत असतील हे सांगणे अवघड आहे. बुद्धमूर्तीसाठी, विहारांसाठी धम्मदान मागणे, गल्लोगल्ली धम्म परिषदा भरविणे तुलनेने सोपे आहे! डॉ. आंबेडकरांचे धम्मचक्र प्रवर्तन जगातील सर्वात जुन्या रूढी, परंपरा व सामाजिक व्यवस्थेविरुद्ध उघडपणे केलेले बंड होते. ‘भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन होईल!’ असे भाकीत १९०७ साली पी. लक्ष्मीनरसू या मद्रासच्या प्राध्यापकाने ‘द इसेन्स ऑफ बुद्धिझम’ हे पुस्तक प्रसिद्ध करताना वर्तविले होते. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती १९४८ साली प्रकाशित झाली ती डॉ. आंबेडकरांमुळे. त्यांनी या आवृत्तीला प्रस्तावनाही लिहिली होती.
‘मी भारत बौद्धमय करीन’ डॉ. आंबेडकरांची ही भूमिकासुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुता (कालाम, अस्सलायन आणि तैविज्य) या बौद्ध धर्मातील त्रिसूत्रांवर आधारलेली होती. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत याचा समावेश करताना ही तत्त्वे आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नसून त्याची मुळे मला बौद्ध तत्त्वज्ञानात सापडतात, असे डॉ. आंबेडकरांनी म्हटले. या तत्त्वांचा प्रसार म्हणजेच भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल म्हणता येईल.
सिद्धार्थ महाविद्यालयात वास्तव्यास असताना डॉ. आंबेडकरांनी बुद्धाचे जे चित्र काढले त्यात ‘डोळे उघडे असलेला बुद्ध’ त्यांनी रेखाटला. डॉ. आंबेडकरांना कोणत्या प्रकारचा बौद्ध धम्म अपेक्षित होता, याचे हे एक ‘डोळस’ उदाहरण होय. हेच उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून ‘आंबेडकरी अनुयायांनी’ भविष्यातील वाटचाल केली पाहिजे. तरच डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या ‘धम्मचक्रा’ला गती मिळेल.