विशेष लेख : इक वो भी दिवाली थी Print

 

विनायक अभ्यंकर - गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
(निवृत्त नौदल  अधिकारी)

चीनशी ५० वर्षांपूर्वी भारत पुरेसा लढलाच नाही आणि त्या वेळी आपण ज्या चुका केल्या, तशा आजही निराळय़ा तपशिलांनिशी करतोच आहोत, याची आठवण देणारे हे अनुभवाचे बोल..
पराजयाला कोणीच वाली नसतो, पण विजयाचे वाटेकरी मात्र अनेक होतात. अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडून आपली जबाबदारी झटकणारे कालौघात लुप्त होतात. लोकशाही शासनव्यवस्थेत ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण’ हे खरे तर लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या लोकांचे म्हणजे सरकारचे असते. हा न्याय एकदा मान्य केला, तर १९६२ चे ‘न लढलेले युद्ध’ हा तत्कालीन सरकारचा अपराध होता.

युद्ध लढत असताना ते दोन सैन्यांत लढावयाचे असते, परंतु १९६२ च्या युद्धात भारतीय सेना केवळ झुंजता झुंजता ‘पीछे हटत’ होती. ‘लाल सेना’ अरुणाचल गिळंकृत करण्याच्या मनसुब्याने पुढे मुसंडी मारत होती. म्हणून खरे तर हे ‘न लढलेले युद्ध’ म्हणूनच संबोधले पहिजे.
१९५२ पासून चीनची लाल सेना भारताच्या ईशान्य  भागापर्यंत सैन्याच्या हालचाली सुकर व सोयीस्कर व्हाव्यात म्हणून पक्के रस्ते बांधत होती. ७५० मैल लांबीचा हा रस्ता बांधून काढत असताना चीनने ११२ मैलांचा भारतीय भूभाग आपसूक गिळंकृत केला, तेव्हा आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाने ‘तिकडे गवताची काडीही उगवत नाही’ असे संसदेमध्ये उत्तर देत काणाडोळा केला. खलिता पाठवून चौ-एन लाय यांना त्याबद्दल जाब विचारला, तेव्हा धूर्तपणे त्यांनी उत्तर दिले. ‘या भागातील नकाशे चुकीचे व जुने आहेत, त्यात अजूनही बदल होणे बाकी आहे.’
याबाबत अनुभवी व कार्यतत्पर सेनाधिकारी जनरल थिमय्या, जनरल सेन, जनरल थोरात हे मान्यवर, सरकारला चीनच्या लष्करी डावपेच व भविष्यातील संकटाचा इशारा देत होते. सहजीवन, शांती, अहिंसा या सहिष्णु भावना पुस्तकात शोभून दिसतात, पण व्यवहारात निष्फळ ठरतात अन् त्याच गर्तेत आमचे सरकार तेव्हा गुरफटून पडले होते. याचाच फायदा घेत चिनी ड्रॅगनने विश्वासघाताची सुरी आमच्या उरात खुपसली. जनरल एसएसपी थोरात यांनी तर त्या काळात ‘माऊंटेनीअरिंग ब्रिगेड व तिचे प्रशिक्षण’ याबाबत तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्याकडे एक अहवाल पाठवून त्याचे महत्त्व विशद केले होते, पण ते कृष्ण मेनन यांनी बासनात बांधून ठेवले. उलट जनरल थोरात यांना ‘चीनकडे आम्ही बघू. तुम्ही त्याची काळजी करणे सोडा!’ असा निरोप पाठवला.
सैन्याकडे दुर्लक्ष
 पुढे स्व. यशवंतराव चव्हाणांनी तो अहवाल बाहेर काढून वर्षभरात पर्वतीय सैनिकांच्या पाच माऊंट डिव्हिजन उभ्या केल्या. (एक डिव्हिजन म्हणजे पंधरा ते वीस हजार जवान) अपमानित झालेल्या सेनापतींना सन्मानाने परत बोलावून डिफेन्स कौन्सिलची पुनर्रचना केली.
पंडित नेहरूंशी असलेले गाढ मित्रत्वाचे संबंध, साम्यवादाशी जवळीक, राजकीय सत्तेमुळे येणारा मस्तवालपणा यामुळे कृष्ण मेनन या बुद्धिमान नेतृत्वाचे अधपतन झाले. अनुभवी सेनाधिकाऱ्यांशी उद्धट वर्तणूक आणि हुकूमशाही वृत्तीमुळे संरक्षण मंत्रालयाकडून सेनादलांत सुधारणा होण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होऊन सेनाधिकाऱ्याचे नैतिक खच्चीकरण तर झालेच, शिवाय साधनसामग्रीची वानवा यामुळे जुनाट-पुचाट हत्यारांनी लढणाऱ्या सैन्याची पीछेहाट होऊन हकनाक झुंजार सैन्याला अपयशाचे धनी व्हावे लागले. या युद्धात कर्नल हुद्दय़ाच्या एका अधिकाऱ्याने आपल्या रक्ताने चपातीवर संदेश लिहून तो दिल्लीला पाठवला, यावरून वाचकांच्या लक्षात यावे किती विषम परिस्थितीत आमचे सैनिक प्राणांची बाजी लावत. हे २० ऑक्टोबरला ऐन हिवाळ्यात सुरू झालेले युद्ध लढत होते. बर्फाच्छादित भागात साधे लोकरी हातमोजे- पायमोजही आमच्या जवानांकडे नव्हते. सगळाच अजागळपणा.
त्या आधी म्हणजे १९४७ ला फाळणीसह स्वतंत्र झालेल्या भारताने १९६२ पर्यंत, म्हणजे तब्बल १५ वर्षे भारताला विकास प्रथम, मग संरक्षण या भ्रमात राजकारणी नेत्यांनी गुंतवून ठेवले होते. (Defence versus Development ) हा अनावश्यक व धोक्याचा वाद उद्भवल्यामुळे लष्कराकडे दुर्लक्ष झाले. फाळणीनंतर विभागलेले लष्कर जसे मिळाले तसेच आमचे सरकार फक्त पोसत होते, जोपासत होते. आर्थिक व सामजिक सामर्थ्यांपुढेच जग झुकत असते किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर वजन वाढवायचे असेल,  तर प्रथम एक प्रभावी, प्रत्ययकारी, प्रतापी सैन्याची उभारणी करणे महत्त्वाचे असते. नेहरू सरकारने चिनी राज्यकर्त्यांवर फाजील विश्वास ठेवून सैन्याकडे काणाडोळा करत बेखबर धोरण आखून स्वतच्या पायावर धोंडा मारून घेतला. सैन्य हे राजकीय, नैतिक पाठिंब्यावर व शिबंदीवर चालत असते. सैन्य हा राष्ट्रीय आपत्तीत सर्वसंगपरित्याग करून लढणारा समुदाय असतो, हे नेहरू सरकार पूर्णपणे विसरले. आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचा ध्यास लागलेले नेहरू चिनी राज्यकर्त्यांच्या अंत:करणाचा ठाव घेताना चुकले. माओत्से तुंग, चौ एन लाय यांनी पंडितजींचा भ्रमनिरास करून भारताला खरे तर जागे केले. चीनचा हा लत्ताप्रहार म्हणजे खरे तर एक इष्टापत्तीच. कारण चीनच्या या आक्रमक तडाख्यानंतर भारत सरकारने संरक्षण अंदाजपत्रकात ८६७ कोटी रुपयांची तरतूद करून संरक्षण विभागाच्या विकासाला चालना दिली.
युद्धाच्या शेवटी, १५ नोव्हेंबरपासून चिनी सैन्याने  मोठी मुसंडी मारून नेफाच्या लोहीत डिव्हिजनमधील लावांग या ठाण्यावर हल्ला चढवला आणि ते ताब्यात घेऊन आपला मोर्चा कामंग डिव्हिजनकडे वळवून ‘बोमदिला’ हे महत्त्वाचे उत्तर सीमेवरचे ठाणे काबीज केले. यामुळे वातावरण फारच तापले. चीन पूर्वाचल भागातून, आसाम फूट हिल्स भागात घुसतो की काय या भयगंडाने शासन पछाडले. पंडित नेहरू भांबावलेल्या मनस्थितीत अनवधानाने बोलून गेले, ‘आसामी जनतेच्या विचाराने माझे मन व्यथित झाले आहे.’ संपूर्ण आसामचे शासन कोलमडून पडले आणि एकच हलकल्लोळ आसामात माजला. त्या काळात अमेरिकन राजनीतिज्ञ जॉन केनेथ गालब्रेथ यांनी नेहरूंचे वर्णन ‘एक भांबावलेले दिशाहीन मूल’ असे केले आहे.
आपल्याला प्रतिकारच होत नसल्याने, आत खेचून प्राणघातक हल्ला असे तर भारतीय सैन्याचे धोरण नाही ना, या संभ्रमात चीनने २० नोव्हेंबर रोजी युद्धबंदी जाहीर करून भारताला अचंबित करून धक्का दिला. चीनचेसुद्धा भारताबद्दलचे आडाखे चुकले, तसेच अमेरिका, ब्रिटन, रशिया यांनी भारताला समर्थन देऊन युद्धसाहित्याचा पुरवठा सुरू केला, पण तोवर चीनने भारताची हजारो मैल भूमी व्याप्त केली जी आजही त्यांच्या ताब्यात आहे. या युद्धातली आणखी एक अनाकलनीय गोष्ट म्हणजे परकीय मित्रांच्या सल्ल्यामुळे नेहरूंनी वायुदलाचा युद्धात वापरच केला नाही. का? तर म्हणे आपल्या आकाशयोद्धय़ांना इतक्या उंच ‘हाय अल्टिटय़ूड’ रणभूमीचा अनुभव नाही; परंतु पहिल्या व दुसऱ्या महायुद्धात वेलिंगकर, पुरोहित, अर्जुनसिंग, इंद्रलाल रॉय, डेव्हिड गार्नर, पंडित नारायण खंडेराव, शितोळे, रामस्वामी राजाराम, दिनशा एडलजी इत्यादी १२ पेक्षा जास्त आकाशयोद्धय़ांनी उंच गरुडभरारी घेत (Distinguished Flying Cross) हे सर्वोच्च शौर्यपदक मिळवले होते. असे असताना वायुदलाला युद्धात न उतरवून सरकारने काय साधले? भारतीय वायुदलाला या युद्धात फक्त सामग्री वाहन व जायबंदी सैन्याची ने-आण एवढीच कामगिरी करण्याची परवानगी होती.  वायुदलाचा प्रत्यक्ष युद्धभूमीवर उपयोग करून घेतला असता, तर या युद्धाचा इतिहास व भूगोल निश्चितच वेगळा लिहिला गेला असता.
आजचे काय?
आपल्याला प्रगत, सामथ्र्यशाली राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल, तर स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या चुका परत होणार नाहीत व राष्ट्राचे अखंडत्व शाबूत राहील हे पाहाणे गरजेचे असून एकपक्षीय हुकूमशाही राजवट असणाऱ्या चीनशी व्यवहार करताना सावधगिरीने पावले टाकणे अत्यावश्यक आहे. चीन आज पाकिस्तानी शासनाशी जवळीक साधून भारताला खिंडीत गाठण्याचे मनसुबे आखत आहे. पाकव्याप्त लेहबाहेरच्या परिसरातून रेल्वे मार्ग सुरू करून आपले ‘जाल’ भारताच्या सभोवार पसरवत आहे. कारगिललगतच्या सीमा भागात घुसखोरी करून आजही ‘रेड आर्मी’चे रंगवलेले मैलाचे दगड हळूहळू पुढे सरकवत आहे आणि १९६२ प्रमाणेच आपले राज्यकर्ते थंड आहेत.
१९६० च्या शेवटास पाकिस्तानच्या फील्ड मार्शल आयुब खान व चिनी पंतप्रधान चौन एन लाय यांच्यात जो ‘सिनो पाक बॉर्डर अ‍ॅक्ट’ झाला त्याची धूळ झटकत चीन परत कारगिल क्षेत्रात खोडय़ा काढत आहे. या सीमाविषयक करारात पाकिस्तानने लेहसह पूर्ण नेफा चीनचा आहे हे कबूल करून टाकले, तर त्या मोबदल्यात चीनने ‘संपूर्ण काश्मीर पाकिस्तानचे’ असा शिक्कामोर्तब केला. हे सर्व घडत असताना आमच्या सरकारने चीनचा अंत:स्थ हेतू जाणून ‘पंचशीलचा’ उद्घोष करण्यापेक्षा सैन्य मजबुतीवर भर देणे गरजेचे होते; परंतु डाव्या विचारसरणीच्या कृष्ण मेनन यांनी चुकीचा सल्ला देऊन नेहरूंची फसवणूक तर केलीच, शिवाय भारतीय सैन्याला तोंडघशी पाडले.
पराजयाचा इतिहास वाचण्यात कुणाला आनंद आहे? परंतु तरुण पिढीने याचे मनन, चिंतन करून आंतराराष्ट्रीय विस्तारवादाचे राजकारण ओळखले पाहिजे. आज भारतीय सैन्यात २० हजारांच्या आसपास अधिकारी पदाच्या जागा रिक्त असून वायुदलाला २००-२५० पायलटचा तुटवडा भासत आहे. २१ व्या शतकात युद्धाचे मंत्र व तंत्र विकसित होऊन युद्ध हे आता रणभूमीपुरते मर्यादित राहिले नसून आमच्या घराच्या उंबरठय़ावर येत आहे. अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे यांची परिभाषा रोज बदलत असून त्याला भीषण दहशतवादाची जोड लाभत आहे. अशा वेळी पालकांनी, तरुणांनी सैन्याच्या हाकेला प्रतिसाद देणे अगत्याचे आहे. भारताच्या सैन्यदलातही आता बरीच क्रांती होऊन १९६५ व १९७१ व १९९९ च्या युद्धातील पराक्रमामुळे पाकिस्तान व चीन आक्रमणापूर्वी दहादा विचार करतील. तरीही शस्त्रसज्ज राहणे व तरुणांत क्षात्रतेजाची ज्योत तेवत ठेवणे हे राष्ट्राच्या जिवंतपणाचे द्योतक असते.
१९६२ च्या त्या रक्तलांच्छित दिवाळीची आठवण अंगावर काटा आणते आणि माझे सैनिकी मन उद्विग्न होते. सरकारच्या चुका भोगाव्या लागल्या सैन्याला. या युद्धात अनेक बांके नरवीर बाशिंदे धारातीर्थी झाले, पण गनिमाला पाठ न दाखवता राष्ट्रमातेच्या चरणी रुजू झाले. म्हणूनच म्हणतो, ‘इक वो भी दिवाली थी। हसता हुआ मौसम, रोता हुआ माली है!’