अन्यथा : न उमटलेल्या ओरखडय़ाची कहाणी Print

रु. ५६७८९००००००००
गिरीश कुबेर  - शनिवार, २६ मे २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्वत:चं असं काहीही उत्पादन नसताना केवळ माणसांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जोडण्याच्या कल्पनेतून या कंपनीची इतकी ताकद उभी राहिलेली आहे.. गुगलनं तयार केलेल्या अपेक्षांच्या पायघडय़ांवर फेसबुकला भांडवली बाजारातही अलगद येता आलं.पण आसपासचं जग मंदीच्या दलदलीत रुतलेलं असताना फेसबुकचा एकटय़ाचा रथ वेगात दौडत राहू शकेल?

ही संख्या नक्की किती आहे माहीत नाही. मराठी असल्यामुळे इतके मोठे आकडे वाचायची आपल्याला सवयही नाही, परंतु अवघ्या आठ वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या कंपनीनं गेल्या आठवडय़ात आपले समभाग पहिल्यांदा विकायला काढले, तेव्हा त्याच्या विक्रीतून आलेल्या महसुलाचा हा आकडा आहे. म्हणजे इतके रुपये या कंपनीच्या पहिल्यावहिल्या समभाग विक्रीतून. ज्याला आयपीओ. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात. उभे राहिले.
फेसबुक असं या कंपनीचं नाव.
काय करते ही कंपनी, असं विचारायचं काहीच कारण नाही, कारण ती एका अर्थानं काहीच करीत नाही. माणसांना फक्त जोडत जाते. तेही दुसऱ्याच्याच संगणकावरनं. म्हणजे स्वत:चं असं काहीही उत्पादन नसताना केवळ माणसांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जोडण्याच्या कल्पनेतून या कंपनीची इतकी ताकद उभी राहिलेली आहे. या भूतलावर जितके मनुष्यप्राणी राहतात त्यातला दर सातवा माणूस हा फेसबुकवर असतोच असतो. इतका प्रचंड जनाधार आहे या फेसबुकचा. त्यामुळेच या कंपनीचा आयपीओ जेव्हा बाजारात आला तेव्हा त्यातून थेट १०,४०० कोटी डॉलर्स उभे राहिले. ज्या काळात जगाची अर्थव्यवस्था बसकण मारून बसलेली आहे, ज्या काळात बडय़ा बडय़ा कंपन्यांनी आपापले आयपीओ वा अन्य समभाग विक्री निर्णय पुढे ढकलले आहेत, त्या काळात ही आठ वर्षांची चिमुरडी कंपनी बाजारात येते काय आणि इतका अचाट पैसा उभा करते काय, सारंच विलक्षण.
या अशा मोठय़ा संख्यांचा खरा आकार समजायचा असेल तर तो कशाच्या तरी तुलनेत दिला तर सोपं जातं. म्हणजे ही नुसती संख्या किती मोठी आहे हे कदाचित कळणार नाही, पण समजा असं सांगितलं की, या इतक्या रकमेत अख्खीच्या अख्खी रिलायन्स कंपनी एकदा नाही तर दोन वेळा खरेदी करता येऊ शकेल आणि तरीही वर काही चार पैसे हातात राहतील तर या संख्येचा अंदाज येणं सोपं जाईल किंवा असंही सांगता येईल की, या इतक्या महाप्रचंड रकमेत आपली टाटा कन्सल्टन्सी. म्हणजे टीसीएस. आणि आयसीआयसीआय आणि रिलायन्स या तीनही कंपन्या विकत घेता येतील किंवा या ११० कोटींच्या देशाची जी वित्तीय तूट आहे ती सगळीच्या सगळी या रकमेतून धुऊन टाकता येईल, इतकी ती प्रचंड आहे. त्याच्याहीपेक्षा तुलनेसाठी सोपी गोष्ट म्हणजे सध्या आपल्या देशात ज्या सार्वजनिक हिताच्या सरकारी योजना राबवल्या जातात. म्हणजे रोजगार हमी वगैरे. त्या योजना तब्बल आठ र्वष इतक्या पैशातून चालवता येतील.
तसं बघायला गेलं तर जगाच्या इतिहासातच इतका अवाढव्य आयपीओ झाल्याची फार उदाहरणं नाहीत. याआधी क्रेडिट कार्डवाल्या व्हिसा कंपनीचा आयपीओ १९०७ कोटी डॉलर्सचा होता. दुसऱ्या क्रमांकावर होता तो जनरल मोटर्सचा. त्यातून १८१० कोटी डॉलर्स उभे राहिले होते. हा फेसबुकचा तिसरा. १६०० कोटी डॉलर्सचा. त्याची किंमत झाली वर शीर्षकात दिली आहे इतकी.
याचं वैशिष्टय़ म्हटलं तर हेच की, स्थापन झाल्यानंतर अवघ्या आठ वर्षांत ही कंपनी इतक्या उंचीवर पोहोचली. मार्क झुकेरबर्ग या तरुणाने कॉलेजात शिकत असताना टाइमपास म्हणून स्थापन केलेली ही कंपनी. मार्क हा ज्युईश. वडील दाताचे डॉक्टर तर आई मानसोपचारतज्ज्ञ. शाळेपासनं आवड म्हणाल तर कवितेची. अनेक कविताच्या कविता त्याला पाठ आहेत. परत हा बहुभाषिक. म्हणजे फ्रेंच, ज्यू असल्यामुळे हिब्रू, लॅटिन आणि ग्रीकसुद्धा त्याला येते. याचा हळवा कोपरा म्हटला तर तो इंग्रजी. ते त्याचं खूपच कच्चं, पण आपल्याला इंग्रजी तितकं चांगलं येत नाही. याची कधीही त्याला लाज वाटली नाही. वडिलांनी संगणक आणून दिल्यानं लहान वयातच त्याची संगणकाशी दोस्ती झाली. त्याच्या चरित्रकारानं म्हटलंय, ज्या वयात मुलं संगणकावर खेळ खेळतात त्या वयात मार्क संगणक खेळ तयार करत होता. म्हणजे इतकी त्याला सॉफ्टवेअरमध्ये गती होती आणि हे सगळं कोणतंही प्रचलित शिक्षण व्हायच्या आधी. हा संगणक त्याचा जीव की प्राण होता. त्यानं काय केलं. तर वडिलांचा घराजवळच असलेला दवाखाना. तिथले संगणक आणि घरातला संगणक यांना जोडून दाखवलं. हे केव्हा? तर नेटवर्किंग वगैरे शब्दही जन्माला यायचे होते तेव्हा. म्हणजे घर आणि वडिलांचा दवाखाना यांच्यात त्यांनी पारदर्शकता आणणारं सॉफ्टवेअर तयार केलं, त्यासाठी लागेल ते हार्डवेअर. म्हणजे साधनसामग्री तयार केली. त्याला त्यानं नाव दिलं झुकनेट.
पुढे तो हॉर्वर्डला दाखल झाला, उच्च शिक्षणासाठी. तोपर्यंत त्याचं संगणकाच्या क्षेत्रातला भावी तारा. वगैरे नामकरण झालेलं होतं. हॉर्वर्डला तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहायचा. पुन्हा एकदा तिथे टाइमपास म्हणून त्यानं एक सॉफ्टवेअर विकसित केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला आवडतील त्यांची छायाचित्रं एकत्र आणता येत होती. त्याला मार्कनं नाव दिलं फेसमेश- चेहऱ्यांची जाळी. ते तिथेच राहिलं, पण झालं असं की, त्या वसतिगृहात एक पद्धत होती. तिथे राहणाऱ्यांची छायाचित्रं आणि समोर तपशील असा एक पुस्तकात दिलेला तपशील असायचा, कार्यालयाच्या माहितीसाठी. त्या पुस्तकाचं नाव फेसबुक. पुढे त्या फेसमेश या सॉफ्टवेअरला मार्कनं आणखी घासूनपुसून आकर्षक केलं. त्यामुळे जोडय़ाच जुळवता यायला लागल्या. त्यात सोय अशी झाली की, कोणत्याही मुलाच्या/मुलीच्या छायाचित्रासमोर कोणत्याही मुलीचं/ मुलाचं छायाचित्रं ठेवता येऊ लागलं. हे सॉफ्टअेवर मार्कनं महाविद्यालयाच्या वेबसाइटला जोडून दिलं. ही बातमी बाहेर कळली आणि एकच कल्ला झाला. इतका की वेबसाइटच बंद पडली. झाला प्रकार लक्षात आल्यावर प्राध्यापकांनी मार्कलाही दम दिला. काही मुला/मुलींच्या तक्रारीही तोपर्यंत आल्या होत्या. तेव्हा हे प्रकरण दोन दिवसांतच बंद करावं लागलं. ते बंद झाल्यावर पोरांना कळलं आपली किती गंमत कमी झाली आहे ती. त्यांनी प्राचार्यानाच गळ घातली, आमची छायाचित्रांसह माहिती देता येईल, असं काही तरी करा. कॉलेजनंही सांगितलं करू या म्हणून. ते मार्कला कळल्यावर तो म्हणाला, हे असं काही करायचं असेल तर कॉलेजपेक्षा मीच जास्त चांगलं करू शकेन. असं म्हणून त्यानं थेट कॉलेजलाच आव्हान दिलं आणि तो जिंकला. म्हणजे अशी काही सोय तयार व्हायच्या आत मार्कची वेबसाइट तयारसुद्धा झाली. ४ मार्च २००४ या दिवशी त्यानं या साइटचं उद्घाटन केलं, वसतिगृहात पोरांच्या कॉमन खोलीत, डॉर्मिटरीत. या साइटला त्यानं नाव दिलं फेसबुक.
तिचाच आयपीओ हा आता जगात गाजला. जगभरातले शेअरबाजार आणि एकूणच अर्थव्यवस्था माना टाकीत असताना मार्कच्या फेसबुकनं विक्रम केला. आजमितीला फेसबुकची वार्षिक उलाढाल आहे ३०७ कोटी डॉलर्सच्या आसपास. कंपनीच्या आयपीओतून उभे राहिले १६०० कोटी डॉलर्स. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अजब न्याय असा की, गुगलची वार्षिक उलाढाल आहे ३८०० कोटी डॉलर्सची, पण गुगलचा आयपीओ आला होता तेव्हा त्यातून उभे राहिले होते फक्त १६८ कोटी डॉलर्स.
असं का? कारण गुगलनं तयार केलेल्या अपेक्षांच्या पायघडय़ांवर फेसबुकला अलगद येता आलं. माहिती क्षेत्राची हवा तयार झाली होती. त्या हवेवर उडतच फेसबुकचा आयपीओ आला. गुगल इतकं कमवतं आहे, तेव्हा आम्हीही उत्तम कमवू शकतो.. असं तो सांगू लागला आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात दाटलेल्या नैराश्याने कंटाळलेल्या ग्राहकांनी अमाप उत्साहानं त्याचं स्वागत केलं. शीर्षकात दिलेली रक्कम त्यातून उभी राहिली, पण आसपासचं जग मंदीच्या दलदलीत रुतलेलं असताना फेसबुकचा एकटय़ाचा रथ वेगात दौडत राहू शकेल?
तोच प्रश्न आता निर्माण झालाय आणि फेसबुकच्या मागे खटलेच्या खटले उभे राहू लागलेत. मंदीच्या वातावरणात आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळणारही नाही कदाचित याचा अंदाज फेसबुकच्या समभागांच्या विक्री व्यवस्थेतील बँकांना आला, पण ही कबुली त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवली नाही, असा गंभीर आक्षेप आता घेण्यात आलाय. तशी ती पोहोचवली गेली असती तर गुंतवणूकदारांनी सावधपणे निर्णय घेतले असते? विक्रमी रक्कम उभी केल्यानंतर फेसबुकच्या मागे खटल्यांचं झेंगट लागलंय.
उत्तम नियंत्रक हवा असतो तो यासाठी.
नाही तर आपण. एक पैचंही विजेचं उत्पादन नसणारी, दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणारी कंपनी आपल्याकडे कोटय़वधी रुपये कमावून गाळात जाते आणि बुडलेल्या गुंतवणूकदारांच्या व्यथेचा एक ओरखडाही व्यवस्थेवर उमटत नाही. असो.