अन्यथा : चालणाऱ्याला चालवणारे चार शब्द Print

 

गिरीश कुबेर, शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निपुण मेहताला चालता चालता फक्त हे चारच शब्द सापडले, असं नाही.. बरंच काही मिळालं, पण पुढेही चालत राहण्याचं बळ या चार साध्याच शब्दांनी दिलं. साधे आणि सरळ अर्थच त्याला हवे होते,  म्हणून ते त्याला मिळालं.. साधेपणाच्या अर्थाची ही गोष्ट, निपुणनंच सांगितलेली..


‘‘प्रिय मित्रांनो..
तुमच्यासमोर आज बोलताना मला खूप आनंद होतोय. आयुष्याच्या धावपट्टीवर तुम्ही आता उभे आहात आणि तुमच्या कारकीर्दीचे विमान कोणत्याही क्षणी उड्डाण करू शकेल, इतकी तुमची तयारी झालेली आहे. परंतु मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचाय. आयुष्यात प्रगतीसाठी उड्डाणांचीच गरज असते का? सतत हवेतून जायची क्षमता म्हणजेच प्रगती का? तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, पण उडण्याच्या, अफाट वेगाच्या या काळात आपण चालणं या मूलभूत, प्रेरणादायी कृतीला मुकतो आहोत का? पादचारी म्हणजे ‘पायी चालणारा’ म्हणजे कोणी गरीब बिचारा, असं आपण समजू लागलो आहोत. हे योग्य आहे का? आपण जेव्हा चालत असतो तेव्हा आपला आपल्या मुळाशी संपर्क असतो, याची आपल्याला जाणीव आहे का? युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी चालण्याला मान दिला जातो आणि चालणाऱ्यांकडे गौरवानं पाहिलं जातं, हे आपल्याला माहीत आहे का? आपण जेव्हा चालताना पावलं टाकत असतो तेव्हा आसपासच्या निसर्गाशी, त्याच्या लयीशी आपलं नातं जुळत जातं, हे आपल्याला कधी जाणवतं का? चालण्याचा आणखी एक फायदा असतो. आसपासच्या परिसरापेक्षा आपण कधीच मोठे होत नाही. त्यामुळे अहं नियंत्रणात राहतो. आणि दुसरं म्हणजे परिसरापेक्षा आपला वेगही कधी वाढू शकत नाही. त्यामुळे गतीची नशाही जाते.
मी तुम्हाला माझीच कथा सांगतो..
२००५ साली माझं लग्न झालं. इतरांसारखं मधुचंद्र वगैरे नेहमीचंच थंड हवेच्या ठिकाणी जाणं असं काही करायचं नाही, असं आमचं मत होतं. मी आणि माझ्या बायकोनं ठरवलं. आपण पुढचे तीन महिने फक्त चालत प्रवास करायचा. हे जमणार का आपल्याला? सर्वागांनी विचार केला. दोघांचाही होकार आला. अडचणी तर होत्याच. ताजा संसार होता. पैसे अर्थातच नव्हते. ते उभे करण्यासाठी आमच्याकडच्या सर्व वस्तू आम्ही विकल्या. त्यातून भारतात जायचा आणि यायचा खर्च निघाला. ठरवलं की मोजकेच पैसे बरोबर ठेवायचे. दिवसाला किती खर्च करायचे? तर फक्त एक डॉलर-  म्हणजे तेव्हाचे ४५/४६ रुपये. यात जे परवडेल तेच खायचं. जमेल तिथेच राहायचं. त्यापेक्षा एक पैही अधिक खर्च करायची नाही, असा निर्धार केला. आम्ही लक्ष्य ठेवलं एक हजार किमी चालण्याचं. गांधी आश्रमात जाऊन डोकं ठेवलं. गांधी आश्रमच का? तर त्या माणसाला चालण्याचं महत्त्व कळलं होतं म्हणून. आणि सरळ दक्षिणेकडे चालायला सुरुवात केली. पुढचे तीन महिने आम्ही फक्त चालतच होतो. काय शिकवलं या तीन महिन्यांनी?
‘वॉक’मधला ह :  विटनेस.
तुम्ही जेव्हा चालत असता तेव्हा तुम्हाला खूप खूप गोष्टी दिसत असतात. मोटारीतून जाता तेव्हा डोळय़ांपुढे ४० अंशांचा कोन असतो. पण जेव्हा चालता तेव्हा डोळय़ाला केंद्रभागी ठेवून १८० अंश कोनातून तुम्हाला परिसर दिसत असतो. त्यामुळे खूप गोष्टी नव्याने कळल्या. रोजच्या सूर्योदयाचं वा सूर्यास्ताचं आकाश. त्या वेळी दिसणारी बगळय़ांची रांग. संध्याकाळी त्या वेळी जिथे असू तिथल्या टपरीवर कटिंग चहा पीत हे सगळं बघणं. केवळ स्वर्गीय. तेव्हा जाणवलं. फेसबुकवर फ्रेंड वाढवत नेण्यापेक्षा अशा खऱ्याखुऱ्या अनुभवांना, मित्रांना सामोरं जाणं हे जास्त आनंददायी असतं. आणखी एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे वेगामुळे माणसा-माणसामधली दरी वाढतच जाते. चालण्यामुळे ती सहजपणे बुजवली जाते. चालता चालता जे दिसतं, ते पाहून आपण किती सहज काय काय शिकू शकतो. आम्हा दोघांनाही जाणवलं आपण आपल्या गरजा एरवीच्या आयुष्यात किती वाढवून ठेवल्या आहेत ते. आणि दुसरं म्हणजे चालण्यामुळे अतीच्या हव्यासाला आळा बसतो. आम्हाला एक शेतकरी सहजपणे म्हणाला.. अहो तुम्ही हे मिळवलं ते मिळवलं म्हणता.. पण सूर्याला देतो त्यापेक्षा अधिक प्रकाश द्यायला तुम्ही भाग पाडू शकत नाही, चांदण्याला अधिक बरस म्हणून सांगू शकत नाही आणि ढगांमधलं पाणी वाटतं म्हणून अधिक ओतायला लावू शकत नाही. काही गोष्टी आहेत तितक्याच स्वीकारायच्या असतात आणि जगायचं असतं.
हा केवढा मोठा धडा आम्हाला चालण्यानं शिकवला.
‘वॉक’मधला अ : अ‍ॅक्सेप्ट.
आपण जेव्हा चालत असतो तेव्हा विश्वाच्या या प्रचंड पसाऱ्यात एक टिंबही नसतो. आम्ही भर उन्हात चाललो, पावसात चाललो. उन्हात वाटायचं कधी एकदा सावली येतीये, पावसात आडोशाची आस असायची. कधी ती सावली यायची वा आडोसा मिळायचा. बऱ्याचदा नाहीही. पण नाही मिळाला तो म्हणून वाईट नाही वाटायचं. एकदा आम्हाला पाटी  दिसली, इथे मोफत मुक्काम करू दिला जाईल म्हणून. आम्ही दोघेही आनंदून गेलो. त्या घरात शिरलो. चांगला मोठा वाडाच होता. अनेक खोल्यांचा. आत गेल्यावर आतल्यानं विचारलं. आमच्या देवळात आलात का? देवळात येणाऱ्यांनाच फुकट राहता येतं. वास्तविक हो, त्यासाठीच आलोय, असं सांगून आम्हाला वेळ मारून नेता आली असती. पण आम्ही तसं केलं नाही. सांगितलं- देवळासाठी म्हणून आलेलो नाही. हे ऐकल्यावर त्यांनी आम्हाला खोली दिली नाही. पण रात्र होती म्हणून दया दाखवली. काय? तर मला पुरुषांच्या स्वच्छतागृहाबाहेर आणि बायकोला महिलांच्या.. रात्र घालवायची परवानगी दिली. आम्ही झोपलो तसेच. उपाशी. कारण देवळात नाही म्हणून प्रसादाचं जेवण नाही. एक साधी थाप मारून आमचा प्रश्न मिटवता आला असता. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही समोर आलेली परिस्थिती स्वीकारली. हे आम्हाला चालण्यानं शिकवलं.
‘वॉक’मधला छ  : लव्ह.
चालताना आपण आसपासच्या परिसराशी नकळतपणे तादात्म्य पावत असतो. आसपासचा निसर्ग आपल्याला खूप शिकवत जातो. फुकट. त्या बदल्यात तो काहीही मागत नाही. हल्ली सगळय़ांचा समज असतो आपल्याकडे भरपूर काही जमल्याशिवाय देताच येणार नाही. पण हे भरपूर जमवता जमवताच इतकी दमछाक होते की द्यायची जाणीवच मागे पडते. आणि हे भरपूर म्हणजे किती, हे तरी कुठे नक्की करता येतं? या चालण्यात त्यामुळे आयुष्यातील सगळय़ात मोठा धडा मिळाला. तो म्हणजे ज्याच्याकडे काहीही नाही असं वाटत असतं तोच बरंच काही देत असतो. ज्याच्याकडे बरंच काही आहे, त्याच्याहीपेक्षा. शहरात आमच्याकडे बघून अनेकांना प्रश्न पडायचा. हे असं का करतायत? पण गावात बरोबर त्याच्या उलट. तिथे उत्सुकता असायची.. अरे तुम्ही आमच्या गावातले वाटत नाही, कोण कुठचे आहात, असे प्रश्न असायचे.. भाकरतुकडा पुढे केला जायचा. मुद्दा हा की तुम्ही कोण, किती मोठे आहात त्यावर तुमचं कसं स्वागत करायचं ही शहरी पद्धत गावात नाही. माणसं मुक्तपणानं एकमेकांचं स्वागत करतात. ते पाहिल्यावर जाणवतं ते हेच की खऱ्या दातृत्वासाठी खूप काही असावं लागतं हा समजच मुळात चुकीचा आहे. तो आमच्या मनातून दूर झाला केवळ चालण्यामुळे.
‘वॉक’मधला ङ  : नो युवरसेल्फ.
तळय़ातल्या पाण्याचा तळ पाहायचा असेल तर पाणी शांत व्हावं लागतं. मनाचंही तसंच आहे. चालताना काही काळानंतर आपल्या मनाला अशी शांत उसंत मिळते. आत डोकावून बघण्यासाठी. आपली दोन मनं असतात. एकाला फक्त प्रगती हवी असते. सरळ उंच जाणारी. दुसऱ्याला आडवंही वाढायचं असतं. रोजच्या स्पर्धेच्या युगात आपण या दुसऱ्याकडे लक्षच देत नाही. नियमितपणे चालायची सवय लावून घेतली तर या दुसऱ्या मनाकडे लक्ष देता येतं. त्याचं म्हणणं ऐकता येतं. त्याचंही ऐकायची सवय लागली की वाढ परिपूर्ण व्हायला लागते. आपण आपल्याला कळू लागतो.
तेव्हा मित्रांनो महाविद्यालयाच्या प्रांगणातून जगण्याच्या हमरस्त्यावर प्रवेश कराल तेव्हा लक्षात ठेवा की केवळ वेग म्हणजेच सर्वस्व नव्हे. पदवीदानाच्या आजच्या क्षणी असं काही ऐकणं तुम्हाला विचित्र वाटेल. वाटू द्या. पण तुमच्या प्रवासातला एखादा टप्पा तरी त्यामुळे उजळून निघेल अशी मला आशा आहे आणि मला तेवढंही पुरे आहे.

(अमेरिकेतील पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या आयव्ही लीग विद्यालयाच्या २०१२ सालच्या पदवीदानप्रसंगी निपुण मेहता यांनी केलेलं हे भाषण. निपुण हा सव्‍‌र्हिसस्पेस ओआरजी या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक आहे. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि स्वयंसेवकता अशा मुद्दय़ांवर ही संस्था काम करीत असते. पदवीदान समारंभासाठी इतका अनवट प्रमुख पाहुणा पहिल्यांदाच बोलावला गेला.  त्याच्या बऱ्याच गाजलेल्या भाषणाचा हा स्वैरानुवाद. इंग्रजी प्रत पाठवणारे ‘लोकसत्ता’चे वाचक विजय गोखले (डोंबिवली) यांचे आभार)