अन्यथा : व्यक्ती आणि व्यवस्था Print

 

गिरीश कुबेर - शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

व्यक्तींच्या ‘संस्था’ व्हायला वेळ लागत नाही.. पण गुन्हा तो गुन्हाच हे सांगणारी व्यवस्था असते.. तुम्ही चूक केली असेल तर व्यवस्थेला आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका, हा धडाही असतो.. तो शिकायचा की नाही?
गुंडपुंडसुद्धा धर्मार्थ कामे करून नावलौकिक मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी देणग्या देतात.. सेवाभावी संस्थांना मदत करतात. पण म्हणून काही त्यांनी केलेल्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही आणि तेव्हा तो माफ  करणेही योग्य नाही..


गेल्याच आठवडय़ात, अमेरिकेत सध्या गाजणाऱ्या सर्वात मोठय़ा आर्थिक गुन्ह्याच्या खटल्याचा निकाल लागला. त्याच्या निकालात न्यायाधीशांनी हे उद्गार काढले. आरोपी होता ‘अमेरिकी स्वप्न’ ज्याला म्हणता येईल तशा परिकथेचा नायक, जन्माने अनाथ. तेव्हा अर्थातच गरीब. मग कोणाकोणाच्या मदतीनं अमेरिकेत स्थलांतर. हॉर्वर्डसारख्या प्रत्येकाचं स्वप्न असलेल्या शिक्षण संस्थेत मग अध्ययन. वेगवेगळय़ा ठिकाणी पुढे नोकऱ्या आणि कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात तर प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल, गोल्डमन सॅक.. अशा उद्योग, अर्थविश्वाला ललामभूत ठरणाऱ्या संस्थांचं उच्च पद. रस्त्यावरनं सुरू झालेला हा प्रवास अनेक पिढय़ांना रस्ता दाखवणारा. मोठं कसं आणि किती व्हायचं हे दाखवणारा.
पण रजत गुप्ता यांचा हा चंदेरी प्रवास तुरुंगात संपणार हे गेल्या आठवडय़ात नक्की झालं आणि अनेकांच्या स्वप्नांना तडे गेले. उच्च पदावरील जबाबदारीचा भाग म्हणून मिळणारी माहिती व्यापारी हेतूसाठी इतरांना देणं आणि त्यातून फायदा कमावणं हे नवबाजारपेठीय व्यवस्थेतील अत्यंत घृणास्पद पाप. ते गुप्तांच्या नावावर आहे. अत्यंत घृणास्पद अशासाठी की संपूर्ण बाजारपेठीय व्यवस्थेवरचा विश्वासच त्यामुळे उडून जाऊ शकतो. ज्या काळात माहिती ही भोग्य वस्तू असते आणि जिच्या आदानप्रदानामुळे फायदा-नुकसानीची गणितं बदलू शकतात, त्या काळात माहिती फोडणं हा गंभीर व्यभिचार ठरतो आणि तो करणाऱ्यास तितकीच गंभीर शिक्षा होणं आवश्यक असतं.
तो गुन्हा गुप्ता यांनी केला असंच जेव्हा उघड व्हायला लागलं तेव्हा उद्योगविश्वाची दातखिळीच काय ती बसायची राहिली. आपल्याकडे उद्योगविश्वात अनेक वासरं आहेत. त्यामुळे त्यातल्या त्यात लंगडय़ा का होईना पण गाईपणामुळेच शहाणे आहेत असं मानलं जाणाऱ्या अनेकांना गुप्ता यांच्यावरील कारवाईचा धक्का बसला. दुनिया मुठ्ठीमध्ये वगैरे घेऊ पाहणारे मुकेश अंबानी, आपल्या शांत, संयत सामाजिक भूमिकांसाठी ओळखले जाणारे आदी गोदरेज वगैरेंनी गुप्ता यांच्या बाजूनं पत्रकं काढली. गुप्ता यांच्यावर कसा अन्याय झाला आहे आणि ते किती सज्जनोत्तम आहेत, याचे दाखले भारतातून दिले गेले. इतकंच काय आपल्याकडनं अनेक जण गुप्ता यांच्या विरोधातील खटल्यात चारित्र्य साक्षीदार म्हणून थेट अमेरिकेतच गेले. म्हणजे अमुकतमुक व्यक्ती किती चांगली आहे आणि ती गुन्हा करणं कसं शक्यच नाही. असं न्यायालयात शपथेवर सांगायचं. अनेकांनी ते काम चोख बजावलं. गुप्ता यांनी किती सामाजिक संस्थांना किती प्रचंड देणग्या दिल्यात त्याच्या याद्या सादर झाल्या. आणि पाठोपाठ युक्तिवाद. इतक्या देणग्या देणारा पैशासाठी कशाला गैरव्यवहार करेल.
वरकरणी बिनतोडच म्हणणं हे. पण निकालाची वेळ आली तेव्हा न्यायालयानं या सगळय़ा मान्यवरांच्या मताला केराच्या टोपलीत फेकण्यासाठी एक क्षणही घालवला नाही. तसं करताना या मंडळींना न्यायालयानं ऐकवलं, ‘गुन्हेगारानं देणग्या दिल्या म्हणून त्याचा गुन्हा माफ होत नाही वा त्याचं गांभीर्य कमीही करता येत नाही. गुन्हा तो गुन्हाच.’ इतकं म्हणून न्यायालय थांबलं नाही. या प्रकरणात गुप्ता यांना दोषी ठरवण्यात आलं. त्यांची शिक्षा आता जाहीर होईल. या प्रकारच्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त २० र्वष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
वास्तविक या प्रकरणात अमेरिकेच्या भांडवली बाजार नियंत्रकानं गेल्या वर्षी गुप्ता यांच्यावर साधी प्रशासकीय कारवाईची नोटीस बजावली होती. ती अर्थातच गुप्ता यांना अमान्य होती. म्हणून गुप्ता यांनी नियंत्रकाच्या कारवाईला आव्हान दिलं. हा आव्हान अर्ज दाखल झाल्या झाल्या लगेचच नियंत्रकानं गुप्ता यांच्यावर बजावलेली कारवाईची नोटीस मागे घेतली. झालं. गुप्ता यांना वाटलं आपण जिंकलो.
आणि तिथेच त्यांची मोठी चूक झाली. दोनेक महिन्यांत बाजारपेठ नियंत्रक हात धुऊन गुप्ता यांच्या मागे लागला. इतका की गुप्ता यांनी ज्याला ही माहिती पुरवली त्या राजरत्नम याच्याशी त्यांचं झालेलं बोलणं आणि त्या पाठोपाठ लगेचच झालेले मोठमोठे व्यवहार याची जंत्रीच बाजार नियंत्रकानं मिळाली. हा सगळा तपशील गुप्ता यांच्या विरोधात परिस्थितीजन्य पुरावा म्हणून कामी आला आणि गुप्ता यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला. या गुन्ह्यासाठी शिक्षा होणारी गुप्ता ही आतापर्यंतची सवर्ोेच्च व्यक्ती. त्यांना दोषी ठरवताना न्यायाधीशांना मनापासून दु:ख होत होतं. न्यायमंडळातल्या काही तरुण न्यायाधीशांच्या डोळय़ांत पाणी आलं. इतक्या मोठय़ा माणसाला गुन्हेगार ठरवणं हे नाही म्हटलं तरी अवघडच असतं. आणि परत ही व्यक्ती उद्योग, अर्थविश्वात अनेकांसाठी आदर्श ठरलेली. तरीही न्यायमंडळ आपल्या कर्तव्याला चुकलं नाही. गुप्ता यांच्याविषयी या सगळय़ांनी आदर व्यक्त केला. असं व्हायला नको होतं. वगैरे छापाचे चार शब्द ऐकवले. पण तरीही गुप्ता यांना दोषी ठरवलं ते ठरवलंच. ते ठरवताना न्यायालय म्हणालंदेखील. आरोपी छोटा आहे का मोठा हे महत्त्वाचं अजिबातच नाही.. गुन्हा केला असेल तर शिक्षा व्हायलाच हवी.
यावर भारतीय म्हणून आपली जी प्रतिक्रिया उमटते तीही उमटली. यामागे अनेकांना अमेरिकी उद्योगविश्वाचा कट दिसला. भारतीयांना ही मंडळी ठरवून अडकवू लागली आहेत, असं अनेकांनी म्हटलं. अमेरिकी भारतीयांच्या वेबसाइट्स, संस्था सगळय़ांत आता भारतीयांवर जगात कसा अन्याय सुरू आहे. असा सामुदायिक गळा काढायला सुरुवात झाली.
हे आपलं राष्ट्रीय वैशिष्टय़. चूक करताना पकडलो गेलो की कांगावा सुरू करायचा. अन्यायाच्या कहाण्यांची सोयीस्कर पारायणं सुरू करायची. सोयीस्कर अशासाठी म्हणायचं की गुप्ता यांच्यावरच्या कारवाईची एकच भारतीय बाजू दाखवायची. पण हे नाही सांगायचं की ज्यांनी गुप्ता यांची चौकशी केली आणि त्यांच्या विरोधात भरभक्कम पुरावा सादर केला तोही भारतीय होता. प्रीत भरारा त्याचं नाव आणि ज्यांनी गुप्ता यांच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला तो वकीलही भारतीय होता. रवी बात्रा त्याचं नाव. त्यामुळे जेव्हा गुप्ता हे दोषी असल्याचं सिद्ध झालं.. तेव्हा बात्रा म्हणाले, तुम्ही चूक केली असेल तर व्यवस्थेला आव्हान द्यायचा प्रयत्न करू नका आणि ती व्यवस्था जर अमेरिकेची असेल तर असं आव्हान द्यायचा विचारही करू नका.
फरक असलाच तर हा आहे. आपल्याकडे असे रजत गुप्ता शेकडय़ांनी पडलेत. काहींच्या संस्थाही झाल्यात. पण उणीव आहे ती व्यक्तीपेक्षा व्यवस्थाच मोठी असते असं मानणाऱ्यांची. त्याप्रमाणे वागणाऱ्यांची. त्याचमुळे मुकेश अंबानी वगैरेंनी कौतुक केलं ते गुप्ता यांचंच. चुकीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचं नाही.
अर्थात काहींकडून कौतुक करून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून होणारा निषेधच अधिक गौरवास्पद असतो.