अन्यथा : मेकॉलेचे मारेकरी Print

गिरीश कुबेर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

भाषा हे माध्यम आहे..वाहक आहे..त्यातून जे काही सांगायचं त्यात सत्त्व असायला हवं. महत्त्व त्या सत्त्वाला आहे. जे काही वाहून न्यायचं त्याला आहे.. ‘इंग्रजीची घसरण सुरू आहे’ अशी चिंता करणाऱ्यांनी ७०० भारतीय शब्द आजवर स्वीकारले, इंग्रजीच्या व्याकरणात बसवले. ..एके काळी आपल्याला हसणाऱ्या मेकॉलेला आपण  कसे ठेचतो आहोत, याची जाणीव मात्र आपल्याला नाही!

ओळखीचे एक प्राध्यापक आहेत. भाषातज्ज्ञ. कोणताही भाषाभेद निर्माण झाला की त्यांचा एक उपाय असतो. त्यांचं म्हणणं असं की आपण हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत चालत निघायचं. मधे टप्प्याटप्प्यावर राहायचं. मुक्काम करायचा. स्थानिकांशी मिसळायचं. असं करत करत जेव्हा आपण कन्याकुमारीला पोहोचू तोपर्यंत आपल्यातले भाषाभेद मिटलेले असतील आणि सर्व भाषा आपल्याला सारख्याच वाटायला लागतील.
हा प्रयोग कोणी करून बघितलेला नाही. त्यामुळे त्याचा निष्कर्ष बरोबर आहे की नाही, हे अर्थातच कळायला मार्ग नाही. हल्ली जग जवळ आलंय वगैरे म्हणतात, पृथ्वी म्हणजे एक जागतिक खेडं आहे.असंही म्हणतात. फ्रान्सिस फुकुयामा यानं तर आपल्याला इतिहासाचाच अंत होणार असल्याचं सांगितलंय. भाषाभेदाबाबतीत असं कोणी सांगितलंय किंवा काय माहीत नाही. पण भाषा ही अजून तरी मानवसमूहातील अनेक दऱ्यांपैकी एक दरी आहे, हे नक्की. तसं नसतं तर फुकुयामाच्या नाकावर टिच्चून बेळगाव-कारवार वाद शिल्लक राहिला नसता. असो.
हे सगळं आता आठवायचं कारण म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरी बनवणाऱ्यांपैकी एक पथक गेल्याचं आठवडय़ात भारतात येऊन गेलं. साहेबाच्या इंग्रजीचं शुद्ध तुपातलं रूप न्याहाळायचं असेल, शब्दाचा असा शुद्ध तुपातला अर्थ शोधायचा असेल तर या डिक्शनरीला पर्याय नसतो, हे तर सगळय़ांनाच माहीत आहे. म्हणजे या डिक्शनरीत आहे ते इंग्रजीचं शुद्ध रूप. इंग्रजीची बाकी सगळी रूपं इतर वर्गात मोडतात. गमतीचा भाग असा की ज्या ऑक्सफर्डचा संदर्भ या इंग्रजीच्या बाबत दिला जातो त्या ऑक्सफर्डमधल्या भाषाधुरिणांना काळजी लागली आहे ती इंग्रजीच्या घसरणीची. ते बिचारे ब्रिटिश इंग्रजीवर अमेरिकन इंग्रजीचा पगडा कसा वाढू लागलाय वगैरे मुद्दय़ांवर चर्चा करत असतात. म्हणजे आपल्याकडे ज्या इंग्रजी शिक्षणासाठी सगळे धडपडत असतात ती इंग्रजी आता पहिल्यासारखी कशी राहिलेली नाही, असे उसासे इंग्लिश विद्वान सोडत असतात.
यातून एक सरळ अर्थ दिसतो तो असा की भाषा ही नेहमी सुदृढ अर्थव्यवस्थेच्या आसऱ्याला जाते. अमेरिकी अर्थव्यवस्था आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे.. साहजिकच अमेरिकी इंग्लिश हे अर्थव्यवस्थेमुळे मागे पडलेल्या ब्रिटिशांच्या इंग्रजीपेक्षा आघाडीवर आहे. उद्या फ्रान्सने समजा अमेरिकेची जागा घेतली तर सारं जग ऊ लाला म्हणायला लागेल. याचा अर्थ असाही घेता येईल का की समजा अशोकाचं साम्राज्य जगभर पसरलं असतं तर त्याच्या राज्याची भाषा जगाची भाषा झाली असती? सामाजिक अंगानं भाषेकडे पाहणाऱ्यांच्या मते तसं नक्कीच झालं असतं. इंग्रजी जगाची भाषा झाली कारण ब्रिटिशांचं जगावर राज्य होतं. सोळाव्या शतकात सुरू झालेला हा साम्राज्याचा विस्तार पुढे इतका झाला की १९२२ पर्यंत एकचतुर्थाशपेक्षाही अधिक जगावर ब्रिटिशांचं राज्य होतं. २२ जून १८९७ ला जेव्हा ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिच्या राज्यारोहणाचा हीरक महोत्सव साजरा झाला तेव्हा जगातील जवळपास सर्व देशांचे प्रमुख राणीचं अभीष्टचिंतन करायला हजर होते. इंग्रजीचा प्रसार झाला तो यामुळे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचं केंद्र लंडनमधून वॉशिंग्टनला सरकलं.आणि अर्थातच साहेबाच्या इंग्रजीला उतरण लागली.    
तर मुद्दा हा की गेल्या आठवडय़ात ऑक्सफर्डचं पथक भारतात आलं होतं ते कोणकोणत्या नव्या शब्दांचा अंतर्भाव इंग्रजी शब्दकोशात करता येईल याची चाचपणी करण्यासाठी. आजमितीला जवळपास ७०० भारतीय शब्द ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात इंग्रजी शब्दांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. म्हणजे आपल्याकडचा गुरू आणि इंग्रजीतला गुरू यात आता काहीही फरक नाही. गुरू हा शब्द इंग्रजीच झालाय. जेम्स कॅमेरून- म्हणजे टायटॅनिक या भव्य सिनेमाचा निर्माता/दिग्दर्शक - यानं जेव्हा दुसरा तितकाच भव्य सिनेमा काढला त्याचं नाव होतं ‘अवतार’. हा शब्द काही आपल्या अवताराचा ‘इंग्रजी अवतार’ नक्कीच नाही. आपला अवतार आणि इंग्रजी अवतार यात काहीही फरक नाही. असे कित्येक शब्द सांगता येतील. आपला आर्य इंग्रजीनं तसाच्या तसा गिळंकृत केला. आपल्या भाषेत जे चक्र फिरतं तेच चक्र इंग्रजीतही तसंच फिरतं. आपला धर्म हा इंग्रजीतही धर्मच असतो आणि आपल्याकडे निर्वाण ज्या अर्थानं घेतलं जातं त्याच अर्थाने इंग्रजीतही घेतलं जातं. आता वास्तविक राजा राममोहन रॉय आणि अन्यांच्या प्रयत्नांमुळे सतीची प्रथा कधीच बंद झाली. पण बंद व्हायच्या आधी सती या शब्दाची इंग्रजीतही त्याच अर्थानं प्रतिष्ठापना झालेली आहे, याची आपल्याला कल्पनाही नाही. आपला पंडित हा इंग्रजीतही पंडित असतो आणि आपला पडदा हा शब्द थोडंसं स्पेलिंग बदललं की इंग्रजीतही तेच काम करतो. झाकण्याचं. आपली धोती इंग्रजी झाली आहे, बिंदी इंग्रजी झाली आहे, आपल्याप्रमाणे इंग्रजीतही चटणी त्याच चवीनं खाल्ली जाते आणि आपल्याप्रमाणे इंग्रजीतही घी असतं. करी तर काय इंग्रजांनी राष्ट्रीय पदार्थच बनवून टाकली आहे आणि कबाब हेही इंग्रजीतच घरोघरी पोहोचले आहेत. गेल्या दोनेक वर्षांत आणखी जवळपास आपल्या ८० शब्दांनी इंग्रजी शब्दसंग्रहात कधीच घर केलंय. बदमाश, बंद ही आपली इंग्रजीला देणगी. भगवान हादेखील आपणच दिला. इंग्रजीत मोटारीच्या मागे सामान ठेवायच्या जागेला बूट म्हणतात. आपण त्याचं डिकी कधी केलं, त्यांनाही कळलं नाही. हिंदुत्व आणि स्वदेशी हे शब्दसुद्धा ऑक्सफर्डला जसेच्या तसे स्वीकारायला लागले.
हे एका अर्थानं कौतुकाचंही नाही का? म्हणजे इंग्रजी अन्य भाषांपेक्षा जास्त लवचिक असल्यामुळे ती इतर शब्द सहज आत्मसात करते असाच त्याचा अर्थ. इंग्रजी भाषातज्ज्ञांच्या मते इंग्रजीमधली शब्दसंख्या तब्बल १० लाखांच्या घरात आहे. आता त्यातले ७०० आपले, म्हणजे भारतीय आहेत. आपण जसे मोठे होऊ.. आपली अर्थव्यवस्था अधिक बलवान होईल तेव्हा आणखी भारतीय शब्द इंग्रजीत- तेही ऑक्सफर्ड डिक्शनरीत-  दिसू लागतील. खरोखरच वाढलो आपण तर इंग्रजीवर आता भारताचा प्रभाव कसा आहे, याची चर्चा तज्ज्ञ करू लागतील.
..आणि तरीही हे काहीही कळत नसलेले आपण भारतीय इंग्रजी माध्यमांच्या शाळांत आपल्या पोराटोरांना प्रवेश कसा मिळेल याचीच चिंता करत राहू. भाषा हे माध्यम आहे..वाहक आहे..त्यातून जे काही सांगायचं त्यात सत्त्व असायला हवं. महत्त्व त्या सत्त्वाला आहे. जे काही वाहून न्यायचं त्याला आहे.. वाहकाला नाही, हे आपल्याला कधी कळणार हा प्रश्न आहे.
आपलं इंग्रजी कच्चं आहे, म्हणून तीनेकशे वर्षांपूर्वी तो लॉर्ड मेकॉले आपल्याला हसला होता. त्याचं ऐकून आपल्या किती पिढय़ांनी इंग्रजी कच्चं आहे म्हणून शाळेत शिक्षकांच्या हातच्या पट्टय़ा खाल्ल्या. आता आपणच त्या मेकॉलेच्या मताचे मारेकरी ठरू शकतो याची जाणीव आपल्याला नाही.    
मराठी माध्यमाच्या शाळांचे प्राण म्हणून तर कंठाशी आलेत.