अन्यथा : यशबळी..! Print

गिरीश कुबेर , शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अमेरिकेच्या सत्तेचा दरारा जेव्हा टिपेला होता, त्या क्लिंटन-काळापर्यंत बिल गेट्सची ‘मायक्रोसॉफ्ट’ ही कंपनी उद्योगक्षेत्राची जागतिक सरताज होती.. त्या वेळी स्टीव्ह जॉब्जची दखल कुणी घेण्याचं कारण नव्हतं.. पण सतत नव्या कल्पनांसोबत राहणाऱ्या जॉब्जचा पुढे बोलबाला झाला आणि गेट्स मात्र,  मायक्रोसॉफ्टच्या व्यवसायातच अधिकाधिक रस घेणारा ठरला..


यश म्हणजे काय? आजचं यश हे उद्याच्या यशाची हमी देत असतं का? त्या यशाचा आकार मोजायची काही पद्धती असते का? असे बरेच प्रश्न सध्या अनेकांना, अनेकांच्या उदाहरणावरनं पडलेत.
मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल आणि या दोन्ही उद्योगांना जन्म देणारी अमेरिका हे तिघेही जगद्व्यापी यशस्वितेची मूर्तिमंत प्रतीके. मायक्रोसॉफ्टचा प्रणेता बिल गेट्स, अ‍ॅपलकार स्टीव्ह जॉब्स आणि अशा अनेक कर्तृत्ववानांना घडवणारा अमेरिका हा देश यांच्या इतकं यश कोणीच पाहिलेलं नसावं. पण या यशाचं भान असावं लागतं. कारण ते नसेल तर त्याच्या रहाटगाडग्यात यशस्वीदेखील फिरत राहतो. व्हॅनिटी फेअर या मासिकाच्या ताज्या अंकात विख्यात पत्रकार कुर्त आयशेनवाल्ड (याच्या ‘कॉन्स्पिरसी ऑफ फूल्स’ या एन्रॉनवरील पुस्तकाची आठवण गेल्या शनिवारच्या ‘बुक-अप’ सदरात निघाली होती) यानं एका अप्रतिम लेखात या तीन उदाहरणांच्या निमित्तानं यशापयशाच्या रहाटगाडग्याचा वेध घेतलाय. माहिती तंत्रज्ञानाच्या अनेक नियतकालिकांत सध्या हा लेख चर्चेचा विषय बनलाय. या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या लेखानं भाष्य करायला लावलंय.
२००० सालच्या डिसेंबपर्यंत बिल गेट्सची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी उद्योगक्षेत्राची जागतिक सरताज होती. मायक्रोसॉफ्ट इतकी चांगली जगात दुसरी कोणती कंपनी असूच शकत नाही असंच एकंदर वातावरण. बिल गेट्स हा संगणक युगाचा अनभिषिक्त सम्राट गणला जात होता. योगायोग म्हणजे अमेरिकाही त्या वेळी ऐन भरात होती. संगणकाच्या क्षेत्रात राज्य होतं बिल गेट्स याचं; तर जगातल्या एकमेव महासत्तेवरचं बिल क्लिंटन यांचं राज्य नुकतंच संपलं होतं. त्या वेळी मायक्रोसॉफ्टच्या एका समभागाचा दर होता ११९.९४ डॉलर इतका. संपत्तिमूल्याच्या बाबतीत जगातली सर्वाधिक श्रीमंत कंपनी मायक्रोसॉफ्ट होती. त्या वेळी तिची मार्केट कॅप होती ५१००० कोटी डॉलर इतकी.
स्टीव्ह जॉब्स याच्या अ‍ॅपलला आकार येऊ लागायचा हाच काळ. आपण काय करणार आहोत, याची स्पष्ट जाणीव जॉब्स याला झाली होती. पण जगाला पूर्णाशाने व्हायची होती. त्यात बिल गेट्सच्या भोवतीची प्रभावळ त्या वेळी इतकी तेज:पुंज होती की त्यामुळे स्टीव्ह जॉब्सची दखल कोणी घेण्याची शक्यताही नव्हती. त्याच्या अ‍ॅपल कंपनीच्या समभागाचा दर त्या वेळी होता फक्त ८.१९ डॉलर, तर कंपनीचा आवाका होता ४८० कोटी डॉलर इतका.
नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर जगातील अत्यंत बुद्धिमान, कल्पक अभियंत्यांचे पाय रेडमंडच्या दिशेनेच जात होते. कारण तिथे मायक्रोसॉफ्टचं मुख्यालय आहे. प्रत्येक उत्तम, अभ्यासू अभियंत्याला आपण आज ना उद्या मायक्रोसॉफ्टमध्ये काम करावं असं वाटत होतं. अशाच काही प्रतिभावंत अभियंत्यांनी १९९८ साली एक नवीन कल्पना मांडली. त्यात पाटीसारख्या संगणकाच्या आकारात पुस्तक वाचायची सोय होती. त्यांनी ते उत्साहानं बिल गेट्सला दाखवलं. आश्चर्य हे की गेट्सनं त्याकडे पाहून नाक मुरडलं आणि असलं काहीही तयार करण्याची कल्पना फेटाळून लावली. बिल गेट्स याला विंडोजच्या पलीकडे जग पाहताच येत नव्हतं. आपलीच निर्मिती असलेल्या विंडोजच्या प्रेमात तो इतका पडला होता की त्याला पुढचं काही दिसतच नव्हतं.
त्यानंतर २००७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात अमेझॉन कंपनीचा किंडल हा पुस्तक वाचायचा संगणक आला. प्रचंड यशस्वी झालं हे उत्पादन. काही कोटींच्या संख्येनं हे किंडल विकले गेले. त्यानंतर तीन वर्षांनी स्टीव्ह जॉब्सच्या अ‍ॅपलचं आयपॅडही आलं.
alt

याचा अर्थ असा की नंतर साऱ्या जगाला ज्या उत्पादनानं नादावलं त्या उत्पादनाची कल्पना गेट्स याच्या कंपनीकडे कधीच तयार होती. मग त्यानं का नाही राबवली ती? उत्तर साधं आहे. त्या उत्पादनाचा चेहरा त्याला अजिबात आवडला नाही. ‘हे नवीन बाळ जराही विंडोजसारखं दिसत नाही’ असं गेट्स त्या वेळी म्हणाला होता. गेट्स आपल्याच निर्मितीच्या इतक्या प्रेमात पडला होता की त्यापेक्षा वेगळं काही असतं आणि तेही बरं असू शकतं, हेच त्याला कधी लक्षात आलं नाही. हे किंडलचं आणि नंतर आयपॅडचं यश त्याला इतकं लागलं की त्यानं नंतर तशी उत्पादनं तयार करण्याचा प्रयत्न केला. काही फार जमलं नाही त्यातून. कारण पहिल्याची नक्कल होऊ शकते. यशाची नक्कल करता येत नाही. वैयक्तिक संगणक म्हणजे पीसी, चालवणारी प्रणाली विंडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि व्यवसायांसाठी लागणाऱ्या संगणकांची प्रणाली ही तीन उत्पादनं ही गेट्सची जगाला देणगी. त्यावर त्याचीच मक्तेदारी होती. अजूनही आहे काही प्रमाणात. ही उत्पादनं त्यानं जगाला दिली तेव्हा त्यानं मक्तेदारी मोडली ती आयबीएम या कंपनीची. मायक्रोसॉप्टच्या आधीही संगणक होते. मोठमोठे. खोली एवढय़ा आकाराचे. त्यात आयबीएमची दादागिरी होती. गेट्सने संगणकाला छोटं केलं.. अगदी मांडीवर घेऊन काम करता येईल इतकं छोटं. ती क्रांती होती.
पण त्या क्रांतीच्या आनंदात पुढच्या क्रांतीच्या खुणा त्याला दिसल्या नसाव्यात. कारण विंडोजनंतरच्या संगणकीय काळात डिजिटलायझेशन हे मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. संगीताचं, चित्रांचं, छायाचित्रांचं डिजिटलायझेशन ही पुढच्या काळाची गरज आहे, हे त्याला लक्षातच आलं नाही. त्यामुळे २००१ सालच्या ऑक्टोबर महिन्यात जेव्हा अ‍ॅपलनं संगीताचा साठा काडेपेटी एवढय़ा खोक्यात साठवून ठेवणारा आयपॉड आणला, तेव्हा गेट्स ते उत्पादन बघून हसला होता. पण हे उत्पादन इतकं प्रचंड लोकप्रिय झालं की जगभरात कानोकानी आयपॉड्स दिसू लागले. अखेर त्याची दखल गेट्सलाही घ्यावी लागली. त्यानं २००६ साली आयपॉडच्या धर्तीवर झून नावानं आपला आयपॉड आणला. तो काही अर्थातच चालला नाही. चार वर्षांतच हे उत्पादन बिल गेट्सला बंदच करावं लागलं. इतकं पडलं ते. २०१० साली अ‍ॅपलनं आपला आयपॅड आणला. तेव्हाही गेट्सने फार काही केलं नाही. आता दोन वर्षांनी गेल्या महिन्यात त्यांना स्वत:चं आयपॅडसारखं उत्पादन आणावं लागलंय. त्यांचा सरफेस हा टॅबलेट पीसी बाजारात आलाय.
अर्थातच मायक्रोसॉफ्ट बाजारात घसरलाय. आज गेट्सच्या मायक्रोसॉफ्टचे समभाग गडगडत असताना, अ‍ॅपलच्या एका समभागाची किंमत आहे ६१४.३२ डॉलर इतकी. म्हणजे ८ डॉलरवरून तो इतका वर गेलाय. तर त्याच्या कंपनीची मार्केट कॅप आहे ५७४०० कोटी डॉलर्स इतकी. आधी होती फक्त ४८० कोटी डॉलर्स. आज परिस्थिती अशी आहे की अ‍ॅपलच्या आयफोन या एकाच उत्पादनाचा महसूल हा अख्ख्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या महसुलापेक्षा अधिक आहे.
हे असं का झालं, हा प्रश्न स्टीव्ह जॉब्सलाही विचारला गेला होता. त्यावर त्याचं उत्तर होतं :  मायक्रोसॉफ्टची खरी समस्या आहे बिल गेट्स हीच. त्याला फक्त व्यवसायात रस आहे. म्हणजे नवनवी उत्पादनं आणण्यापेक्षा व्यवसाय वाढवणं हेच त्याचं ध्येय आहे. संपत्तिनिर्मिती ही दुय्यम असायला हवी. उत्तमोत्तम उत्पादनं कशी देता येतील हे ध्येय असायला हवं.
आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचं म्हणणं हेच आहे. जे मायक्रोसॉफ्टच्या बाबतीत घडलं तेच अमेरिकेच्या बाबतीतही घडतंय. केवळ संपत्तिनिर्मिती हेच त्या देशाचं ध्येय राहिलं.. नवनवीन असं काही त्या देशानं केलंच नाही. मायक्रोसॉफ्टची घसरण आणि अमेरिकेची घसरण ही त्यामुळेच अशी समांतर आहे.
याचा अर्थ इतकाच की, नुसतं यश मिळून चालत नाही. पुढच्या मोठय़ा यशाकडे लक्ष असावं लागतं. तसं नाही झालं तर आपलं यशच आपल्या जिवावर उठतं. आपणच आपले यशबळी ठरतो!