अन्यथा : खणखणीत लव्हाळी.. Print

 

गिरीश कुबेर  - शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

जन्माला आल्यापासून आहे तसंच आहे, असं एक  उत्पादन आपल्या आसपास आहे.. अगदी जगभर आहे! हातातला मोबाइल कितीतरी बदलला, बदलत गेला आणि त्याच्या मूळ उपयोगापेक्षा आणखी बरीच कामं करू लागला.. पण ‘ती’ तशी नाही.. तंत्रज्ञान-बदलाच्या अनेक लाटा येऊनही ती लव्हाळय़ासारखी टिकून राहिली.. उपयुक्ततेचं नाणं खणखणीत असल्यावर मग काय!
हल्ली सगळं कसं सारखं बदलतच असतं. बदल हा सृष्टीचा स्थायीभाव पूर्वीही होताच. पण हल्लीच्या काळात तो जरा जास्तच लवकर लवकर व्हायला लागलाय.

माहिती तंत्रज्ञानानं तर एकंदरच बदलण्याच्या कल्पनेला इतका जोर दिलाय की त्या क्षेत्रात म्हणे तीन महिन्यांचंच वर्ष समजलं जातं. म्हणजे फक्त तीन महिन्यांपूर्वीची एखादी वस्तू या क्षेत्रातल्या मंडळींना.. शी किती जुनी आहे.. अशी वाटू लागते. या क्षेत्रात वाढदिवसही तीन तीन महिन्यांनी साजरे करतात की काय, ते माहिती नाही. पण दर तीन महिन्यांनी काही का काही या क्षेत्रात नवं घडावंच लागतं. सॉफ्टवेअर असेल, हार्डवेअर असेल सगळय़ात बदल होत राहायला हवा. तसा तो होईनासा झाली की अगदी कालबाह्यच समजायला लागलेत हल्ली.
उदाहरणार्थ आयफोन. जगात पहिला आयफोन जन्मला तो २००७ साली. तो येऊन जरा कुठे स्थिरावतोय तर त्याच्या एक दोन.अशा आवृत्त्या येत गेल्या. एक आला, दुसरा आला..आणि आता काल तर आयफोन फाइव्ह आलादेखील. म्हणजे दर वर्षांला एक अशा गतीनं या फोनच्या नवनव्या आवृत्त्या येत गेल्या. मानवनिर्मिती सोडली तर वर्षांला एक अशी आवृत्त्यांची गती ऐकायची सवय नाही आपल्याला. पण तिकडे असं अनेक उत्पादनांचं होतं. अ‍ॅपलला तोंड द्यायला जन्माला घातलेल्या सॅमसंग कंपनीच्या गॅलॅक्सी या फोनचंही तसंच. आवृत्त्यांवर आवृत्त्या निघाल्या त्या फोनच्या. आणि पंचाईत ही की नवीन आवृत्ती हाती नसेल तर आपल्याला बिच्चारं वगैरे समजतात तरुण पोरं. म्हणजे किती गरीब आहे.. बिच्चाऱ्यावर अजूनही अ‍ॅपल तीनवर दिवस ढकलायची वेळ आलीये.. असं हल्ली पोरांना वाटतं. पूर्वीच्या प्रीमिअर पद्मिनी वगैरे वापरताना कोणाला बघून कशी आता प्रतिक्रिया होते काहींची, तसंच.
    प्रश्न असा की हे इतकं बदलणं आवश्यक असतं का? आवश्यक असेल तर कोणासाठी? आपल्यासाठी की त्यातल्या कंपन्यांसाठी? असा बदल घडवून आणणं ही त्यांची बाजारपेठीय गरज असेल, आपण का तिला शरण जायचं? आणि बदल म्हणजेच प्रगती का? बदल हा समपातळीवरही असू शकतो.. म्हणजे उंची न वाढता एखादा आडवा वाढू शकत असेल तर? तरीसुद्धा प्रत्येक बदल हा उंच घेऊन जातोय आपल्याला; असं समजायचं का, शिवाय..फोनचं मुख्य काम समोरासमोर नसणाऱ्या किमान दोघांत संभाषण घडवून आणणं हे नाही का? तसं असेल तर मग उगाच यानं चित्रं काढता येतात, छायाचित्रं काढता येतात.त्यावर गाणी ऐकता येतात..हा सल्ला देतो, तो रस्ता दाखवतो..या सगळय़ाची खरोखरच गरज असते का, असा प्रश्न आपल्याला पडतो का?
  ते जाऊ द्या. पण जन्माला आल्यापासून आहे तसंच आहे आणि आजही कालबाह्य झालेलं नाही, आपली उपयुक्तता गमावून बसलेलं नाही.. असं एखादं उत्पादन सध्याच्या काळात आहे का?
आहे. आश्चर्य वाटेल. पण ते उत्पादन म्हणजे पेपर क्लिप. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी ती जन्माला आली. पण तिच्यात काहीही बदल झालेला नाही. आहे तश्शीच आहे. सडसडीत. वळणदार. हाताशी असावी असं वाटेल अशी आणि घट्ट धरून ठेवणारी.. अर्थातच कागदांना. तिचीच- म्हणजे पेपर क्लिपची-  ही कथा.
  खरं म्हणजे पेपर क्लिपच्या जन्माच्या आधीही कागद होताच. फक्त तो कापडाचा असायचा. इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनमध्ये कापडावर लिहून ठेवायची पद्धत सुरू झाली. पण हे प्रकरण महाग होतं. त्यामुळे जे कायमस्वरूपी जतन करायचं आहे तेच कापडावर लिहून छान त्याची पोथी बनवून ठेवून दिलं जायचं. कापड जड. तितकं काही ते लिहिताना उडायचं नाही. पण पुढे दोघांचा जन्म झाला. एक म्हणजे कागद. लाकडाच्या लगद्यापासून स्वस्तात कागद बनवायची कला विकसित झाली आणि कागद सर्रास वापरला जाऊ लागला. या कागदाच्या प्रसारामुळे आणखी एक संस्था जन्माला आली.
 कारकून. सरकारी मेजावर वेगवेगळय़ा प्रकारच्या कागदांवर वेगवेगळे आदेश लिहिणं, सरकारी नोंदी सांभाळणं वगैरे अनेक कामं कारकून या संस्थेच्या बोकांडी बसली. त्यामुळे सरकारी कचेरीत कागदांच्या डोंगरामागे लपलेला कारकून हे सर्रास दिसणारं चित्र होतं त्या वेळी. त्याची कामांची जबाबदारी जसजशी वाढली तसतशी आणखी एक गरज निर्माण झाली.
ती म्हणजे या कागदांना धरून ठेवील अशा काही युक्तीची. पेपर क्लिपच्या जन्माची कहाणी इथपासून सुरू होते.
औद्योगिक क्रांतीची मशाल ज्याच्या हाती होती त्या इंग्लंडसह अनेक देशांत कागद धरून ठेवणाऱ्या उपकरणासाठी खटपटी लटपटी सुरू होत्या. त्यात बऱ्यापैकी यशस्वी होण्याचा मान जातो अमेरिकेतील सॅम्युएल फे या व्यक्तीस. त्यानं अंगावरच्या शर्टास कागदपत्रं डकवण्यासाठीचा चिमटा बनवला. पठ्ठा इतका उद्योगी होता की त्याचं पेटंटही त्यानं घेऊन ठेवलं. किती साली? तर १८६७. म्हणजे आपल्याकडे तात्या टोपे, झाशीची राणी आदींचा पहिला स्वातंत्र्यलढा शांत होत असताना अमेरिकेत हा चिमटा जन्माला आला होता. त्यावर आणखी एका व्यक्तीनं काम केलं. अर्लमन राइट यानं वर्तमानपत्रं एकत्र ठेवता येतील अशी क्लिप तयार केली. ही घटना पहिल्या चिमटय़ाच्या जन्मापासून दहा वर्षांनंतरची. म्हणजे १८७७ सालची. इकडे अमेरिकेत अशी क्लिप जन्माला येत असताना त्यांचा लहान अवतार ब्रिटनमध्ये अवतरला. दरम्यान, लोखंडाची तार कागदांसाठी वापरण्याची पद्धत आलीच होती. पण त्यामुळे एक तर कागद फाटायचे आणि दुसरं म्हणजे त्यांचं लोखंड गंजलं की तो गंज कागदावरही पसरायचा.
यात बदल झाला तो स्टेनलेस स्टीलच्या शोधानंतर. दरम्यानच्या काळात कागद एकत्र ठेवण्यासाठी काही ना काही तयार करायचे उद्योग सुरूच होते. त्यातूनच जन्माला आली आजची पेपर क्लिप. १८९९ मध्ये विल्यम मिडलब्रूक या व्यक्तीनं या क्लिपसाठीच्या पहिल्या पेटंटसाठी अर्ज केला. गंमत म्हणजे त्याला पेटंट हवं होतं ते क्लिपसाठी नाही. तर त्या क्लिपा बनवणाऱ्या यंत्राच्या रचनेसाठी. एकाखाली एक अशी तीन चक्र. त्यातून एक तार जातीये. पहिल्यातून जाताना ती डावीकडे वळते. मग उजवीकडे आणि मग पुन्हा डावीकडे. तिसऱ्या वळणानंतर ती तार कापली जाते आणि क्लिप तयार. ही क्लिप बघता बघता जगभर पोचली. जगात आज कितीही अप्रगत मागास.. संगणकही नसलेले वगैरे प्रदेश असतील. पण पेपर क्लिप नाही, असा प्रदेश सापडणार नाही.
या विल्यमचं महत्त्व एवढय़ासाठी की त्यानं जी क्लिप बनवली तीत आजतागायत तसूभरही बदल झालेला नाही. त्रिकोणी टोकाच्या, लांब अशा क्लिपा आल्या. पण मूळ आकार तसाच राहिला. ब्रिटनमध्ये त्यांना जेम क्लिप्स असं म्हटलं जायचं. १९०४ मध्ये कुशमन अ‍ॅण्ड डेनिसन या कंपनीनं जेम (हिरा) नाव देऊन त्या क्लिपांचं पेटंट घेऊन टाकलं. या जेम्स क्लिपा इतक्या लोकप्रिय झाल्या की पेपर क्लिप्सला युरोपभर जेम क्लिप्स असंच म्हटलं जायचं. स्वीडनमध्ये तर पेपर क्लिप म्हणजेच जेम असं समीकरण बनून गेलं. म्हणजे तिथे कोणी क्लिप दे म्हणत नाही.तर जेम दे असं म्हणतात. आपल्याकडे या पेपर क्लिपच्या यू पिना झाल्या. असो.
 ज्या काळात बदलल्याशिवाय टिकता येणार नाही, असं सारखं सांगितलं जातं त्याच काळात या क्लिपा बदलाच्या नाकावर टिच्चून आहे तशाच आहेत. एवढं माहिती तंत्रज्ञान आलं, जग बदललं. पण ही क्लिप जराही बदलली नाही. संगणकानं फाइल या शब्दाला नवीन अर्थ दिला. पण ही फाइल प्रत्यक्षात आली की तिच्यातले कागद धरून ठेवायला अगदी बिल गेट्स आणि स्टिव्ह जॉब्स यांनाही हीच क्लिप वापरावी लागते. तीच ती. १८९९ साली जन्माला आलेली.
काळाच्या महापुरानं अनेकांना बदलायला लावलं.. लव्हाळीसारखी ही क्लिप तेवढी वाचली. शेवटी उपयुक्ततासुद्धा बंद्या नाण्यासारखी असावी लागते, हेच खरं.