अन्यथा : व्यक्ती आणि व्यवस्था Print

गिरीश कुबेर , शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

ममताबाईंनी हा कारखाना बंद केला, नरेंद्रभाईंनी तो आपल्याकडे सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो बंद का केला म्हणून ममताबाईंना त्यांच्या कोणी काही विचारलं नाही, तसंच तो सुरू का केला म्हणून नरेंद्रभाईंना त्यांच्या कोणी विचारलं नाही. एकाचा लहरीपणा नकारात्मक म्हणून त्यावर टीका करायची आणि दुसऱ्याचा लहरीपणा विधायक म्हणून त्याचं कौतुक करायचं.प्रगती होत असेल, तर यात वाईट काय?
.. या संभाषणाची गाडी महाराष्ट्रापाशी आल्यावर मात्र कौतुकाचा तो परिचित सूर बदलला होता..त्याऐवजी एक फरक स्पष्ट होत होता..

मध्यंतरी एक उद्योगपती भेटले. तसे नामांकितच. दोनेकहजार कोटींची उलाढाल. खूप लांबचं बघणारे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पुढच्या काही वर्षांत पाचेक हजार कोटींवर पोहोचणार हे नक्की. पण वागाबोलायला साधे. एरवी रिझव्‍‌र्ह बँकेतला कारकूनसुद्धा प्रत्येक नोटेवर आपल्याला सही करावी लागत असल्यासारखा वागतो, असा आपला अनुभव. पण त्या मानाने हे काहीच न मिरवणारे असे. परत मोकळे. हाही तसा वेगळेपणाच. याचं कारण असं की संपत्ती निर्मितीतली माणसं नेहमी गोडगोडच बोलतात. कदाचित या गोडबोलेपणातच संपत्ती निर्मितीची कौशल्यं दडलेली असावीत. तसंही असेल. पण हे मोडेन पण वाकणार नाही असा बाणा नसूनही स्पष्ट बोलणारे.
.. तर ओळखीनंतर सुरुवातीचे काही क्षण येतं ते अवघडलेपण मागे पडल्यानंतर हे बोलायला लागले. विषय अर्थातच त्यांच्या क्षेत्राशी संबंधित. म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांना कसं काहीच कळत नाही, ज्याला कळतं त्याला नको त्या गोष्टीतच रस कसा असतो, पावलापावलावर अडथळे कसे आणले जातात.. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड कशी आहे.. असं सगळंच आलं. बऱ्याचदा ही उद्योगपती वगैरे मंडळी आपण उद्योग करतो ते कसे समाजाच्या भल्यासाठीच, अशी एक बकवास भावना बोलून दाखवत असतात. तसं यांचं नव्हतं. यांची भूमिका चांगलीच वास्तववादी. त्यामुळे त्यांचे अनुभव ऐकताना बऱ्याच गोष्टी कळत होत्या.
alt

हल्ली उद्योगपतींच्या, व्यापारविषयक क्षेत्रातल्यांच्या चर्चेचा शेवट हमखास एका मुद्दय़ावर होतो. तो म्हणजे गुजरात. म्हणजे बाकी सगळय़ा देशांत काळाकुट्ट अंधार असताना गुजरात कसा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या स्वयंप्रकाशित नेत्याच्या तेजानं उजळून निघालाय, असं ऐकायला येत असतं. त्यांच्या अनुभवापुरतं ते खरंही असतं. एरवी महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात शेतीक्षेत्राच्या विकासाचा दर शून्याच्याही खाली जात असताना शेजारच्याच राज्यात हा दर दुहेरी आकडय़ाइतका होणं हे खरंच कौतुकास्पद. वास्तविक गुजरात हा काही बिहारसारखा नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध असा प्रदेश नाही. शिवाय बऱ्याच मोठय़ा विभागात बरंच वाळवंटही आहे. तरीही गुजरात बरंच काही करू शकला, हे दुर्लक्ष करण्यासारखं नाहीच. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमधेही विजेची कमतरता होती. परंतु वेगवेगळय़ा उपायांनी ती कशी कमी केली आणि त्या उपायांचा प्रारंभ महाराष्ट्रात त्याच वेळी होऊनही इथे ती का नाही कमी होऊ शकली.. हे आपण कळून घेतलं की गुजरातचं मोठेपण कळायला मदत होते.
तेव्हा आता आपल्याला गुजरातेत प्रगतीचा वारू कसा चौखूर उधळला आहे हे ऐकायचं आहे, अशी मनाची तयारी झाली. हे उद्योगपती महाशय भरभरून बोलत होते गुजरातबद्दल. यातल्या बऱ्याचशा गोष्टी इतर अनेक उद्योगपतींनी आधीच बोलून झालेल्या होत्या. त्या आपल्या डोक्यात जाणार नाहीत याची खबरदारी घेत या उद्योगपतीला ऐकणं सुरू होतं. मग चर्चा यथावकाश त्यांच्या उद्योगविस्ताराकडे वळली. तेव्हा मात्र तीच तीच चरपटपंजरी ऐकून आलेली सुस्ती एकदम निघून गेली.
कारण बोलता बोलता या उद्योगपतींना मी विचारलं होतं त्यांच्या भावी कारखान्याबद्दल. तेव्हा हा कारखाना मी गुजरातमध्ये काढणार नाही, असं ते बोलून गेले. लक्षात आलं, ही गंमतच आहे. इतकं सगळं गुजरातमध्ये आहे. उद्योगस्नेही मुख्यमंत्री, संवेदनशील आणि कार्यक्षम असं प्रशासन. तेव्हा पुढचा कारखाना या उद्योगपतीचा गुजरातेतच असायला हवा, हे उघड आहे. पण त्यालाच हे नाही म्हणतायेत. एखादा पदार्थ आवडल्याची इतकी स्तुती करायची आणि खायला मात्रं दुसरंच काही मागायचं.. तसाच हा प्रकार. पण ते गंभीर होते. म्हणायचं म्हणून म्हणत नव्हते मी गुजरातमध्ये कारखाना काढणार नाही.
असं का?. हा प्रश्न पडणं साहजिकचं होतं. मी तसं लगेच त्यांना विचारलं. उत्तरादाखल त्यांनी प्रतिप्रश्न केला.
केंद्रात ए. राजा यांचा दूरसंचार घोटाळा झाला, तो कशानं?
मी सांगितलं.. त्याविषयी वाचून आणि लिहून इतकं काही पाठ झालं होतं की राजाइतक्याच अधिकारवाणीनं त्याविषयी माहिती देता येत होती. ती त्यांनी ऐकली. वर विचारलं.. या सगळय़ाचा अर्थ काय?
मी म्हटलं : अर्थ काय म्हणजे.. राजा यांनी सगळय़ांना गुंडाळून टाकलं आणि आपल्या मर्जीप्रमाणे परवाने वाटले आणि रग्गड कमावले.
त्यावर ते म्हणाले : कोळशात काय झालं?
मी म्हटलं तेच. कोळसा जमिनीतून काढायचा कोणी, विकायचा कोणी, किती दराने विकायचा.. असं काहीच कोणी ठरवलं नाही आणि तरीसुद्धा कोळसा विकला गेला.
म्हणजे अर्थ तोच ना.. त्यांनी विचारलं. मग म्हणाले- टाटांचा नॅनोचा प. बंगालातला कारखाना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंद करायचं ठरवलं.. ते का?
मी त्यांना म्हटलं.. ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत असं का याचं उत्तर देता येत असतं तर मनमोहन सिंग यांच्या चेहऱ्यावर हसू नसतं का उमटलं? वाजपेयींची गुडघेदुखी नसती का सुसह्य झाली? ममताबाईंचं काय कधी कळतं का?
त्यावर ते उद्योगपती म्हणाले : बरोबर.. बाईंच्या मनात आलं.. त्यांनी कारखाना बंद करून टाकला. बरोबर?
मी म्हटलं हो! त्यावर लगेच त्यांचा पुढचा प्रश्न : तो गुजरातमध्ये सुरू करायचा निर्णय कोणी घेतला?
एव्हाना परीक्षा द्यायचा मला कंटाळा आला होता. नाही तरी पत्रकारांना प्रश्न विचारलेले आवडतच नाहीत. तेव्हा चेहऱ्यावर किरकिरेपणा दिसू न देता मी म्हणालो.. आता तुम्हीच सांगा.
तर त्यावर ते उत्साहाने म्हणाले : नरेंद्र मोदी यांनीच घेतला किनई?
तेव्हा त्यांना म्हटलं, तिकडे आख्खंच्या आख्खं मंत्रिमंडळ.. म्हणजे मुख्यमंत्री ते पुढचे दहा क्रमांक- सगळय़ा खुच्र्यावर मोदीच बसतात. त्यात विशेष काय?
त्यावरचा त्यांचा प्रश्न निरुत्तर करणारा होता. ते म्हणाले : ममताबाईंनी चक्रमपणाने हा कारखाना बंद केला, नरेंद्रभाईंनी तितक्याच चक्रमपणे तो आपल्याकडे सुरू करण्याचा निर्णय घेतला. तो बंद का केला म्हणून ममताबाईंना त्यांच्या कोणी काही विचारलं नाही, तसंच तो सुरू का केला म्हणून नरेंद्रभाईंना त्यांच्या कोणी विचारलं नाही. एकाचा लहरीपणा नकारात्मक म्हणून त्यावर टीका करायची आणि दुसऱ्याचा लहरीपणा विधायक म्हणून त्याचं कौतुक करायचं. असं कसं काय?
मी म्हटलं. त्यात वाईट काय? प्रगती तर होते ना.. त्यामुळे.
तोच तर धोका आहे.. ते म्हणाले.. आज जी काही गुजरातची घोडदौड वगैरे आहे ती एकटय़ा मोदींमुळे. प्रगतीच्या आड येणाऱ्यांना ते खडय़ासारखे बाजूला करतात आणि प्रकल्प रेटतात. पण आज ना उद्या मोदी जाणार. कशानं जातील ते महत्त्वाचं नाही.. दिल्लीत जातील, निवडणूक हरतील काहीही होईल. ते काही तिथे कायमचेच राहणार आहेत असं नाही. परंतु तसे ते गेल्यावर मोदी यांनी निर्णय प्रक्रियेत ज्यांना डावललंय ते मात्र तिथे असतील. तेव्हा इतके दिवस तोंड दाबून मोदींचा मार खाणारी ही मंडळी अशा परिस्थितीत मोकाट सुटतील आणि ज्यांना ज्यांना मोदी यांच्यामुळे फायदा झाला त्यांच्या मागे लागतील.. असं होऊ शकतं की नाही. कोणतंही प्रारूप हे व्यक्तिकेंद्रित असलं की हे असंच होतं. गुजरातचा विकास झालाय हे नक्की, होतोय हेही नक्की. पण तो विकास होत राहील यासाठीची व्यवस्था नाही. जे काही आहे ते व्यक्तिकेंद्रित आहे. आपली जी काही समस्या आहे ती सगळी व्यक्तिकेंद्रिततेमुळे आहे. उत्तम व्यक्ती असतात.. पण आपण उत्तम व्यवस्था तयार करत नाही. तशी ती करायला हवी. कारण उत्तम व्यक्ती आज आहे उद्या नाही.. उत्तम व्यवस्था मात्र कायमची राहू शकते.
थोडक्यात, काही मूलगामी असेल तर महत्त्व व्यक्तीला नको, व्यवस्थेला हवं.
महत्त्वाचाच मुद्दा म्हणायचा हा!