सो कुल : उचल-बांगडी! Print

शुक्रवार , ५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

जगरहाटी आणि बदल हे समानार्थी शब्द असावेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विषयात विज्ञान, इतिहास, भाषा, कला. सगळीकडे हिशोब हा धडाही समानच असावा. तो शिकणं किंवा समजून तरी घेणं अपरिहार्य होत चाललं आहे. इथलं दुकान? इथलं दुकान कुठे गेलं..? मी गोंधळून इकडे-तिकडे पाहात मोठय़ाने विचारलं. आसपास उभी असलेली माणसं चमकून वळून बघायला लागली. एक माणूस फोनवर ओरडत बोलत होता. तो बोलायचा थांबला. एक फळवाला फळं रचत होता तो आश्चर्याने बघायला लागला. मी भांबावून गेले होते. शृंगार बिंदी नावाच्या- माझ्या अतिशय लाडक्या दुकानाच्या जागी एक व्यक्तिमत्त्व नसलेलं ठोकळेबाज असं मोबाइलचं दुकान उभं राहिलं होतं. वेगळेच कामगार शिपायासारखे तिथे कामाला लागले होते. कुंकवाची रेघ ओढलेला एक इसक मालक असल्याच्या अधिकाराने काऊंटरच्या मागे चहा पीत बसला होता. माझ्या प्रश्नाकडे त्याने लक्षही दिलं नाही. मी आतल्या आत रडकुंडीला आले. तेवढय़ात फळवाला पुटपुटला. ‘‘ये नई दुकान है.’’ माझे हातपायच गळल्यासारखे झाले. भर गर्दीच्या रस्त्यात- भर दिवसा- आपण रडायला लागणं बरं दिसणार नाही असं वाटून मी एकदम रस्ता ओलांडून गेले आणि पुन्हा वळून पाहात राहिले.
माझ्या डोळ्यासमोर आमचा शृंगार बिंदीचा गोड पसारा दिसायला लागला. टिकल्यांची पाकिटं पताकांसारखी टांगलेली असायची, ती वाऱ्याबरोबर हलायची. मेंदीचे कोन, काचेच्या बांगडय़ा, नेलपॉलिश रिमूव्हर. सगळं मी इथूनच घ्यायचे. गडबडीत जाऊन एखाद्या सिनेमासाठी वगैरे ‘‘लाल सिंदूर दिजिए. रहेगा ना?’’ असं विचारलं की दुकानदार हसून वळायचे. हो हो अशी मान हलवायचे हसत. ‘‘क्यूँ नही रहेगा.’’ असं म्हणायचे. मध्यमवयीन होते. चाळीस पंचेचाळीसच्या आसपास. आता आठवले. त्याच्याही कपाळावर कुंकवाची रेघ असायची. कधी कधी नायलॉनची साडी नेसलेली त्यांची बायको बांगडय़ा नीट लावताना किंवा पदराने वारा घेताना दिसायची. कधीही मी तिथून फक्त एक वस्तू घेऊन बाहेर पडले नाही. सेफ्टीपिना, रबर, ब्लीच असं काही तरी अजून घेत राहायचे. प्रत्येक वेळी ‘‘टोटल किजिए. हां. अब टोटल किजिए.’’ असं गडबडीने म्हणत राहायचे. टिकल्यांची पाकिटं तर हमखास, ऐन वेळी बेरजेत घुसवायचे. ‘‘हे दाखवा. ते काय आहे.’’ असं म्हणत मालकांना भंडावून सोडायचे. तेही ‘‘रुकीये रुकिये.’’ म्हणत माझ्या सरबत्तीला शिताफीने तोंड द्यायचे. माझ्या आईला मावशीसाठी हवी असणारी मीना खाकी पावडर मला युरेका! सारखी इथेच मिळाली होती अचानक. अख्खी मुंबई पालथी घातली होती मी त्या पावडरीसाठी. दर दोन-तीन महिन्यांनी त्या पावडरीचं निमित्त काढून मी शंृगार बिंदीमध्ये जायचे. नेहमीच्या गिऱ्हाईकाचं आदरातिथ्य म्हणून डोक्यावरचा मिनी फॅन सुरू केला जायचा आपुलकीने.
तो माझा अत्यंत आवडता, गजबज विसरून स्वत:त हरवण्याचा छोटा गाळा लुप्त झाला होता. त्या लहानशा दुकानाचा नफा-तोटा, वार्षिक उत्पन्न असं कुठलंच गणित कधी माझ्या मनात आलं नव्हतं. कदाचित मोबाइलवाल्या मालकानं आमच्या शृंगार बिंदीला मोठी ऑफर दिली असेल. कदाचित ती जागा चार भावांच्या नावावर असेल. आणि मधल्या भावानं बुडीत खात्यात चाललेलं टिकल्या पावडरी कंगव्यांचं छोटं खोपटं उचलायचं ठरवलं असेल. कदाचित आमचे हसरे मालक किंवा त्या भाभी. काय कोण जाणे. काय झालं असेल. पण माझ्या डोळ्यातनं पाणीच वाहायला लागलं.
मला एकदम कळलं की, जग बदलत चाललंय. स्पर्धेत या किंवा बाहेर व्हा. थेट मैदानाबाहेर. असा नवा नियम लागू झालाय. रमतगमत, मौज घेत जगण्यासाठी हे शहर नाही. अशी कर्कश्श आकाशवाणी माझ्याभोवती घुमायला लागली. शंृगार बिंदीसारखंच आमचं लक्ष्मी सुपर स्टोअर्स गेलं. माझ्या आधीच्या घरापाशी असलेलं. मी नेहमी होम डिलिव्हरीने काय काय मागायचे. फक्त कांदे-बटाटे, साबण, कापूर किंवा लिहून काढलेली पंधरा-वीस गोष्टींची यादी असो- लगेच आणून द्यायची या दुकानातली मळकट-वेंधळी दिसणारी- पण प्रामाणिक आणि तत्पर असणारी मुलं. क्वचित माझी आई प्रसाद म्हणून लाडू वगैरे हातावर ठेवायची किंवा मी माझ्या सिनेमाच्या गाण्यांची साडी वगैरे दिली तर आनंदून जायची. माझा गुजराती सिनेमा त्या सगळ्यांनी आवर्जून डीव्हीडी आणून एकत्र पाहिला होता. दुसऱ्या दिवशीपासून ते सगळे माझ्याशी त्यांच्या मारवाडी भाषेतच बोलायला लागले. त्यांच्या बिलाच्या यादीतलं अक्षर आणि आकडे कायम अगम्य वाटायचे. चुकून कधी तपासला हिशोब तर एक रुपयाचाही फरक नसायचा. मी पूर्ण विश्वासाने कागदावरची बेरीज देऊ करायचे. आमसूल हा पदार्थच त्यांना माहिती नव्हता आधी. नंतर आठवणीने. ते काळपट ओलसर ‘कोकम’ आणि माझ्या आवडीचे टोस्ट स्टॉकमध्ये ठेवायचे. दोन-एक महिन्यांपूर्वी मी इकडे-तिकडे न बघता गाडीतून उतरून दुकानात घुसायला गेले. तर शटर बंद! गुरुवारही नव्हता. मी पलीकडच्या मुलाला काही विचारायच्या आत तो तोंडभर हसत म्हणाला. बेच दिये है वो. अब हमारे यहाँसे सामान लिया करो.
पुण्यातलं आमचं किराणा सामानाचं विक्रम जनरल, सावरकरांचा गोठा, गणेश बेकरी, गिरणी, झेरॉक्स आणि एसटीडी बूथ. अशा किती तरी गोष्टी आणि त्या संदर्भातली माणसं सगळं होत्याचं नव्हतं झालं. असं वाटतं. आपल्या आठवणी कायम ठेवण्यासाठी कुणी नुकसानीचा धंदा सोसावा का. नाही. तसं नाही. पण कधी कधी हा निव्वळ वेग. ही बदलाची गती आपल्याला भिववून टाकते. न भिता ते बदल स्वीकारणं म्हणजेच मोठं होणं का? किती विदारक आहे हे समंजसपणे मोठं होणं..