ग्रंथविश्व : आनंदाचा उंबरठा Print

शशिकांत सावंत ,शनिवार, २१ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सुखाची संकल्पना तपासून पाहणे, तिची व्याख्या करणे हे तत्त्वज्ञ आणि भाष्यकारांचे काम! पण अनुभवांमधून आलेला आनंद आणि त्यातून उमगलेले सुख यांच्या खूणगाठींचा पट मांडणारी दोन लोकप्रिय पुस्तके आहेत..या पुस्तकांनी काम केले, ते प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आनंदाचा उंबरठा दाखवून देण्याचे. आनंद सापेक्ष असतो, पण या पुस्तकांतून इतरांच्या आनंदाची परीक्षा आपल्याला करता येते..

alt

‘सुखाचा शोध’ ही एक सर्वसाधारण मानवी ओढ आहे. ‘प्लेझर’ किंवा ऐंद्रिय सुख आणि जाणवणारे संवेदनासुख सर्वाना सारखे असेल, पण त्यापलीकडे सुखाची व्याख्या करण्याचे प्रयत्न होत राहतात. एखाद्या संस्कृतीचा सुखाबद्दलचा दृष्टिकोन असू शकतो, पण विविध संस्कृतींतले लेखन ज्या भाषेतून प्रसिद्ध होते, त्या इंग्रजीत या विषयावर विपुल आणि निरनिराळ्या प्रकारचेही साहित्य आढळते. हेन्री डेव्हिड थोरो, बटर्रण्ड रसेल यांच्यासारख्यांपासून ते जे. कृष्णमूर्तीपर्यंत अनेक तत्त्वज्ञांनी सुखाच्या संकल्पनेचा शोध घेणारे लिखाण केले आहे. त्याउलट डेल कान्रेजी यांचे ‘हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग’ तसेच नॉर्मन व्हिन्सेंट पील ते अगदी दीपक चोप्रा, रविशंकर अशा अनेकांच्या पुस्तकांनी यात संख्यात्मक भर टाकली आहे. इतकी की, केवळ या सुखशोधक आणि आनंदवर्धन करू पाहणाऱ्या पुस्तकांनी एक छोटी लायब्ररी भरू शकते.
थोरोसारख्यांनी १९ व्या शतकात नदीकाठी स्वत:चे घर बांधले. २८ डॉलरमध्ये त्याने वर्षभर गुजराण केली. आज हे घर बघायचे तर ५० डॉलर तिकीट आहे. निसर्गाच्या जवळ जाणे, साधे राहणे, स्वत:ची कामे स्वत: करणे, भरपूर चालणे यात त्याला आनंदाची गुरुकिल्ली सापडली. बट्र्राण्ड रसेल तसेच जे. कृष्णमूर्ती यांनी दु:खाचे विश्लेषण करून त्याची मुळे, त्याची कारणे शोधणे यावर भर दिला आहे. प्रत्येक क्षण उत्कटतेने जगणे (लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट), मन:स्थिती दु:खी झाल्यास ती अलिप्तपणे निरखणे, त्याच्या कारणांचा स्वत: शोध घेणे अशा गोष्टी कृष्णमूर्तीच्या शिकवणीत आढळतात. सुखाच्या शोधातील साहित्यात क्षणिक सुख आणि शाश्वत सुख यांत फारकत केलेली आढळते. शाश्वत सुखाची वाट अध्यात्माच्या हिरवळीवरून जाते, हेही बऱ्याच जणांनी सांगितलेले आहे, पण व्यक्तिगत पातळीवर शोध घेणाऱ्या अ‍ॅना क्विंडलीन या अमेरिकन लेखिकेचे आणि मॅथ्यू रिकार्ड या फ्रेंच भिक्षूचे अशी दोन पुस्तके सुखाच्या शोधाची कहाणी सांगतात.
अ‍ॅना क्विंडलीन यांच्या २००० साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे नाव आहे  ‘अ शॉर्ट गाइड टू हॅपी लाइफ’. अ‍ॅना या पुलित्झर पारितोषिकविजेत्या स्तंभलेखिका आणि कादंबरीकार आहेत. त्यांचे पुस्तक केवळ पन्नास पानांचे आणि तेही सचित्र आहे. कमीतकमी शब्दांत आनंदी होण्याचा धडा वा पाठ असे त्याचे स्वरूप आहे. सुरुवातीलाच त्या दोन वाक्ये सांगतात. एक म्हणजे, ‘अमेरिकेतील एका सिनेटरने कॅन्सर झाल्यावर पुन्हा सिनेटची निवडणूक लढविणे नाकारले आणि म्हटले, मृत्युशय्येवर असताना कोणालाही ‘आपण कार्यालयात अधिक वेळ घालवायला हवा होता,’ असे कदापिही वाटणार नाही’ आणि दुसरे वाक्य तिला वडिलांनी पोस्टकार्डावर लिहिलेले होते.  ‘इफ यू विन द रॅट रेस, यू आर स्टिल अ रॅट!’  तिचा मुख्य संदेश आहे तो ‘जगायला लागा’ - तुमच्या आयुष्याचे ताबेदार पूर्णपणे तुम्हीच असता- तेही संपूर्ण आयुष्याचे, केवळ बसमधल्या, गाडीतल्या, संगणकासमोरील आयुष्याचे नव्हे; तर संपूर्ण आयुष्याचे.. केवळ मनाचे नव्हे किंवा केवळ बँक अकाऊंटचेही नव्हे, तर तुमच्या आत्म्याचे ताबेदार तुम्हीच असता. तेव्हा आयुष्य भरभरून जगायला लागा.
लेखिका १९ वर्षांची असताना तिची आई कॅन्सरने मरण पावली. वयाच्या ४० व्या वर्षी अनेक स्त्रियांचे निधन होत असेल, पण लेखिकेची ती आई होती. याचमुळे तिला आयुष्य छोटे असते, संपणारे असते याची जाणीव झाली. मृत्यूची जाणीव ही आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे, कारण त्यामुळे कळते की, घडय़ाळ टिकटिकते आहे आणि त्याची जाणीव नसेल, तर आपली वेळ आणि आयुष्य वाटेल तसे वाया जाऊ शकते. हे मृत्यूपर्यंतचे आयुष्य काळे-पांढरे नसते तर रंगतदारही असते आणि त्या दोघांत एक सीमारेषा असते, पूर्ण काळोखात बुडाल्यावरही कुठून तरी प्रकाश उमटतो याची तिला जाणीव झाली ती आईच्या मृत्यूमुळे.
ती सांगते की, फार कमी वेळेत मी खूप काही शिकले. कशाच्या तरी मागे धावणे सोडून द्या, आपल्यावर प्रेम करणारी माणसे शोधा आणि हेही लक्षात ठेवा की, प्रेम म्हणजे काही विरंगुळा नव्हे, तर तेही एक काम असते. सतत शिकत राहणे, आयुष्यातील प्रसंगांतून योग्य तो धडा घेणे आणि त्यानुसार पुढच्या जगण्यात सुधारणा करणे हे आवश्यक आहे हे सांगते. छोटय़ा वाक्यांतून बनलेल्या पुस्तकात नेहमीच ‘सांगितलेल्या गोष्टी सांगितल्यासारखे’ वाटेल. उदाहरणार्थ, मरणाचे स्मरण असावे, असे संत रामदासांनी सांगितले आहे. तिचे लेखन थोडेसे काम आणि पशाच्या मागे लागलेल्या अमेरिकन संस्कृतीशी फटकून वागणाऱ्या लोकांसाठी आहे.. पण नेमकी हीच संस्कृती आपल्याकडे रुजत आहे.
ती सांगते, आपण करीत असलेले काम हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, सारे आयुष्य नव्हे. मित्रमत्रिणी, नाती, प्रेम, त्यातील उबदारपणा या साऱ्यांचे मिळून आयुष्य तयार होते, त्याचाच काम हा एक भाग असतो. हे सारे नीट असेल तर कामही नीट होते.
उत्तम गाडय़ा, छान घरे, स्वििमग पूल, सुखोपभोगाची अत्याधुनिक साधने हे सारे भोवती आहे. पण सारे असूनही ग्लास अर्धा रिकामा आहे असे का वाटते?  कारण आपण आयुष्य सुंदर आहे हे आपण लक्षातच घेत नाही. सुंदर म्हणजे वैश्विक अर्थाने नव्हे, तर छोटय़ा गोष्टींतील सौदर्य समजून घेण्यामुळे. पाऊसधारा, फुलणारे एखादे फूल, कोचावर शेजारी बसलेले मूल, प्रेमळ नात्याचा कटाक्ष, वाचनीय आणि आवडती पुस्तके अशा छोटय़ा छोटय़ा क्षणांतून आयुष्य बनते. अनेकदा हे क्षण न सांगता येतात आणि खूप धावपळीचे आयुष्य घालविणाऱ्या आपल्याला ते दिसतच नाहीत. त्या क्षणांना अनुभवण्यासाठी, जागा करून देण्यासाठी आपण स्वत:ला शिकवायला हवे, त्यासाठी स्वत:ला जगायला लावायला हवे.
‘मी जेव्हा २० वर्षांचा होतो तेव्हा आनंद किंवा समाधान या शब्दांचे मला काहीच महत्त्व नव्हते,’ अशी प्रस्तावना करणाऱ्या मॅथ्यू रिकार्ड यांच्या पुस्तकाचे नाव आहे ‘हॅपिनेस’. मूळ फ्रेंच पुस्तक २००३ मध्ये प्रकाशित झाले, त्याचा इंग्रजी अनुवाद २००६ साली. अनुवादित इंग्रजी आवृत्तीसाठीच्या प्रस्तावनेत ते सांगतात : मी पॅरिसमधला टिपिकल विद्यार्थी होतो. आयझेसस्टाइन आणि मार्क्‍स ब्रदरच्या चित्रपटांना जायचो, गिटार वगैरे वाजवायचो. तेव्हा- मे १९६८ मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या उठावात मीही भाग घेतला, पण तसा तर मी स्पोर्टकारदेखील चालवायचो. असा चारचौघांसारखाच विद्यार्थी! आयुष्य कसे घालवायचे याचा विचारच शिवला नव्हता, पण आपल्यामध्ये समृद्ध होण्याची जाणीव होती. आज ३५ वर्षांनंतर मला अजून खूप प्रवास करायचा आहे, पण माझी दिशा नक्की हवी आणि प्रत्येक पाऊल आनंदाने टाकतो. ते सांगतात की, सतत मानसशास्त्र आणि मनोविज्ञान हे प्रवृत्ती बिघडलेल्या किंवा मानसिक बिघाड झालेल्यांना नॉर्मल स्थितीत आणण्याबद्दल बोलत असतात, पण नॉर्मल माणसाला आनंदाची वरची पातळी गाठण्याची क्षमता अमलात आणता येईल का, याचा आता विचार चालू आहे. मॅथ्यू रिकार्ड यांनी नोबेल पारितोषिकविजेत्या वैज्ञानिकाच्या हाताखाली मॉलेक्युलर बायोलॉजीचे शिक्षण घेतले. १९६७ साली त्यांनी पहिल्यांदा भारत प्रवास केला आणि त्यांनी बुद्धिझमचा अभ्यास सुरू केला. गेली ३५ वर्षे ते तिबेटी मठात राहत होते.
ध्यानाचा मेंदूवर काय परिणाम होतो, याबद्दल सध्या ते संशोधन करीत आहेत. बौद्ध, हिंदू, ख्रिश्चन तत्त्वज्ञान, कथा, कादंबरी, कवितांमधून उदाहरणे तसेच आपल्याला भेटलेल्या माणसांचे ‘केस स्टडी’ यांचा उपयोग करून हे पुस्तक लिहिलेले आहे. ते सांगतात, ‘१८८८ पासून मानसशास्त्रावरील पुस्तकांच्या सारांशांची जी प्रकरणे (अ‍ॅबस्ट्रॅक्ट्स) प्रसिद्ध झाली आहेत त्यात एक लाख ३६ हजार ७२८ इतकी शीर्षके राग, नराश्य, द्वेष याबद्दल आहेत, तर केवळ ९५१० इतकी प्रकरणे आनंद, समाधान आणि सुख याबद्दल आहेत. या दुसऱ्या प्रकाराला पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हटले जाते आणि त्यातल्या संशोधनावर लेखकाचा भर आहे. नकारात्मक भावना नेमक्या कशा निर्माण होतात आणि त्या टाळण्यासाठी काय करावे याचे उत्तर देताना ते काही करता येण्याजोगी कृती सुचवितात (या कृती प्रत्येक प्रकरणाच्या मागे सुचविल्या आहेत). यापैकी, ‘ध्यानासारख्या अवस्थेत बसून श्वासावर नियंत्रण ठेवून गोंधळ वा तत्सम विचारांचे निरीक्षण करून ते पाहणे’ ही पद्धत कृष्णमूर्तीच्या जवळ जाणारी आहे. अन्यत्र थोरो ते गांधी यांच्यासारख्याच्या शिकवणीचा उपयोग करून तिरस्कार, द्वेष समजून घेण्यासाठी मानसशास्त्रामध्ये चाललेले संशोधन समजावून सांगतात. हे सारे करीत ते आपले प्रतिपादन टोकदार करतात. त्यांच्या मते, ‘दु:ख आणि असमाधान यांत फरक आहे. तो ओळखला पाहिजे आणि वेदना व दु:ख, होरपळणे आणि क्लेश यातील फरकही समजून घेतला पाहिजे. असमाधान आपण तयार करतो तर दु:ख आपण ओढवून घेतो. ज्या ज्या गोष्टींमुळे दु:खे होतात, त्या त्या कारणांवर काही वेळा आपल्याला नियंत्रण ठेवता येते, तर काही वेळा त्या आपल्या अजिबातच हातात नसतात. उदाहरणार्थ अपंगत्व, आजारपण, नात्यातील आकस्मिक मृत्यू या साऱ्यांनी आपण दु:खी होतो. असमाधान ही वेगळी गोष्ट आहे आणि अनेकदा ती बाह्य वेदना किंवा भौतिक कारणांशी संबंधित असू शकते, पण दरवेळी ते कशाशी तरी निगडित असतेच असे नाही.
शिवाय आनंद, क्षणिक आनंद आणि समाधान यांतही फरक करायला ते सांगतात. थोडक्यात परिस्थिती समजावून घेणे, त्याचे विश्लेषण करणे आणि तात्त्विक दृष्टीने त्याकडे पाहणे अशी थोडीशी आनंदाकडे जाणारी बौद्धिक वाट मॅथ्यू रिकाडरे दाखवितात. ज्याँ पॉल सात्र्च्या ‘नॉशिया’पासून ते नागार्जुनाच्या उताऱ्यापर्यंत विविध साहित्यिक संदर्भानी हे पुस्तक समृद्ध झालेले आहे.
या दोघांमध्ये साम्य फारसे नाही. दोन पुस्तके एकाच विषयाकडे निरनिराळय़ा पद्धतींनी पाहणारी; परंतु दोन्हींच्या वाचनानंतर प्रश्न असा पडू शकतो की, प्रत्येकालाच सुखाचा आणि जीवनानंदाचा अर्थ कळण्यासाठी एखादा उंबरठा ओलांडावा लागतो काय? अ‍ॅनाने तो १९ व्या वर्षीच ओलांडला आणि मॅथ्यूला तो ओलांडण्यासाठी, तो म्हणतो त्याप्रमाणे, ३५ वर्षे लागली.
आनंद सहज मिळणारा असतो, तो परिश्रमपूर्वक मिळवलेला असतो आणि अध्यात्माची गूढ छटाही त्यात असू शकते. सुख-कल्पनेच्या व्याख्या हा भाष्यकारांचा प्रांत आहे, परंतु आनंदाचे उंबरठे दाखवणे, हे अशा पुस्तकांचे काम असते. या दोन पुस्तकांनी ते केले आहे.

अपरिहार्य कारणांमुळे गिरीश कुबेर यांचे ‘बुक-अप’ हे सदर आजच्या अंकात नाही. पुढील शनिवारी ‘अन्यथा’ नित्याप्रमाणे प्रसिद्ध होईल.