ग्रंथविश्व : भारताचा पुनशरेध Print

 

अ. पां. देशपांडे, शनिवार, ९ जून २०१२
भारताला जर मोठय़ा प्रमाणावर झेप घेऊन आपले राष्ट्र अव्वल दर्जाचे बनवायचे असेल तर ते केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनेच होऊ शकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्धल बोलताना दरवेळी परदेशीयांचे जे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान तेच खरे असे समजायचे कारण नाही. याबाबतीत भारताकडेही जगाला देण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मात्र त्याचा पुनशरेध नव्या नजरेतून घेणे गरजेचे आहे. अमेरिकन लोकांनी जेव्हा हळदीचे एकस्व (पेटंट) मिळवले तेव्हा डॉ. रघुनाथ अनंत माशेलकरांच्या लक्षात आले की अरे! हळदीचा वापर तर आपण नाना कारणांनी हजारो वष्रे करीत आलो असताना हे एकस्व अमेरिकनांना काय म्हणून मिळावे? मग त्यांनी जुन्या वाङ्मयातील संदर्भ देत ते परदेशीयांना पटवून दिले आणि ते एकस्व त्यांच्याकडून हिसकावून घेतले.

तीच गोष्ट कडुनिंबाबाबत झाली आणि मग त्यांना जाणवले की आपले जे परंपरागत ज्ञान आहे ते संगणकावर शब्दबद्ध करायची गरज आहे. एकस्व देणारे हॉलंड देशातील हेग येथील कार्यालय, असे शब्दबद्ध वाङ्मय, संदर्भासाठी वापरते. त्यातून त्यांनी कौन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नवी दिल्ली (सीएसआयआर) या संस्थेची एक नवीन उपसंस्थाच पुण्यात काढली. त्याचे नाव आहे, युनिट  फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फम्रेशन प्रॉडक्टस्. मग भारतातील आदिवासी लोकांकडे असलेले जडीबुटीबद्दलचे ज्ञान, आयुर्वेद, योगशास्त्र अशा अनेक गोष्टी त्यात मोडतात. भारतीय प्रज्ञेचा अनुभव संगणक, नासा, मेडिकल व इतर संशोधनाच्या क्षेत्रात जगाने घेतला आहे. या सर्व गोष्टींचा पुनशरेध घेणे जरुरीचे असल्याचे डॉ. माशेलकरांना जाणवले. या संदर्भात त्यांनी भारत आणि परदेशात असंख्य भाषणे दिली आहेत. त्यातील १९९५ ते २०१० या काळातील निवडक भाषणांचा संग्रह म्हणजे ‘रीइन्व्हेंटिंग इंडिया’ हे पुस्तक होय.
१९७०-८० च्या दशकात पुण्याच्या एनसीएलने त्या वेळी भारताच्या हरित क्रांतीस उपयोगी पडणारी कीटकनाशके, तृणनाशकांसारखी रसायने बनविली. यामुळे भारताची ७० टक्के गरज भागवली जात होती. पण हे संशोधन म्हणजे नव्याने केलेले काम नव्हते, तर परदेशीयांना माहीत असलेले तंत्रज्ञान भारतात विकसित केले गेले होते. हीच गोष्ट औषध उद्योगात चालू होती.१९८९ साली माशेलकर एनसीएलचे संचालक झाल्यावर रिव्हर्स इंजिनीअिरगऐवजी ते फॉरवर्ड इंजिनीअिरगमध्ये शिरले. कोणाच्या मागे जाण्याऐवजी आपणच नेता बनायचे ठरवले व एनसीएलने ते देशी व परदेशी बाजारपेठेत साध्य करून दाखवले. २०१०साली जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या प्रमुखाने अशा कामात भारत व चीन पुढाकार घेईल म्हटले आहे, पण एनसीएलने ते १९९०-९३ मध्येच करून दाखविले. २०१५ सालापर्यंत भारताची निम्मी लोकसंख्या पंचविशीखालील असणार आहे. हे जर खरे ठरणार असेल तर आपल्या युवावर्गाचे शिक्षण नीट व्हायला हवे. आपले शिक्षण हे खूपच पुस्तकी झाले आहे. विद्यार्थ्यांनी त्याकडे आकर्षति व्हावे असे त्यात काही दिसत नाही. पाठांतर पद्धतीऐवजी रोजच्या जीवनातील प्रयोग प्रत्यक्ष करून शिक्षण कसे देता येईल हे आपण पाहिले पाहिजे. यासाठी शालेय शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याऐवजी त्या त्या स्थानिक ठिकाणची निसर्ग संपत्ती, प्राणी, पक्षी, कीटक, जमीन, पाणी, नदी, सांस्कृतिक परंपरा, भूगोल, इतिहास यांचा अंतर्भाव त्यात केला पाहिजे. ते शिक्षण जर स्थानिक भाषेत दिले तर विद्यार्थ्यांची आत्मीयता वाढेल. प्रत्येकजण ज्ञानाचा वापर करून पुढे जाईल तरच तो देश पुढे जाईल. आज आपण सर्व क्षेत्रे ज्ञानाधिष्ठित झाली म्हणतो, कारण एक किलो पोलादात ९० टक्के किंमत पोलादाची असते तर फक्त १०टक्के किंमत त्यासाठी वापरलेल्या ज्ञानाची असते.. उलट मायक्रोसॉफ्टच्या विंडोज-९८ मध्ये ९५ टक्के किंमत ज्ञानाची असते आणि फक्त पाच टक्के किंमत ते बनवण्यासाठी वापरलेल्या पदार्थाची असते. पूर्वी एखाद्या वस्तूची किंमत अर्थतज्ज्ञ काढत असे आता मात्र ज्ञानाधिष्ठित वस्तूची किंमत काढायला वैज्ञानिकाचीही गरज आहे.    
भारत खेळांच्या ऑलेम्पिक्समध्ये मागे पडतो पण भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, खगोल आणि गणिताच्या ऑलिम्पियाडमध्ये तो नेहमीच चमकतो. ज्ञानाच्या क्षेत्रात भारत मागे नाही हे यावरून सिद्ध होते. २००६ साली भारताने १९ मुले स्पध्रेत भाग घ्यायला पाठवली होती आणि १९च्या १९ पदके घेऊन आली. दरवर्षी भारतीय मुले अशीच पदके घेऊन येतात, याला एकाही वर्षांचा अपवाद नाही. हुशारी, वेचक निरीक्षण, उत्तम विश्लेषण, चांगले संयोगीकरण ही मशागत केलेल्या मनाची लक्षणे आहेत तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, पद्धत हे मनाची ठेवण कशी आहे ते सांगते. भारतात या दोन गोष्टींत मोठाच संघर्ष आहे. भारतीय मन एकविसाव्या शतकात गेले असून आपल्या मनाचा कल मात्र अजून १४ व्या किंवा फार तर १६ व्या शतकातच अडकून पडला आहे. मनाची ठेवण उणिवांकडे पाहण्याची नसावी. पॉझिटिव्ह हवी, विधायक हवी, भविष्यदर्शी हवी, एकमेकाला मदत करणारी हवी. तसे झाले तरच एकविसावे शतक घडविता येईल, हे सांगताना माशेलकर म्हणतात : शिक्षकांना समाजात पूर्वी जसे सन्मानाने वागवले जाते, तसे आता होत नाही, ते आपल्याला परत करता आले पाहिजे. तरच नवीन पिढी संस्कारक्षम होईल. माणसाच्या आयुष्यात यश आणि अपयश असे दोन्ही येत असते, पण माणसाने यशाने हुरळून जाऊ नये की अपयशाने खचून जाऊ नये. हेच पॉझिटिव्हिझम आहे.
नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी संशोधक हा कल्पक असायला हवा. कल्पक माणसाला अशक्य हा शब्द ठाऊक नसतो. कल्पक माणसाला जे इतरांना दिसत नाही ते दिसायला हवे. रॉबिन वॉरेन आणि बॅरी मार्शल यांना नोबेल पुरस्कार मिळाला. इतरांना वाटले की, पोटदुखीचे (गॅस्ट्रिक इन्फ्लमेशन) कारण जेवणातील अनियमितता आणि जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आम्ल (अ‍ॅसिडिटी). पण हेलिबॅक्टर पायलोरी हा जीवाणू याला कारणीभूत आहे. या विचाराला अनेकांनी विरोध केला, पण वॉरेन आणि मार्शल आपल्या विधानाला चिकटून राहिले आणि त्याचीच परिणती त्यांना हा पुरस्कार मिळण्यात झाली. माशेलकर याच्या पुढचे सांगतात :  नोबेल पुरस्कार मिळण्यात राष्ट्रीयत्व किंवा तुम्ही संशोधनासाठी किती खर्च करता या गोष्टी आड येत नाहीत. मुख्यत: आपल्याला शालेय वयापासून मुलांमध्ये एक सांस्कृतिक बदल घडवून आणावा लागेल. एखादे काम करताना धाष्टर्य़ पत्करण्याची प्रवृत्ती निर्माण करावी लागेल. सर्व गोष्टी सुरक्षित वातावरणात होत नसतात. मुलांमधील क्षमता ती आठ-दहा वर्षांची असतानाच आपल्याला ओळखता आली पाहिजे. राष्ट्र गरीब असो की श्रीमंत; विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेली गुंतवणूक फायद्याचीच ठरते.
डॉ. माशेलकर हे नेहमीच एक वेगळ्या प्रकारचा विचार करताना दिसून येतात. आज जगात भारताच्या विज्ञान क्षेत्राचे ते प्रतीक (आयडेंटिटी कार्ड) बनले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने समाजाच्या तळागाळापर्यंत प्रगतीचे लोण पोहोचविता आले पाहिजे हे त्यांचे मत हाच त्यांच्यातला वेगळेपणा आहे. अशा वेगळ्या, प्रेरक विचारांसाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.