ग्रंथविश्व : अमेरिकन लेखकराव! Print

दिवंगत अमेरिकी लेखक गोर विडाल यांचा चरित्रवेध..
शशिकांत सावंत ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२

‘लेखकाने दोन गोष्टी कधीही नाकारू नयेत.. सेक्स आणि टीव्ही चॅनेलवर झळकण्याचे आमंत्रण’, असे म्हणणारे गोर विडाल गेल्या मंगळवारी वयाच्या ८६ व्या वर्षी वारले. त्यांनी २५ कादंबऱ्या लिहिल्या, पटकथा आणि नाटके लिहिली तसेच टीव्हीसाठी भरपूर लेखन केले. विपुल प्रमाणात संकीर्ण लेख त्यांनी लिहिले, त्यात काही उत्तम निबंधांचा समावेश आहे. अशा लेखकाचे चरित्र रंगतदार असणारच. फक्त मेख एवढीच की,  हे चरित्र गोर विडाल हयात असताना, फ्रेड काप्लान यांनी बिडाल यांच्या अनुमतीनेच लिहिलेले ‘अधिकृत चरित्र’ आहे. हेच चरित्रकार फ्रेड काप्लान म्हणतात, ‘आय लाइक माय सब्जेक्ट्स डेड’! बरोबरच आहे.

त्यांनी अगोदर थॉमस कार्लाइल, चार्लस् डिकन्स आदींची चरित्रे लिहिली आहेत. माणूस गेल्यावर त्याच्याविषयी बरेवाईट बोलण्यात मोकळेपणा येतो, शिवाय चरित्राला पूर्णविरामही मिळालेला असतो. तसे विडाल यांच्या या चरित्राबाबत होण्याची शक्यता नव्हती. पण बडे प्रस्थ असलेल्या या लेखकाच्या लिखाणातून त्याला शोधण्याचा मार्ग काप्लान यांनी निवडला.
 लहानपणी विडाल यांनी अनुभवलेल्या लॉस अल्मॉसचे तुकडे अगदी अलीकडल्या ‘द स्मिथसोनियन इन्स्टिटय़ूशन’ या कादंबरीत दिसतात, पार्टीत भेटलेला समीक्षक पुढे एका कादंबरीत कसा येतो, अ‍ॅनाइस लिन या लेखिकेचे चरित्र ‘सिटी अँड द पिलर’ मध्ये कसे उतरते, याचा तपशील या पुस्तकाची वाचनीयता वाढवतो.
कवितेपासून लेखनाला सुरुवात करणाऱ्या विडाल यांनी पहिली कादंबरी विशीच्या आतच लिहिली. ‘द सिटी अँड द पिलर’ या कादंबरीत (१९४८) समलिंगी संबंधांचे, नात्याचे चित्रण होते. अनेक मुलींसह फ्लर्टिगचा खेळ खेळणाऱ्या विडाल यांचा खरा ओढा दुसरीकडे आहे, हे या कादंबरीतून लोकांपुढे आले. कादंबरीत नैतिक मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या समीक्षकांनी तिच्यावर टीकाच केली. पण या कादंबरीमुळे लेखक म्हणून अमेरिकेला विडाल माहीत झाले. पुढे ‘न्यू वर्ल्ड रायटिंग’ या पुस्तकरूपात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकाच्या पहिल्या भागाचे संपादनही त्यांनी केले आणि इतरांनाही ते लिहायला लावू लागे. यातून लेखक, पाटर्य़ा, प्रकाशन समारंभ, अन्य क्षेत्रांतल्या कलावंतांशी भेट अशा जगात त्यांचा प्रवेश झाला.
आईच्या दोन घटस्फोटांमुळे माणूस म्हणून कुटुंबव्यवस्था, नाती यांबद्दल विडाल यांच्या मनात साशंकता निर्माण झाली. पण लेखन हीच एक थेरपी असते, हे सत्यही त्यांना गवसले. पुढे अ‍ॅनाइस लिनशी नाते नाकारताना विडाल सांगतात, ‘मला कुठलीही अ‍ॅटॅचमेंट नको, त्याने हाती लागते ती वेदनाच’. तर ‘सीझन ऑफ कम्फर्ट’ ही कादंबरी पूर्ण केल्यावर म्हणतो, ‘ माझा आईविषयीचा कडवटपणा पूर्ण गेला आहे.. मी सारे काही कादंबरीत मांडल्यावर!’
त्या काळातही केवळ लेखनावर जगणे कठीण झाल्याने १९५३ च्या सुमारास विडाल यांनी टीव्हीसाठी लेखन करण्यास सुरुवात केली. हे सांगताना चरित्रकार काप्लान त्या काळातल्या टीव्ही क्षेत्राचा नेमका परिचय करून देतो.. १९५३ साली ८० टक्के अमेरिकन घरांमध्ये टीव्ही संच होता, एनबीसी आणि सीबीएस या दोनच राष्ट्रीय वाहिन्या सर्वत्र दिसत होत्या, असा तपशील त्या ओघात येतो. इथे मोठय़ा प्रमाणावर साहित्यावर आधारित टेलिफिल्म बनत. तसेच रहस्य, रंजन यांवर आधारित स्वतंत्र लेखनाला वाव असे. गोर विडाल यांनी टीव्ही लेखनाचे तंत्र चटकन आत्मसात केले. रहस्यकथा देखील लिहिल्या. तसेच राजकारणात स्वतंत्र मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या सिनेटरची व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून एक मालिकाही लिहिली. ‘व्हिजिट टु द प्लॅनेट’ या विनोदी प्रहसनाला ब्रॉडवेवरून नाटय़रूपांतरासाठी मागणी आली आणि त्यांनी नाटकही लिहिले. पुढे त्यांनी लिहिलेल्या ‘द बेस्ट मॅन’ या नाटकालाही ब्रॉडवेवर चांगले यश लाभले.
टीव्हीमुळे सिनेमावर परिणाम होत होता, त्यातच हॉलिवुडमधील ‘स्टुडिओ पद्धती’ कोलमडू लागली होती. अशा परिस्थितीत मेट्रो गोल्डविन-मेयरने ‘बेन हर’ हा बिग बजेट चित्रपट बनवायचे ठरवले. साल होतं १९५७, बजेट होतं दीड कोटी डॉलर. तोवरच्या इतिहासातील हा सर्वात महागडा चित्रपट होता. त्याच्या पटकथेच्या पुनर्लेखनावर काम करण्यासाठी एमजीएमचे सॅम इंबलिस्ट यांनी गोर विडाल यांना बोलावले. पुढे बेन-हर यशस्वी झाला, पण एमजीएमशी श्रेयासाठी झालेल्या कोर्टकचेरीनंतर विडाल यांनी या क्षेत्रात जास्त काम केले नाही.
साधारणपणे कादंबरीलेखनासाठी सुरुवातीला लेखक आधार घेतो, तो स्वत:च्याच अनुभवांचा आणि नंतर भोवतालचे वास्तव चित्रित करण्याचा मार्ग निवडला जातो. विडाल याला अपवाद नव्हते. आधुनिक समाज आणि ऐतिहासिक वास्तव यांचा मेळ घालणारी थोडी वेगळी कथानके विडाल यांनी लिहिली. ‘इन सर्च ऑफ अ किंग’ , ‘ज्युलिआन’, ‘लिंकन’, ‘कलकी’ इत्यादी. इजिप्तसह पौर्वात्य देशांचे प्रवास आणि  इटलीत अनेकदा होणारे वास्तव्य यासाठी त्यांना उपयोगी पडले. कादंबऱ्यांत वैविध्य भरपूर असले तरीही विडाल हे काही पहिल्या फळीचे वा प्रतिभावंत कादंबरीकार नव्हते.. हेमिंग्वे किंवा स्टाइनबेक सारखे. मात्र अभ्यास आणि संशोधन यांची जोड देऊन त्यांनी तपशील भरून काढले. यातून ‘लिंकन’ सारखी चरित्रकादंबरी खप आणि समीक्षा या दोन्ही आघाडय़ांवर यशस्वी ठरली. ‘कलकी’ या हिंदू देवतेत (विष्णूच्या कल्की अवतारात) रूपांतरित होणाऱ्या साध्या माणसाच्या कथानकाचे सारे हक्क मिक जॅगर या रॉकस्टारने विकत घेतले.. त्याला त्यावर सिनेमा काढून ‘कलकी’ची भूमिका करायची होती.
पैसा, प्रसिद्धी, मानमरातब या जोडील विडाल यांच्या वाटय़ाला आणखी एक गोष्ट आली. आईच्या घटस्फोटानंतर तिने केलेल्या लग्नातून जॅकलीन केनेडी ही सावत्र बहीण त्यांना लाभली. यामुळे जॉन एफ. केनेडींचा सहवास, व्हाइट हाउसमध्ये वावर हे सारे आलेच. एका लेखकाचे मोठे स्वप्न काय असू शकते? विडालसारख्या लेखकाला पैसा-प्रसिद्धीबरोबरच सत्तेचा स्पर्श झाला आणि महत्त्वाकांक्षा पल्लवित झाली. पण राजकारणात त्यांना यश मिळाले नाही.
पुस्तकाचा शेवटचा भाग केवळ विडाल यांनी समकालीनांशी खेळलेल्या विविध वादांनी भरलेला आहे. हे चरित्र लिहिताना लेखक काप्लान यांनी भरपूर तपशील जमा केले आहेत आणि मुक्तपणे वापरले आहेत. ( हे मूल तुझे असल्याने ६५० डॉलर पाठव, असे सांगणाऱ्या मुलीला विडाल यांनी पैसे पाठवले होते, इत्यादी) हे ‘अधिकृत चरित्र’ आहे, म्हणजे विडाल यांनी चरित्रलेखनाला परवानगी दिली आणि साह्यही केले. जवळची कागदपत्रे आणि माहिती विडाल यांनी दिली. अशी दोन हजार पत्रे वाचून, शेकडो मुलाखती घेऊन, जुनी वर्तमानपत्रे व नियतकालिके वाचून मेहनतीने हे ८५० पानांचे चरित्र काप्लान यांनी लिहिले आहे. ते वाचून अमेरिकी जीवनातला एक मोठा कालखंड समजायला मदत होते.. आणि लेखकाचा लेखकराव कसा होतो, हेही समजून घेता येते!