ग्रंथविश्व : समाजवादाची (भविष्यातील) पुनर्बाधणी Print

ज. शं. आपटे, शनिवार, १८ ऑगस्ट २०१२

आवडी येथे १९५४च्या काँग्रेस अधिवेशनात, देशात समाजवादी समाजरचना आणण्याचा ठराव संमत झाला होता! पुढल्या काळात आर्थिक, सामाजिक, राजकीय स्वरूपाच्या अनेक घडामोडी घडल्या आहेत. आर्थिक सुधारणांना २० वर्षे होऊन गेली. त्यानंतर समाजवादाचा विचार करणाऱ्या प्रस्तुत पुस्तकाचे लेखक प्रभात पटनाईक हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अर्थशास्त्र अध्ययन व नियोजन केंद्राचे अर्थशास्त्राचे माजी प्राध्यापक  व केरळ राज्य शासनाच्या नियोजन मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.

‘सोशल सायंटिस्ट’ या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. अर्थशास्त्रासंबंधी त्यांच्या नावे सहा मौलिक ग्रंथ आहेत. प्रस्तुत पुस्तकात मार्क्‍सवाद, समकालीन भांडवलशाही, विचारसरणी व शिक्षण, समाजवाद आणि विश्वअर्थव्यवस्था अशा पाच विषयाबद्दल २० लेख एकत्रित केले आहेत. ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेसंबंधीच्या एका निश्चित भूमिकेविषयी असूनही, अर्थशास्त्रीय स्वरूपाचे नाहीत, तर राजकारण व विचारसरणीच्या प्रश्नांसंबंधी आहेत.
आंतरराष्ट्रीय वित्तीय भांडवलाच्या प्रभुत्वाचा सध्याचा काळ आहे. त्यातच, भांडवलशाहीच्या दुष्टपणामुळे दहशतवादासारख्या तीव्र भावना निर्माण होतात, असे लेखकाने ‘मार्क्‍सवादाची आवश्यकता’ या लेखात म्हटले आहे. सध्याच्या अनुमानासाठी तात्त्विक आकलनाची गरज आहे. मार्क्‍सवादच या आकलनासाठी आधार पुरवू शकतो. ‘भांडवलशाही, स्वातंत्र्य व लोकशाही’ या तीन्ही घटकांच्या परस्परसंबंधाचे विवेचन करणारा लेख पुस्तकात आहे. ‘द इंडिव्हिज्युअल अ‍ॅज ए सब्जेक्ट’ या प्रकरणात शेवटी म्हटले आहे: सोविएत युनियन व इतर पूर्व युरोपियन समाजवादी देशांच्या पाडावामुळे व चिनी समाजवादात शिरलेल्या विसंगतीमुळे असा विश्वास बळावला आहे की समाजवादाचा प्रकल्प अशक्य आहे आणि भांडवलशाहीनंतरच्या समाजाचा विचारही करण्याचे प्रयोजन नाही. भांडवलशाही आता स्थिरावली, जनसामान्यांचे जीवन सुधारण्यास आपण विशिष्ट मागण्यांसाठी आपली शक्ती वापरावी अशी भावना झाली आहे. ‘मार्क्‍सवादी विचारसरणीचा प्रदेश’ या लेखात  पहिल्या महायुद्धानंतर मार्क्‍सवादी विचारसरणीत बदल कसे झाले याचे विवेचन आहे.
‘ऐतिहासिकतावाद आणि क्रांती’ या पाचव्या प्रकरणात ऐतिहासिकतावादाची व्याख्या स्पष्ट करून मांडली आहे. कार्ल पॉपरची व्याख्या हेगेल व मार्क्‍स यांनी मांडलेल्या ‘इतिहासाला एक पद्धती व एक अर्थ असतो व जर नीट समजून घेतला तर वर्तमानात भविष्याचा अंदाज, भाकीत वर्तवून ते बनवण्याचा प्रयत्न करता येईल’ या विचाराशी जोडलेली आहे. ऐतिहासिकतावाद आणि इतिहासशास्त्र यांत मूलभूत फरक आहे हे लेखक या प्रकरणात सातत्याने मांडतो. सहाव्या प्रकरणात मध्यम स्थितीच्या शहरी लोकशाही आणि समाजवादासंबंधीचे विवेचन आहे. ‘समकालीन भांडवलशाही’ या विभागात सहा लेख आहेत. ‘साम्राज्यवादाच्या नवीन स्वरूपातील अर्थशास्त्र’, ‘नवउदारमतवादातील राज्यशासन’, ‘खुल्या अविकसित अर्थव्यवस्थेतील तंत्रज्ञान व रोजगारी’, ‘जागतिकीकरण काळातील संचयन प्रक्रिया’, ‘जागतिकीकरण व पुनर्विभागणीवादाच्या मर्यादा’, ‘आर्थिक पेचप्रसंग आणि समकालीन भांडवलशाही’ ही सहा प्रकरणे आजच्या भांडवलशाहीच्या मूलभूत प्रश्नांचे स्वरूप, व्याप्ती, परिणाम समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहेत.
‘विचाराचा नाश’ प्रकरणात विचार व मनन हा फरक मांडून लेखकाने म्हटले आहे, की मनन दैनंदिन जीवनात अनेक व्यावहारिक बाबींसंबंधी आपण करत असतो. ही कमालीची गुंतागुंतीची असते, पण विचार हा संदर्भापलीकडे जाणारा असतो, त्याचा सामाजिक ऊर्जेशी संबंध असतो. सामाजिक ऊर्जा गतिमान करून चेतवून मानवी परिस्थिती बदलणे हे विचाराचे उद्दिष्ट असते. यासंबंधी उदाहरणे देताना मार्क्‍स, फ्रेडरिक एंजल्स, दादाभाई नौरोजी, रवींद्रनाथ टागोर, गांधीजी, मेघनाद सहा, सत्येन बोस अशा दिग्गजांचा उल्लेख केला आहे. ‘भांडवलशाही विश्वाला ज्या संकटाने ग्रासले आहे, त्यामुळे ‘विचारा’चे पुनरुज्जीवन होणार आहे व त्याचबरोबर मानवी स्वातंत्र्याच्या  प्रयत्नांचे पुनरुज्जीवन होईल, असा आशावाद या प्रकरणात आहे. वित्तीय भांडवलाच्या वैचारिक प्रभुत्वासंबंधी लिहिताना लेखकाने लेनिनचे वचन उद्धृत केले आहे. ‘वित्तीय भांडवलाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्यास प्रभुत्व हवे असते. ते संयोग, जोडण्याचे प्रतिनिधित्व करण्याशी झगडत असते व विशिष्ट जागेत ‘नेहमीप्रमाणे काम’ असे शांततामय जीवन नको असते. वित्तीय भांडवलामुळे केवळ जनसामान्यांना सामूहिक प्रतिकाराविरुद्ध हतबल करणे पुरेसे नाही, तर त्यांना ‘प्रतिक्रियात्मक कृतिशील’ करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे’! या लेखाअखेर, तिसऱ्या जगातील साम्यवादी चळवळही प्रभुत्वप्रवण  होईल, असा इशारा आहे.  
उच्च शिक्षणासंबंधी दोन लेख आहेत. जागतिकीकरणाच्या संदर्भात उच्च शिक्षणाविषयी पर्यायी दृष्टिकोन. दुसरा लेख- विकसनशील देशामधील उच्च शिक्षणापुढील आव्हाने. उच्च शिक्षण केवळ देशविकासासाठीच अत्यावश्यक नसून ते देशातील जनसामान्यांचे स्वातंत्र्य टिकावे म्हणूनही विशेष गरजेचे आहे. जेव्हा शैक्षणिक संस्थांतून बाहेर पडण्याची हाक विद्यार्थ्यांना दिली तेव्हा त्यांचा उद्देश होता ‘मनाचे वसाहतीकरण’ मोडण्याचा. उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था तेव्हा ते मनाचे वसाहतीकरण करण्याच्या हेतूने सुरू झाल्या होत्या आणि त्यांनी ते केलेही. उच्च शिक्षणाचे क्षेत्र हे नवकल्पनानिर्मितीचे मूलस्रोत आहे. दादाभाई नौरोजी व रमेशचंद्र दत्त यांनी ग्रंथांतून, जनसामान्यांचे राजकीय संघटन व्हावे म्हणून वैचारिक मूलगामी कार्य केले.
‘समाजवादाची पुनर्बाधणी’ या लेखात लेखक प्रा. प्रभात पटनाईक म्हणतात, ‘वाढती बेरोजगारी, दारिद्रय़, भूक व असुरक्षितता कायम राहणार असून, समाजवादी कार्यक्रम आजही पूर्वीइतकाच प्रस्तुत आहे आणि समाजवादी आंदोलनास वेग, गती आली नाही तर साम्राज्यशाहीविरुद्धच्या असंतोष, क्रोधाला विनाशकारी, अमानवी व अनुत्पादक स्वरूप (दहशतवादासारखे) येईल.’
समाजवादाची पुनस्र्थापना, पुनरुज्जीवन व्हायला वेळ लागेल. जॉर्ज ल्यूकस यांच्या मते सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे प्रवास, संक्रमण हा जवळजवळ ३०० वर्षांचा होता, त्याचप्रमाणे भांडवलशाहीकडून समाजवादापर्यंतचे संक्रमण हे बराच काळचे असणार नाही. जॉर्ज ल्यूकस यांचा विचार आजच्या क्षणी अधिक खरा वाटतो. ‘समाजवाद वा सुधारणावाद?’ या प्रकरणात  हवामानबद्दल, साम्राज्यवादी आक्रमण, विकासाच्या नावाखाली सक्तीने शेतकऱ्यांना करावा लागणारा स्वत:च्या मालकीचा जमीनत्याग, आदिवासी जनतेची दडपणूक, स्त्रीपुरुष भेदभाव, पर्यावरणीय अवनती, यामुळे जहाल, कडक निषेध, मोर्चे निघतात, पण यामुळे समाजवादाचे पर्यायी जग दृष्टिपथात येत नाही, असे परखड विवेचन आहे.
री-एनव्हिजनिंग सोशॅलिझम
प्रभात पटनाईक
प्रकाशक: तुलसी बुक्स, दिल्ली.
पृष्ठे : २७१, मूल्य: रु. ३२५