ग्रंथविश्व : पर्यावरणवादाच्या ‘बायबल’ची पन्नाशी महत्त्वाची कशी? Print

अविनाश गोडबोले, शनिवार, २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

‘सायलेंट स्प्रिंग’ या रॅशेल कार्सन यांनी लिहिलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती अमेरिकेत २७ सप्टेंबर १९६२ रोजी प्रकाशित झाली. म्हणजे आता या पुस्तकाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या अर्धशतकात या पुस्तकाचे अनेक भाषांमधील अनुवाद प्रसिद्ध झाले, इंग्रजीत तर अनेकानेक आवृत्त्याही निघाल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, ‘सायलेंट स्प्रिंग’मध्ये मांडलेल्या संकल्पनांवर आणि त्यामागल्या तत्त्वज्ञानावर आधारलेली अनेक पुस्तके पुढल्या काळात लिहिली गेली.

एवढे झाले, म्हणून या पुस्तकाची ‘सुवर्णमहोत्सवी वाटचाल झळाळते आहे’ असे म्हणण्याचा आनंद आपल्याला मिळायला हवा होता. तो मिळालेला नाही. मिळेल असेही नाही. या पुस्तकाने ज्या पर्यावरणनिष्ठ जगाची कल्पना केली, तिचा विकसनशील देशांमधल्या शेती वा फलोत्पादनादी उद्योगांशी तर संबंध नाहीच, पण तेथील अन्य उद्योगही पर्यावरणाची पुरेशी चाड बाळगत नाहीत. चीन व भारत हे ‘वेगाने वाढणारे आशियाई देश’सुद्धा अद्यापही शेतीसाठी ‘डीडीटी’सह अनेक घातक रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताहेत आणि मुख्य म्हणजे चीनप्रमाणेच भारताचीही विकासाची व्याख्या ‘वाढ’ हीच आहे.
‘सायलेंट स्प्रिंग’ ग्रंथाला कारण ठरले एका वृत्तपत्रातले वाचकपत्र! डासनाशक म्हणून प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या ‘डीडीटी’ या कीटकनाशकाचे परिणाम घातक होताहेत आणि त्या भागातले पक्षी ‘कमी होताहेत’, असे या पत्रात म्हटले होते. तेथून पुढे, केवळ अमेरिकेतील एका भागाचाच नव्हे तर शक्य तितका व्यापक अभ्यास मूळची जीवशास्त्रज्ञ (सागरी जीवशास्त्रज्ञ) असलेल्या रॅशेलने केला. त्यातून हे पुस्तक सिद्ध झाले.
‘आधुनिक पर्यावरणवादाचे बायबल’ ही उपाधी या पुस्तकाला रामचंद्र गुहा यांनी दिली आहे. ‘एन्व्हायर्न्मेंन्टालिझम : अ ग्लोबल हिस्टरी’ या पुस्तकातून गुहा यांनी पर्यावरणवादविषयक अन्य पुस्तकांचाही साकल्याने धांडोळा घेतलेला असल्यामुळे त्यांच्या मताला महत्त्व आहेच. पण म्हणून रॅशेल कार्सनला ‘पर्यावरणवादी’ मानणे मर्यादित अर्थानेच खरे ठरेल. तिच्या पुस्तकाने महायुद्धोत्तर अमेरिकेत जो कृषीविकास होत होता, त्यातील कीटकनाशकांचे प्रदूषण किती भीषण आहे हे तिने दाखवून दिले, म्हणजेच ‘विकासाची विनाशक बाजू’ दाखवून दिली, एवढेच. मात्र यानंतरच्या घडामोडीही महत्त्वाच्या आहेत. पर्यावरणीय मुद्दय़ांवर जनमताचा प्रवाह संथपणे का होईना, वाढत जाण्याची आणि या जनमताचे पुढे लोकसहभागात रूपांतर होण्याची प्रक्रिया या पुस्तकापासून सुरू झाली. रॅशेल कार्सनने अभ्यासान्ती हे पुस्तक लिहिले, तोवर पर्यावरणवादाच्या कल्पना अगदी रोमँटिक होत्या.. ‘हरित तृणांच्या मखमालीचे हिरवे गालिचे’ खेडेगावांमध्ये सलामत राहिले की आपल्याला निसर्गसान्निध्यात विहरता येईल, असे या कल्पनांचे एक टोक होते; तर आधुनिक विज्ञानामुळे सर्व काही ठीकठाक होते- अगदी पर्यावरणाची झीजसुद्धा भरून येऊ शकेल- असे मानणे हे याच रोमँटिक पर्यावरणवादाचे दुसरे टोक! त्याऐवजी, पर्यावरणवाद हा आपल्या रोजच्या जगण्याशी निगडित आहे आणि विकासाचे प्रश्न हे पर्यावरणवादाचे प्रश्न आहेत, हे रॅशेलच्या या पुस्तकाने प्रथमच दाखवून दिले. त्यामुळेच गुहा हेदेखील ‘सायलेंट स्प्रिंग’चे महत्त्व सांगताना, ‘अर्थशास्त्रज्ञ केन्सच्या ‘जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अ‍ॅण्ड मनी’ या पुस्तकानंतर जर एखाद्या पुस्तकाने सरकारी धोरणे, जनमत आणि शास्त्रीय संशोधन कार्य या तिन्ही क्षेत्रांवर प्रभाव पाडला असेल तर ते हेच,’ असे म्हणतात. तेही खरे, कारण कार्सन यांच्या पुस्तकामुळेच, अमेरिकेत १९७२ पासून ‘डीडीटी’चा वापर बंद झाला व पुढे जगभर तो बंद करण्यासाठी जनमत तयार होऊ लागले.
 जनमताला परिवर्तनासाठी प्रवृत्त करायचे, एक निराळे स्वप्न दाखवायचे आणि सरकारी धोरणकर्त्यांना त्यांचे आग्रह सोडायला लावायचे, असे दुहेरी यश या पुस्तकाला अमेरिकेत लाभले, याचे एक कारण म्हणजे- हे पुस्तक १९६० च्या घडत्या, परिवर्तनशील दशकात प्रसिद्ध झाले! १९६०च्या दशकातील ‘काऊंटरकल्चर’ चळवळीने सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा विश्वास अमेरिकी तरुणांमध्ये जागवला, तो पुढे अन्य पाश्चात्त्य देशांतही पसरू लागला आणि त्याचे काही परिणाम जगभर पोहोचले. मानवी हक्कांची चळवळ, व्हिएतनाम युद्धविरोधी आंदोलन, स्त्रीमुक्तीची ललकारी आणि समलिंगींच्याही हक्कांसाठीची मोहीम, हे या परिवर्तनशील मनोभूमिकेचे पैलू. याच ‘काऊंटरकल्चर’ने अमेरिकी भोगवादावर कोरडे ओढले आणि त्याचा एक भाग म्हणून अमेरिकी पर्यावरणवादाने पहिली पावले टाकली. पुढल्या दशकांत त्याची वैचारिक वाढ संशोधनाच्या अंगाने झाली. ही वाढ अशा प्रकारे व्हावी, याची वाट कार्सनच्या या पुस्तकाने दाखवली.
कार्सनच्या पुस्तकाचे सुवर्णमहोत्सवी स्मरण करायचे, ते अशा संशोधनाच्या अंगाने होणाऱ्या वैचारिक वाढीसाठी! आपल्याकडे अशा वाढीला आज ५० वर्षांनंतरही भरपूरच वाव आहे- आपल्याकडे कीटकनाशकांच्या वापराबाबतचे नियम ढिसाळच आहेत, आपल्या नद्यांमध्ये प्रदूषक पदार्थ सर्रास सोडले जाताहेत, हे सारे आपल्याला माहीत आहे. केरळमध्ये एन्डोसल्फानमुळे झालेला अनर्थ हा देशभरच्या हानीचा विचार केल्यास हिमनगाचे केवळ पाण्यावरचे टोक ठरेल, हेही अनेकांना माहीत असेल. आपण ‘सायलेंट स्प्रिंग’संदर्भात भारत वा चीनचा विचार फक्त कीटकनाशकांपुरताच मर्यादित ठेवला, तरी तो करायलाच हवा, अशी स्थिती आहे. जगातील एकंदर उपजाऊ जमिनीपैकी (अ‍ॅरेबल लॅण्ड) सातच टक्के जमीन असणाऱ्या चीनमध्ये कीटकनाशकांची मागणी मात्र सर्वाधिक आणि नेहमी वाढती आहे. भारत आणि चीनमधून जी कृषी वा अकृषी निर्यात होते, त्यांत कीटकनाशकांचे अंश सापडल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात.
‘सायलेंट स्प्रिंग’च्या संदर्भात भारत आणि चीनची ही चर्चा जुनीच आहे; होय, या चर्चेत काही नवे नाही.. पण हीच चर्चा या देशांमध्ये अजूनदेखील कालबाह्य नाही! शिवाय, भारतासारख्या देशाचे पर्यावरणीय प्रश्न आणखी वेगळेही आहेत- इथल्या रिसायकलिंगसारख्या उद्योगाने निर्माण केले प्रश्न, हे पर्यावरणाचे भारतीय प्रश्न आहेत. ‘सायलेंट स्प्रिंग’ ला ५० वर्षे उलटून गेल्यानंतर भारत आणि चीनमध्ये शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरणाच्या काळजीसाठी ‘आशियाई पर्यावरणवादा’ची नवी पहाट येणे त्यामुळेच आवश्यक आहे. त्या दृष्टीने या अमेरिकी पुस्तकाच्या पन्नाशीचे महत्त्व आपण- वेगाने वाढणाऱ्या आशियाई देशांनी ओळखायला हवे.