सह्याद्रीचे वारे : गडकरी विरुद्ध मुख्यमंत्री? Print

विक्रम हरकरे - मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

नागपुरात अनेक स्थानिक कार्यक्रमांना  ‘भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष’ नितीन गडकरी यांची उपस्थिती असणे, हा त्या पक्षाच्या प्रचारतंत्राचा भाग. पण असाच एक उद्घाटन सोहळा नियमांवर बोट ठेवून सरकारने रद्द करू पाहिला, आणि वाद सुरू झाला..
भाजप-शिवसेनेची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत जलकुंभांच्या स्थानिक लोकार्पण सोहळ्यांना आता कटू राजकारणाचे वळण मिळाले आहे. जलकुंभांच्या लोकार्पणासाठी स्थानिक नेत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या ठिणगीची धग मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचली असून दोन्ही नेत्यांनी परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विकासकामांचे श्रेय लाटण्याचे राजकारण, राजशिष्टाचार भंगाचा वाद आणि जनतेने निवडून दिलेल्या महापालिका सत्ताधाऱ्यांच्या कामात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असे विविधांगी पैलू या वादासोबत जोडले गेले आहेत.
नागपूर महापालिकेत सत्ता असल्याचा फायदा उचलून स्थानिक भाजप नेत्यांनी जलकुंभांच्या उद्घाटनाचा गडकरींच्याच हस्ते धडाका लावला आहे. विकासकामांचे श्रेय लाटण्यात भाजप एक पाऊल पुढे गेल्याने संतापलेले काँग्रेस नेते आक्रमक झाले आणि गडकरींच्या हस्ते होणारा शनिवारचा लोकार्पण सोहळा म्हणजे राजशिष्टाचराचा भंग असल्याचे चित्र निर्माण करून भाजपला प्रतिशह देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची करामत काँग्रेसने केली. परिणामी जलकुंभांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेस-भाजपच्या बडय़ा नेत्यांच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा नवा खेळ सुरू झाला आहे.  
या कुरघोडीच्या राजकारणाचे मूळ पूर्व नागपुरातील स्थानिक नेत्यांमधील जुन्या वैरात दडलेले आहे. पूर्व नागपुरातून गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागले आहेत. सतीश चतुर्वेदी समर्थकांचा राग त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी कृष्णा खोपडे यांच्यावर आहे. कधीकाळी चतुर्वेदींचे कट्टर समर्थक असलेले कृष्णा खोपडे चतुर्वेदींना चारीमुंडय़ा चीत करून पूर्व नागपूरचे आमदार बनले आहेत. चतुर्वेदींच्या मनातली ही खदखद अजूनही ताजीच आहे. ‘चतुर्वेदी विरुद्ध खोपडे’ ही पारंपरिक लढाई आता पूर्व नागपूरपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. त्याच्या ठिणग्या आता भडकू लागल्या आहेत.
कृष्णा खोपडे यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणण्यात नितीन गडकरी यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गडकरींची ही मात्रा अचूक लागू पडली आणि पूर्व नागपुरातून कधीही पराभूत न झालेल्या सतीश चतुर्वेदींना चक्क घरी बसण्याची वेळ आली. बऱ्याच काळानंतर खोपडेंच्या राजकीय उदयाला शह देण्याची संधी टीडीआर घोटाळ्याच्या निमित्ताने चतुर्वेदींना मिळाली. याच वेळी पूर्व नागपूरचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या शांतीनगरातील जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्याच्या हालचालींचे संकेत प्राप्त झाले, परंतु आपल्या लोकवस्तीतील जलकुंभाचे श्रेय भाजपला मिळू नये यासाठी चतुर्वेदी समर्थकांनी जलकुंभाचा लोकार्पण सोहळा परस्पर आटोपून टाकला. यानंतर हा स्थानिक संघर्ष आणखी पेटला.
जलकुंभाचे श्रेय काँग्रेसने परस्पर घेतल्याने भाजप नेत्यांना कुरघोडीचे कडवट घोट प्यावे लागले. त्याचा वचपा काढण्यासाठी महापौर अनिल सोले यांनी याच जलकुंभाचा लोकार्पण सोहळा शनिवारी होणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका छापून यात नितीन गडकरींसह पालकमंत्री, महापालिकेचे अधिकारी आणि काँग्रेस नेत्यांचीही नावे टाकली. मात्र शुक्रवारी रात्रीच काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणे हा राजशिष्टाचार भंगाचा प्रकार असल्याची तक्रार करून कार्यक्रम रोखण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना गडकरींच्या हस्ते सोहळा करणे हा राजशिष्टाचार भंग असल्याबद्दल बोल लावल्याने हा कार्यक्रमच रोखण्याचाही प्रयत्न झाला. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी महापौर अनिल सोले यांना कार्यक्रम रद्द करण्यासाठी पत्र जारी केले. दुपारी एक वाजता सदर पत्र महापौरांच्या हाती पडल्यानंतर त्यांनी यातील सूचना धुडकावून लावून लोकार्पण सोहळा ठरल्याप्रमाणेच होणार, अशी भूमिका घेतली आणि गडकरींच्याच हस्ते कार्यक्रम पार पडला. या वेळी गडकरींनी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करून विकासकामात काँग्रेस सरकार अडथळे आणत असल्याचा आरोप केला. त्यामुळे गडकरी विरुद्ध मुख्यमंत्री असे चित्र उभे झाले आहे.
नितीन गडकरींचे नागपुरात ‘टार्गेट लोकसभा २०१४’ला अनुसरून अफाट लोकसंपर्काचे काम सुरू झाले आहे. यासाठी जनसंपर्काची संधी म्हणून मुलाच्या विवाहापासून ते पक्षसदस्यांची नोंदणी करण्यापर्यंत गडकरींनी जातीने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या विकासकामांच्या उद्घाटनाचा धडाका हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे. प्रत्येक स्थानिक कार्यक्रम फक्त गडकरींच्या उपस्थितीत पार पडला पाहिजे, असा अलिखित पायंडाच महापालिकेने घालून दिल्याचे चित्र आहे, कारण अगदी छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमांना गडकरींची हजेरी नागपुरात चर्चेचा विषय झाली आहे. पाणीपुरवठा योजना, जलकुंभांचे उद्घाटन, सोनेगाव तलावाचे सौंदर्यीकरण वा सहकारनगरातील पूल खुला करण्याचा कार्यक्रम या सर्व स्थानिक सोहळ्यांत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांखेरीज पान हलत नाही. भाजपच्या या खेळीने काँग्रेस नेते आता सावध झाले आहेत. लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी लोकसंपर्काचे महत्त्व जाणून असलेल्या काँग्रेसने शनिवारचा कार्यक्रम रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खांद्याचा वापर केला. वास्तविक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांचेही नाव होते. नेमके त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त यवतमाळच्या दौऱ्यात मोघेंना जावे लागले. त्यामुळे ते अनुपस्थित होते, यात महापालिकेचा दोष कसा, असा सवाल महापौरांनी विचारला आहे, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या जेएनएनयूआरएम निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन वा लोकार्पण फक्त मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांच्याच हस्ते झाले पाहिजे हा प्रचलित शिष्टाचार असल्याची पुस्ती जोडून रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत यांनी या वादात तेल ओतले. गडकरींच्या हस्ते झालेले उद्घाटन हा राजशिष्टाचार भंगाचाच प्रकार असल्याचा आरोप त्यांनी लावून धरल्याने हा वाद आणखी चिघळवला आहे.
महापालिकेच्या पुढाकाराने होणारा एखादा उद्घाटन सोहळा रोखण्यासाठी महापौरांना पत्र देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे का, हा सवालही यानिमित्ताने उभा झाला आहे. नितीन गडकरी विधान परिषदेचे सदस्य आहेत, परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यानेच त्यांना उद्घाटन सोहळ्यांचा मान दिला जात आहे. जेएनएनयूआरएमच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या उद््घाटनासाठी फक्त मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांनाच निमंत्रित करण्याचा राजशिष्टाचार आहे आणि जर त्यांची उपलब्धता नसेल तर अन्य मंत्र्यांची उपलब्धता तपासून अशा कार्यक्रमांची औपचारिकता पार पाडता येते. हा मान गडकरींना दिला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद आता जोर धरू लागला आहे.