लोकांसाठी नव्हे , लोकांच्या सोबत... Print
शब्दांकन :  भूषण देशमुख  - रविवार, २८ ऑगस्ट २०११
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt
कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटे यांनी सहा दशकांपूर्वी सुरू केलेल्या ‘आनंदवन’चं काम आज त्यांची तिसरी पिढी बघते आहे. बाबांनंतर या कामाची धुरा त्यांचे चिरंजीव डॉ. विकास व डॉ. प्रकाश यांनी समर्थपणे सांभाळली. आता विकास यांची कन्या डॉ. शीतल आणि चार्टर्ड अकाऊंटंट असलेला मुलगा कौस्तुभ यांनी हा वारसा पुढे नेताना त्याला व्यावसायिक कौशल्यांची जोड दिली आहे. नवी क्षितिजं धुंडाळत, नव्या पिढीतल्या मंडळींना बरोबर घेऊन बाबांची स्वप्नं पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’मध्ये या दोघांशी साधलेला हा मनमोकळा संवाद..
गिरीश कुबेर - बाबा असतानाचं आनंदवन, विकासभाऊंचं तिथं असणं आणि आता तुम्ही; हा सगळा प्रवास, त्यातील बदल तुम्ही कसा बघता? तुमच्या प्रेरणा, या सगळय़ाकडे बघण्याचा तुमचा चांगल्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोन आम्हाला समजावून घ्यायचा आहे..
शीतल आमटे -  महारोगी सेवा समिती हा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तो ‘आमटे आणि सन्स प्रा. लि.’ नाही. आम्हालाही या कामात येण्याआधी गुणवत्ता सिद्ध करावी लागली. आम्ही आनंदवनशी तीन पातळय़ांवर निगडित आहोत. एक म्हणजे भावनात्मक, दुसरी व्यावसायिक आणि तिसरी संस्थात्मक. ‘आनंदवन’ आमची आई आहे. आम्ही जे आहोत ते आनंदवनमुळेच. पण आम्ही आजच्या पिढीचे तरुण आहोत. आम्हालाही बाहेरच्या जगातली प्रलोभनं दिसतात; हॉटेलांमध्ये, मॉलमध्ये जायला आवडतं. पण आयुष्यात काय करायचं हे आम्ही ठरवलं आहे. आनंदवनचं एक भाग म्हणून त्यात पडायचं की, व्यावसायिक म्हणून योगदान द्यायचं, असा प्रश्न आमच्यापुढे होता. मी बाबांना विचारत असे की मी आयुष्यात काय करावं? ते लगेच तोंड फिरवत. माझ्या लक्षात आलं की, बाबा या प्रश्नाचं उत्तर कधीच देणार नाहीत. तूच स्वत:चा मार्ग निवड असं त्यांना म्हणायचं असावं. त्यामुळे कदाचित त्यांच्या विचारांचं ओझं कधी झालं नाही. त्यांनी कधी म्हटलं नाही की माझी गादी तू चालव. बाबांनी कुष्ठरुग्णांबरोबर काम सुरू केलं. माझ्या वडिलांनी ते अपंगांपर्यंत विस्तारलं. आज आम्ही त्याला व्यावसायिक स्वरूप देत आहोत. आनंदवन ही संस्था नसून विचार आहे आणि तो प्रवाही आहे. आम्ही समाजसेवक नाही आहोत. ‘समाजसेवक’ या शब्दात एक प्रकारची विषमता अभिप्रेत आहे. आम्हाला वाटतं की आम्ही समाजसेवा नाही करीत, आम्ही सामाजिक काम करतो. या कामातले आम्ही व्यावसायिक आहोत. कुठल्या तरी गरिबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आमचं शिक्षण कामाला येतंय, ते समाधान कुठल्या एसी टॉवरमध्ये कुठच्या कंपनीत काम करून मिळालं नसतं.
कौस्तुभ आमटे - मी सीए करीत होतो तेव्हा संस्था आर्थिक अडचणींना तोंड देत होती. शिकत असलेली व्यवस्थापनाची तत्त्वं वापरून त्या सोडवण्याचा प्रयत्न मी करू लागलो. तीन वर्षांत बऱ्याचशा समस्या दूर झाल्या. मग बाबांनी मला पदाधिकारी म्हणून घेतलं. आनंदवनचं काम वेगवेगळय़ा मार्गानं विस्तारलं होतं. त्याचं संगणकीकरण करून सुसूत्रता आणली. हे प्रकल्प स्थिरस्थावर झाल्यावर नवीन काम हाती घेतलं.
गिरीश कुबेर - तुम्हाला बाबा कसे आठवतात?
कौस्तुभ - १९९० साली बाबा नर्मदा बचाव आंदोलनासाठी गेले, तेव्हा माझं वय १३ होतं. बाबा १०-११ वर्षे तिकडेच होते. या काळात त्यांच्या सहवासाला आम्ही मुकलो. २००१ मध्ये बाबा परत आले तेव्हा माझं सीए, सीएसचं शिक्षण चालू होतं. बाबा वकील असल्यानं ते म्हणायचे - माझी मुलं विकास, प्रकाश आपल्या संस्थेच्या घटनेकडे लक्ष देत नाहीत, तू लक्ष घाल. मी त्यांच्याशी चर्चा करू लागलो. ‘ज्वाला आणि फुले’ मी दोन-तीन वेळा वाचलं, पण नाही कळालं. त्यामुळं त्याविषयी आमच्यात कधी चर्चा झाली नाही; पण संस्थेची घटना, सुधारणा याबद्दल खूप बोलायचो.
शीतल - माझा जन्म झाला, तेव्हा बाबांना अपघात झाला होता. नंतर त्यांनी मला पाहिलं तेव्हा आनंदाने म्हणाले, ‘‘ही माझ्यासारखीच काळी आहे. म्हणजे टिपीकल आमटे आहे.’’ लहानपणी मी बाबांना ‘गाडगेबाबा’ म्हणायचे. तेव्हा ते काठी घेऊन चालत म्हणून मी ‘गाडगेबाबा, गाडगेबाबा’ म्हणून चिडवायचे. ते काठी घेऊन माझ्या मागे लागत. चौथीत असताना एकदा सगळं घर पहाटे ३ वाजता उठलं. मला कळेचना काय झालं. आईनं सांगितलं बाबा चालले घर सोडून. नव्वदीतले बाबा गाडीच्या दारात उभं राहून हात करत होते. सगळं आनंदवन रडत रडत जाऊ नका म्हणत होतं. बाबा म्हणाले, मी चाललो माझं नवं आयुष्य सुरू करायला.. कितीही वृद्ध झाले, तरी त्यांचा तो ध्यास संपला नव्हता. पु. ल. देशपांडे यांच्या सांगण्यावरून बाबा नर्मदेवरून परतले, तेव्हा माझे कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. बाहेर समाजसेवेचं वातावरण असलं, तरी माझ्या संपूर्ण खोलीत ऐश्वर्या रायचे फोटो होते. बाबांना ते खूप आवडायचं. ही पोरगी काही तरी वेगळी, माणसात आहे असं म्हणायचे. बाबांना ग्रेटा गाबरे, नॉर्मा शिअरर यांचं खूप आकर्षण होतं. एकदा त्यांनी माझ्यासाठी नवीन ड्रेस आणून हातात द्राक्ष देऊन ग्रेटा गाबरेसारखे फोटो काढायला लावले होते. ते वेगळेच बाबा होते..
मेडिकल संपलं आणि मी आनंदवनात परतले. पदव्युत्तर शिक्षणाबाबत द्विधा होती. मनात आलं, बाबांचं आयुष्य आज बोनस आहे. विचार केला तीन वर्षे आपण बाबांसमवेतच थांबूया. म्हणून मी एमडीची संधी सोडली. आयुष्यातला तो सर्वात चांगला निर्णय ठरला. या कोळात माझं जीवन बदललं. बाबा जुन्या आठवणी सांगायचे, स्वातंत्र्य चळवळीबद्दल बोलायचे, त्यांच्या आईबद्दल सांगायचे. खूपदा भावविवश होऊन रडायचे.
गिरीश कुबेर - बाबांसारखे आजोबा, विकाससारखे वडील, प्रकाशसारखा काका याचं म्हणून वेगळं दडपण कधी आलं का?
डॉ. शीतल - कधी मी बाबांची नात असायचे आणि कधी विद्यार्थी. शाळेत मला गरीब मुलींबरोबर राहायला आवडायचं. गरीब मैत्रिणीच्या डब्यात दोन भाकरी असत. त्यातील एक तिची आई माझ्यासाठी देत असे. वर्गातली श्रीमंत मैत्रीण मात्र एकच घास देई. हा विरोधाभास लक्षात यायचा. शाळा खूप चांगली होती, पण कधी कधी शिक्षक बाबांवरून टोमणा मारायचे. एकदा वर्गशिक्षकांशी माझं वाजलं. तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट का बोलता, असं मी त्यांना विचारलं. ते म्हणाले, महापुरुषांवर सगळय़ांचाच हक्क असतो. मी म्हणाले, तुम्ही त्यांना हक्काचं समजता, तर त्यांच्या जीवनातील एक टक्काही तुम्ही आपल्या जीवनात राबवू का नाही शकत? त्यानंतर ते माझ्याशी चांगले वागू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्पष्ट बोलणं, तेव्हाच्या तेव्हा प्रश्न सोडवणं नंतर खूप उपयोगी पडतं. आपला समाज मुलींना एका साच्यात बंद करण्याचा प्रयत्न करतो. पुरुषाइतकीच क्षमता माझ्यात आहे. माझा साचा मी बनवीन. ‘बाबा आमटेंची नात’ यासाठी उपयोगी येत नाही, त्यासाठी स्वत:चा ठाम निर्धार गरजेचा आहे.
आम्ही आनंदवनचे दोन कालखंड पाहिले. डॉक्टर असलेल्या माझ्या आई-वडिलांना खूप कमी म्हणजे २५० रुपये पगार होता. पण त्यातूनही आई माझ्या हस्तक लेच्या साहित्यासाठी ५ रुपये काढून ठेवायची. तिचं म्हणणं तू काहीतरी नवीन निर्माण कर. त्यातून नवनिर्मितीचा आनंद मिळत गेला. माझ्या लक्षात यायला लागलं की आपली आवड कम्युनिकेशनमध्ये, लँग्वेजेसमध्ये आहे. वाटायचं आपण आर्किटेक्ट, इंटेरिअर डिझायनर बनावं, आर्टिस्ट व्हावं. १२ वीला ९७ टक्के गुण मिळाले आणि मी घरी जाहीर केलं की मला डॉक्टर नाही बनायचं! सर्वाची खूप झाप खाली. आईचा मात्र मला पाठिंबा होता. आमचे इतरत्र प्रयत्न सुरू होते, पण बाबांनी ‘तू डॉक्टर व्हावं ही माझी शेवटची इच्छा आहे’ असं सांगून मला अडकवून टाकलं. (नंतर कळलं की त्यांनी अनेकांना अशा शेवटच्या इच्छा सांगितल्या होत्या!) कॉलेज पूर्ण झाल्यावर वाटायला लागलं, आपल्याला नुसतं गोळय़ा वाटणारं डॉक्टर नाही व्हायचं. वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग करून तू इतर काय करू शकतेस असं सांगणारंही कुणी नव्हतं. पाच र्वष मी आनंदवनमध्ये काम केलं. नंतर ‘सोशल आंतरप्रनरशिप’मध्ये मास्टर्स केलं. माझी डॉ. अभय बंग यांच्याशी नेहमी चर्चा व्हायची की काय करायला हवं. ते म्हणायचे - तुझ्याकडे एकच आयुष्य आहे. तुला काय करायचं हे तू निवड.
कौस्तुभ - सातवीत असताना मला रेल्वे इंजिनचं ड्रायव्हर व्हायचं होतं. नववीत असताना खूप पैसा कमवावा असं वाटू लागलं. नंतर जशी समज यायला लागली तसं लक्षात आलं की, इथं मला आनंद मिळतोय. बाबा म्हणायचे - ‘‘ही तुमचा निवड आहे. तुम्हाला कुणी जबरदस्ती केलेली नाही. केव्हाही तुम्ही सोडून जाऊ शकता. कामात आनंद वाटत नसेल, तर तुम्ही काम खराब कराल.’’ त्यामुळे मनात कधी किंतु आला नाही. काही दडपणं आहेत, पण मी हे आपणहून स्वीकारलं आहे. हळूहळू अभय बंग, अनिल अवचट अशी माणसं आयुष्यात आली. मी मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे बघू लागलो. बाबा आमटे हे बाबा आमटेच, विकास आमटे हे विकास आमटे आहेत आणि मी कौस्तुभ आमटे. मी डब्ल्यूडब्ल्यूएफच्या मॅचेस पाहतो. मला त्या मारामाऱ्या आवडतात. माझा तो ‘मेडिटेशन’चा भाग आहे.
शीतल - खूप लोक आमचं लाइफस्टाइल, गाडय़ा वापरणं याविषयी बोलतात. सर्वच समाजसेवकांनी भिकारडंच राहिला पाहिजे का? ते व्यावसायिक नाहीत का? कितीतरी लोक चांगलं काम करून समाजात सुधारणा घडवत असतात. स्वत:चं समाधान होईल अशी त्यांची जीवनशैली असते. आम्हाला आमची स्वप्नं बघण्याचा अधिकार आहे. मी अवचटांना विचारलं - आपली जीवनशैली कशी असावी? ते म्हणाले - ‘‘बेटा, तू खूप आजारी पडत असलीस, तर तुझं घर हॉस्पिटलजवळ असणं ही गरज आहे. खूप गरम होत असलं आणि घरात एसी आहे, तर ती चैन नाही; गरज आहे. ती जर तू पूर्ण करू शकली नाहीस, तर आयुष्यभर असमाधानी राहशील. आणखी एक, दरवर्षी आपल्या कमाईतील छोटासा हिस्सा समाजासाठी द्यायचा. देण्याची सवय लागली की आपण आपोआप नम्र होतो..’’ तेव्हापासून आम्ही दोघांनी ठरवलं की, आपल्या पगारातील ठरावीक वाटा आनंदवनसाठी द्यायचा.  
प्रशांत दीक्षित -  बाबांसारखं ‘मॅग्नेट’ आता तिथं नसताना संस्था चालवणं हे नक्कीच आव्हानात्मक आहे. या प्रवासात कोणती जीवनमूल्यं सापडली?
कौस्तुभ - बाबा शरीराने गेले तरी त्यांनी रुजवलेली विचारप्रक्रिया आजही जिवंत आहे. काही जण म्हणाले, ‘बाबा गेल्यावर आनंदवनात कोण येणार?’ पण तसं झालं नाही. उलट ओघ प्रचंड वाढला. बाबा होते तशीच कामं आजही चालू आहेत. त्यांच्या तत्त्वांशी आम्ही कधी तडजोड केली नाही. समाजकल्याणच्या अनुदानासाठी नेहमी त्रास होतो. त्यांनी ‘चहापाणी’ मागितलं की आमचे लोक म्हणतात, ‘तू ये, ड्रमभर चहा पाजतो, पाणी पाजतो; पण पैसे नाही देत.’ हे आम्ही वर्षांनुर्वष जपलं आहे. आम्ही कधी एक पैसा दिला नाही, कधी घेतला नाही. त्रास होतो, पण कामं थांबलं नाहीत.
शीतल - लहानपणापासून मी बंडखोर वृत्तीची आहे. मलाही ‘ज्वाला आणि फुले’ फारसं कळत नाही. मी असं ठरवलं की आपण एकाच माणसाच्या तत्त्वज्ञानानुसार का वागायचं? माझा आजच्या जमान्यातील आधुनिक गोष्टींवर जास्त विश्वास आहे. आपण शिवाजी, गांधी यातच अडकलो आहोत. त्यांच्यापासून प्रेरणा जरूर मिळते, पण ते बोलत नाही. माझ्याशी बोलणारी, चुकलं तर सांगणारी माणसं हवीत. सुदैवानं मला अभय बंग, अवचट आणि आनंद नाडकर्णी भेटले. मला चार ‘बाबा’ आहेत असंच मी सांगते. राणीमावशी माझी आई आहे. या सगळय़ांकडून खूप काही मिळालं..
विनायक परब - सध्याच्या महागाईच्या दिवसांत ३-४ हजारांचं कुटुंब चालवणं ही फार अवघड गोष्ट आहे. हे कसं करता? भविष्यासाठी निधीचं काय नियोजन?
कौस्तुभ - गोष्टी खरोखरच अवघड होत चालल्यात. दरवर्षी आम्हाला ५० लाख ते १ कोटींचा ऑपरेशनल लॉस सहन करावा लागतो. अनुदान तरी किती असणार? दोन वर्षांपूर्वी मोठा दुष्काळ पडला. पिकं गेली. एक कोटीचं उत्पादन बुडालं. शिवाय दीड कोटींचं धान्य बाहेरून विकत घ्यावं लागलं. देणग्या मिळतात, पण ‘डोनर प्रेशर्स’ असतात. काही धनदांडग्यांना वाटतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वागावं. हे फार घातक आहे. त्यानं आमची कार्यक्षमता कमी होते, संस्थेच्या कामावर परिणाम होतो. मोठय़ा कंपन्यांच्या सीएसआरचा पैसा येणं अवघड आहे. स्वयंसेवी संघटना म्हटली की ते संशय घेणार! आमचं काम कुष्ठरोग्यांपुरतं मर्यादित नाही. बाहेरच्या गरजूंनाही आनंदवनातलं जनरल हॉस्पिटल खुलं आहे. आनंदवनातील आरोग्य शिबिरांचा लाभ इतर हजारोंनाही झाला आहे. काही जण सुचवतात, तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्या. ज्यांच्याकडे शिबिराला येण्यासाठी भाडय़ाचे पैसे नाहीत, त्यांच्याकडून काय घेणार? आम्ही कोणत्याही गरजूला नाही म्हणत नाही. कोणी तरी हे स्वीकारायलाच हवं. सरकारकडून आम्हाला रुग्णामागे प्रतिदिन १५ रुपये ५० पैसे ग्रँट मिळते. इतक्या कमी पैशांत जेवण, कपडे, औषधं, रुग्णवाहिकेचं डिझेल, डॉक्टर ते स्वीपरचा पगार कसा भागणार? शेंबडय़ा मुलालाही हे समजेल. काहींना वाटतं परदेशातून पैसा येत असणार. बाबांवर तर सीआयएचे एजंट असल्याचे आरोप झाले होते. पण आम्ही फारसं मनावर घेत नाही. आम्ही म्हणतो - बॅलन्सशीट पाहा! पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यासाठी ५५ कोटींचा कायम निधी उभारत आहोत.  हा आकडा मोठा वाटतो, पण १० हजार देणारे ५५ हजार लोक आपल्याकडे नाहीत का, असा विचार केला तेव्हा टार्गेट सोपं वाटायला लागलं. हे लोक जोडायचे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आनंदवन हे ‘हेल्थ कॅपिटल’ व्हावं हे बाबांचं स्वप्न होतं. आरोग्यापासून कामाला सुरुवात झाली. ते विस्तारण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संदीप आचार्य - कुष्ठरुग्णांची संख्या वाढत असताना सरकार ती लपवण्याचा प्रयत्न करतंय. निधीही सरळ मागून मिळत नाही. थोडी ‘अण्णागिरी’, ‘आमटेगिरी’ करणार का?
कौस्तुभ - जगातील ६० टक्के कुष्ठरोगी आज भारतात आहेत. १ लाख ३७ हजारांपैकी १३ हजार मुले दहा वर्षांखालील आहेत. पण सरकार म्हणतं कुष्ठरोग निर्मूलन झालं! निर्मूलन झालं म्हणायचं आणि असणाऱ्या रुग्णांसाठी निधीही द्यायचा नाही..  
शीतल - आम्ही सरकारकडे प्रस्ताव दिला, पण पुढे काहीच झालं नाही. हा अन्याय आहे, हे आम्ही संशोधन करून दाखवून देणार आहोत.
कौस्तुभ - कुणी काय करावं याविषयी मी बोलत नाही. सरकारला असं प्रेशराइज करणं वैयक्तिकदृष्टय़ा मला पटत नाही. माणूस एक वेळ वाईट असेल, पण राजकारण वाईट असं कसं म्हणता येईल? या देशात आपण राहतो, तर देशाची घटना मानायला हवी. नसेल तर राहू नका इथं. राजकारणाला नावं ठेवण्यापेक्षा त्यात काय करता येईल का? आपण का नाही फ्रंट, पार्टी उभी करत? चांगली माणसं त्यातही येतील.
भूषण देशमुख - शेतक ऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहता?
कौस्तुभ - बाबा नेहमी म्हणायचे, तुम्ही कुणाला ‘वेल्फेअर अ‍ॅडिक्ट’ बनवू नका. सरकारच्या ६० हजार कोटींच्या पॅकेजचं वाटप कसं होणार याचा माझा अभ्यास नाही. आम्ही नेहमी विकासाविषयी बोलतो. जलसंधारण, मृदसंधारण अशा पायाभूत कामांत आम्ही लोकांसाठी नव्हे, लोकांबरोबर काम केलं. त्यांचं उत्पन्न वाढलं, आता ती सुखात आहेत.
शीतल - पैसा देणं खूप सोपं आहे, हात धरून मोठं करणं अवघड असतं. गाई दिल्या, पण चारा नसेल तर काय उपयोग? पॅकेज दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं सरकारनं समजू नये. लोकांना शिकवायलाही जाऊ नये. काय करायचं हे शेतक ऱ्यांना चांगलं माहीत आहे.
दिनेश गुणे - पुढचं नियोजन?
शीतल - सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आम्ही वेडे आहोत; पण केवळ वेडे नसून ध्येयवेडे आहोत. ‘ध्येय’ शब्द जेव्हा प्रखर होतो तेव्हा ‘आनंदवन’सारखं काम उभं राहतं. बाबांपासून प्रेरणा घेऊन हजारो संस्था आज उभ्या राहिल्या आहेत. आनंदवनमध्ये तयार झालेलं ज्ञान इतर संस्थांपर्यंत पोहोचवायचं आहे. या सर्वाना एकत्रित करायचं आहे. लोक आनंदवनपर्यंत येऊ शकत नाहीत ना, आनंदवन तुमच्या दारात येईल..
मानवी विकासाचे आमचे निर्देशांक वेगळे आहेत. समाजाने एके काळी टाकून दिलेला आमचा कुष्ठरुग्ण आता होंडा घेतो. १५ वर्षांपूर्वी आमच्या संस्थेतील दूध रस्त्यावर ओतून दिलं जायचं. आज मात्र कुष्ठरोग्यांनी धुतलेल्या गाईंच्या दुधाला परिसरातील लोकांकडून, हॉटेलांकडून वाढती मागणी आहे. आनंदवनातील वृक्षवल्लींनी फुललेली स्मशानभूमी पाहण्यासाठीही लोक येतात. हा आमचा विजय आहे..
खादीचे कपडे घालण्यावरून बाबांशी वाद होत. ते म्हणायचे - खादी हे नुसतं कापड नसून एक विचार आहे. तुला जेव्हा हे पटेल तेव्हा तू घाल. तू तुझ्या आवडीचे कपडे घाल. कपडय़ांचं ओझं होऊ देऊ नको.  समाजवाद योग्य की, गांधीवाद यावर आम्ही बोलायचो. बाबा म्हणत - कुठल्या वादात पडू नका, कुठला वाद निर्माण करू नका. स्वत:चं तत्त्वज्ञान तयार करा. मी माझं तत्त्वज्ञान तयार केलं, त्याप्रमाणे जगलो. पण माझंसुद्धा अनुकरण करू नका..
आमच्याकडे येणारे काही पाहुणे मागच्या भेटीत काढलेले आमच्या लोकांचे फोटो घेऊन येत. ते पाहून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरायचा. मला वाटायचं, लोक जोडण्याचं हे खूप चांगलं साधन आहे. एकदा कौस्तुभचा कॅमेरा वापरून मी दोन फोटो काढले. त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्यानं दम दिला - पुन्हा हात लावलास तर तंगडं तोडून हातात देईन. त्या दिवशी मी ठरवलं एक दिवस असा येईल की हा म्हणेल ‘येस बॉस मान गए!’ मी पुन्हा चोरून त्याच्या कॅमेऱ्याने फोटो काढले. चांगले आले असं वाटल्यानं एका स्पर्धेसाठी पाठवले. माझं नाव उघड होऊ नये म्हणून एक कौस्तुभच्या, तर दुसरा मित्राच्या नावाने पाठवला. गौतम राजाध्यक्ष परीक्षक होते. त्या दोन्ही फोटोंना पारितोषिक मिळालं. तेव्हापासून कौस्तुभनं फोटोग्राफी सोडली आणि मी चालू केली..
बाबा म्हणत - लोकप्रभूंचे हजारो हात या कामाला लागले आहेत. हे लोकप्रभू कोण तर मध्यमवर्गीय लोक! मुंबईत चाळीत राहणाऱ्या एका बाईंनी आनंदवनातील लहान मुलांच्या डे-केअर सेंटरसाठी दीड लाख रुपये दिले. एक माणूस गेल्या ३० वर्षांपासून दर महिन्याला ११ रुपयांची मनिऑर्डर करतो. डोंबिवलीत राहणाऱ्या शिक्षिका अनसूयाताई कुंभार यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या पीएफचे १ लाख रुपये आनंदवनला दिले. सरकार देत नाही तर सोडून द्या; हे खरे आमचे आधारस्तंभ आहेत!
आवाहन
दरवर्षीच्या मदतनिधी संकलन व्यापातून सुटका व्हावी यासाठी कायमस्वरूपी निधी उभारण्याचा प्रयत्न आमटे कुटुंबीयांचा आहे. या रकमेच्या व्याजातून आनंदवनाचा दरवर्षीचा खर्च निघावा हा यामागचा विचार. त्यासाठी लागणार आहेत फक्त ५५ कोटी रुपये. या निधीसाठी देणगीची रक्कम १०० टक्के करमुक्त असून समाजातल्या सुजाण आणि सुस्थापित मंडळींनी यथाशक्ती हातभार लावावा. अधिक माहिती आणि संपर्क- कौस्तुभ आमटे
- ९९२२५५०००६, ईमेल   This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it /  
शीतल आमटे - ९८२२४६५८३४, ईमेल This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it