‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा वारसा Print
alt
लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज
संकलन : संदीप आचार्य, रविवार, १३ नोव्हेंबर २०११

alt
शिवसेनेविषयी कुणाला कुतूहल, कुणाला आपुलकी, तर कुणाला भीतीही वाटते.. आणखी पाच वर्षांनी शिवसेना पन्नास वर्षांची होईल. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी,  ‘राडा संस्कृती’तून मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रात मजबूत पाय रोवणारी संघटना ते राष्ट्रीय राजकारणातील प्रभावशाली राजकीय पक्ष अशी दमदार वाटचाल करताना बाळासाहेब ठाकरे यांनी ‘भगव्या’ला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. शिवसेनेला खिंडारे पडली, घरातच फूट पडली, तरी शिवसेना भक्कमच राहणार, असा उद्धव ठाकरेंचा ठाम विश्वास आहे. शिवसेनेचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याविषयी उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात व्यक्त केलेले हे विचार..
गिरीश कुबेर- ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये आपले स्वागत. शिवसेनेविषयी अनेकांना कुतूहल, आपुलकी, औत्स्युक्य, भीती आहे. चारपाच वर्षांनी सेना पन्नाशीला पोहोचेल. हा एक मोठा कालखंड महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडित आहे. सेनेची वाटचाल व त्याच्या स्थित्यंतराकडे तुम्ही कसे पाहाता?
उद्धव ठाकरे- प्रथम सर्वाचे आभार. केवळ प्रेमाने गप्पा मारण्याचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे. मुलाखत म्हटले की आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे वाटते. शिवसेनेविषयी अनेकांच्या मनात कुतूहल आहे तसेच उत्सुकता व भीतीही आहे. मला आठवतंय, रजत शर्मांनी त्याच्या एका कार्यक्रमात बाळासाहेबांना विचारले होते, ‘लोग आपसे डरते है’ तेव्हा बाळासाहेबांचं उत्तर बोलकं होतं.. ते म्हणाले, ‘सिंहाला घाबरणार नाही तर काय उंदराला घाबरणार?’ मुद्दा असा आहे की उत्सुकता, कुतूहल, आधार आणि भीती हा शिवसेनेकडे पाहण्याचा एक भाग आहे. शिवसेनेविषयी कोणाकोणाला काय वाटले पाहिजे, याची  वर्गवारी कधीच झाली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपला त्या सुमारास सेनाप्रमुख व माझे काका श्रीकांतजी  यांनी असा विचार केला, मराठी माणूस सतत लढतच आला आहे. संघर्ष करत आला आहे. संघर्ष आणि मराठी माणूस हे समीकरण पाचवीला पुजले आहे. त्यावेळी मुंबई नुकतीच महाराष्ट्राला मिळाली होती आणि तो लढा संपला होता. त्यामुळे मराठी माणसाच्या जीवनात विरंगुळ्याचे, मनोरंजनाचे दोनचार क्षण आणावे म्हणून ‘मार्मिक’ची सुरुवात झाली. मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक. यातून मराठी माणसाचे प्रश्नही मांडले जात होते. हे करत असताना असे लक्षात आले, मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी पंरतु मराठी माणसाचे काय?.. यशवंतराव चव्हाण त्यावेळी म्हणाले होते की, ‘मुंबई महाराष्ट्रात आहे पण  मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही’. याचा अर्थ स्पष्ट होता. परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे मुंबईत मराठी माणूस उपरा झाला. मराठी माणसाला नोकऱ्यांमध्ये डावलले जात होते. याची माहिती ‘मार्मिक’कडे यायला सुरुवात झाली. मार्मिकमधून कोणत्या कंपनीत किती भरती झाली, त्यात किती मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या याच्या याद्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्याचे शीर्षक होते. ‘वाचा आणि थंड बसा’ यातून लोक त्यांचे प्रश्न घेऊन मार्मिक कडे यायला लागले. एकेदिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना विचारले, संघटना काढायचा विचार आहे का, तेव्हा बाळासाहेबांनी ‘हो’ म्हटले. संघटनेचे नावही त्यांनीच सुचविले. संघटनेचे नाव ‘शिवसेना’ असे ठेव. तो दिवस होता १९ जून १९६६. संघटनेची स्थापना करण्यासाठी त्यांनी दिवस अथवा पंचांग पाहिले नाही. श्रीफळ घेतले, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणून तो नारळ फोडला आणि शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून हा मराठी माणसांचा. भूमिपुत्राचा लढा सुरू झाला. एवढी वर्षे निघून गेली. याकाळात एक गोष्ट नक्की झाली ती म्हणजे मराठी माणसाला स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगायला शिवसेनेने शिकवले. पुढच्या वाटचालीत अनेकदा माझ्यावर आरोप झाले की उद्धव ठाकरे शिवसेनेचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करतात. शिवसेनेचा चेहरा बदलावा एवढा काही तो वाईट नाही. आजही शिवसेनेचा चेहरा तोच आहे. परंतु काळाबरोबर काही निर्णय घ्यावे लागतात. तसे ते मी घेतले. आहे ते टिकवण्याचा आणि अधिक चांगले करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी अनेकदा हेच सांगतो की ज्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी हा संघर्ष सुरू केला ती परस्थिती आणि आजची परिस्थती वेगळी आहे. तो काळ दगडाची मूर्ती घडवण्याचा होता. आता ती मूर्ती छान बनलेली आहे. एक भक्कम व बलदंड शिवसेना तयार झाली आहे. आता जरी मी शिल्पकाराचा मुलगा असलो आणि बनलेल्या मूर्तीवर घाव घालू लागलो तर तुम्हीच म्हणाल हा वेडा आहे. याच्या वडिलांनी एवढी छान मूर्ती बनवली आणि हा घण घालून ती मोडतो. त्यामुळे जेव्हा गरज असते तेव्हा शिवसेनाप्रमुख आपल्या छिन्नीने घण घालून आकार देण्याचे काम करतातच. आज जी शिवसेनेची शक्ती आहे, ताकद आहे ती विकासाच्या दिशेने कशी वापरता येईल. मराठी माणसाला अधिक सक्षम कसे करता येईल याकडे माझे जास्त लक्ष आहे. मराठी माणसात आज आत्मविश्वास शिवसेनेने निर्माण केला आहे. या आत्मविश्वासाच्या बळावर शिवसेनेची अधिक जोमदार वाटचाल कशी करता यईल, हे मी पाहातो.
गिरीश कुबेर- शिवसेनेने लोकाधिकार समितीचा चांगला उपक्रम सुरू केला. त्याला एक महत्त्व होते. मराठी घरांमध्ये त्याला एक स्थान होते. ते कुठे सुटले आहे का, शिवसेना मध्यमवर्गापासून तुटली असे काही झाले का, सत्ता आल्यानंतर स्थानीय लोकाधिकार समितीचे महत्त्व कमी झाले का?
उद्धव ठाकरे- मला नाही तसे वाटत. लोकाधिकार समितीचे काम आजही जोरात सुरू आहे. गेली ३५ ते ४० वर्षे लोकाधिकार सातत्याने नोकरी मार्गदर्शन वर्ग घेत आहे. मग ते बँकांमधील भरती असो की रेल्वेमधील. मराठी माणसाला नोकरी मिळालीच पाहिजे असे नुसते आंदोलन करून किंवा घोषणा देऊन काही होणार नाही alt
तर त्यासाठी मराठी तरुण त्या क्षमतेचा बनवला पाहिजे आणि ते काम शिवसेना करत आली आहे. मला नाही वाटत दुसरा कोणताच राजकीय पक्ष ते काम करत असेल. एखादे काम सतत सुरु असले की कालांतराने त्याकडे बघणाऱ्याचे थोडे दुर्लक्ष होते, पण म्हणून ती प्रक्रिया काही थांबत नाही.. थांबलेली नाही. मुंबईत विभागवार शिवसेनेने वेगवेगळे कोर्सेस सुरू केले आहेत. लोकाधिकार समितीमुळे हजारो तरुण आजही आमच्याशी जोडले जात आहेत. सत्ता नव्हती तेव्हा, सत्ता आल्यानंतर व आजही लोकाधिकारचे काम त्याच जोमाने सुरू आहे. दुर्दैवाने झालंय काय, की कायमस्वरूपी नोक ऱ्या कमी होऊ लागल्या आणि कंत्राटी लेबर हे प्रकरण वाढू लागले आहे. कंत्राटी पद्धतीत आज मिळालेली नोकरी उद्या असेल की नाही, हा प्रश्न फार भयावह आहे. ज्यावेळेला आमचे एनडीए सरकार होते तेव्हा लेबर रिफॉर्म या गोंडस शब्दाखाली ही कंत्राटी पद्धती आणू पाहात होते. शिवसेनेने केंद्रात सत्तेत असूनही याला तेव्हा ठाम विरोध केला. कामगार असंघटित असणे हे केव्हाही अयोग्य आहे. कामगार अस्थिर म्हणजे पर्यायाने देश अस्थिर हेच समीकरण आहे. त्यामुळे शिवसेनेचा या लेबर रिफॉर्मला विरोध आहे.
प्रशांत दीक्षित- तुम्ही म्हणाला की शिवसेनेचा चेहरा बदलण्याची गरज नाही, पण तुम्ही जी ‘मी मुंबईकर’ मोहीम सुरू केली तेव्हा परप्रांतीयांबद्दलची तिखट भावना कमी करण्याचा तो प्रयत्न होता का? सेना सत्तेत आल्यानंतर शिवसेनेत काही बदल झाला का?.. बदल झाला असे लोकांना वाटते आहे.
उद्धव ठाकरे- प्रथम ‘मी मुंबईकर’ ही संकल्पना स्पष्ट करतो. गेली पंधरा वर्षे सलग मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे आहे. त्यापूर्वीही शिवसेनेची सत्ता होती. साफसफाई व नालेसफाई हे एक पालिकेचे काम आहे. पालिकेने कितीही सफाई केली तरी कचरा साठलेला असतो. नाले तुंबलेले दिसतात. प्रसारमाध्यमातूनही याची ओरड होत असते. अशावेळी नेमके काय केले पाहिजे असा प्रश्न निर्माण झाला. यातून गेली काही वर्षे मी नाले व सफाईच्या कामाची पाहाणी करायला लागलो. मुंबईतील जवळपास प्रत्येक नाल्याची पाहाणी केली. अनेक ठिकाणी नाल्यांवर झोपडय़ा आहेत. तर काही ठिकाणी नालाच बंद करण्यात आला आहे. दहिसर नदीला आकारच नव्हता. गेल्या दोन वर्षांत आम्ही नदीचे पात्र रुंद केले. गाळ काढला. अनेक नाल्यांच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. याउपरही पालिकेने कितीही काम केले तरी कमी पडते. यातून असा प्रश्न निर्माण झाला की आपण आपल्याला काही शिस्त लावणार आहोत की नाही? जनतेचेही यात योगदान असणे गरजेचे होते. मुंबई चांगली राहावी यासाठी लोकांनीही एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. आपण जर आपले घर चांगले ठेवतो, तर मुंबई का ठेवू नये, ही माझी मुंबई आहे ती स्वच्छ राहिलीच पाहिजे, ही भावना रुजवण्याची गरज लक्षात घेऊन ‘मी मुंबईकर’ संकल्पना मांडली होती. यात मराठी अथवा परप्रांतीय असा मुद्दा नव्हताच.. आणि परप्रांतीयांच्या भीतीने मराठी माणसाने ‘मी मुंबईकर’ असे बोलायचे नाही का?  मी मुंबईकर आहेच. माझा जन्म मुंबईचा आहे मी महाराष्ट्राचा आहे. मी बोलणारच.. यात पुढच्या पिढय़ांचा विचार होता. नागरिकांना थोडी शिस्त लावावी असे धोरण होते. परप्रांतीयांना मस्का लावण्यासाठी ही योजना मांडली नव्हती.   
प्रशांत दीक्षित - मग आत्ता शिवसेनेची मुंबईबाबतची भूमिका काय आहे? येथे वर्षांनुवर्षे राहणाऱ्या मुंबईकरांना सामावून घेण्याची भूमिका आहे की मुंबई फक्त मराठी माणसांची राहावी असे वाटते?
उद्धव ठाकरे- मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. याबाबत शिवसेनेची भूमिका शिवसेना पार पाडतेच. परंतु अन्य पक्षांचे काय? शिवसेना मराठी माणसांचीच आहे परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मराठी आईवडिलांची मुले नाहीत का? त्यांची काही जबाबदारी नाही का? अर्थात शिवसेनेची जबाबदारी आहेच. मुंबईकडे कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले, कोणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. पण यात बाकीच्या पक्षांची काही जबाबदारी नाही का? की केवळ निवडणूक आली की मते घ्यायची? एवढेच त्यांचे काम आहे का? आम्ही विकासाची कामे करायची आणि त्यांनी राजकारण करत राहायचे. रोज आदळणाऱ्या लोंढय़ांचे काय?.. आपण येथे आत्ता बोलत असतानाही जे लोंढे मुंबईत उतरत आहेत त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची?
गिरीश कुबेर- सुरुवातीपासूनच मुंबईत परप्रांतीय येत आहेत. परंतु ८० च्या दशकात गिरणी कामगारांचा संप झाला आणि मराठी माणसाचे मुंबईतून स्थलांतर सुरू झाले. आता परिस्थिती आशी आहे की ३६ विधानसभा मतदार संघांपैकी २७ मतदार संघात अमराठी उमेदवारांचे प्राबल्य आहे. अशा वेळी स्थानिक पक्ष म्हणून मराठी माणसाचे स्थलांतर तेव्हा शिवसेनेनेच रोखायला हवे होते असे आज वाटते का?
उद्धव ठाकरे- जर कोणी स्वत:हून जागा सोडून जात असेल तर काय करायचे, मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी शिवसेनेने खूप खस्ता खाल्ल्या आहेत. परंतु शिवसेनेने मराठीसाठी आवाज उठवला की लगेच alt
आम्ही प्रांतीय ठरतो. एकवेळ त्यावेळी शिवसेना चुकली असे समजू .. काय करायला पाहिजे होते आम्ही? गिरणी कामगारांचे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेने कामगारांची साथ सोडलेली नाही. गिरणी कामगारांचा संप झाला, तेव्हा अंतुले मुख्यमंत्री होते. नंतर अंतुले बदलले आणि बाबासाहेब मुख्यमंत्री झाले. त्यावेळी नर्दुल्ला टँकवर शिवसेनाप्रमुखांनी कामगारांची सभा घेतली होती. शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी कामगारांना सांगितले की आपल्याला लढा पुकारायचा आहे, परंतु आत्ता बेमुदत संप करण्याची वेळ नाही. शिवसेनाप्रमुख हे बोलले आणि कामगार उठून निघून गेले. त्यामुळे शिवसेना मूक साक्षीदार होती हे बरोबर नही. शिवसेनाप्रमुखांचे न ऐकल्याचे पर्यवसान काय झाले? दत्ता सामंतांनी संप पुकारला तो अजून चालूच आहे. यातून कामगार संपला पण संप नाही संपला. आजही शिवसेनेने आपली जबाबदारी सोडलेली नाही. गिरणी कामगारांसाठी आम्ही लढतच राहणार.
गिरीश कुबेर- यातील मुद्दा असा आहे की मराठी माणूस मुंबईबाहेर जात आहे आणि अनेक मतदारसंघात अमराठी मतदारांचे प्राबल्य वाढत आहे. परप्रांतीय हे प्रादेशिक पक्षाला मत देत नाही हा इतिहास आहे, त्यामुळे मतदार संघात इतके अमराठी असतील तर..
उद्धव ठाकरे- ठीक आहे. मला एवढीच अपेक्षा आहे. एकदा तरी तमाम मराठी माणसांनी एकजूट दाखवून शिवसेनाप्रमुखांवर विश्वास ठेवावा आणि शिवसेनेला एकहाती सत्ता द्यावी. म्हणजे शिवसेना आपली ध्येयधोरणे कशी राबवते ते तुम्हाला पाहायला मिळेल. त्यावेळी मराठी माणूस कुठे असेल तेही दिसेल. आज नितीश कुमार, नरेंद्र मोदी, ममता यांना एकहाती सत्ता मिळाली. त्यामुळे ते विकास करू शकतात. हीच संधी शिवसेनेला मिळाली तर चित्र बदललेले दिसेल.
दिनेश गुणे- युतीची सत्ता आली तेव्हा युतीच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत परमिट पद्धत अमलात आणली पाहिजे अशी भूमिका मांडली आणि लगेचच काही दिवसांत माघारही घतली. पुढे साडेचार वर्षे युती सत्तेत होती. त्याकाळात लोंढय़ांचा प्रश्न सोडविण्यासाठी युतीने काय केले ?
उद्धव ठाकरे- युतीच्या सत्तेच्या काळात अनेक चांगले निर्णय आम्ही घेतले होते. लोंढय़ांना रोखण्यासाठीही काही उपाययोजना तयार केल्या. अनेक योजना आम्ही आखल्या होत्या. दुर्दैवाने ९९ साली सरकार गेले. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आमच्या अनेक योजनांची वाट लावली. पुन्हा मी तेच सांगेन की एकहाती सत्ता मिळाली तर अनेक गोष्टी करून दाखवता येतील. पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणतात त्याप्रमाणे आघाडीची काही अपरिहार्यता असते.
दिनेश गुणे- याचा अर्थ लोंढय़ांवर तुमच्याकडेही उपाय नाही.. मग हुसकावून लावण्याची भाषा वारंवार का होते?..
उद्धव ठाकरे- आहे ना.. तुमचा पाठिंबा त्यासाठी हवा. तुम्ही अग्रलेख आमच्या विरोधात लिहायचे नाही. मग लोंढय़ांचे काय करतो ते पाहा. यातला विनोदाचा भाग सोडला तरी मुंबईत येणाऱ्या लोंढय़ांना आवरण्याची गरज आहे. कोणीही यावे, कोठेही व कसेही राहावे हे अयोग्यच आहे. परंतु जो कोणी नियमानुसार येथे येतो. कायदे पाळून राहातो. भूमिपुत्रांचा मानसन्मान राखतो, त्यांच्याशी भांडण होण्याचे कारण नाही. लोंढय़ांना आवरण्यासाठी ज्या वेळी आम्ही परमिट सिस्टीम आणण्याचे बोललो त्या वेळी देशभर गदारोळ झाला होता. संसदेपासून सर्वत्र शिवसेनेवर टीका करण्यात आली. मला आता हाच प्रश्न विचारायचा आहे की, आम्ही काही बोललो की लगेचच घटना दाखवली जाते आणि आमच्या घरात येऊन कोणी आगळीक करणाऱ्याला आम्ही प्रत्युत्तर दिले तरी आम्हीच गुन्हेगार ठरतो. जे आम्हाला आमच्या घरात येऊन आव्हान देतात त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही.
प्रसाद मोकाशी- एकहाती सत्ता मागता तेव्हा राज्याचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत. ब्ल्यू पिंट्र वगैरे काही आहे का?
उद्धव ठाकरे- मी ब्ल्यू पिंट्र वगैरे काही मानत नाही. माझ्याकडे शिवसेनेची ऑरेंज प्रिंट आहे. विकास कामातून राज्याचे प्रश्न सोडवता येतील. त्याची तयारी आहे. त्यामुळे ब्लू प्रिंटसाठी मला बाजूच्या घरात काय चालले आहे ते बघण्याची गरज नाही. माझ्या घरात काय करायचे आहे ते मला पक्के माहीत आहे. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची पिंट्र तयार आहे. उगाच महाराष्ट्र असा घडवेन, तसा घडवेन असल्या बाता मी मारणार नाही मात्र लोकांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून एकहाती सत्ता दिली तर राज्यातील जनतेच्या सुखासाठी झटत राहीन एवढेच सांगतो.
स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ- आरोप असा होतो की युतीच्या काळात झोपडीवासीयांना मोफत घरे देण्याचे धोरण स्वीकारल्यापासून झोपडय़ा वाढू लागल्या.
उद्धव ठाकरे- युतीच्या काळात ही संकल्पना राबविण्यामागे एक धोरण होते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिचा चेहरा चांगला असावा. त्याचप्रमाणे झोपडीत राहाणाऱ्यांना चांगल्या जागेत राहावयास मिळावे ही भूमिका होती. मुंबईतील झोपडय़ांमध्ये मराठी माणूसही राहतो. या झोपडय़ा कायम करणे म्हणजे त्यांच्या वेदना व व्यथांची जाण न बाळगण्यासारखे आहे. यातूनच शिवशाही पुनर्वसन प्रकल्प ही सकल्पना आकाराला आली. अनधिकृत झोपडय़ा तसेच आज जी पाणीचोरी होत आहे त्याला आळा बसेल अशी कल्पना होती. आमची सत्ता गेल्यानंतर या चांगल्या योजनेची काँग्रेसने माती केली. आम्ही ९५ पर्यंतच्या झोपडय़ांना पात्र ठरवले होते. मात्र आमची सत्ता गेल्यानंतर किती झोपडय़ा मुंबईत उभ्या राहिल्या. त्याची जबाबदारी कोणाची आहे? या झोपडय़ांवर कारवाई का झाली नाही?
उमाकांत देशपांडे- पालिकेत तुमची पंधरा वर्षे सत्ता असताना तुम्ही लोंढे थांबविण्यासाठी अनधिकृत झोपडय़ांवर कठोर कारवाई का केली नाही?
उद्धव ठाकरे- मुळात मुंबईत महापालिकेच्या जागेवर अनधिकृत झोपडय़ा किती आणि राज्य शासनाच्या मालकीच्या म्हणजे कलेक्टरच्या जागेवर किती झोपडय़ा आहेत ते तपासून पाहा. म्हणजे कोणाच्या जागेवर झोपडय़ा वेगाने वाढत आहेत ते लक्षात येईल. अनधिकृत झोपडय़ा अथवा अतिक्रमणांवर पालिका वेळोवेळी कारवाई करते. यासाठी राज्य शासनाकडून पुरेसा पोलीस बंदोबस्त दिला जात नाही. त्यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मार खाण्याची वेळ येते. आज मुंबईत वेगाने वाढत जाणऱ्या अनधिकृत झोपडय़ांना सर्वस्वी राज्य शासन जबाबदार आहे. जाणीवपूर्वक राज्य शासनाकडून पोलीस संरक्षण दिले जात नाही. पालिकेसाठी वेगळे संरक्षणदल देणार असे गेल्या अधिवेशनात गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी जाहीर कले होते. आजपर्यंत हे संरक्षण दल मिळालेले नाही. ती केवळ घोषणाच ठरली. यातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबईवर आज किती संस्था राज्य करत आहेत. पालिकेचे अधिकार कमी केले जात आहेत आणि राज्य शासनाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. यामुळे पालिकेपुढे काम करताना अडथळ्यांची शर्यत निर्माण झाली आहे. कालच अजित पवारांनी एका ठिकाणी सांगितले की, मुंबईत मेट्रो केली ती आम्ही चूक केली. आता या पापाचे धनी कोण होणार? महापालिका? पालिकेला तुम्ही विश्वासात घेणार नाही आणि मग प्रश्न निर्माण झाले की हात झटकून मोकळे व्हायचे.
गिरीश कुबेर- एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. मुंबईत किती संस्थांनी काम करायचे. पालिकेला शह देण्यासाठी एमएमआरडीए जन्माला आली. त्यानंतरही एमएसआरडीसीसह अनेक संस्था आल्या. अशावेळी मुंबईचा विकास हा गंभीर चिंतेचा विचार आहे असे वाटत नाही का? आता मुंबई उसवत चालली आहे. अशावेळी दोन पर्याय उभे राहतात.. मुंबई स्वतंत्र राज्य असावे का किंवा महापौर थेट निवडून यावा का, महापौरांना काही अधिकार असावे का?
उद्धव ठाकरे- मुंबईचे स्वतंत्र राज्य करण्याची काहीही गरज नाही. महापौरांच्या अधिकाराचे म्हणाल तर महापौरांना थोडे अधिकार मिळणे गरजेचे आहे. आमची सत्ता असताना एका मुख्यमंत्र्याने महापौरांना अधिकार दिले तर दुसऱ्या मुख्यमंत्र्याने कोणालाही न विचारता महापौरांचे अधिकार काढून घेतले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळे पालिका निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तशी ती असायलाच हवी परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महापालिका ही सर्व रोगांवर इलाज करणारी एकमेव संस्था नाही. राज्य शासनाच्या ‘कृपे’मुळे मुंबईत  एमएमआरडीए, एमएसआरडीसी, अशा वेगवेगळ्या संस्था आपल्याला हव्या त्या पद्धतीने काम करत आहेत. पालिकेला विश्वासातही घेतले जात नाही. रेल्वे, संरक्षण दलाच्या हद्दीतील नाले पालिकेला साफ करता येत नाहीत. मागे मी नाल्यांच्या प्रश्नावर पालिका आयुक्तांना घेऊन हवाई पाहणी केली होती. त्यावेळी माझ्यावर टीकाही झाली. मुंबईच्या विकासासाठी कितीही टीका झाली तरी ती मी सहन करेन. मिठी नदीच्या एका भागापर्यंत पालिकेची हद्द तर दुसऱ्या ठिकाणी मिठी नदी विकास प्राधिकरण आहे. कसे काम करणार हा एक प्रश्न आहे.
गिरीश कुबेर- खुप आचारी झाले की स्वयंपाक बिघडतो असे झाले आहे का?
उद्धव ठाकरे- अगदी तसेच झाले आहे. मुंबईत महापालिकेव्यतिरिक्त अनेक प्राधिकरणे राज्य शासनाने मुंबईवर लादली. यामागे मुंबईचे चांगले व्हावे हा हेतू नव्हता तर पालिके ला शह देण्याची ‘दूरदृष्टी’ त्यामागे असल्यामुळेच नव्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अंगावर आले की या समस्यांसाठी पद्धतशीरपणे alt
पालिकेला दोष दिला जातो. पालिकेवर जर जबाबदार धरायचे असेल तर संपूर्ण अधिकारही पालिकेला दिले पाहिजे. एकीकडे राजकारण म्हणून स्वतंत्र संस्थाने निर्माण करायची. त्यांनी परस्पर मुंबईत निर्णय घ्यायचे. यातून आज कोणाचा पायपोस कोणाला राहिलेला नाही आणि एक सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. १९६६ साली आम्ही कलानगरला राहायला गेलो तेव्हा लोकांनी बाळसाहेबांना विचारले इथे का राहायला आला. त्यावेळी सगळीकडे खाडी आणि दलदल होती. आम्ही पावसाळ्यात मासे पकडायचो. आज कलानगरच्या एका बाजूला एमएमआरडीएने रस्ता बांधला. तो बांधताना रस्त्याची उंची वाढवली. दुसरीकडे बीकेसी उभे राहिले. या साऱ्यात कलानगरचा आकार बशीसारखा झाला. पाण्याचा निचरा व्हायला जागाच शिल्लक राहिली नाही. यातून २००५ साली मुंबईत मुसळघार पाऊस झाला त्यावेळी ‘मातोश्री’ पाण्यात गेली होती. आता आमच्या हाती पालिकेची सत्ता असतानाही घरात पाणी जाते आणि मी काही करू शकत नाही. याला वेगवेगळ्या संस्थांनी मुंबईत मनमानी पद्धतीने केलेले काम जबाबदार आहे. या संस्था राज्य शासनाने निर्माण केल्या असून या संस्था निर्माण करताना मुंबईकरांचा विचार नव्हता तर मुंबईवर डल्ला कसा मारता येईल हेच पाहिले गेले. त्याचे परिणाम आज मुंबईकर भोगतो आहे.
गिरीश कुबेर-  पालिकेव्यतिरिक्त अन्य संस्था नसाव्या असे वाटते का? सरकारने मुंबई महापालिकेचे अधिकार काढून घेतल्यामुळे पालिका अपंग होत चालली आहे का?
उद्धव ठाकरे- महापालिकेव्यतिरिक्त मुंबईत अन्य संस्था असू नये असे माझे स्पष्ट मत आहे. जागा मुंबईची आहे. मुंबईतील संरक्षण विभाग, रेल्वे, विमानतळ या सर्व जागा महापालिकेअंतर्गत येतात. मुंबई  महापालिकेचा हक्क कसा नाकारणार? आता आदर्शची इमारत उभी राहिली आहे, त्याला कोण जबाबदार आहे. एमएमआरडीएचे अनेक प्रकल्प सुरू असतात. त्यांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. एकदिवस तत्कालीन आयुक्त जयराज फाटक यांना सरकारकडून एक पत्र आले की आमच्या प्रकल्पाना मंजुरी देण्यास पालिकेकडून उशीर होत असल्यामुळे यापुढे कामांबाबतची माहिती केवळ तुम्हाला कळवली जाईल. एमएमआरडीएअंतर्गतच्या प्रकल्पांना परवानगी देण्याचे आधिकार त्यांच्याकडेच राहतील. आता पालिका काय करणार ते तुम्ही सांगा.  पालिकेच्या अनेक अधिकारावर सरकारने अतिक्रमण केले आहे. यांनी परस्पर विचार न करता इमारती अथवा बांधकामांसाठी परवानग्या द्यायच्या आणि त्यांचे ड्रेनेज पालिकेने वाहून न्यायचे असे चालले आहे.
सुहास गांगल- एकहाती सत्ता हवी असे तुम्ही म्हणालात, त्यासाठी नितीश कुमार व मायावतीचे उदाहण तुम्ही दिले. त्यांच्यावर लोकांचा विश्वास होता म्हणून एक हाती सत्ता दिली तसा विश्वास तुमच्या बाबत वाटत नाही, म्हणून तुम्हाला एकहाती सत्ता मिळत नाही का? मुळातच तुम्ही युती करून निवडणुकीत उतरता. मग तुम्हाला एकहाती सत्ता देण्याची संधी जनतेला  मिळणार कशी?
उद्धव ठाकरे- एकहाती सत्ता याचा अर्थ पूर्ण बहुमत मिळणे असा आहे. १९९५ साली युती असूनही एकहाती सत्ता नव्हती तर अनेक हाती सत्ता होती. केवळ भाजपचा मुद्दा नाही तर अपक्षही होते. अपक्षांचे त्यावेळी एवढे नखरे होते की त्यांना जपण्यातच युतीचा कालावधी संपला. त्यामुळे युतीला पूर्ण बहुमत मिळावे असे म्हणणे आहे.
संदीप आचार्य- एकहाती सत्ता देण्यासाठी तुम्ही कोणाचा चेहरा देणार, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल ?
उद्धव ठाकरे- प्रश्न चेहऱ्याचा नाही तर विचार व कामाचा आहे. १९९५ ला निवडणूक लढवताना कोणता चेहरा समोर होता?  शिवसेनाप्रमुखांच्या आवाहनावर लोकांनी विश्वास टाकला होता. आता भाजप-रिपाई आमच्याबरोबर आहे. आम्हाला पूर्ण संधी मिळाली तर निश्चितपणे चांगले काम झालेले तुम्हाला दिसेल. युतीच्या काळाही अनेक चांगली कामे आम्ही केली होती. मी मुख्यमंत्री बनण्याचे म्हणाल तर मुख्यमंत्री होणे हे काही माझे स्वप्न नाही. मागेही मी सांगितले होते मला काय वाट्टेल ते व्हायला आवडेल पण लोकांना आवडणार आहे का? त्यामुळे माझी आवड मी लोकांवर का लादू ? मी आहे तसा सुखी आहे. फक्त मला काम करण्याची संधी मिळाली म्हणजे बहुमत मिळाले तर चांगले काम करता येईल. उगाच मी ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र असा घडवीन’ वगैरे बोलणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस सुखासमाधानाने जगला पाहिजे एवढेच माझे स्वप्न आहे.
शेखर जोशी- शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेचे शिल्प घडवले. नारायण राणे व राज ठाकरे सोडून गेल्यामुळे हे शिल्प भंग पावले आहे असे तुम्हाला वाटते का?
उद्धव ठाकरे- अजिबात नाही. शिवसेनाप्रमुखांनी उभारलेले शिल्प अत्यंत भक्कम आहे. त्यामुळे एखादा दगड इकडे तिकडे गेला म्हणून शिल्पाला कोणताही धोका निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही.
रवींद्र पाथरे- पावसाळ्यात मुंबई खड्डेमय झाली होती. त्यानंतर जे लोक या खड्डयांना जबाबदार होते त्यांनाच पुन्हा रस्ते बांधण्यासाठी कंत्राट देण्यात आले यामागचे कारण लोकांना कळले नाही, ते जरा सांगाल का?
उद्धव ठाकरे- लोकांना कारण कळले आहे पण टीकाकारांना ते कळले नाही. रस्त्याचे कंत्राट नगरसेवक तयार करत नाही तर ते प्रशासन करत असते. कामाचे स्वरूप, खर्च आदींचा अंदाज तयार करून निविदा काढल्या जातात. त्यासाठी पात्रतेचे निकष तयार केले जातात. त्यानंतर रीतसर निविदा मागवून त्याची छाननी प्रशासन करते. त्यानंतरच स्थायी समितीकडे ही निविदा मंजुरीसाठी येत असते. या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक कामाला मंजुरी देतात अथवा ते फेटाळून लावतात. आता रस्त्याचे कंत्राट देताना पालिका आयुक्त सुबोध कुमार यांनी ते स्वत: तपासले होते. मुख्यमंत्र्यांनीही या साऱ्याची आयक्तांकडून माहिती घेतली होती. त्यांनाही काही गैर आढळले नाही. त्यानंतर रस्त्याच्या कामाची निविदा स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आली होती. त्यामुळे या कंत्राटात काही गडबड आहे असे मला वाटत नाही.
गिरीश कुबेर- बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना सुरू केली तेव्हा त्यांच्या आसपास लेखक-कलावंतांचा छान गोतावळा होता. तो चेहरा कोठेतरी हरवला असे वाटते का?
उद्धव ठाकरे- शिवसेनाप्रमुख हे एक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहे. असे व्यक्तिमत्त्व क्वचितच निर्माण होते. मुळात ते स्वत: कलाकार आहेत. त्या वेळी जी कलावंतांची पिढी होती ती वेगळीच होती. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुखांचे सूर जुळले होते. आजची पिढीही बाळासाहेबांकडे येत असते. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्या काळात हीरोंचे साम्राज्य असायचे. प्रदीर्घ काळ चाहत्यांच्या हृदयावर त्याचे राज्य चालायचे. आजची परिस्थिती वेगळी आहे. रोज एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतो. असे असले तरी आजही सर्व क्षेत्रातील कलावंतांशी आमचे चांगेल संबंध आहेत.
गिरीश कुबेर- मुद्दय़ांचे अनेक प्रयोग सेनेत केले गेले. यात मराठीकडून हिंदुत्वाकडे मग पुन्हा हिंदुत्व त्यानंतर पुन्हा मराठीचा मुद्दा..
उद्धव ठाकरे-  मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणूस आणि शिवसेना ही नाळ आजही जुळलेली आहे.  ज्यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आले की, इस्लामी आंतकवादाचा धोका वाढतो आहे आणि त्याच्याशी  टक्कर घेण्यासाठी एकटा मराठी माणूस पुरा पडणार नाही. तेव्हा हिंदूुत्वाचा मुद्दा आला. ९२ ला बाबरी पडल्यानंतर तशा देशात कोठे दंगली झाल्या नाहीत पण मुंबईत त्या झाल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणूस हाही अनेकदा हिंदू म्हणून एकवटतो. पुलंनी म्हटले होते की मराठी माणूस स्वत:ला छत्रपतींचा वारसदारच समजतो. पण हे मराठीपण जेव्हा गल्लीत येते त्यावेळेला वैदर्भीय मराठी वेगळा, कोकणी वेगळा, तेली कुणबी वेगळा होतो. त्यांना एकत्र आणण्यासाठी सुद्धा हिंदुत्व हे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याचा पुकारा दिला होता. तेव्हाही मोघलांच्या विरोधात उभे राहण्यासाठी अठरापगड जाती आणि मराठय़ांच्या टोळ्यांना एकत्र करण्यासाठी महाराजांनी भगवा झेंडा आणि हिंदुत्व घेतलं नसेल ना, असा विचार माझ्या मनात येतो. हिंदुत्व म्हटल्यावर लगेच अ‍ॅलर्जी येण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी यांनीही हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेऊन सत्ता मिळवली. त्यानंतर आज ते ‘जय गुजरात’ आणि ‘गुजरातनी अस्मिता’चा नारा देत फिरत आहेत. मोदींना आज किती जण प्रश्न विचारत असतील की आता तुम्ही गुजराथी अस्मितेची भाषा करता मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का? मराठी माणूस हिंदू नाही का? मी हिंदू आहे तर हिंदू आहेच, यात लाज कसली आली ?
रोहन टिल्लू- मुंबईत येणारे परप्रांतीय हिंदू नाहीत का?  की मुंबईपुरती तुमची विचारधारा वेगळी आहे?
उद्धव ठाकरे- या देशात भाषावार प्रांतरचना झाली आहे. मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे हे हिंदूच आहेत. काही बंगलादेशीही येथे येतात. युतीची सत्ता असताना त्यातील अनेकांची बांगलादेशच्या सीमेवर रवानगीही केली होती. या बांगलादेशींना काय म्हणून स्वीकारायचे ? प्रश्न असा आहे की, मुंबईत येणारी ही मंडळी ज्या राज्यांमधून येथे येतात तेथील सरकारे काय काम करतात? ते आपल्या राज्याचा विकास का  करीत नाहीत? मुंबईने व महाराष्ट्रानेच या साऱ्याचा ठेका घेतला आहे का? संपूर्ण देशात जेवढा महसूल गोळा होतो त्यातील पस्तीस टक्के महसूल एकटय़ा मुंबईतून जातो. एवढा महसूल दिल्यानंतर पुन्हा अन्य राज्यातून येणाऱ्यांची जबाबदारी स्वीकारायची हे महाराष्ट्रावर अन्याय करणारे आहे.
गिरीश कुबेर- शिवसेनेच्या हिंदुत्ववादाने मराठीवाद अशक्त झाला असे वाटते का?
उद्धव ठाकरे - मराठीवाद अशक्त होण्याचा प्रश्नच नाही. उलट मराठी माणूस अधिक सशक्त झाला. शिवसेनेच्या हिंदुत्वामुळे मराठी माणूस आपापसातील जातीपातीचे भेद गाडून एकत्र आला. ९५ साली आम्ही सत्तेवर आलो ते हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरच. जातीपातीचे कार्ड कायम काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वापरले जाते. कोणत्या विभागात कोणत्या जातीचे लोक आहेत ते पाहून उमेदवारी देण्याचे काम ही मंडळी करतात. काँग्रेसच्या या जातीपातीच्या राजकारणावर तेव्हा शिवसेनेच्या हिंदुत्वाने मात केली होती. आताही काँग्रेसचे विखारी व जातीपातीवर आधारित राजकारण सुरू आहे.
मधु कांबळे- शिवसेनेची राज्यातील सत्ता का गेली आणि सरकारच्या कामात काही त्रुटी त्याला जबाबदार होत्या का?
उद्धव ठाकरे- राज्यात आमची सत्ता येण्यापूर्वी एका पत्रकार परिषदेत बाळासाहेबांना विचारण्यात आले की सत्ता आल्यानंतर तुम्ही काय करणार, तेव्हा बाळासाहेब म्हणाले की, माझा मुख्यमंत्री केवळ खांद्यावर भगवा घेऊन फिरणार नाही तर तो महाराष्ट्राचा विकास करून दाखवेल. साडेचार वर्षांच्या सत्तेच्या काळात विकासाची अनेक कामे झाली. एकटय़ा मुंबईचा विचार केला तरी अनेक उड्डाण पूल व रस्ते बांधले गेले. सागरी सेतूचे भूमिपूजनही शिवसेनाप्रमुखांनीच केले होते. ती कल्पनाही शिवसेनेचीच होती. कृष्णा खोऱ्यासह अनेक चांगली कामे झाली होती. त्यामुळे सत्ता का गेली असे विचारण्यापेक्षा सेनेला सत्ता का दिली गेली नाही, असा प्रश्न विचारायला हवा. आम्ही कामे केली हा आमचा दोष होता का, आम्ही प्रामाणिकपणे काम केले व करत आहोत. काँग्रेसचे जातीपातीचे राजकारण याला आडवे आले का, हे तपासावे लागेल.
रोहन टिल्लू-  इतिहासात भाऊबंदकीच्या अनेक नोंदी आहेत. आजही ती आहे. हे रोखण्यासाठी घरापासून तुम्ही सुरुवात करणार का?
उद्धव ठाकरे- भाऊबंदकी पूर्वापार सुरू आहे. तो इतिहास आहे. काही परंपरा चालू ठेवल्या जातात, हेच मराठी माणसाचे दुर्दैव आहे. आमच्याकडे ज्यांनी फूट पाडली त्यांचा हा प्रश्न आहे. मी आजही माझ्या घरात आहे व माझ्याच घरात राहातो. मी कोठेही गेलेलो नाही. मी फूट पाडलेली नाही. मी शिवसेनेतच आहे. जे गेले त्यांचा तो प्रश्न आहे. शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर विश्वास टाकला व त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी दिवसरात्र झटतो आहे. जे बाहेर गेले त्यांनी आपले अवतार कार्य कशासाठी आहे ते तपासून पाहावे. शिवसेना संपवणे हेच जर त्यांचे अवतार कार्य असेल तर त्यांचा अवतार संपेल पण शिवसेना संपणार नाही, एवढेच मी सांगेन. त्यामुळे अशा लोकांबरोबर भाऊबंदकी संपविण्यासाठी मी ‘आ बैल मुझे मार’, असे का करू?
प्रसाद मोकाशी- या भाऊबंदकीमुळेच, एकहाती सत्ता देण्याबाबत जनतेला विश्वास वाटत नसावा, असे तुम्हाला वाटते का?
उद्धव ठाकरे- अजिबात नाही. एखादी नवीन गोष्ट आली तर लोकांना त्याबद्दल कुतूहल असू शकते. पण कालांतराने कळते हे नुसतेच वरवरचे आहे. यात काही दम नाही. काही वर्षांपूर्वी एक टुथपेस्ट बाजारात आली होती. त्याची जाहिरात जबरदस्त होती. जाहिरात बघून जवळपास प्रत्येकाने ती टुथपेस्ट वापरायला सुरुवात केली. खूप जाहिरातबाजी झाली होती. लोक त्या आश्वासनांना भुलले होते. आता ती टुथपेस्ट कोणीच वापरत नाही. कारण त्या भूलथापा होत्या हे कालांतराने लोकांच्या लक्षात आले, तेव्हा ते पुन्हा जुन्या टुथपेस्टकडे वळले. आता लोकांना त्या टुथपेस्टचे नावही आठवत नाही. आम्ही आमच्या कामांची जाहिरात करत नाही हा आमचा दोष आहे. आम्ही सतत कामे करत राहातो आणि मी स्वत: जाहिरात क्षेत्रातील असूनही कामांची प्रसिद्धी करत नाही.
गिरीश कुबेर- आज जी शिवसेना आहे तिला आकार द्यायचा झाला तर.. म्हणजे जैतापूरसारखे प्रश्न आहेत.. एसईझेडसारखे विषय आहेत.. असे जे मोठे विषय आहेत तेथे शिवसेना कोणत्या नजरेने पाहाते? कारण राज्याच्या विकासाचा प्रश्न यात निगडित आहे.
उद्धव ठाकरे- महाराष्ट्रात एसईझेड झालेच नाहीत का? एसईझेड झाले मात्र सगळेच्या सगळे झाले नाहीत. काही एसईझेड आपण नाकारले. कोणते नाकारले ते पाहिले पाहिजे. रायगडमधील जी जमीन तीन पिके घेत होती ती खडकाळ म्हणून घोषित करून जर एसईझेड राबवला जाणार असेल तर त्याला विरोध होणारच. जैतापूरला शेतकरी अथवा मच्छीमारांना जमिनीचा भाव नकोच आहे. तो राक्षसी प्रकल्प कोकणाची वाट लावणार आहे. लोकांना सुरक्षितता वाटत नसेल आणि त्यातून आंदोलन झाले तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. फुकुशिमानंतर लोकांच्या मनात एक भीती बसली आहे. या प्रकल्पाच्या सुरक्षेची हमी घेणारे लोक हा प्रकल्प सुरू  होईल तेव्हा कोठे असतील ते माहीत नाही. उद्या येथे किरणोत्सर्ग झाला तर बाहेरचा हमी देणारा कुठे असेल. येथील लोकांची जबाबदारी कोण घेणार? महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोकणच्या किनारपट्टीवर एवढे वीज प्रकल्प तुम्ही का लादता? तुम्हीच लिहिले आहे, जे तंत्रज्ञान आहे ते जगात कोणी वापरले नाही.. मग आपणच ते का स्वीकारावे हाही एक प्रश्न आहे. आपण का त्याचे गिनीपिग व्हायचे? लोकांचे अनेक प्रश्न आहेत तेथे जे सरकार दुर्लक्ष करते ते जैतापूरला मात्र हात धुऊन मागे लागले. शिवसेना विकासाच्या आड कधीच आली नाही. महाराष्ट्राची कायमच त्यागाची परंपरा राहिली आहे. तेव्हा हा जर प्रकल्प एवढा चांगला आहे तर तो अन्य राज्याना देऊन टाका.. आम्ही त्यांच्याकडून वीज विकत घेऊ. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा ठाम विरोध आहे. येथे जर हा प्रकल्प लादला गेला तर महाराष्ट्राला पन्नास टक्के वीज मिळेल असे सांगितले जाते. तीही विकत घेऊनच. मग हा प्रकल्प दुसऱ्या राज्यांना द्या आम्ही वीज विकत घेऊ की, पन्नास टक्के विजेसाठी शंभर टक्के धोका आम्ही का स्वीकारावा ते सांगा.
रवींद्र पाथरे- मग कोणते प्रकल्प होऊ द्यायचे आणि कोणते नाही ते सांगा? भारनियमनातून महाराष्ट्र मुक्त कसा होणार?
उद्धव ठाकरे-जैतापूर व्यतिरिक्त आम्ही किती वीज प्रकल्पांना विरोध केला? एन्रॉनला आम्ही विरोध केला असे चित्र रंगवले जाते. पण ते चुकीचे आहे. आम्ही एन्रॉन प्रकल्पाच्या कराराला विरोध केला होता. योग्यप्रकारे करार झाल्यानंतर आम्ही एन्रॉन स्वीकारले आहे. जैतापूर प्रकल्प कोकणाच्या मुळावर येणारा आहे. बंगाल, तामिळनाडूत सत्ताधारी पक्षांनीच प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र ममता असो की जयललिता, काँग्रेस तेथे काही बोलत नाही आणि महाराष्ट्रात मात्र सरकार दडपशाही करते हे बरोबर नाही. शिवसेना अशावेळी गप्प बसून राहू शकत नाही.
गिरीश कुबेर- ममता अथवा जयललिता या प्रादेशिकतावाद सांभाळतात. मात्र शिवसेनेप्रमाणे त्यांच्यावर प्रादेशिकतेचा, संकुचितपणाचा आरोप होत नाही यामागे काय कारण आहे ?
उद्धव ठाकरे- यामागे तिथली वृत्तपत्रे कारणीभूत आहेत. त्यांचा पाठिंबा असतो ममता व जयललितांना. तसा तो इथे शिवसेनेला मिळाला, तर आमच्यावर प्रादेशिक अथवा संकुचित मराठीवादाचा आरोपही होणार नाही. शिवसेनेची एकतरी भूमिका माध्यमांनी स्वीकारावी. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई आम्ही कधीही सोडणार नाही. आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला तर शिवसेनेने मराठी मुद्दा सोडला का, मराठीचा मुद्दा घेतला तर हिंदुत्व सोडले का, असले प्रश्न उपस्थित केले जातात. माझे एवढेच म्हणणे आहे, थोडासा विश्वास प्रसारमाध्यमांनीही शिवसेनेवर दाखवला पाहिजे. आमचे काही चुकत असेल तर जरूर सांगा.
दिनेश गुणे- युतीच्या सत्तेच्या काळातील अनेक चांगल्या कामांचे तुम्ही दाखले दिले. त्या काळात तुमचे काही चुकलेच नाही, असे तुम्हाला वाटते का?
उद्धव ठाकरे- चुकलेच नाही असे मी म्हणणार नाही. पण सरधोपटपणे टीका करण्याऐवजी आमचे काय चुकले ते सांगा म्हणजे त्या सुधारणा करता येईल. आपुलकीच्या भावनेतून सांगतो की, महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही तुमचे निश्चित ऐकू. तुम्हाला जसा रागावण्याचा अधिकार आहे तसा आम्हाला सुधारण्याचा अधिकार देणार की नाही?
शेखर जोशी- सरकार, पालिका अथवा केंद्राच्या जागेवर आधी झोपडय़ा उभ्या राहू दिल्या जातात. मग माणुसकीच्या दृष्टीने त्यांचे पुनर्वसन केले जाते. मुळात पहिली झोपडी उभी राहते तेव्हाच कारवाई पालिका का करत नाही?
 उद्धव ठाकरे- नाही पालिका अशी कारवाई करू शकत नाही. कारण जेव्हा आम्ही कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मागतो तेव्हा राज्य शासनाकडून तो दिला जात नाही. याचा अर्थ पालिका कारवाईच करत नाही, असा नाही. पालिका आपली कारवाई करतच असते. पालिकेच्या जमिनींवरील अतिक्रमणे अनेकदा आम्ही काढली आहेत. मी परत परत सांगेन की पालिकेला तुम्ही जबाबदार धरणार असाल तर पालिकेला संपूर्ण अधिकारही द्या.
गिरीश कुबेर- तुम्ही हेलिकॉप्टरमधून जैतापूरचे फोटो काढणार का?
उद्धव ठाकरे- का काढणार नाही? पण फोटो काढायला परवानगी नाकारली तर काय करणार? एलिफंटाला जसा नौदलाचा तळ आल्यानंतर पर्यटक बंद होणार तसेच येथे काही झाले तर सांगता येत नाही.
संदीप आचार्य- फोटोग्राफी की राजकारण या दोघातून एकाची निवड करायची झाल्यास कोणाची कराल ?
उद्धव ठाकरे- दोन्ही पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. फोटोग्राफी हा माझा छंद आहे. प्रत्येकाला एखादा चांगला छंद असायला हवा. तो आपला ऑक्सिजन असतो. जसा आपण जगण्यासाठी श्वास घेतो तस आजच्या धकाधकीच्या जीवनात हाही ऑक्सिजन प्रत्येकाकडे असायला हवा. ज्याच्याकडे एखादाही छंद नाही तो दुर्दैवी म्हणावा लागेल.
संदीप आचार्य- बाळासाहेबांनी कायम घराणेशाहीला विरोध केला. आता बाळासाहेबांची तिसरी पिढीही राजकारणात आणली गेली. ती घराणेशाही नाही का? शिवसेना हा कायम युवकांचा पक्ष राहिला आहे. तुमच्या रूपाने एक स्थित्यंतर सुरू असताना युवासेनेच्या रूपाने दुसरे स्थित्यंतर आणणे कितपत योग्य आहे?
उद्धव ठाकरे- बाळासाहेबांनी कोणत्या घराणेशाहीवर टीका केली हे प्रथम लक्षात घ्या. योग्यता असो अथवा alt
नसो पण आपल्या मुलाबाळांना सत्तेच्या खुर्चीचा वारस ठरवणाऱ्यांना बाळासाहेबांनी विरोध केला. तसा त्यांच्या घराणेशाहीत व आमच्या घराणेशाहीत फरक आहे की नाही? बाळासाहेब मुख्यमंत्री झाले नाहीत. मी अशी कोणतीही इच्छा कधी व्यक्त केलेली नाही. आदित्यचा तर प्रश्नच येत नाही. आजोबांपासून आमच्याकडे सामाजिक कार्याचा एक वारसा चालत आला आहे व तो आम्ही जपला आहे. प्रबोधनकारानी एकटय़ानेच लढाई केली. बाळासाहेबांनी शिवसेना ही संघटना काढली. आमचे हिंदुत्व हे कधी शेंडी व जानव्यात अडकले नाही. त्याची नाळ राष्ट्रीयत्वाशी जोडलेली आहे. आम्ही खुर्चीची परंपरा नाही चालवली तर सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम केले आहे.
गिरीश कुबेर- तुम्ही जेव्हा आदित्यच्या वयाचे किंवा एखादं वर्ष मोठे होतात तेव्हा तुमच्या डोंबिवलीला पाटणकरांकडे हळूच फेऱ्या सुरू झाल्या होत्या.. तसं उद्या आदित्यचे झाले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
उद्धव ठाकरे- माझ्या डोंबिवलीला फेऱ्या थोडय़ा उशिरा सुरू झाल्या होत्या. आता प्रेमप्रकरण म्हटले की चोरून करणे आलेच. त्यावेळी माझ्या फेऱ्या कळल्यानंतर जशी माझ्या आई-वडलांची प्रतिक्रिया झाली तशीच वडील म्हणून आदित्याच्या बाबतीत माझी असेल. जर सगळं चांगलं असेल तर हरकत घेण्याचे काही कारण नाही.
रोहन टिल्लू- ठाकरे घराण्यात कोणी निवडणूक लढवली नाही. परंतु बाळासाहेबांनी रिमोट कंट्रोल ठेवला. त्यापेक्षा तुम्हाला हवी तशी कामे करण्यासाठी ममता, मोदी, नितीश कुमार यांच्याप्रमाणे थेट निवडणूक लढवून तुम्ही सत्ता राबवणे पसंत कराल का?
उद्धव ठाकरे- कामं जर चांगली होत असतील तर खुर्चीत बसण्याचा प्रश्न येतोच कोठे? रिमोट कंट्रोलचं म्हणाल तर रिमोट कंट्रोल आणि हायकमांडमधील फरक प्रथम लक्षात घ्या, काँग्रेसच्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला हात धुवायचे असतील तरी दिल्लीची परवानगी घ्यावी लागते. बाळासाहेबांनी जो रिमोट कंट्रोल चालवला तो महाराष्ट्राच्या जनतेची कामे व्हावी यासाठी. म्हणूनच ‘मी ऊठ म्हणताच उठणारा आणि बस म्हणताच बसणारा मुख्यमंत्री मला हवा’ असे त्यांनी जाहीर केले होते. आज काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था तरी बघा. एकतरी चांगले काम महाराष्ट्रासाठी ते करू शकतात का ते तपासून पाहा. केवळ हायकमांडची मर्जी राखणे एवढेच त्यांचे काम आहे. युतीच्या काळात अनेक चांगली कामे झाली. आता पृथ्वीराज चव्हाण यांना एक वर्ष पूर्ण होत आहे. तुम्हीच सांगा कोणती चांगली कामे या काळात झाली. शिवसेनेत अनेक चांगले व कार्यक्षम लोक खुर्चीसाठी लायक आहेत. त्याच्या माध्यमातून विकासाची चांगली कामे करून घेता येतील.
रवींद्र पाथरे- सर्व राजकीय पक्षांनी लोकांची निराशा केल्यामुळे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला लोकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला असे वाटते का?
उद्धव ठाकरे- लोकांना सर्वच राजकीय पक्षांनी निराश केले असे म्हणणे चुकीचे ठरेल. भ्रष्टाचार कोणलाच नको आहे. त्याविरोधात आवाज उठवल्यास लोक साथ देणारच. तसा तो लोकांनी अण्णा हजारे यांना दिला. आता भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी जनचेतना यात्रा काढली त्यालाही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
गिरीश कुबेर- निवडणुका आल्या की वातावरण तापवण्यासाठी विशिष्ट मुद्दे काढले जातात. जसे संजय निरुपम यांनी दिलेले आव्हान असेल, त्याला तुमचे प्रत्युत्तर..  हे नेमके आहे काय?
उद्धव ठाकरे- शिवसेनेवर एक जो आरोप होतो, की हे परप्रांतीयांना राज्यसभा देतात. पण किती टक्के याचा कोणी विचार करत नाही. जर हे परप्रांतीय महाराष्ट्राचे राज्यसभेत चांगले प्रतिनिधित्व करणार असतील व आपली जबाबदारी ओळखून वागणार असतील तर एक प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे. मात्र जेव्हा या व्यक्ती उलटल्या तेव्हा शिवसेनेने त्यांना धडाही शिक वला आहे. त्यावेळी जेव्हा माझ्यावर आरोप झाले तेव्हाही मी म्हटले होते की बोलून चालून ते तर परप्रांतीयच होते पण घरातलीच माणसे उलटली त्याला काय म्हणायचे. मग परप्रांतीय आणि घरातले यांच्यात फरक काय ?
 गिरीश कुबेर- संजय निरुपमचे वक्तव्य निवडणूक स्टंट आहे का, कारण निवडणुका आल्या की मराठी अमराठी वाद सुरू होतो..
उद्धव ठाकरे- मराठी- अमराठी वादाची सुरुवात कोणी केली? संजय निरुपम याचे वक्तव्य हा जरी स्टंट असला तरी तो स्टंट म्हणून सोडून देता येत नाही. कारण काँग्रेसची नीती लक्षात घेतली पाहिजे. काँग्रेस कायम सुरुवातीला फालतू लोकांना पुढे करून वेगवेगळे आरोप करायला लावते. हे आरोप उचलले गेले तर मग मोठे नेते पुढे येतात. आरोप चालला नाही तर निरुपम यांच्यासारख्यांचे बोलणे हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून हात झटकतात. त्यामुळे काँग्रेसचा कितीही फालतू माणूस असला तरी त्याला जिथल्या तिथे उत्तर हे दिलं गेलंच पाहिजे. निरुपम यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनीही त्याची थातूरमातूर दखल घेतली नाही यातच सारे काही आले. हेच विधान जर शिवसेनेतून कोणी केले असते तर लगेचच कायद्याचा बडगा उगारला गेला असता. बाळासाहेब जे म्हणतात, ‘मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव आहे’ त्याची टेस्ट करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो.
दिनेश गुणे- राज यांच्या बाहेर जाण्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडली..
उद्धव ठाकरे- यासाठी मराठी माणसाने वास्तव समजून घेतले पाहिजे. सुदैवाने मराठी माणसाला आता वस्तुस्थिती समजली आहे. प्रामाणिकपणे बोलायचे झाले तर मराठी माणसानेही नेमके काय खरे आहे ते ओळखायला शिकले पाहिजे. शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुखांनी कायमच दिलेला शब्द पाळला आहे. त्यामुळे यापुढे मराठी मतांमध्ये फूट पडलेली दिसणार नाही.
स्तुती शुक्ला - पन्नास टक्के महिला उमेदवारांमुळे शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे विभाग आरक्षित झाले आहेत. त्याचा काही परिणाम होणार का?
उद्धव ठाकरे- शिवसेनेवर याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण या परिस्थितीला सर्वच पक्षांना सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वीही ३३ टक्के आरक्षण आले तेव्हा आमच्या अनेक चांगल्या नगरसेवकांचे विभाग आरक्षित झाले होते. मात्र शिवसेनेत कोणालाही आता आपले कसे होणार हा प्रश्न पडलेला नाही. खऱ्या शिवसैनिकाला नगरसेवकपद गेले काय आणि राहिले काय याचा फरक पडत नाही.
स्वाती खेर- मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण होत आहे त्याबाबतचे तुमचे मत काय? आणि दोन हजापर्यंतच्या झोपडय़ांना नियमित करण्याच्या हालचाली सरकारकडून सुरू  होत आहेत, त्याबाबतची तुमची भूमिका काय आहे?
उद्धव ठाकरे- मुख्यमंत्र्यांच्या एक वर्षांच्या कामाचा आढावा घेण्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. त्याचा अहवाल लवकरच येईल. नाही म्हणायला त्यांच्या वर्षांच्या काळात जैतापूर, वारकरी, शेतकरी आणि कामगारांवर चार ठिकाणी गोळीबार झाला आहे. झोपडय़ा नियमित करण्याचे म्हणाल तर निवडणुका आल्या की मतांच्या राजकारणासाठी हा विषय नेहमीच आणला जातो. आता सरकारने जर दोन हजापर्यंतच्या झोपडय़ा नियमित केल्या त्याचा विचार मुंबईकरांनीच करायचा आहे.
केदार दामले- भाजपबरोबर आपली युती असताना सीमाभगात वारंवार मराठी माणसावर अत्याचार होतात. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे त्यामुळे तुमचे भाजप नेत्यांशी याबाबत काही बोलणे होते का ?
उद्धव ठाकरे- माझे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी यावर बोलणे झालेले नाही. परंतु एका सभेत कर्नाटकचे प्रभारी अनंतकुमार यांच्याशी मी बोललो. भाजपबरोबरची मैत्री वगैरे ठीक आहे, पण न्याय मागणाऱ्या मराठी बांधवांवर तुम्ही अत्याचार कसे होऊ देता. असे मी म्हटल्यावर ते म्हणाले की, या परिस्थितीत बदल झालेला तुम्हाला दिसेल.
मधु कांबळे-  शिवशक्ती-भीमशक्तीच्या अजेंडय़ावर हिंदुत्व आणि आरक्षण हे दोन मुद्दे असणार आहेत?
उद्धव ठाकरे- यावर आमच्यात बोलणे झालेले आहे. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट आहे. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाशी निगडित आहे. रूढी-परंपरांच्या विरोधात माझे आजोबाही लढले आहेत. तोच धागा पकडून आम्ही पुढे चाललो आहोत. आरक्षणाबाबत शिवसेनाप्रमुखांची भूमिकाही स्पष्ट आहे. प्रत्येक पोटाला भूक लागते. त्या पोटाला तुम्ही जात का लावता? याचा अर्थ आरक्षणाला विरोध असा नाही तर त्याला त्या क्षमतेचा केला पाहिजे असा दृष्टिकोन आहे. नुसतेच आरक्षण आरक्षण करत बसलो तर तो न्याय दिल्यासारखे होणार नाही. मंडल आयोग केंद्राने व राज्याने मानला. यात किती जागा भरल्या गेल्या? हाही विषय आम्ही बसून सोडवतो आहे.
संदीप आचार्य- महापालिका निवडणुकीनंतर अन्य कोणत्या पक्षाशी युती करण्याची गरज निर्माण झाली तर मनसेशी हातमिळवणी करणार का?
उद्धव ठाकरे- तशी वेळच येणार नाही. शिवसेना-भाजप व रिपाई युतीला पालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल हे पूर्ण विश्वासाने मी सांगतो. आम्ही केलेली चांगली कामे आणि आता भीमशक्तीची मिळालेली जोड यामुळे आम्हीच विजयी होणार हे निश्चित आहे. अन्य कोणाशीही युती अथवा हातमिळवणी करण्याचा प्रश्नच येणार नाही.
गिरीश कुबेर- लोकसभा निवडणुकीला अजून बराच काळ आहे पण भाजपमध्ये अतापासूनच पंतप्रधानपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. अशावेळी ‘एनडीए’च्या भवितव्याविषयी काय वाटते?
उद्धव ठाकरे- प्रामणिकपणे सांगायचे झाल्यास एकूणच मला एनडीएच्या भवितव्यापेक्षा देशाच्या भवितव्याची जास्त चिंता वाटते. पंतप्रधान कोण असावा अथवा नसावा हा नंतरचा मुद्दा आहे. देवेगौडा, गुजराल, चंद्रशेखर अशी अनेक माणसे ज्यांच्या ध्यानीमनीही नव्हते ते पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे तो मुद्दा नाही. अगदी डॉ. मनमोहन सिंगही पंतप्रधान झाले. पंतप्रधान हा एक यंत्रणेचा भाग झाला पण देशाला आज नेता कोण आहे. आज आपल्या देशाचा चेहरा काय आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबतीत कोणी वाईट बोलू शकणार नाही. देशाला दिशा दाखवणारे नेते आता कुठे राहिले आहेत? एक बाळासाहेब त्यांना योग्य वाटते ते बोलतात आणि एक अडवाणी जे देशभर फिरतात. अडवाणी यांच्या इतका फिरणारा नेता काँग्रेसकडेही नाही. मला चिंता पंतप्रधानाची नाही तर देशाला नेतृत्व देऊ शकेल असा नेता कोण आहे याची आहे. पूर्वीचे नेते मग ते काँग्रेसचेही असतील त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आदराने मान झुकायची आणि आजच्या नेत्यांकडे पाहिले की मान शरमेने झुकते. आज दुर्दैवाने ठाम निर्णय घेणारे नेतृत्वच देशात नाही. त्यामुळे देश पुढे कुठे जाणार हा प्रश्न आहे. आपल्याकडे धोरण नाही. देशाच्या सीमा असुरक्षित आहेत. पाकव्याप्त काश्मीर घ्या की चीनच्या हालचाली पाहा. सीमाभागात धोकाच दिसून येतो. चीनशी टक्कर घेण्याची आपली तयारी नाही. अतिरेक्यांनी उच्छाद मांडला आहे. माओवादी डोके वर काढून आहेत. त्यातच भ्रष्टाचार पराकोटीचा बोकाळला आहे. आपणच जगात ओरडून सांगतो आमचा देश भ्रष्टाचाऱ्यांचा देश आहे. भारताची प्रतिमा जगात भ्रष्टाचारी देश अशी झाली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना आपल्याकडे शिक्षा व्हायला पाहिजे. दुर्दैवाने अशा लोकांना शिक्षा होताना दिसत नाही. कें द्र सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टाचारात सापडत आहेत. आणि पंतप्रधान आघाडीच्या मर्यादेच्या नावाखाली गप्प बसून आहेत. अशा परिस्थितीत चांगले प्रकल्प अथवा उद्योग आपल्या देशात येतील का हाही एक प्रश्न आहे.
प्रशांत दीक्षित- शिवसेनेत तुम्ही जबाबदारी घेतल्यापासून काही स्थित्यंतरे झाली. सेना महाराष्ट्रात पसरली. तुमचे संघटन कौशल्यही चांगले आहे. महाराष्ट्रातील सेनेकडे तुम्ही कसे पाहाता? मुंबईत तुमच्या नगरसेवकांचे व शाखाप्रमुखांचे सर्वसामान्यांशी नात तुटलेले दिसते..
उद्धव ठाकरे- सर्वसामान्यांशी नगरसेवकांचे व शाखाप्रमुखांचे नाते आजही चांगले आहे. लोकांच्या प्रश्नावर मग ते रुग्णालयात उपचारासाठी न्यायचे असो अथवा अन्य काही कामे असतील तर शाखांच्या माध्यमातून आजही काम चांगले चालले आहे. लोकांची मदत करण्याचे, संवादाचे केंद्र म्हणून शाखा आहेत. त्यामुळे लोकांशी नाते तुटण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातही शेतकऱ्यांपासून विविध प्रश्नांवर शिवसेना काम करतच आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रात शिवसेना पसरलेली दिसत आहे.
प्रशांत दीक्षित- गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरी भागात तुम्ही मार खाल्लात, मात्र ग्रामीण भागात यश मिळाले, असे का झाले?
उद्धव ठाकरे- गेल्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी महाराष्ट्र पिंजून काढला. शेतमालाच्या हमी भावापासून चांगली खते मिळण्यापर्यंत अनेक आंदोलने केली. खतांसाठी आंदोलन आपल्या राज्यात करावे लागते हे दुर्दैव आहे. शेतीला वीज देण्यातही भेदभाव केला जातो. ‘आयपीएल’सामन्यांना वीज दिली जाते. ती देऊ नये असे माझे म्हणणे नाही पण मग शेतकऱ्यांवर अन्याय का केला जातो. लवासासाठी दिल्लीला जाऊन तळ ठोकायला शरद पवार यांना वेळ आहे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र ते भेटत नाहीत. पण निवडणुकीत धनशक्तीचा प्रभाव निर्णायक ठरला. अर्थात तरीही आम्हाला ग्रामीण भागात चांगले यश मिळाले. लोकसभेच्या चांगल्या जागा निवडून आल्या. आजही विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर प्रत्येक व्यासपीठावर आवाज उठवत आहोत. ग्रामीण भागात मी पुन्हा जाणार आहे. आजही शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या थांबलेल्या नाहीत. आता पुन्हा धान, ऊस, कापूस आदींचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार योग्य हमीभाव देण्यास टाळाटाळ करत आहे. मी नुकतेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली आहे. गेल्या सोळा वर्षांत अडीच लाख आत्महत्या झाल्या आहेत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तरी एखाद्या देशात एवढे बळी गेले आहेत का?
गिरीश कुबेर- मुंबईतील परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तर महाराष्ट्रातील आणि देशातील अन्य राज्यांमधील वीज, शेतकरी, पाणी आदी प्रश्न सारखेच आहेत. अशावेळी प्रादेशिक पक्षांनी एकत्र यावे असे वाटते का आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का?
उद्धव ठाकरे- तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. एनडीएचे सरकार असताना प्रादेशिक पक्षांनी समान प्रश्नांवर एकत्र यावे यासाठी माझा प्रयत्न चालला होता. माझे दिल्लीत फारसे येणेजाणे नाही. आणि नंतर सरकार गेल्यामुळे तो प्रयत्न तसाच राहिला. पण प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची आता गरज आहे. कारण राष्ट्रीय पक्षांनीही एखाद दुसरे राज्य सोडले तर सर्व राज्यांत आघाडी केल्याचे दिसून येईल. प्रत्येक राज्याला आपला विकास करण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी सर्व राज्ये आपल्या प्रदेशाचा विकास करतील तेव्हा हे लोंढय़ांचे प्रश्न संपण्यास मदत होईल. प्रादेशिक पक्षांना आज चांगले भवितव्य आहे. राष्ट्रीय पक्षांनाही राज्या राज्यात प्रादेशिक पक्षांचीच मदत घ्यावी लागताना दिसते. अशावेळी दिल्लीपेक्षा प्रादेशिक पक्ष अधिक जवळचा वाटू लागतो. देशाला नेता नाही की नेतृत्व नाही त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी एकत्र येण्याची वेळ आता आली आहे आणि शिवसेनेने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मला वाटते.
प्रशांत दीक्षित- प्रादेशिक पक्षात महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांनाही घेणार का?
उद्धव ठाकरे- काल जर एखादा प्रादेशिक पक्ष स्थापन झाला तर त्याला घ्यायचं का, हा एक प्रश्नच आहे.. (हंशा)
सुहास गांगल- तुमची प्रतिमा सभ्य-सज्जन नेता अशी आहे. अचानकपणे तुम्ही ‘जंगली’ आणि ‘हरामखोर’ असे शब्द वापरलेत आणि महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणारी जनता दचकली. असे अचानक काय झाले, ती पक्षाची गरज होती की अनावर झालेला राग होता?
उद्धव ठाकरे- मी सुद्धा माणूस आहे. आपल्यावर जसे संस्कार झाले ते ज्याला जसे झाले तसे तो पाळतो. पण शेवटी ज्याला जी भाषा कळते त्याच्याशी त्याच भाषेत बोलावे लागते. शक्यतो अशी वेळ येऊ नये. सभ्यपणे वागलो तर जास्त आनंद मिळतो असा माझा अनुभव आहे. राग अनावर झाला म्हणून मी हरामखोर, जंगली जनावर म्हटले नाही तर ‘जशास तसे उत्तर’ दिले म्हणजे लवकर समजेल म्हणून मी बोललो.
प्रशांत दीक्षित- तुम्ही अनेक वर्षे राजकारणात आहात. शिवसेनाप्रमुख सोडल्यास तुमच्यावर परिणाम अथवा प्रभाव पाडणारा दुसारा नेता कोण?  
उद्धव ठाकरे- अत्यंत प्रामणिकपणे सांगतो की, बाळासाहेबांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणाचा विचारच केलेला नाही. लहानपणापासून वडील म्हणून, शिवसेनाप्रमुख म्हणून मी त्यांना पाहात आलो आहे. त्यांच्यातच अनेक गुण आहेत. व्यंगचित्रकार, पत्रकार, नेता अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचे पाहून मी लहानपणी व्यंगचित्रही काढत होतो. पुढे फोटोग्राफीकडे वळलो. त्यामुळे त्यांचाच प्रचंड पगडा माझ्यावर आहे. मी त्यांचे अनुकरण (नक्कल)करत नसलो तरी त्यांचे विचार माझ्या रक्तात भिनलेले आहेत. मला असे वाटते की अनुकरण न करणे हाही त्यांचाच वारसा आहे.
सुहास गांगल- सिनेमा बघायला आवडते का? रोज बघता का?
alt
उद्धव ठाकरे- चित्रपट पाहायला आवडते. पण रोज बघत नाही. तसा वेळही मिळत नाही. मी पाहिलेला शेवटचा चित्रपट आहे तो अमिताभचा ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’. त्याच्यानंतर चित्रपट पाहिलेला नाही.