आसूस ट्रान्स्फॉर्मर पॅड टीएफ ३०० टीजी Print

स्मार्ट रिव्ह्यू
मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
उपलब्ध रंग

रॉयल ब्लू, आइसबर्ग व्हाइट आणि टॉर्च रेड. तरुणाईला समोर ठेवून ऑससने ही आकर्षक रंगसंगती असलेले टॅब्लेट बाजारपेठेत आणले आहेत.
आयए टेग्रा थ्री क्वाड कोअर सीपीयू
या टॅब्लेटमध्ये प्रथमच एनव्हीडिओ टेग्रा थ्री फोर प्लस वन, क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्यामुळेच वेब ब्राऊझिंगचा अनुभवदेखील वेगवान असतो आणि व्हिडिओदेखील वेगात म्हणजेच १०८० पी एवढय़ा वेगात पाहाता येतो. क्वाड कोअर प्रोसेसरमुळे मल्टिटास्किंगचा अनुभवदेखील तेवढाच चांगला मिळतो. त्यामुळेच हे ट्रान्स्फॉर्मर पॅड मोबाईल मनोरंजनासाठी उपयुक्त आहे.
सुधारित ग्राफिक्स अनुभव
नव्या अद्ययावत प्रोसेसरच्या वापरामुळे या टॅबवर सुधारित ग्राफिक्स अनुभव वापरकर्त्यांला मिळतो. ग्राफिक्सचा वेग ३० टक्क्य़ांनी वाढला आहे.
स्पेशल कीबोर्ड
टॅब्लेटस्ची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यावर टायिपग करणे. हेच सर्वाधिक अडचणीचे प्रकरण असते. कारण त्या सात इंची किंवा दहा इंची टॅब्लेटवर टाइप करणे अडचणीचे ठरते. सध्या सर्वाना सवय आहे ती, की बोर्डवर टायपिंग करण्याची. त्यामुळेच टॅब घेताना आजही लोक अनेकदा विचार करतात. त्याचा वापर इ- पुस्तक वाचण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी इतपतच त्याचा विचार होतो. फार तर इंटरनेटसाठी खास करून सोशल नेटवर्किंग साइटस्साठी त्याचा वापर केला जातो. मात्र ऑफिससाठीच्या कागदपत्रांसाठी किंवा ऑफिसचे काम करण्यासाठी त्याचा विचार फारसा केला जात नाही. त्यावर न जमणारे टायिपग हेच त्या मागचे प्रमुख कारण आहे. हेच लक्षात घेऊन आसूसने एक नावीण्यपूर्ण पर्याय समोर आणला आहे. त्यांनी एक की बोर्ड डॉक सोबत दिले असून त्याचे अनेक फायदे आहेत. हे डॉक जोडल्यानंतर तो लगेचच लॅपटॉपप्रमाणे काम करू लागतो. त्यामुळे त्यावर टायपिंग करणे सोपे जाते. क्वर्टी की बोर्डमुळे टायिपग सोपे जाते. शिवाय त्या डॉकमुळेच १४ तासांचे अतिरिक्त बॅटरी लाइफही टॅब्लेटला प्राप्त होते. या डॉकमध्येच यूएसबी पोर्टची सोयही करून देण्यात आली आहे.
सॉनिक मास्टरमुळे सुश्राव्य संगीत
आसूसच्या गोल्डन इअर्स टीमने सुश्राव्य संगीतासंदर्भातील संशोधनावर गेल्या काही वर्षांत चांगले काम केले असून त्याचा परिणाम या टॅब्लेटमध्ये अनुभवता येतो. या संशोधनामधूनच सॉनिक मास्टर तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याचाच वापर या टॅब्लेटमध्ये करण्यात आला आहे.
८ मेगापिक्सेल कॅमेरा
या टॅब्लेटच्या मागच्या बाजूस कॅमेरा देण्यात आला असून त्याला अद्ययावत ८ मेगापिक्सेल सीमॉस सेन्सर जोडण्यात आला आहे. त्याचे अ‍ॅपर्चर एफ / २.२ असून फाइव्ह एलिमेंट लेन्स डिझाइनवर तो काम करतो. त्यामुळे कमी प्रकाशात या टॅबवरही चांगले फोटो काढता येतात. यात हाय- स्पीड ऑटो फोकस फोटोचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील रंगांप्रमाणेच चित्रण पाहायला मिळते.
सुपरनोट
या टॅब्लेटमध्येच असलेल्या सुपरनोट अ‍ॅप्समुळे आपली माहिती विविध पद्धतीने साठवता येते. त्यात की बोर्डबरोबरच, फिंगर इनपूट, फोटो, व्हिडिओ कॅप्च्युअर आणि ऑडिओ नोटस् यांचाही पर्याय देण्यात आला आहे.
पोलारिस ऑफिस
टॅब्लेटवर टायिपगची व्यवस्थित सोय नसल्याने त्याचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी होणे कठीणच आहे. हे लक्षात आल्यानंतर आसूसने त्यांच्या या टॅब्लेटसोबत वेगळा की बोर्ड तर दिलाच, पण त्यासोबत काम करण्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेअरही दिले आहे. या ट्रान्स्फॉर्मर पॅडसोबत पोलारिस ऑफिस ३.० हे सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. त्यामुळे डॉक, एक्सेल आणि पॉवरपॉइंट म्हणजेच पीपीटी या तिन्ही फॉरमॅटमध्ये यावर काम करता येते. त्यामुळेच कार्यालयीन कामकाज सोपे करण्याचे काम पोलारिस करते.
८ जीबी क्लाऊड स्टोरेज
सध्या अनेक कंपन्यांनी त्यांच्या मोबाइल किंवा टॅब्लेट आणि लॅपटॉपसोबत क्लाऊड स्टोरेज देण्यास सुरुवात केली आहे.  हे लक्षात घेऊन आता आसूसनेही त्यांच्या या टॅब्लेटसोबत तब्बल ८ जीबी मोफत क्लाऊड सेवा पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे डिजिटल साठवणुकीचा प्रश्न सोडविण्यात आसूसला यश आले आहे.
माय क्लाऊड
माय क्लाऊड या सेवेमुळे गाणी, व्हिडिओ, फाइल्स हे सारे काही विविध उपकरणांवरून शेअर करण्याची सोयही या टॅब्लेटमध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही विंडोज सिस्टिम वापरता की, मॅक याचा माय क्लाऊडवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे आपल्या फाइल्स कुठेही असलात तरी सर्वत्र विविध उपकरणांवर सहज शेअर करता येतात. या ट्रान्स्फॉर्मर पॅडची उपयुक्तता त्यामुळे अधिकच वाढली आहे.
ऑपरेटिंग सिस्टिम
खास टॅब्लेटसाठी तयार करण्यात आलेली अँड्रॉइडची ४.० ही आइस्क्रीम सँडविच ऑपेरटिंग सिस्टिम या नव्या टॅब्लेटसाठी वापरण्यात आली आहे. याबरोबर आसूसचा वेवशेअर यूजर इंटरफेसही या टॅब्लेटसोबत असल्याने त्यावर वेगात काम करता येते. अ‍ॅडोब फ्लॅशचा वापरही यात करण्यात आला आहे. शिवाय गुगल प्ले सोबत आहेच.
या टॅब्लेटसोबत आसूस लाँचरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कोणतेही सॉफ्टवेअर सुरू करण्यासाठी कमीतकमी कालावधी घेतला जातो. त्याचप्रमाणे या टॅब्लेटमध्ये असलेल्या अनेक गोष्टींचा अ‍ॅक्सेसही कमीतकमी वेळेत मिळतो.
माय नेट
सध्या कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करताना ग्राहकांतर्फे एक महत्त्वाची बाब पडताळून पाहिली जाते किंवा त्याची खात्री करून घेतली जाते ती म्हणजे एचडीएमआय. या टॅब्लेटमध्येही एचडीएमआय सोय देण्यात आली आहे. त्यामुळे यातील एचडी व्हिडिओ किंवा संगीत आपल्याला घरी असलेल्या किंवा इतरत्र उपलब्ध असलेल्या एचडीटीव्ही पाहण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. ४३,९९९/-