ट्रॅव्हल कॅमेरा ; ऑलिम्पस एसझेड- १४ Print

विनायक परब ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अगदी कुठेही बाहेर पडताना खिशात कॅमेरा ठेवून निघणाऱ्या आणि फेसबुकवरच्या प्रोफाईल अपडेटसाठी बहुतांश फोटो टिपणाऱ्या पिढीसाठी ऑलिम्पसने एसझेड हा १४ मेगापिक्सलचा कॅमेरा बाजारात आणला आहे.
मेटल फ्रेम
मेटल फ्रेम हे त्याचे खास वैशिष्टय़ आहे. गेल्या दीड- दोन वर्षांत ऑलिम्पसने त्यांच्या कॅमेऱ्याच्या रचनेमध्ये बरेच बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एक महत्त्वाचा प्रयत्न या नव्या मॉडेलमध्ये आहे.
एलसीडीवर सेटिंग्ज
अनेक सेटिंग्ज सुटसुटीत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. कॅमेऱ्याच्या वरच्या बाजूस किंवा मागच्या बाजूस असणारी सेटिंग्जची गोलाकार चकती जाऊन त्याची जागा समोरच्या एलसीडी स्क्रीनवरच्या डिस्प्लेमधील सेटिंग्जनी घेतली आहे. समोरच्या बाजूने हा अतिशय कॉम्पॅक्ट वाटावा, असाच कॅमेरा आहे.
चांगली हॅण्डग्रीप
त्याची जाडी ४ सेंटीमीटर्सपेक्षा अधिक नाही. शिवाय नव्या मॉडेलमध्ये त्याला चांगली हॅण्डग्रीपही देण्यात आली आहे. त्यामुळे कॅमेरा हाताळणी सोपी राहाते. समोरच्या बाजूस लेन्सच्या वरती डावीकडे फ्लॅश वरती करण्यासाठीचे बटण देण्यात आले आहे. वरच्या बाजूने पाहिल्यास अगदी उजवीकडे केवळ गोलाकार चकती असून ती वाईड आणि टेलीफोटो लेन्ससाठी देण्यात आली आहे. तिथेच मध्यभागी क्लिक् करण्यासाठीचे बटण आहे. आणि त्याच्याच शेजारी ऑन- ऑफ स्वीच देण्यात आला आहे.
मोठा एलसीडी स्क्रीन
मागच्या बाजूस मोठा ७.६ सेंटीमीटर लांबीचा एलसीडी स्क्रीन देण्यात आला आहे. मोठय़ा स्क्रीनमुळे प्रत्यक्ष शूट करताना वापरकर्त्यांस चांगला फायदा होतो. अधिक चांगल्या सुस्पष्ट प्रतिमांकनासाठी ते फायदेशीर आहे. त्याच्याच बाजूस चार लहान गोलाकार बटणे व एक मोठी चकती देण्यात आली आहे. ही सेटिंग्जसाठी गोलाकार फिरवून वापरण्याची चकती आहे.
थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग
सर्वात वरच्या बाजूस थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठीचे बटण आहे. त्याखाली टिपलेले फोटो पाहण्यासाठीचे तर त्या खाली मेन्यू बटण आहे. सर्वात खालच्या बाजूस ‘हेल्प’ हे बटण देण्यात आले आहे. अलीकडे जवळपास सर्वच कॅमेऱ्यांमध्ये ‘हेल्प’ची सोय इनबिल्ट देण्यात आलेली असते.
कॅमेरा सुरू केल्यानंतर डावीकडच्या बाजूस स्क्रीनवर बॅटरी किती चार्जड् आहे, त्याची कल्पना येते. तर डावीकडे खाली आपण केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा कालावधी आणि त्याखाली आपल्या कॅमेऱ्यामध्ये असलेल्या मेमरी कार्डवर टिपलेल्या फोटोंची संख्या पाहाता येते. त्यातही ते किती मेगापिक्सेलवर टिपलेले आहेत, त्याचा अंदाजही घेता येतो.
मेन्यू सेटिंग्ज
अगदी उजवीकडे असलेला मेन्यू वापरकर्त्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असतो. त्यात सर्वातक वरच्या बाजूस प्रोग्रॅम, आयऑटो, सीन, मॅजिक, पॅनोरमा, थ्रीडी असे मोडस् देण्यात आले आहेत. यात ज्यांना कॅमेरा आणि चित्रण यातील फारसे काही कळत नाही, अशांसाठी आयऑटो मोड चांगला आहे. त्यामध्ये तुम्ही टिपत असलेला फोटो लक्षात घेऊन त्यासाठीची योग्य सेटिंग्ज कॅमेरा स्वत निवडतो आणि त्यामुळे तुम्हाला चांगला फोटो सहज मिळू शकतो.
प्रोग्रॅम मोड व १६ सीन सेटिंग्ज
पण अनेकांना छायाचित्रणात वेगवेगळे प्रयोग स्वत करण्याची सवय असते. अर्थात त्यासाठी सेटिंग्जमध्ये स्वत बदल करावे लागतात. त्यांच्यासाठी प्रोग्रॅम मोड देण्यात आला आहे. त्यात तुम्हाला अॅपर्चर, शटर स्पीड आदी सेटिंग्ज करून फोटो टिपता येऊ शकतात. सीनमध्ये एकूण १६ सेटिंग्ज तयार देण्यात आली आहेत. त्यात इनडोअर फोटोपासून ते त्यातही विशेष असलेल्या इनडोअर पोर्ट्रेटपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.
११ मॅजिक फिल्टर्स
गेल्या अनेक मॉडेल्समध्ये अनेकांना सर्वाधिक वापर करून आनंद लुटला आहे तो मॅडिक फिल्टर्सचा. यामध्ये आनंद आणि धम्माल आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे ११ फिल्टर्स उपलब्ध आहेत. त्यात पॉप आर्ट, पीन होल कॅमेरा, फिश आय लेन्स, रेखाटनाप्रमाणे चित्र येणारे ड्रॉइंग, सॉफ्ट फोकस, पंक, स्पार्कल,  जलरंगातील चित्राचा परिणाम देणारे वॉटरकलर, रिफ्लेक्शन, मिनीएचर, फ्रॅगमेंट या फिल्टर्सचा समावेश आहे.
मायक्रो
या शिवाय याच रकान्यात खालच्या बाजूस अॅपर्चर सेटिंग्ज, फ्लॅश सेटिंग, सेल्फ फोटो ऑन- ऑफ सेटिंग आणि मायक्रो किंवा सुपर मायक्रो ही सेटिंग्ज देण्यात आली आहेत. मायक्रो सेटिंग्ज क्लोज अप्समध्ये चांगला परिणाम देतात. मात्र कॅमेरा प्रत्यक्ष वस्तूपासून त्यासाठी काहीसा दूर पकडावा लागतो, असा अनुभव प्रत्यक्ष रिव्ह्यू दरम्यान आला. इतर कॅमेरा तुलनेने जवळ पकडावे लागतात.
२४ एक्स झूम
या कॅमेऱ्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची झूम लेन्स. २४ एक्स झूम हे या कॅमेऱ्याचे वैशिष्टय़च म्हणावे लागेल. कारण एवढय़ा कॉम्पॅक्ट आकाराच्या कॅमेऱ्यात एवढय़ा आकाराची झूम बसविणे हेच ऑलिम्पसचे मोठे यश मानायला हवे. अर्थात या झूमबद्दल आणि त्याच्यामाध्यमातून टिपलेल्या फोटोंच्या सुस्पष्टतेबाबत काही वाद असू शकतात. पण एवढय़ा मोठय़ा आकाराची झूम लेन्स अशा प्रकारे कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यात देणे हे वादातीत कौशल्यच आहे. हल्ली अनेकदा सहज फिरायला जाणाऱ्यांनाही दूरवर फांदीवर बसलेले पक्षी किंवा काही अंतरावर असलेले प्राणी टिपणे यात विशेष रूची असते. अशांसाठी ही लेन्स वरदान ठरू शकते. मात्र रिव्ह्यू दरम्यानचा अनुभव असा आहे की, पूर्ण झूम लेन्स वापरताना त्याच्या सुस्पष्टतेशी तडजोड करावी लागते. पट्टीच्या छायाचित्रकारासाठी कदाचित हा अनुभव हा निराशा पदरी आणणारा असला तरी ऑलिम्पसने मुळात हा कॅमेरा हा काही पट्टीच्या छायाचित्रकारांसाठी आणलेला नाही तर तो हौशी छायाचित्रकारांसाठी आहे.
सुस्पष्टतेवर परिणाम
रिव्ह्यू दरम्यान लक्षात आलेल्या काही महत्त्वपूर्ण बाबी
आयएसओ ८००च्या वरती गेल्यानंतर छायाचित्रणातील सुस्पष्टता काहीशी कमी होत जाते. हा प्रकार प्रसंगी निराशाजनक वाटू शकतो. खरेतर ऑलिम्पसने गेल्या काही महिन्यांमध्ये आणलेले अनेक कॅमेरे हे अतिशय वेगात फोकस करणारे आहेत. मात्र या या कॅमेऱ्यामध्ये १.९ सेकंदांचा कालवधी जातो. त्यामुळे जो क्षण आपण टिपणार असतो तो काहीसा पुढे निघून गेलेला असतो. त्यामुळे नंतर सरावाने आपल्याला तो क्षण आधी मनात ठेवून असे घडणार असे गृहीत धरून आधी क्लिक् करावे लागते मग त्यानंतर प्रत्यक्ष तो क्षण टिपला जातो. १.९ सेकंदांचे अंतर गृहीत धरून काम केल्यास हाती येणारा परिणाम सुखद असू शकतो. पण गृहितकांवर बाजारपेठ काम करत नाही, हेही इथे लक्षात घ्यायला हवे.
सर्वसाधारणपण आऊटडोअर फोटो चांगले तर इनडोअरमध्ये मात्र सुस्पष्टतेला धक्का पोहोचतो असा सर्वसाधारण अनुभव आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. १४,९९९/-