मोटारबाइक रेसिंगचा थरार! Print

गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२

वेगाचे आकर्षण कुणाला नसते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही त्याला अपवाद नाही. तर हाच धोनी मोटारबाइक रेसिंग क्षेत्रात उतरला आहे. मोटाररेसिंगमध्ये एमएसडी आर-एन टीम इंडिया हा संघ धोनीने उतरवला आहे. सुपरबाइक जागतिक चॅम्पियनशिपमध्ये धोनीचा हा संघ सहभागी होणार आहे. भारतात आणि आशिया खंडात मोटारबाइक हा खेळ लोकप्रिय करणे, हाच धोनी आणि टीमचा त्यामागचा उद्देश आहे.
सुपरबाइक जागतिक चॅम्पियनशिपविषयी..
सुपरबाइक रेसिंग हा प्रकार बाइक उत्पादक करणाऱ्या कंपन्यांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. अशाप्रकारच्या शर्यतींद्वारे या कंपन्यांना आपल्या बाइकची विक्री वाढवण्याची आणि आपल्या ब्रँडचा प्रसार करण्याची संधी मिळते. सुपरबाइक जागतिक चॅम्पियनशिप ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची सर्वात मोठी स्पर्धा असून युरोप हे या स्पर्धेचे मुख्य केंद्र आहे. त्याचबरोबर ब्रिटन, अमेरिका, जपान आणि कॅनडा या देशांमध्ये ही स्पर्धा मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय आहे. ८५० सीसी ते १२०० सीसी इंजिन क्षमता असलेल्या आणि चार सिलिंडर असणाऱ्या बाइक या शर्यतींसाठी वापरल्या जातात. या स्पर्धेचे नियम बदलत असल्यामुळे कंपन्यांना आपल्या बाइकमध्ये (उदा. सस्पेन्शन्स, व्हीलचे आकारमान, डायामीटर) वारंवार बदल करावे लागतात. दुकाती या कंपनीने सर्वाधिक १५ वेळा मॅन्युफॅक्चरर चॅम्पियनशिपचा किताब पटकावला आहे. तर इंग्लंडचा कार्ल फोगार्टी या ड्रायव्हरने चार वेळा जगज्जेतेपद पटकावले आहे. सध्या दुकाती, बीएमडब्ल्यू मोटोराड, होन्डा, यामाहा, कावासाकी, सुझुकी, अप्रिलिया या कंपन्यांच्या बाइक या शर्यतींमध्ये आपला जलवा दाखवत आहेत.