मोटारीचा बॅकफेसं Print

रवींद्र बिवलकर - शनिवार, २२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

मोटारीच्या आरेखनामध्ये मोटारीच्या सौंदर्याबाबत विचार करताना त्या मोटारीला विशिष्ट आकार प्रदान केला जातो. त्यानुसार त्या मोटारीला दिलेल्या आकारानुसार ती मोटार सेदान आहे, हॅचबॅक आहे की स्टेशनव्ॉगन आहे ते स्पष्ट होते. मोटार सेदान असो की हॅचबॅक तिचे हे विशिष्ट रूप तिच्या मागील भागावरून निश्चित केले जाते. त्या मागील भागाला असलेला आकार त्या मोटारीला सेदानचे वा हॅचबॅकचे रूप आहे की नाही ते ठरविते. प्रवासी मोटार आपण पाहू म्हणजे ती मोटार नेमकी किती भागात विभागली गेलेली आहे ते लक्षात येईल.
सेदान मोटारीचे रूप आपण बाजूच्या रेखाचित्रात दाखविल्याप्रमाणे पाहिले की त्या मोटारीचे एकंदर तीन भाग पाडले गेले असून त्यात अ, ब, क, व ड असे चार स्तंभ (पिलर) त्या मोटारीला पाडले आहेत. त्यामध्ये पहिल्या प्रकारात दिसणारी पूर्ण मोटार ही सेदान मोटार आहे. त्या मोटारीच्या मागील बाजूला बाहेर आलेला भाग म्हणजे डिक्कीचा तो तिसरा कप्पा, ड भागात येतो. तो कप्पा वरील भाजूने वाढविला की तयार होणारा भाग हा स्टेशव्ॉगनमध्ये मोटारीला रूपांतरीत करतो.
सेदान म्हणजे नेमके काय स्वरूप आहे? सेदान म्हणजे पूर्वीच्या जमान्यातील पालखी, ज्यामध्ये मागे पुढे चार दांडे एका खुर्चीला वा आसनव्यवस्थेला संलग्न असत. ते चार दांडे धरून पालखीचे भोयी पुढे व मागे असत. ते त्या पालखीचे वहन करीत. ही जी रचना आहे ती सेदानची रचना आहे. भोयी म्हणजे त्या मोटारीची चाके असे गृहीत धरल्यास सेदानमध्ये पालखी वा आसनव्यवस्था ही सेदानची बसण्याचा भाग असणारी रचना आहे. मोटारीच्या मागील बाजूला असलेली व बाहेर काही प्रमाणात आलेली रचना (स्वतंत्र डिक्की) सेदान प्रकारातील आहे. या डिक्कीला स्वतंत्र दरवाजा असतो.  भारतात अशा प्रकारच्या मोटारी दिसतात, त्या म्हणजे होंडा सिटी, टाटा इंडिगो, व्हेन्टो, मारूती सुझुकीची एसएक्स ४, स्विफ्ट डिझायर, महिन्द्राची व्हेरिटो, लोगान या प्रकारच्या मोटारी या सेदानमध्ये मोडणाऱ्या आहेत. या मोटारीची मागील बाजू ही स्वतंत्र डिक्कीची रचना देणारी आहे. मोटार थांबविल्यानंतर त्या मोटारीच्या डिक्कीचा दरवाजा उघडून मग तुम्हाला आतील सामान ठेवता व काढता येते. मागील बाजू ही काहीशी मिनुळती, तळाकडे वा वरच्या बाजूस उचलल्यासारखी असणारी किंवा सरळरेषेत असलेली दिसून येते. मोटारीची काच ही आज नवनव्या आरेखनानुसार विशिष्ट कोनांमध्ये पण अतिनिमुळतेपणाने जमिनीकडे न झुकणारी असल्याचे दिसते. हॅचबॅकमध्ये वा एसयूव्ही, एमयूव्हगी प्रकारात ही काच अधिक निमुळत्या कोनात जमिनीच्या दिशेने असते.  
हॅचबॅक म्हणजे रेखाचित्रात दाखविल्याप्रमाणे मोटारीच्या ड या भागात डिक्कीचा भाग हा अधिक जास्त मिळतो. मुळात स्टेशनव्ॉगन या पूर्वीच्या प्रकारची हॅचबॅक ही सुधारित रचना म्हणता येईल. स्टेशनव्ॉगन हा प्रकार मुळात प्रवासी मोटारीबरोबर सामानही बऱ्यापैकी प्रमाणात वाहून नेता यावे यासाठी उपयुक्त मानला जातो. त्य प्रकारच्या मोटारी सध्या आपल्याला एसयूव्ही वा एमयूव्ही या प्रकारात आपल्याला पाहायला मिळतात. हॅचबॅक व स्टेशनव्ॉगनची रचना ही बऱ्याचअंशी मिळतीजुळती वाटते. यामध्ये डिक्कीही मोटारीच्या छताच्या बाजूने उंच असलेली व तेथील मागील बाजूने जमिनीच्या दिशेने निमुळती होत जाणारी असते. स्टेशनव्ॉनसारखी ती पूर्णपणे अधिक मागे सरकविलेल्या आकारातील नसते. हॅचबॅक म्हणजे या मोटारीचा पाठील भाग हा अशा निमुळत्या पद्धतीने पण स्टेशनव्ॉगन सारखा लांब नसलेला असल्याचे दिसते. सर्वसाधारणपणे ही रचना लक्षात घेतली तर हॅचबॅक, स्टेशन व्ॉगन, एमयूव्ही-एसयूव्ही व सेदान या प्रकारच्या मोटारीचे नेमके स्वरूप लक्षात येईल. थोडक्यात या मोटारींचा हा मागचा भाग ज्या रचनेनुसार केलेला असतो त्यानुसार त्या त्या प्रकारचे रूप त्या मोटारींना प्राप्त झालेले दिसते. आता त्या त्या प्रकारातील मोटारीला अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसे अधिकाधिक उपयुक्त, मजबुती व सौंदर्य प्रदान केले जाते ते त्या मोटारींच्या विविध आरेखनकौशल्यावर अवलंबून असते. मोटार कंपन्या आपापल्या पद्धतीनुसार, विचारांनुसार मोटारीला आगळेपणा प्राप्त करून देत असतात.
काचेचे रूप देताना सेदानमध्ये अधिक प्रशस्तपणा वाटण्यासाठी काच लांबीरूंदीला मोटी केली जाते, तर कधी सौंदर्यपूर्ण अविष्काराबरोबरच डिक्कीमधील जागा अधिक सुरक्षित करण्यासाठी वा मोठी वाटण्यासाठी काचेचा आकार लहान केला जातो. गाडीच्या मागील दिव्यांची रचना व त्याचे सौंदर्य, मागील बम्पर, मागे स्टेपनी लावून आणखी वेगळी रचना व काहीसा भव्यपणा आणण्याचा प्रयत्न या साऱ्या बाबी हॅचबॅक वा एमयूव्ही-एसयूव्हीबाबत केल्या जातात.
सेदानला मात्र अशा प्रकारच्या रचना करता येत नसल्या तरी त्याला नोचबॅकचे स्वरूप देऊन मागील बाजूने सेदान एसयूव्ही वा हॅचबॅकसारखी भासावी असेही आरेखन केले जाते. भारतात सध्या दिसणाऱ्या काही सेदान अशा नोचबॅक प्रकारातील आहेत. एकंदरच मोटारीचे हे सौंदर्य मागील व पुढील बाजूने आरेखनकार खुलवित असतात. सध्या एकूणच मोटारीला मागील व पुढील बाजूने निमुळतेपणा आणून आगळेपणा आणण्याचा वा काहीशा जेटयुगात नेण्याचा प्रघात दिसून येऊ लागला आहे. उंच वाटणाऱ्या एमयूव्ही-एसयूव्ही प्रमाणेच बसक्या वाटणाऱ्या सेदानही लोकांना त्यामुळेच आवडतात, त्यांचे आकर्षण वाटते ते यामुळेच. मोटारीची पुढील बाजू जशी आकर्षक केली जाते तशी मागील बाजूही यामुळे आकर्षक करण्याचा प्रकार या सर्व प्रकारच्या मोटारींबाबत चालू आहे, चालू राहणार आहे. किंबहुना सतत बदल स्वीकारणे हेच या उद्योगामधील जिवंतपणाचे लक्षण आहे.