येस, यू बी.. Print

वीरेंद्र तळेगावकर, गुरुवार, २७ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
प्रिय युटिलिटी
होय, तुलाच म्हणतोय मी. आणि तेही मनापासून. खर्रच, आई शप्पथ. तूच आहेस; अनभिषिक्त राणी.
कसेही असले तरी या भारतीय रस्त्यांच्या अंगा-खांद्यावर खेळायला आणि आमच्यासारख्यांचे तुझ्या प्रेमापोटी प्रसंगी खिशावरील नियंत्रण सुटणाऱ्या वाहनवीरांवर राज्य करण्याइतपत तुझ्यायोग्य असं कुणीच नाही.
तुझ्यात काय नाही?
भारदस्त आणि डौलदार व्यक्तिमत्त्वामुळे सर्वामध्ये तुझं उठून दिसणं. मग ते कचकन ब्रेक दाबल्यावर तुझं जागेवर थांबण असो  की स्टिअरिंगमुळे तुझं मस्त फेर धरणं असो. शिवाय कमी-अधिक किंमतीच्या साधनांनीही उजळणारं तुझं सौंदर्य. आणि याला तुझ्या इंधन आणि वेग क्षमतेची जोड नसेल तर मग ते कुंकू न लावलेल्या सवाष्णसारखंच असेल.
alt
 तुला माहीत आहेच की, भारत ही जगातील सहावी मोठी वाहन बाजारपेठ आहे. येथे वर्षांला ५० लाखांच्या घरात वाहने तयार होतात. तर निर्यातीच्या बाबतीतही आपला देश ‘टॉप फाइव्ह’मध्ये नक्कीच आहेच. वर्षांला कधीकधी २० टक्क्यांपर्यंतची वाढ हे क्षेत्र राखते. पण गेल्या काही दिवसांमध्ये ती खुंटली आहे. त्याला इंधन दरवाढ, वाढते कर्जाचे हप्ते, सुट्या भागांच्या अधिक किंमती, वधारणारा रुपया या बाबी आहेतच गं. पण अशा परिस्थितीतही तू तग धरून आहेस. केवळ तगच नाही तर तुझं एकूण वाहन संसारासाठीचं योगदान दुर्लक्ष करता येण्यासारखं मुळीच नाही.
जसं की, युटिलिटी व्हेइकल श्रेणीत मल्टी युटिलिटी तसेच स्पोर्ट युटिलिटी असे दोन प्रकार येतात. कॉम्पॅकच्या नावाखाली बाजारात आणले जाणाऱ्या वाहनांमुळे यातील विभागणी पुसट बनली आहे खरी. व्हॅन हा प्रकार प्रवासी वाहन श्रेणीत अंतर्भूत होत असला तरी त्या मोठय़ा आकारात सादर क रून अनेक कंपन्या युटिलिटीच्या पंक्तीत येऊन बसतात. पुन्हा कारण तेच. या वाहन प्रकाराला असलेली पसंती. माझ्यासह विविध वयोगटाबरोबर सर्वच वाहनप्रेमीइंधन-वेगक्षमता या धर्तीवरही तुला, अर्थात युटिलिटी व्हेइकल श्रेणीचा टॉप गिअर टाकत आहे.
तू हेही जाणतेस की, गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनांची एकूण विक्री रोडावली आहे. प्रवासी वाहनांसह एकूण वाहन विक्री उणे स्थितीत असताना तुझ्या वर्गवारीने मात्र कमाल वेग राखला आहे. आता ऑगस्टमध्येच पाहा नं. या कालावधीत प्रवासी कार विक्री १८.५६ टक्क्याने कमी झाली असतानाच तू, युटिलिटीने मात्र तब्बल ७०.५३ टक्क्यांनी झेपावली आहेस. (हीच बाब मोटरसायकल आणि गिअरलेस स्कूटरच्या बाबतीत. गेल्या महिन्यात मोटरसायकल विक्री ८.४६ टक्क्यांनी घसरली असताना स्कूटर सेगमेन्ट मात्र ९.९५ टक्क्यांच्या तेजीत होता.)
 भारतीय युटिलिटी व्हेइकल बाजारपेठेत सर्वस्वी मालकी आहे ती महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीची. (माझ्याप्रमाणे तुझंही तेच alt
मत असेल.) तुला सांगितलंच असेल की, याच कंपनीने १९४० मध्ये विलीजकडून जीप हे वाहन आयात करून भारतात तुला जन्म दिला होता. सुरुवातीला तिची जीप, कमांडर ही अपत्य होती. आणि तिही काहीशा सरकारी कार्यालये, निवासस्थानासमोरच खेळताना दिसत. यानंतर याच पालक कंपनीने बोलेरो दाखल केली. याचवेळी टाटाची सुमोही आली. तिच्या हाती अधिक विक्रीचे खेळणे होते. तेव्हाच ते टोयोटाच्या क्वालिसने हिसकावले. जनरल मोटर्सच्या शेव्हर्ले ब्रॅन्डअंतर्गत दाखल झालेल्या गुटगुटीत टवेराने मग क्वालिसलाही रडविले. आपले हे बाळ कुणी हिरावून घेऊ नये म्हणून महिंद्राने पुन्हा तुला कवेत घेतलं. याअंतर्गत तिने जन्माला घातलेल्या स्कॉर्पिओचा चावा अन्य कंपन्यांना चांगलाच बसला. इतका की यातून नव्याने सजणारी सुमो आपल्या पायावर उभी तर राहिली नाहीच मात्र तिने क्वालिस, टवेरालाही पाडले. महिंद्राची हीच स्कॉर्पिओ आता अ‍ॅटोमॅटिक गिअरसहही सज्ज झाली आहे. तिच्याच झायलो आणि एक्सयुव्हीने तर तुझ्या कपाळी अनुक्रमे उच्च-नीच या किंमतीतील दोन्ही फळ्यांवर आपले नाव क ोरले आहे.
 तुझ्या मनमोहक रुपावर गोरे लोकही रुंजी घालणार नाहीत, हे मग कसं शक्य आहे? भारतीय वाहन खरेदीदारांच्या मनावर alt
राज्य करणाऱ्या तुझ्या या प्रांतात शिरकाव करण्याचा मोह मग विदेशी कंपन्यांनाही सोडविला नाही. रेनो, निस्सान इतकेच नव्हे तर मर्सिडीज बेन्झ, बीएमडब्ल्यू यासारख्या महागडय़ा किंमतीतील वाहने सादर करणाऱ्या कंपन्याही तुला सादर करण्यासाटी किंमतीच्या बाबतीत जमिनीवर आल्या. एरवी युटीलिटी नव्हे पण स्पोर्ट युटिलिटी तर केवळ श्रीमंतांचीच ऐपत होती. परंतु फ्रेंच कंपनी रेनोने काही महिन्यांपूर्वी डस्टर सादर क रून भारतीय युटिलिटी व्हेइकलच्या फळ्यावरची किंमतीची सारी अक्षरेच पुसून काढली. तर जपानच्या निस्सानने इव्हेलिया याच आटवय़ात भारतीय बाजारात आणून आपल्याच मायभूमीतील स्पर्धक मारुती सुझुकीच्या एर्टिगाबरोबर चाल चालली. (तसा मारुतीने जिप्सी आणि ग्रॅन्ड व्हिटारा ही स्वस्त आणि महागडे युटिलिटी वाहन सादर क रून या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला आहे.) इकडे महिंद्राने झायलोला मिळालेले यश पाहून आणखी परवडणाऱ्यांना मिनी झायलो अर्थात नवी क्वाण्टो देऊ केली. या क्षेत्रात स्कोडाही येती झाली; मात्र तिला यश मिळाले नाही. असे असूनही किमान किंमतीतील मल्टी युटिलिटीमध्ये टोयोटाची इनोव्हा तर उंची महागय़ा स्पोर्ट युटिलिटीमध्ये फोर्डची एन्डेव्हर याच आघाडीवर आहेत.
तेव्हा महागडय़ा असो वा स्वस्तातील प्रवासी वाहन बाजारपेठेत तुझं, युटिलिटी व्हेइकल श्रेणीचं अस्तित्व नाकारून चालणारच नाही.
तुझ्याच प्रेमात आकंठ बुडालेला,
ड्रायव्हर.
 
ऑगस्टमधील एकूण वाहन विक्री     १३,५४,४३६                (-३.९०%)
एकूण प्रवासी वाहन                      १,८४,३५८                  (-३.९४%)
प्रवासी कार                                 १,१८,१४२                  (-१८.५६%)
व्हॅन                                           २१,१५४                     (+३.५८%)
युटिलिटी                                   ४५,०६२                     (+७०.५३ % )

कंपनी        वाहन         किंमत (लाख रुपयांमध्ये)
------------------------------
रेनो           डस्टर         ८.०५ ते १४.०१
निस्सान      इव्हेलिया    ८.५० ते १०
फोर्ड         इकोस्पोर्ट    ६ ते ९
टोयोटा       इनोव्हा       ९.४१ ते १६.९६
मारुती       एर्टिगा        ६.४८ ते १०.५३
शेव्हर्ले       टवेरा         ७.५४ ते ११.२४             
महिंद्रा        झायलो      ७.९० ते १२.९७
              एक्सयुव्ही   १३ ते १६.३२
टाटा          सुमो          ६.४७ ते ८.५३
               सफारी       ८.८० ते १६.४०