सेकंड हँड कार घेताय..? Print

सिद्धार्थ हरळकर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आजकाल सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे वर्तमानपत्राची पाने चाळायला सुरुवात केली की, अनेक पानांवर बाजारात अवतरणाऱ्या नवनवीन गाडय़ांच्या जाहिराती हटकून आढळतात. मग सरावल्या नजरेने त्या आपण न्याहाळतो आणि पुढच्या पानावर सरकतो. मात्र कधी तरी अशीच एखादी जाहिरात आपले लक्ष वेधून घेते आणि आपली नजर त्यावर काही काळ स्थिरावते. वापरलेल्या गाडय़ांबाबत म्हणजे सेकंडहँड गाडय़ांच्या प्रदर्शनाबाबतची ती जाहिरात असते. त्यामुळे गाडी असलेले आणि गाडी नसलेले तसेच गाडी घेऊ इच्छिणारे प्रत्येकाच्या मनात सेकंडहँड गाडय़ांच्या मार्केटबाबत कुतूहल जागे होते.
आज नव्या गाडय़ांच्या उलाढालीचे मार्केट मोठय़ा प्रमाणात विस्तारले आहे. आठवडय़ाला नवे मॉडेल कारशौकिनांना आपल्याकडे आकर्षित करीत असते. त्यामुळे नव्याने येणाऱ्या गाडय़ांचे आकर्षण वाढते आणि त्यामुळे आधी वापरात असलेल्या गाडय़ांना आपसूकच दुय्यमपण येते. मात्र याच नव्याजुन्याच्या चक्रातून सेकंडहँड गाडय़ांचे नवे आणि हॉट मार्केट उभे राहिले आहे. स्वत:ची दुचाकी अथवा चारचाकी असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. नजीकच्या काळातील बदलती जीवनशैली आणि एकूणच बदललेल्या अर्थकारणामुळे बहुतेकांच्या हातात पैसा खेळू लागला आहे आणि त्यातूनच मग गाडी घ्यायला काय हरकत आहे, अशी मनातील विचारांची चाके फिरू लागतात. मात्र या विचारांना मूर्तस्वरूप देताना आपली गरज, कोणती गाडी आपल्यासाठी योग्य, तिची किंमत किती, गाडी कुठून घ्यायची इथपासून सुरुवात होते. काही जण नवीन गाडी दारात उभी करतात. नवीन गाडीला पर्याय नाही. मात्र काही जण सेकंडहँड गाडीच्या पर्यायाकडे वळतात. आज जनमानसात रुळत चाललेला लो बजेटमधील सेकंडहँड गाडीचा पर्यायदेखील योग्य काळजी घेतल्यास सुसह्य़ ठरतो. आज सेकंडहँड गाडी घेण्याकडे एक सोय म्हणून बघितले जाते. मात्र आपल्याकडे जुन्या गाडय़ा घेताना अजून म्हणावी तशी खबरदारी घेतली जात नाही आणि शेवटी जुन्या गाडय़ा त्रास देऊ लागतात, पण सेकंडहँड गाडीच्या पर्यायाची निवड डोळे उघडे ठेवून आणि तांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी करून घेतल्यास नक्कीच फायदेशीर व्यवहार ठरतो, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. नवीन गाडीऐवजी सेकंड हँडच गाडी घ्यायचा निर्णय झाला तर कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे याची थोडक्यात माहिती असणे गरजेचे आहे. सेकंडहँड गाडी घ्यायची झाली तर मूळ मालकाकडून घेणे केव्हाही चांगले. मात्र प्रत्येक वेळी ते शक्य होईलच असे नाही, त्यामुळे अधिकृत डीलर वा दलाल आदींच्या मध्यस्थीनेही सेकंडहँड गाडींचे व्यवहार केले जातात.
गाडीची तपासणी
* सेकंड हँड गाडी घेते वेळी आपल्या ओळखीचा मॅकेनिक अथवा गाडीच्या जाणकाराला सोबत घेऊन गाडीची पाहणी करावी. गाडीची तपासणी नेहमी दिवसाच्या उजेडात करावी. आपण घेत असलेली गाडी किती जुनी आहे, ती किती कि.मी. धावली आहे. दुरुस्तीचे मोठे काम केले आहे का, गाडीचे इंजिन, चाके आदींचा बारकाईने तपास करावा, गाडीला अपघात झाला आहे का, गाडी पहिल्यांदाच विकली जात आहे का आदी बाबींची माहिती घ्यावी.
* साधारणपणे ओळखीपाळखीच्या लोकांकडून सेकंड हँड गाडी घेण्याचा प्रकार आपल्याकडे सर्रास आढळतो. मात्र जेव्हा एखाद्या डीलरकडून सेकंडहँड गाडी घेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा ती गाडी सर्टिफाइड आहे का, याची चाचपणी करावी, कारण अनेक डीलर सर्टिफाइड गाडय़ांची विक्री करतात. सर्वसाधारणपणे जुन्या गाडीला वॉरंटी मिळत नसल्याचे आढळून येते. मात्र असे असले तरी डीलरकडून गाडी घेताना वॉरंटीसंबंधी चाचपणी जरूर करावी.
* जास्त प्रसिद्ध नसलेल्या गाडय़ा घेण्यामध्ये अधिक पर्याय उपलब्ध असतात. अनेक कंपन्यांची मॉडेल लोकांमध्ये अधिक प्रिय नसतात. त्यामुळे मूळ मालकदेखील अनेकदा आपली गाडी काढून नव्याने बाजारात आलेल्या गाडीकडे वळतात. अशा वेळी सेकंड हँड गाडी विकत घेताना नवीन ग्राहकाला पैशाबाबत अधिक लवचिक धोरण ठेवता येते. दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गाडय़ांचे उत्पादन बंद झाले आहे, अशा गाडय़ा शक्यतो घेऊ नयेत, कारण एखाद्या वेळी गाडीत बिघाड झाला आणि त्या मॉडेलचे उत्पादन बंद झाले असले तर सुटे भाग तसेच दुरुस्तीच्या कामात अडचण येण्याची शक्यता असते.
* अनेकदा सेकंडहॅंड गाडीला रंगरंगोटी करून विक्रीस ठेवले जाते. मात्र अशा वेळी रंगरंगोटीवरून हुरळून न जाता गाडी किती जुनी आहे आणि रंग देण्याआधी गाडीची मोठी दुरुस्ती केली आहे का, याकडे लक्ष द्यावे.
* गाडय़ांसाठी कर्ज देणाऱ्या बँका अनेक वेळा हप्त्यांच्या अनियमिततेमुळे गाडय़ा जप्त करतात. या गाडय़ा पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येतात. मात्र या गाडय़ा घेताना थोडी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे, कारण सेकंडहँड म्हणून आपण ती गाडी खरेदी केलेली असली तरी योग्य कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास मूळ मालक अडचण निर्माण करू शकतो. त्यामुळे अशा गाडय़ा घेताना सर्व बाबी तपासून पाहाव्यात.
* मोडिफाय केलेल्या गाडय़ा टाळाव्यात. आजकाल मूळ गाडय़ांच्या रचनेत बदल करण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक तरुण मंडळी आपल्या आवडीनिवडीनुसार गाडय़ांच्या रचनेत बदल करतात. मात्र अशा गाडय़ा मूळ मालकासाठी सोयीच्या असल्या तरी अनेकदा आपल्यासाठी त्रासाच्या ठरू शकतात.

गाडीची कागदपत्रे तपासावीत
’ सेकंडहँड गाडी खरेदी करताना योग्य खबरदारी न घेतल्यास फसवणुकीची शक्यता असते, कारण गाडी जर चोरीची असेल तर पुढे कायदेशीर कटकटींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सेकंडहँड गाडी घेताना गाडीच्या कागदपत्रांबाबत जागरूक राहावे. गाडीची सर्व मूळ कागदपत्रे तपासून पाहावीत. त्यावरून गाडीचा एकूण इतिहास समजेल. आरटीओ टॅक्स रिसीट- हा टॅक्स एकदाच भरला जातो. त्यामुळे मूळ मालकाकडून सदर पावती मिळवावी. गाडीची नोंदणी तपासून पाहावी. तसेच कुठेही डुप्लिकेट नोंदणी असा शिक्का आहे का, तेदेखील पाहावे.
आज गाडी प्रत्येक कुटुंबाची गरज बनू पाहात आहे. ग्राहक हा राजा मानून अनेक मोटार कंपन्या सवलतींचा भडिमार करतात. गाडी घेण्यासाठी अर्थसाहाय्यदेखील मिळवून देतात. त्यामुळे गाडी घेणे आता तेवढे त्रासाचे राहिलेले नाही. मात्र असे असले तरी नवीकोरी गाडी घेण्यापेक्षा कमी खर्चात वापरलेली आणि सुस्थितीत असलेली गाडी मिळत असेल तर लोकांची त्याला नक्कीच पसंती मिळते. सेकंडहँड गाडय़ांसाठीदेखील आता बँका कर्ज देते. मात्र असे असले तरी जुन्या गाडीला काही मर्यादादेखील असतात. शेवटी गाडी हेदेखील एक यंत्र आहे. त्यामुळे अति वापरामुळे ती नव्याकोऱ्या गाडीसारखा परफॉर्मन्स देईल, अशी अपेक्षा बाळगणे योग्य नाही. सेकंडहँड गाडीसाठी इंधन, मेन्टेन्सस आदीमध्ये थोडी वाढ होते. मात्र असे असले तरी योग्य खबरदारी घेऊन घेतलेली सेकंडहँड गाडीदेखील विनातक्रार आपला प्रवास आनंददायी करू शकते, यात शंका नाही.