काचांवरील फिल्म्स ..तुझा रंग कसा? Print

अंतर्गत सौंदर्याचा आकार
रवींद्र बिवलकर ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

मोटारीच्या अंतर्गत सौंदर्याच्या भूलभुलैयावर भाळणारे अनेक ग्राहक असतात. वास्तविक मोटारीच्या आतील भाग कोणत्या अत्युच्च दर्जाच्या कच्चा मालाने व तयार वस्तूंनी सजविलेला आहे व त्यामुळे मोटार सुंदर कशी दिसेल यापेक्षा ती मोटार वापरताना अंतर्गत सौंदर्याला उजाळा मिळण्याबरोबरच आनंद कसा मिळेल, सुलभता व सहजता वाटावी असे वातावरण कसे टिकेल, यासाठी या अंतर्गत सौंदर्याकडे पाहायला हवे. पैसा ओतला की वस्तू विकत घेतली व मोटार सजविली असे करून सर्वानाच चालत नाही. तर त्या अंतर्गत सौंदर्याच्या निर्मितीमध्ये व त्यामुळे होणारा आनंद मोटार चालकाला, मालकाला आणि आतमध्ये बसणाऱ्यांना वाटला पाहिजे. मोटारीच्या या अंतर्गत सौंदर्याला प्रेस्टिज म्हणून पाहू नका, तर त्यामुळे मिळणाऱ्या आनंदाला अनुभवा. (अर्थात ही बाब प्रत्येकाच्या खिशावरही अवलंबून असते हे विसरून चालणार नाही.) वातानुकूलित यंत्रणेप्रमाणेच वायुवीजन नीट व्हावे यासाठी खिडक्यांच्या काचाही खाली केल्या गेल्या असल्या तर काही वेळा आनंदायी असतात, तशातलाच हा भाग आहे.
alt
मोटारीच्या अंतर्गत वायुवीजनाबरोबरच आवश्यक भाग आहे तो प्रकाशाचा. सूर्याच्या अतिप्रकाशाने वा उन्हाळ्यात किरणांच्या तप्ततेमुळे प्रवाशांना जसा त्रास होतो, त्याच्यावर अल्ट्राव्हायलेट (यूव्ही) किरणांचा परिणाम होतो, तसाच तो अंतर्गत वस्तूंवरही होत असतो. त्यामुळे मोटारीत ठेवलेल्या वस्तूंचे रंग, अतिगरम झाल्याने त्यांचे कमी होणारे आयुष्य, आसनांवरील लेदर, कापड यावर होणारे दुष्परिणाम त्याचप्रमाणे अंतर्गत प्लॅस्टिकवरही त्याचे होणारे परिणाम हे टाळता येण्यासाठी मोटारीच्या काचांना पातळ अशा फिल्मचे आवरण चढविण्यात येते. मुंबईमध्ये अशा पातळ फिल्मचे अतिगडद रंग असलेल्या काही मोटारींच्या कांचावरील फिल्म ही विशिष्ट प्रमाणकाला छेद देणारी आहे. हे लक्षात आल्याने सुरक्षिततेच्या कारणामुळे पोलिसांनी अलीकडेच मोहीम राबवून मोटारींच्या काचांवरील अतिगडद रंगाच्या फिल्म्स काढून टाकल्या.
मोटारींच्या काचांवरील या फिल्म्स या काही विशिष्ट प्रेस्टिज असल्याचा आभास करण्याचा मामला नाही किंवा मोटारीला एक वेगळा लूक आणण्याचा प्रयत्नही नाही. त्या दृष्टीने या फिल्म लावणे हेच मुळात चुकीचे आहे. त्यामुळे होणारे सुरक्षिततेचे प्रश्न जेव्हा अधिक त्रासदायी ठरू लागतात तेव्हा कुठे गडद रंगाच्या या फिल्म्सबाबत गांभीर्य वाटू लागते. वेगळ्या कारणांनी का होईना, पण त्याबद्दल काही विचार करायला भाग पाडले जाते. ज्यांच्या काचांवरील या फिल्म्स काढण्यात आल्या असतील त्यांना मुळात या फिल्म्स कशाला लावल्या होत्या याची माहिती चुकीची दिली गेली असावी. ज्यांनी मुद्दाम रंगसंगती म्हणून किंवा अन्य काही कारणांसाठी म्हणून या गडद रंगांच्या फिल्म्सने मोटारीच्या आत कोण आहे, हे न समजण्यासाठी त्या लावल्या असतील त्यांना त्याबाबत योग्य ती समज या कारवाईमुळे मिळाली असेल.
alt
मुळात या फिल्म्स लावण्याचे कारण व फायदे काय ते पाहण्यासारखे आहे. घरांच्या खिडक्यांना असणाऱ्या मोठय़ा काचेला लावण्यासाठी अशा प्रकारच्या फिल्म्स वापरात आल्या आणि हळूहळू मोटारींच्या काचांवरही त्यांचा वापर होऊ लागला. विकसित तंत्रज्ञानामुळे हा सूर्यकिरणांच्या प्रखरतेपासून व उष्णता कमी करण्यापासून केला जाणारा उपाय आहे. तो नक्कीच हितावह व तसा स्वस्त ठरत असल्याने अशा प्रकारच्या फिल्म्स या उपयुक्त असतात. मात्र त्यासाठी गडदपणा वा कमी पारदर्शीपणा असला पाहिजे असे अजिबात नाही. पारदर्शकता असली तरीही सूर्याच्या किरणांपासून होणारा त्रास टाळण्यासाठी असणारा गुण या फिल्म्समध्ये आहे. आरटीओच्या नियमांमध्येही त्या प्रकारच्या फिल्म्स कोणत्या प्रमाणकांमधील लावाव्यात याची माहिती देण्यात येते. चालकासमोरच्या विंडस्क्रीनला लावलेल्या फिल्म्स वा त्या काचेची पारदर्शकता ही ७० टक्के हवी तर बाजूच्या खिडक्यांसाठी ही पारदर्शकता किमान ५० टक्के तरी हवी असा केंद्रीय मोटार वाहन नियम आहे. असे असतानाही अशा प्रकारच्या फिल्म्स वापरताना गडद फिल्म्सद्वारे आतील प्रवासी कोण आहे, आत काय आहे ते न दिसण्याचा वा न दाखविण्याचा प्रयत्न करणे हे सध्याच्या स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीनेही पोलिसांना व समाजाला त्रासदायी नक्कीच आहे. नियमाचे ते उल्लंघन आहे. अतिमहत्त्वपूर्ण व्यक्तींबाबत या संबंधातील नियम शिथिल असला तरी त्या व्यक्ती अतिमहत्त्वाच्या कोणत्या आहेत व नाहीत, ते स्पष्ट होणे पोलिसांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. काही वेळा गडद वाटणाऱ्या फिल्म्स या मोटार वितरकाकडून मोटार विकत घेताना बसविल्या जातात. मात्र त्या नियमात बसणाऱ्या आहेत की नाहीत, हे बिचाऱ्या ग्राहकालाही ठाऊक नसते, असेही प्रकार घडत असलेले दिसतात.
या फिल्म उपयुक्त कशा आहेत ते पाहण्यासारखे आहे. या फिल्म्समुळे मोटारीच्या आतील तापमान कमी होण्यास उपयुक्त ठरते.
alt
सूर्याच्या किरणांतील अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी, त्याचप्रमाणे काचेतून होणारे किरणांचे परावर्तन टाळून व अतिउष्णतेपासून होणारा त्रास टाळण्यासाठी या फिल्म्स महत्त्वाच्या मानल्या जातात. काचेमधून बाहेरचा माणूस कोणी डोकावू नये वा त्यामुळे आपले खासगी आयुष्य जपण्यासाठीही या फिल्म्सचा वापर अतिगडद रंगाच्या फिल्म्सने करण्याचा लोकांचा कल आहे. मोटारीतील वातानुकूलित यंत्रणेलाही कडक उन्हामुळे मोटारीच्या अंतर्भागात निर्माण होणारी उष्णता बाधक ठरत असते. त्यामुळे अतिऊर्जा वापरली जाते. यासाठी या फिल्म्स उपयुक्त मानल्या जातात.
मोटार चालविताना रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या अन्य वाहनांचे प्रखर दिवे, डोळे दिपविणारे असतात. काही व्यक्तींना सर्वसाधारण काचेतून अशा दिव्याकडे पाहताना दुहेरी प्रतिमा दिसते. असे दिसू नये व एकच प्रतिमा दिसावी म्हणून अँटिरिफ्लेक्शन कोटिंगचे चष्मे वापरले जातात. याच तंत्राचा वापर अशा फिल्म्सनेही केला आहे. एकंदर या मोटारीसाठी लावण्यात येणाऱ्या सूर्यकिरण व उष्णतारोधक फिल्म्स या विज्ञानाधारित तंत्राची चांगली फलश्रुती म्हणायला हवी. पण त्याचा गैरवापर वा नियमबाह्य़ वापर केला गेला वा होत आहे, हे नाकारून चालणार नाही. अशा प्रकारच्या फिल्म्स या मोटारीतील प्रवाशाच्या सुविधेसाठी, रक्षणासाठी असतात. पण त्यांच्या गुणांचा फायदा घेण्याऐवजी देशाची सुरक्षितता धोक्यात येत असेल वा गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळत असेल तर ते रोखणे हे सर्वाचेच कर्तव्य आहे.