अंतर्गत जागा आणि आसन व्यवस्था .. प्रवाशाला हवी मोकळी जागा Print

प्रतिनिधी

सध्याचा जमाना आहे मोटारीच्या आतील भागात जागा किती ऐसपैस आहे ते पाहण्याचा. मुळात मोटार छोटेखानी असली तरी तिच्या अंतर्भागात जागा पुरेशी आहे की नाही किंवा ती जागा आपल्या कामाच्या दृष्टीने- आरामाच्या दृष्टीने उपयुक्त आहे की नाही हे पाहण्याची ग्राहकाची दृष्टी असते. मोठी मोटार घेऊन तिच्या पार्किंगची व्यवस्था पाहण्यासाठी वेळ घालविणे अनेक ग्राहकांना नको असते. मात्र त्यामुळे हॅचबॅक मोटारी घेण्याकडे ग्राहकांचा, विशेष करून भारतातील ग्राहकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच नेक कंपन्यांनी हॅचबॅक छोटेखानी मोटारींना विशेष पसंती दिलेली आहे.
नॅनोसारखी छोटी मोटार बनविल्यानंतरही आतील जागा मारुती ८०० पेक्षा अधिक असल्याचे टाटा मोटर्सला सांगावे लागले. यावरूनही आतील भागातील जागेला भारतीय ग्राहक किती महत्त्व देतो हे लक्षात येण्यासारखी आहे. छोटय़ा मोटारीतील मोठी जागा हीच ग्राहकाची एक महत्त्वाची मागणी असल्याचे दिसून येते. वास्तविक आतील जागा म्हणजे नेमके काय ते पाहण्यासारखे आहे. ग्राहकाची ही मागणी पूर्ण करण्यासाठी आरेखन करणाऱ्यांना किती विचार करावा लागला असेल.  याशिवाय सामान ठेवण्यासाठी असणारी डिक्की वा बूट स्पेस कशी अधिकाधिकपणे वापरता येईल अशी तयार करणे हे कामही तसे कौशल्याचे म्हणावे लागते.
छोटेखान हॅचबॅक मोटारींमध्ये आसनाचा विचार करताना काय केले जाते ते पाहण्यासारखे आहे. या मोटारींमध्ये चालकाच्या आसनाची रांग व त्यामागील दुसरी रांग अशी व्यवस्था असते. यामध्ये साधारणपणे पुढील म्हणजे चालकाच्या आसनरांगेत आज सर्वसाधारणपणे दोन स्वतंत्र आसनांची रचना केलेली आहे.   दोन आसनांमध्ये असलेल्या जागेत ग्लास होल्डर, नाणी ठेवण्यासाठी वा सिगरेट लायटरची जागा तयार केली गेलेली दिसते. या रांगेत चालक व त्याच्या बाजूची व्यक्ती अशा दोनच व्यक्ती बसण्यासाठी जागा तयार केली गेली.  मोकळेपणाने बसता येते, ही बाब लक्षात घेतली व त्याचबरोबर मोटारीतील आसनांचा चांगला लाभ शेजारच्या प्रवाशालाही मिळाला. सुरक्षिततेसाठीही ही स्थिती चांगली मानली गेली.  मागील आसनरांगेत ५०/५०, ६०/४० अशा दुभाजित आसनांद्वारे आवश्यकतेनुसार आसने मुडपून बसण्याची सुविधा निर्माण केली गेली. त्यामुळे अधिक वाढीव सामानही ठेवता येते व प्रवासी कमी असला तरी तो त्या मुडपलेल्या आसनाच्या बाजूला सहजपणे बसू शकतो.