मेघाची मेघभरारी Print

दिलीप ठाकूर
altएखाद्या चांगल्या भूमिकेवर कोणाचे बरे नाव लिहिलेले असेल व ती कशी कोणाच्या पथ्यावर पडेल काही सांगता येत नाही बघा.‘काकस्पर्श’च्या मेघा मांजरेकरबद्दल अगदी असेच घडले व त्या भूमिकेसाठी सध्या तिची सर्वत्र तारीफ होत असल्याने ‘खुशी के मारे’ तिचं व्यक्तिमत्त्व अधिकच खुललंय..
‘काकस्पर्श’ या १९३० ते ५० या कालावधीत कोकणात घडलेल्या अनोख्या प्रेमकहाणीत सचिन खेडेकरच्या पत्नीच्या भूमिकेसाठी अगोदर दुसराच कोणाचा तरी विचार पक्का झाला, पण गुहागर येथे पहिले चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच त्या मान्यवर तारकेने ‘काही कारणास्तव’ नकार दिला. दिग्दर्शक महेश मांजरेकरने ‘दुसरा’ कोणाचा तरी शोध घेण्यापेक्षा ‘आपली कलावंत पत्नी’ मेघाकडेच ही भूमिका सोपवली. मेघा तशी कोकणातीलच असल्याने कोकणातील स्त्री साकारणे तिला अवघड नव्हते, पण ऐनवेळी त्या भूमिकेसाठी उभे राहणे व सचिन खेडेकरसमोर काम करणे हे मात्र आव्हानात्मक होते. तिच्या मते, ‘महेशजींनी सगळं काम अगदी व्यवस्थित करून घेतले.’
मेघाने महेशच्याच ‘आई’ चित्रपटात सुनेची भूमिका साकारली होती. मग संजय सूरकरच्या ‘यज्ञ’मध्येही छोटीशी भूमिका केली, त्यानंतर तिने आपली ही अभिनयाची आवड थांबवली. बऱ्याच वर्षांनी तिला महेशच्याच ‘दे धक्का’त काम मिळाले, तेव्हाही ती घाटावरच्या स्त्रीची भूमिका अन्य कोणाला तरी ऑफर झाली होती. पण त्या तारकेचा काहीतरी प्रॉब्लेम झाला व मेघालाच तेव्हा वेळ मारून न्यावी लागली. मेघाने तेव्हाही उत्साह दाखवला.‘खरा कलाकार’ हा असा ऐनवेळी आपला प्रभाव दाखवतो. मेघाचे हे वैशिष्टय़ पाहता महेशने आता तिचे व्यक्तिमत्त्व व अभिनयक्षमता यांना भरपूर वाव असणारा चित्रपट निर्मित व दिग्दर्शिक करावा. मेघा केवढी तरी प्रगती करून दाखवेलच..