‘खेळ तमाशा’ पडद्यावर Print

अतुल माने ,शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२
तमाशा हा आपल्या लोककलेतील एक अविभाज्य भाग असला तरी खरा व अस्सल तमाशा पाहणे सध्या दुरापास्त झाले आहे. हल्ली अनेक मराठी चित्रपटांमध्ये एखादी लावणी चित्रित केली जाते, पण तिचा बाज व रंग हा थोडासा पुढारलेलाच असतो. पूर्वीचा पारंपरिक तमाशा आणि त्यामधील अनेक मंडळी यांची नावेही हल्ली अनेकांना आठवत नाहीत. गावोगावी तमाशाचा फड नेऊन तेथे आपली कला सादर करणारे हे बिनीचे कलाकार नेहमीच उपेक्षित राहिले. अस्सल तमाशाची जागा बाजारू लावणी गीतांनी घेतल्याने लोककलेचा हा ठेवा जोपासण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. तमाशा हा कसा असतो, तसेच त्यामधील विविध व्यक्तिरेखा आणि पोटासाठी त्यांची होणारी गावोगावीची भटकंती या सर्व गोष्टींवर आधारित ‘खेळ तमाशा’ हा अस्सल तमाशा बाजाचा चित्रपट पहिल्यांदाच मराठीतील रुपेरी पडद्यावर येत आहे. पूर्वी काळू-बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर अशा नावांनी अनेक तमाशांचे फड प्रत्येक गावाच्या जत्रेप्रसंगी आपली कला सादर करीत होत्या. एकाच वेळी ५० ते ६० जणांचा हा कबिला त्याठिकाणी घेऊन जाणे व या सर्वाचा खर्च उचलण्याची दुहेरी कसरत तमाशा फडाच्या मालकाला करावी लागत होती. अनेक वेळा त्यामधून तोटाही सहन करावा लागत असे. त्या काळचे या सर्व मंडळींचे जीवनमान कसे होते हे आताच्या पिढीला समजावे या alt

उद्देशानेच या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती गिरीशकुमार यांनी दिली. त्या काळी लोककलेचा होणारा सन्मान, त्याला मिळणारा दर्जा आता राहिला नाही, असे सांगून ते म्हणाले की, पूर्वी एखाद्या तमाशातील वग, गवळण अथवा बतावणीला लोकांकडून फेटे हवेत उडवून तसेच शिटय़ांच्या साहाय्याने दाद दिली जात होती. कालौघात हे आता सर्व नष्ट होत आहे. हे चित्र पुन्हा तयार व्हावे या प्रामणिक हेतूनेच या विषयावर चित्रपट तयार करण्याचे ठरविल्याचे गिरीशकुमार यांनी सांगितले. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा आशीष पुजारी हे सांभाळत असून मििलद शिंदे, नेहा पेंडसे, संजय मोहिते याचबरोबर सयाजी शिंदे हे कलाकार यामध्ये पाहावयास मिळतील. श्रीकांत नरुले यांनी लिहिलेल्या गीतांना नंदू होनप यांनी स्वरसाज चढविला आहे.