पौराणिक चित्रपट एक मंदिर Print

दिलीप ठाकूर ,शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२

हिंदी सिनेमा ही ‘कशीही असली तरी’ जगावेगळी संस्कृती..
पूर्वी श्रावण व भाद्रपद या सणांच्या महिन्यात सामाजिक-पौराणिक चित्रपट झळकत. बलराम श्रीकृष्ण, तुलसी विवाह, जय बजरंगबली, जय जगत जननी, अलख निरंजन, रामराज्य, श्रीकृष्ण लीला, जय गणेश असे कितीतरी ‘श्रद्धाळू’ चित्रपट भाविक प्रेक्षकांची गर्दी खेचत.
गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरवरील (आताचे गोवानी चेंबर्स) या चित्रपटांचे डेकोरेशन पाहण्यासाठी भक्तगण जमत.
डॉ. भडकमकर मार्गावरचे स्वस्तिक, प्रभादेवीचे किस्मत, काळबादेवीचे एडवर्ड, ठाण्याचे प्रभात ही अशा चित्रपटांची हुकमी ‘मंदिरे’, अर्थात चित्रपटगृहे. रसिकांच्या काही पिढय़ा चित्रपटगृहांनाही खूप महत्त्व देत.
या परंपरेतील सर्वाधिक यशस्वी म्हणजे आशीषकुमारचा ‘जय संतोषी माँ’. तो ‘शोले’ हिट ठरल्यावर झळकला व अलंकारला मॅटिनीला सुवर्णमहोत्सवी यशस्वी ठरला. खेडय़ापाडय़ात प्रेक्षक थिएटरबाहेर चपला काढून हा सिनेमा पाहत. मुंबईत कित्येक रस्त्यांवर संतोषीमातेची मंदिरे उभी राहिली. शिर्डी के साईबाबा चित्रपटानेही अशीच भावुक लोकप्रियता संपादली. शिर्डीला भक्तांची गर्दी वाढण्याचे श्रेय याच चित्रपटाला.
या दोन्ही चित्रपटांचे ‘रिमेक’ यशस्वी ठरले नाहीत. बहुधा मूळ चित्रपटांचा प्रभाव कायम राहिल्याचा तो परिणाम असावा. मूळ चित्रपट कथादृष्टय़ा सपक, अभिनयात ठिसूळ, तांत्रिकदृष्टय़ा सामान्य असूनही प्रेक्षकांच्या तक्रारी नव्हत्या. सिनेमा व देव या दोन्हीवरच्या श्रद्धेचा तो परिणाम असावा.  दूरदर्शनवरील ‘रामायण’ व ‘महाभारत’ या महामालिका घराघरात पोहोचल्या आणि हळूहळू पौराणिक चित्रपट मागे पडू लागले. फार पूर्वी होमी वाडिया व चंद्रकांत अशा चित्रपटांबाबत ख्यातनाम होते. असे कोणीतरी एकाच प्रकारच्या चित्रपटासाठी वाहून घेतल्याशिवाय ट्रेन्ड सेट होत नाही.