आज प्रदर्शित Print

प्रतिनिधी ,शुक्रवार ३१ ऑगस्ट २०१२

‘एक था टायगर’च्या तडाखेबंद यशामुळे सुखावलेल्या बॉक्स ऑफिसवर शुक्रवार ३१ ऑगस्टच्या मुहूर्तावर हिंदीतील ‘जोकर’, ‘जलपरी’ आणि ‘एम-२४’ हे तीन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत असून मराठीमध्ये महेश मांजरेकर यांचा ‘कुटुंब’ तसेच ‘चॅम्पियन्स’ या चित्रपटांचे प्रदर्शनही होणार आहे. शिरीष कुंदेर यांच्या बहुचर्चित ‘जोकर’ या चित्रपटाची आतापर्यंत अनेक वेळा चर्चा झाली आहे. अक्षयकुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या अभिनयाने सजलेला हा ‘जोकर’ खरेतर याआधीच प्रदर्शित होणार होता पण ‘एक था टायगर’च्या धसक्याने चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. या चित्रपटाला मिळणाऱ्या यशावर अक्षयकुमारची लोकप्रियता ठरणार असल्याची चर्चा करण्यात येत आहे. तसेच खास बच्चेकंपनीसाठी ‘एम-२४’ हा चित्रपटही प्रदर्शित होत असून त्यातील कथानक मुलांना निश्चितपणे आवडेल असा विश्वास निर्मात्याला वाटत आहे.
मराठीमध्ये महेश मांजरेकर याचा बहुचर्चित ‘कुटुंब’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘दे धक्का’नंतर त्याचा या स्वरूपाचा चित्रपट आला नव्हता. त्यामुळेच ‘कुटुंब’च्या जाहिरातीमध्येही प्रामुख्याने पुन्हा दे धक्का या वाक्याचा वापर करण्यात आला असल्याने हा चित्रपट ‘दे धक्का’ याचा सिक्वेल असण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे. जितेंद्र जोशी, वीणा जामकर, वैभव मांगले, गौरी इंगवले, सिद्धार्थ जाधव आणि मिहीर सोनी यांच्या अदाकारीने सजलेल्या या चित्रपटाची कथाही हृदयाला भिडणारी असल्याचे महेश मांजरेकर यांनी यानिमित्ताने बोलताना सांगितले. हा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितपणे आवडेल, असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने बोलताना व्यक्त केला. याचबरोबर ‘चॅम्पियन्स’ हा चित्रपटही प्रदर्शित होत असून त्यामध्ये लहान मुलांचे भावविश्व दाखविण्यात आले आहे.