डरना मना है... Print

प्रतिनिधी - शुक्रवार, ७ सप्टेंबर २०१२

‘जमाना मिलावट’चा असला तरी ‘मिसळायचे’ तरी किती? भूतपट (महल), रहस्यपट (ज्वेल थीफ) व गुन्हेगारीपट (फूल और पत्थर) असे स्वतंत्र प्रकार छान जमतात, खुर्चीला खिळवून ठेवतात. तशी आशय व मांडणीत ताकद होती. अशा ‘एक दिशा मार्गा’ने आपण यशस्वी होऊ याची खात्री नसल्याने की काय हे सगळं ‘एक’ होत चाललंय.. विक्रम भट्टच्या ‘राज ३’ असे सगळे ‘एकात एक’ दाखवण्यासाठी त्रि-मिती चित्रचा, अर्थात थ्री-डीचाही आधार आहे. पूर्वी भुताचे पडद्यावरचे साधे अस्तित्व घाबरवून टाकी, एका हिऱ्याच्या चोरीभोवती अख्खा सिनेमा रंगे व ‘फक्त एक खून’ अडीच तासांचे रहस्य गडद करी. या प्रत्येक ‘शाखे’चे केवढे तरी दर्जेदार चित्रपट आहेत, त्याला दर्जेदार संगीताची असलेली ‘साथ’ अधिकच उत्तम. गाण्यासाठी ते चित्रपट पुन्हा पाहावेत. रामसेबंधूंनी ‘दो गज जमीन के नीचे’पासून यात ‘भयानक’ प्रकार आणले. विद्रूप-विचित्र चेहऱ्यांची भुते, कानठळ्या बसवणारे संगीत व मठ्ठ चेहऱ्याच्या परंतु मादकता सादर करणाऱ्या तारका यावर त्यांचा भर वाढला. त्यांच्या चित्रपटांचा त्या काळात स्वत:चा चक्क प्रेक्षकवर्ग वाढताच त्यांनी ‘घाबरवून टाकणाऱ्या चित्रपटाची’ जणू ‘फॅक्टरी’ उघडली. ‘अंधेरा’, ‘दरवाजा’, ‘पुरानी हवेली’ वगैरे वगैरे केवढे चित्रपट. त्यांच्या ‘नावात बदल’ करून कोणताही ‘पाहावा’, परिणाम तोच. अर्थात खूप सामान्य. भूतपटात वास्तवाच्या जवळ जाणारा अरुणा-विकासचा ‘गहराई’ तर सादरीकरणात दर्जेदार रामगोपाल वर्माचा ‘भूत’. ‘भूतपट’ म्हणजे भास-आभासाचा खेळ (वह कौन थी), रहस्यपट म्हणजे शेवटी खरा खुनी कोण हे समजल्याने दचकायला हवे (परदे के पीछे, तिसरी मंझिल), गुन्हेगारीपट म्हणजे नाटय़मय वेगवान अशा मारामारीच्या घटना (कब क्यू और कहाँ?) सगळंच एकाच चित्रपटात भरल्याने ‘राज ३’ काय नि आणखी काय कसे ठरेल?