भरतकाम आणि आधुनिक तरूणाई.... Print

मुग्धा डोंगरे, शनिवार, १६ जून २०१२
फॅशन हा एक शब्द, ज्यामध्ये आपल्याला अनेकविध प्रकार पाहायला मिळतात. खासकरून जुनी फॅशन नव्याने डोकावू लागली की अनेक गोष्टींना उजाळा मिळू लागतो. प्रत्येक सणाला आपल्याकडे काहीतरी वेगळं असावं, जेणेकरून चारचौघींमध्ये आपण उठून दिसू असं वाटणं  साहजिक आहे. पण बाहेर असणाऱ्या कपडय़ांमध्ये अनेकदा तीच ती व्हरायटी पाहायला मिळते. मग आपणच आपली थोडी क्रिएटिव्हिटी पणाला लावली तर अनेक सुंदर गोष्टी आपण घरबसल्या करू शकतो.
म्हणतात ना एक नुर आदमी, नि दस नुर कपडा. अलीकडे तरुणींसह ऑफिसला जाणाऱ्या स्त्रियांनाही पेहरावामध्ये काहीतरी alt
नवीन क्रिएटिव्ह असावं अशी अपेक्षा असते. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या डिझाइन्स किंवा मटेरिअल्सचा वापर करून आपल्याला पारंपरिक आणि आधुनिकता यांचा संगम अगदी सहज साधता येऊ शकतो. आता हेच पाहा ना, पारंपरिक भरतकाम करताना आपण आपल्या घरात कुणाला ना कुणाला पाहत आलोय. पुरातन काळापासून आपल्याकडे याबाबत विविध संदर्भ पाहायला मिळतात.
भारतीय स्त्रीने पारंपरिक कलेसाठी बरेच मोठे योगदान दिले आहे. त्यासाठी तिने निसर्गातून सहज उपलब्ध होणारे कापड व टाकाऊ वस्तू यामधून नानाविध कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यासाठी विविध प्रकारचे धाग्यांचा वापर केलेला पाहायला मिळतो. कॉटन, सिल्क, लोकर असे नाना प्रकारचे धागे वापरून साडय़ांमध्येही नवीन डिझाइन्स साकारता येतात.
काही लोकप्रिय भरतकामाचे प्रकार जे विविध कापडावर खुलून दिसतात.
alt
*   कर्नाटकी कशिदा            
*   बंगाली कान्था (Bengali Kantha)        
*   पंजाबी फुलकारी (Punjabi Phulkari)
*   गुजराथी कछी व अबला भरत        
*   लखनवी चिकनकारी             
*   काश्मिरी भरतकाम
*   बिहारचे पेच आणि अप्प्लिक वर्क (Patch & Applique)
कर्नाटकी कशिदा असलेल्या साडय़ा नेसणे हा तर सुखद अनुभव आहे. सिल्कच्या सलवार- कुडत्यावर कर्नाटकी कशिदा खूपच सुंदर दिसतो. याच कशिद्यापासून केलेल्या बुकमार्कला सध्या बाजारात खूपच मागणी आहे. हल्ली यंग जनरेशन स्टोल मोठय़ा प्रमाणात वापरताना दिसतात. स्टोल हा ओढणीचा छोटा अवतार, या स्टोल वरसुद्धा वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात.  जुनी धोतरे, साडय़ा एकावर एक ठेवून त्यापासून गोधडी शिवली. त्यानंतर त्यावर रामायण व महाभारतातील कथा चितारल्या, ते सुद्धा अगदी सोप्या धावदोरा या टाक्याने. यालाच आपण बंगाली कान्था (Bengali Kantha) म्हणतो. कान्था करायला सोपे आणि दिसायला मनमोहक, कान्था साडीस वíकंग वुमेनमध्ये फारच मागणी आहे. गुजराथमधील गरीब स्त्रियांनी फाटलेले कपडे शिवून त्यावर काचा, मणी, शख, शिंपले, लावून कलात्मक रीतीने कपडे निर्माण केले. या सर्व छंदातूनच पुढे मोठे कलादालन उभे राहिले व त्याचा आज खूप मोठा व्यवसाय बघावयास मिळतो. सर्व पारंपरिक कलेवर निसर्ग, धार्मिक रूढी, आपले राहणीमान, स्थापत्य कला यांचा खूपच मोठा पगडा दिसून येत आहे.