सोन्याची सोनेरी परंपरा.. Print

प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२    
alt

उत्सव या चित्रपटात नखशिखांत सोन्याने मढलेली रेखा पाहिल्यावर सोन्याची हौस आपल्याकडे किती आहे हे लक्षात आलं. पण सोनं अंगावर घालण्यापेक्षा ते केवळ बघायलाच बरं असं म्हणणारे अनेक चेहरे समोर येतात. स्वत:च्या लग्नकार्यात किंवा सणासमारंभात मात्र हेच चेहरे डिझाइन्स सिलेक्ट करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेताना दिसतात. खरंच सोन्याची महतीच इतकी अमूल्य आहे की, नको म्हणताना कुठेतरी आपण आपसूक पुढे होत असतो. डिझाइनर ज्वेलरी असो अथवा अगदी बावनकशी सोनं असो, आपल्या संस्कृतीत सोन्याचं महत्त्व हे आजही अगदी अग्रक्रमावर आहे. म्हणूनच सोनंखरेदी ही आता केवळ एक हौस नाही तर निमित्त झालेलं आहे. त्याला मुहूर्ताची जोड देऊन का होईना सोनं खरेदीची हौस आजही अनेक घरांमध्ये भागवली जाते.

alt
सोन्याचा भाव कितीही वाढला तरी आजही आपल्याकडे सोनं घ्यायचं, मग ते काहीतरी निमित्ताची जोड देऊन म्हणून घेतलं जातंच.
जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत सोनं ही गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची ठरलेली आहे. जुनं ते सोनं ही म्हण शाळेत अनेकदा कानावरून गेली, पण त्याची खरी महती आता लक्षात येऊ लागली आहे. साज जुना असला तरी तो नवीन बाजात पेश होऊ लागला आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये दीपिका पादुकोण हिने बोरमाळ घातलेली पाहण्यात आली. जुन्या काळात आजी घालायची तशी बोरमाळ दीपिकाच्या अंगावर पाहून बोरमाळ करण्यासाठी अनेक जणी ज्वेलर्सकडे फेऱ्या मारू लागल्या. कंगनाने घातलेला पोहेहार म्हणजेच चपला हार.. शिल्पा शेट्टीच्या लग्नातील ज्वेलरी नानाविध तऱ्हाच आहेत. या आपल्या हौसेला मोल नाही हे इथे लगेच लक्षात येतं. सोनं खरेदी केवळ एक निमित्त झालेलं आहे. आता तो एक स्टेटस सिम्बॉल होऊ लागलाय. जुन्या चित्रपटात सासू सुनेला एक गोल डबा आणि चावीचा जुडगा हातात द्यायची. हा एक टिपिकल सिन पाहतानाही दागिन्यांच्या डब्यात नेमके कुठले दागिने आहेत याकरता त्या डब्यावर कॅमेरा मारला जायचा. ही गोष्ट तेव्हाही तितकीच महत्त्वाची होती, आज तर सोन्याला रॅम्पवॉकवर जागा मिळालीय.. सोन्यावर तयार झालेले चित्रपट.. सोनं लुटणं.. वाव्वा! या ज्या काही कल्पना आहेत ना त्यांना तोडच नाही..
alt
पूर्वी केवळ सणासुदीला अंगावर विराजमान होणारं सोनं आता डिझाइनर ज्वेलरीच्या नावाखाली अंगावर विराजमान होत आहे. डिझाइनर हे केवळ नाव झालं, पण महत्त्वाचं म्हणजे कमी वजनाचं सोनं वापरणं हाही एक स्टेटस सिम्बॉलच आहे. बरं.. जरा ताडून पाहा की, तुम्ही बोरमाळ घातलीय आणि त्याचबरोबर तुम्ही कमी वजनाचा हार घातलाय दोन्हीकडे सारख्याच नजरेने पाहणारे बायकांचे चेहरे आहेत. इमिटेशन ज्वेलरी का असो, खरेदीसाठी त्याही दुकानांमध्ये झुंबड उडतेच ना.. हे सर्व एकाच गोष्टीचं प्रतीक आहे ते म्हणजे हौस. हौसेला मोल नाही असं म्हणतात ते खरंच आहे. एकूणच काय तर शरीरावर कपडे जसे शोभतात तसेच दागिनेही सूट होतात. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे त्याची कमी अधिक प्रमाणात खरेदी ही होत असते.
सोनं हा प्रतिष्ठेचा विषय अनेक लोकांमध्ये होऊ लागलाय. याच प्रतिष्ठेमुळे का होईना दोन तोलामोलाची घराणी एकत्र येतात आणि यातून संबंध जुळतात. आम्ही ५० तोळे सोनं सुनेच्या अंगावर घातलंय हे सांगणारी सासू पाहिली की अनेकींना तिचा हेवा वाटतो. तर आम्ही तब्बल ७० तोळ्यांचे दागिने जावयाला दिलेत गेल्या वर्षभरात, हे सांगताना मुलीच्या आईवडिलांनाही आपली प्रतिष्ठा दाखवण्याचा सोस होतोच ना.. अखेर बात सोन्याचीच असते ना.. सोनं आणि प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी अगदी हातात हात घालून चालताहेत. कुणी कितीही नाकारलं तरी आजही अनेक लग्नांत हौस म्हणून तुम्ही मुलीला किंवा मुलाला काय घालणार, असा प्रश्न विचारणारा कुणीतरी असतोच. हा कुणीतरीच आपल्या सर्वाचं प्रतिनिधित्व करतो.
alt
सोनं घेण्याची दानत वाढू लागली. अनेक कंपन्यांमध्ये बक्षीस म्हणून सोन्याचं कॉइन देण्यात येऊ लागलं. वळी, बिस्किटं घेणं हे प्रतिष्ठेचं मानलं जात आहे. ज्वेलर्सकडे भिशी सिस्टीम सुरू झाली. प्रत्येक प्रातांगणिक याचा वापर बदलू लागला. प्रत्येक समाजाने याला स्वत:चा एक कोड दिला. अमक्या एका समाजात केवळ असंच सोनं हवी अशी प्रथा म्हणून आजही दिसते. खास आग्री लोकांच्या अंगावर असलेलं सोनं हे वेगळ्या डिझाइन्स डाळ्यांसमोर ठेवूनच बनवलं जात आहे. प्रत्येक धर्मासाठी सोन्यानेही त्याचं रूप बदललं, अनेकांच्या अंगावरील दागिन्यांमध्ये देव-देवतांचा समावेश असलेला दिसून येतो. सोन्याची ही सोनेरी परंपरा दिवसागणिक अधिक उजळून निघत आहे. आजही आपण नाही म्हटलं तरी सोन्याच्या दागिन्यांकडे एक स्टेटस् सिम्बॉल म्हणून पाहत आहोत. पण आता केवळ स्टेटस् सिम्बॉल राहिलेला नाही, तर स्टाइल सिम्बॉल म्हणूनही दागिन्यांची निकड भासत आहे.