तांनापिहिनि पाजां : ‘पाऊस’खुणा Print

अ‍ॅड. सीमंतिनी नूलकर, बुधवार, १२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

वाढत्या वयाबरोबर, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे, प्रत्येक माणसातला निरागसपणा, कणाकणाने संपून जातो पण तरीही काही गोष्टी, कोणत्याही वयाच्या कोणत्याही मन:स्थितीतल्या व्यक्तीला क्षणभर का होईना, निरागस आनंदाचा अनुभव देतात- त्यापैकीच एक म्हणजे इंद्रधनुष्य! तानापिहिनीपाजा किंवा VIBGYOR हे शब्द उच्चारताक्षणीच, मन, बालपणात पोचलेले असते.
निसर्ग सतत भरभरून देतच असतो. पण पावसाळ्यामध्ये, त्याची विशेष मेहेरनजर असते. श्रावणात उनपावसाचा खेळ सुरू झाला की आकाशात हा रंगसोहळा रंगात येतो. कधी संध्याकाळी, पूर्वाकाशात इंद्रधनूची कमान दिसते, कधी सकाळी पश्चिम आकाशात. जगातला सर्वागसुंदर प्रकाश सोहळा किंवा रंगसोहळा असेच वर्णन इंद्रधनुष्याचे केले जाते.
वातावरणातल्या बाष्पबिंदूंवर पडलेल्या सूर्यकिरणांचे परावर्तन, अपवर्तन यामुळे सप्तरंगी प्रकाश वर्णपट दिसतो. हे झाले शास्त्रीय विधान, पण म्हणून काही त्यातले काव्य आणि सौंदर्य कमी होत नाही.
पावसाळी भटकंतीत कधी अचानक, एकावर एक, अशा दोन इंद्रधनूंच्या कमानी पडलेल्या दिसतात. या दुसऱ्या इंद्रधनुष्याला ‘दुय्यम इंद्रधनुष्य म्हणतात. या दोन धनुकल्यांमधले आकाश, जरा अधिक निळे भासते. तो असतो, ‘अलेक्झांडर्स बँड’. क्वचित इंद्रधनूंची संख्या अधिकही असते. त्यांना म्हणतात ‘अधिसंख्या इंद्रधनुष्यें’ बाष्पकणांचा आकार मोठा असेल तर इंद्रधनू स्पष्ट, ठळक दिसते.
‘इंद्रवज्र’ हाही एक अमोलिक, दुर्लभ, काही थोडय़ा भाग्यवंतांच्या नशिबात लिहिलेला अनुभव असतो. इंद्रवज्र म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य.
इंद्रधनू, आकाशपटावरच दर्शन देते असे नाही. पावसाळ्यात धबधब्याची शोभा अवर्णनीय असतेच पण कोसळत्या प्रपातात इंद्रधनू दिसले तर हरखायलाच होते. कर्नाटकातल्या उंचेकळी प्रपाताच्या, मधल्या टप्प्यावर हा अनुभव बरेचदा मिळतो. असाच एक साक्षात्कार नळदुर्गच्या पाणीमहल मधे झाला. हा पाणीमहल आधीच अत्रंगी. या महालाच्या डोक्यावर धरण आहे. पावसाळ्यात ते तुडुंब भरते आणि महालाला जे
छज्जे काढलेले आहेत, त्यासमोरून त्याचा ‘ओव्हरफ्लो’ धबाबा पडतो. त्यावेळी जर उन्हाची तिरीप आली तर त्या कोसळणाऱ्या पाण्याच्या पडद्यावरचे छज्जातून दृष्यमान होणारे इंद्रधनूचे नर्तन बेभान करून सोडते.
माणसाचे मन नादिष्टच असते. इंद्रधनूचे सौंदर्य टिपता टिपता, त्यावरून पावसाचे आडाखेही बांधायला पाहते.
Rainbow in the eve - it will rain and leave
Rainbow in the morning-- shepherd's take warning
आहे की नाही मजा?
पण कुसुमाग्रजांच्या कवितेतली ओलेती पक्षीण मात्र, मनावर सात रंगाचे सिचन करत, घायाळ करते ते वेगळेच.
‘तुझ्या गीताच्या पंखांना
सात रंगांचे सिंचन
आली ओलेती पक्षीण
इंद्रधनुष्याघालून..’