मुशाफिरी : मोरगाव Print

अभिजित बेल्हेकर ,बुधवार, २६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

थेऊर, रांजणगावप्रमाणे मोरगाव हे आणखी एक पुण्याजवळचे अष्टविनायकातील गणेशस्थान. इथे येण्यासाठी पुण्याहून सासवड, जेजुरी, मोरगाव असा मार्ग आहे. हे अंतर ६४ किलोमीटरचे. पण याशिवाय थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन पाटस, चौफुला, सुपे मार्गेही मोरगावात येता येते. हे अंतर थोडे जास्त असले तरी येता-जाता स्वतंत्र मार्ग वापरले तर थेऊर, भुलेश्वर, मोरगाव आणि जातेवेळी जेजुरी अशी छान सहल घडू शकते.
असो! कधीकाळी मोरांची संख्या जास्त असल्यामुळे या गावाला मोरगाव हे नाव मिळाले. आजही या परिसरातील शेताशिवारात सकाळ-संध्याकाळी मोर दिसतात. मोरगावशेजारी सुप्याला लागून तर आता या मोरांसाठी खास अभयारण्य तयार होत आहे. एकूणच मोरांची चिंचोलीखालोखाल मोरांशी संबंधित असे हे दुसरे गाव.
क ऱ्हा नदीच्या काठावरील या गावात शिरताच अनेक जुन्या वाडय़ा-हवेल्यांमधून गणेशाचे मंदिर लक्ष वेधून घेते. उत्तराभिमुख असलेल्या या मंदिराभोवती उंच तट आणि चार कोपऱ्यांवर मिनारांसारखी रचना आहे. मंदिर गणेशाचे आणि स्थापत्य मात्र मुस्लिम शैलीतील पाहून आश्चर्य वाटू लागते. पण मग याचे उत्तर मोरगावच्या इतिहासात सापडते. मोरगावच्या मयूरेश्वरावर हिंदूप्रमाणेच मुस्लिम सत्ताधीशांचीही श्रद्धा होती. यातूनच बिदरच्या बादशाहने मोरगावचे हे मंदिर बांधले. मुस्लिम स्थापत्य शैलीमागे असे हे श्रद्धेचे धागदोरे!
गणपतीपुढे नंदी
मंदिराच्या पायऱ्या चढू लागतो तेव्हा वाटेतच एक भलामोठा नंदी खुणावतो. काळय़ा पाषाणातील धष्टपुष्ट, ऐटबाज मान, वशिंड असलेला हा नंदी नजरेत भरतो. पण याहीपेक्षा महादेव सोडून गणेशाच्या दारात नंदी पाहून आश्चर्य वाटते. मग यासाठी स्थानिक कथेचा संदर्भ पुरवला जातो. मोरगावातीलच एका शिवमंदिरासाठी हा नंदी घडवला होता. तो एका गाडय़ातून घेऊन जात असताना हा गाडा इथे मयूरेश्वराच्या दारातच रुतला आणि काही केल्या तो जागचा हलेना. दरम्यान, याच्या कारागिराच्या स्वप्नात येऊन नंदीने सांगितले, ‘मला मयूरेश्वराच्या दारातून हलवू नका. मी अन्यत्र जाणार नाही.’ शेवटी या नंदीला इथेच विराजमान करण्यात आले. एकेका मूर्ती-शिल्पाभोवतीच्या या कथा ऐकू लागलो, की त्या पुस्तकाप्रमाणे वाटू लागतात.
मंदिरास नगारखान्यासह भलेमोठे प्रवेशद्वार आहे. त्यावर शरभ, कमळाच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना. भोवतीच्या ओवऱ्यांमध्येही अनेक देवता आहेत. यात आठ दिशांना आठ गणेशाचेच अवतार आहेत. हे सारे पाहात असतानाच गाभाऱ्यातील मयूरेश्वराची ती शेंदूरभरली आसनस्थ मूर्ती मन प्रसन्न करते. चतुर्भुज, डाव्या सोंडेची ही मूर्ती! दोन्ही डोळय़ांत दोन तेजस्वी हिरे, मस्तकावर नागराजाचा फणा आणि बाजूला रिद्धी-सिद्धी अशी त्याची रचना! असे म्हणतात, समर्थ रामदास या मयूरेश्वराच्या दर्शनाला आले आणि ही प्रसन्न मूर्ती पाहून त्यांना इथेच
‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।।’
या मंगल आरतीची प्रेरणा मिळाली. गणेशभक्त मोरया गोसावी यांचा जन्म मोरगावचा. त्यांना इथल्या एका कुंडात मिळालेल्या गणेशमूर्तीचीच त्यांनी पुढे चिंचवड येथे स्थापन केली.
मयूरेश्वराची मूळ मूर्ती लहान आकाराची आहे. मात्र तिच्यावर वर्षांनुवर्षे शेंदराचे लेप चढल्याने तिचा आकार वाढला. कधीतरी शे-सव्वाशे वर्षांनी हे शेंदराचे कवच निखळून पडते आणि मूळ मूर्ती प्रगट होते. यापूर्वी सन १७८८ आणि १८८२ मध्ये हे कवच निखळल्याच्या नोंदी आहेत.
कोरीव शिवालय
मयूरेश्वराचे दर्शन घेऊन मोरगावचा आणखी प्राचीन इतिहास पाहण्यासाठी कऱ्हेच्या काठी निघावे. इथे वाटेतच एक सुंदर कोरीव शिवालय आपल्याला चक्रावून सोडते. सभामंडप आणि गाभाऱ्याने युक्त हे शिवालय तसे साधेच, पण त्याचे अत्यंत नाजूक नक्षी-मूर्तिकामाने सजलेले प्रवेशद्वार पाहिले, की उडायलाच होते. दोन्ही बाजूंस द्वारपालाच्या रेखीव मूर्ती, त्याच्या आत एका घडीव महिरपीमध्ये ही शिल्पांकृत द्वाररचना आहे. ज्याच्या शाखा पुन्हा अनेक भौमितिक रचना, निसर्ग रूपकांनी सजलेल्या आहेत. गंधर्व, कीर्तिमुख आदी रचनांनी त्याला जिवंत केले आहे, तर तळाशी पुन्हा शंकर, पार्वती आणि त्याचे शिवगण यांचे मूर्तिकाम आहे. हे सारे कोरीवकाम अत्यंत नाजूक आणि सफाईने केले आहे. यातील अनेक मूर्तीना भंजकांनी हानी पोहोचवली आहे, तसेच बाजूच्या भिंतींतील अत्यंत सुंदर अशी कोरीव दगडी जाळय़ाही तोडल्या आहेत.
अश्मयुगीन हत्यारे
पूर्वाभिमुख मंदिराच्या दक्षिण-उत्तर दिशेसही छोटी प्रवेशद्वारे ठेवलेली आहेत. त्यांनाही कलात्मक कमानींचे साज चढवलेले आहेत. याच सुंदरतेने बाहय़ भिंतीवर काही कोनाडेही सजवलेले आहेत.
सभामंडपात गणेश, नंदी आणि कासवाची रचना आहे, तर गाभाऱ्यात काळय़ा पाषाणातील शिवलिंग थाटले आहे. मंदिराच्या काही भागावरीलच कोरीव काम, अपुरे शिखर यामुळे या मंदिराचे काम मध्येच सुटल्यासारखे वाटते. यामागे निधीची कमतरता किंवा शत्रू सत्तेचा विरोध संभवतो.
पुरंदर, बारामती तालुक्यांत कऱ्हेच्या काठावर चालुक्य, यादवांच्या काळात अशा अनेक मंदिरांचे निर्माण झाले आहे. मोरगावातील मंदिरही त्या काळातील असावे असे वाटते. त्याची शैली-रचना थक्क करून सोडते. पण अन्य मंदिरांप्रमाणे मोरगावातील या मंदिराच्या वाटय़ालाही उपेक्षाच आल्याचे दिसते.
खरेतर मोरगाव याहून प्राचीन अशा इतिहासाचा साक्षीदार आहे. किंबहुना त्याचे धागेदोरे मानवाच्या उत्क्रांतीशी जोडलेले आहेत. पुणे जिल्हय़ात नारायणगावजवळ कुकडीकिनारी बोरी आणि क ऱ्हेकाठी मोरगाव या दोन ठिकाणी नदीपात्रालगत ज्वालामुखीच्या राखेचे थर (टेफ्रा) आढळून आले आहेत. पुण्याच्या डेक्कन कॉलेजने या राखेच्या थरांखाली गेल्या काही वर्षांपासून उत्खनन करत संशोधन केले आहे. ज्यातून या परिसरात प्राचीन मानवी वस्तीचे अनेक पुरावे हाती लागले आहेत. तत्कालीन दगडी हत्यारे, जीवाश्मरूपी अवशेष या साऱ्यांतून मानवाच्या उत्क्रांतीचे अनेक टप्पे उलगडले गेले.
alt
टेफ्रा म्हणजे ज्वालामुखीच्या राखेचे थर! कधीकाळी-कुठे हजारो किलोमीटर दूरवर ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्या उद्रेकाबरोबर खनिज, सिलिकांचे असंख्य सूक्ष्म कणही हवेत दूरवर उडतात. हवेबरोबर प्रवास करणारे हे कण शांत-गार झाल्यावर जड होत दूरवर जाऊन पडतात. मोरगावजवळ क ऱ्हेच्या पात्रातील राखेचे थर हे अशाच एका ज्वालामुखीचे आहेत. ज्याचे संशोधन केल्यावर त्याचे वय-काळ हे काही लाख वर्षे प्राचीन निघाले. आपोआपच या थरांच्या खाली सापडलेली अश्मयुगीन हत्यारे, जीवाश्मही तितकीच प्राचीन असणार! लाखो वर्षांपूर्वीच्या आमच्या संस्कृती, उत्क्रांतीचे धागेदोरे सांगणारे असे हे स्थळ-पुरावे!
मोरगावला मयूरेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पण यातले फार थोडे पुढे गावच्या सीमेवरच्या या महादेव मंदिरावरचे शिल्पकाम आणि क ऱ्हेच्या काठावरचा हा प्राचीन इतिहास पाहतात. एखाद्या स्थळाला भेट देणे हे कर्तव्यभावनेतून न होता ते निखळ आनंदासाठी असावे. डोळे उघडे ठेवून आमचा सारा इतिहास-भूगोल पाहात केलेली मुशाफिरी जास्त संपन्न आणि समृद्ध करणारी ठरते.