दुर्गेंद्राच्या परिघात Print

ओंकार ओक
alt

सह्य़ाद्रीतील सर्वोच्च गिरिदुर्ग कोणता? या प्रश्नाचं उत्तर सदासर्वदा किल्ल्यांच्या वाऱ्या करणाऱ्या भटक्यांशिवाय कोणालाही चटकन देता येणार नाही.कारण महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे आणि ट्रेकर्सचे जन्मजन्मांतरीचे नाते जडलेले आहे! नाशिक जिल्ह्य़ातील ‘साल्हेर’ हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला! ट्रेकिंग करतो आणि साल्हेरला गेला नाही असा गिर्यारोहक सापडणे जवळजवळ अशक्यच.महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई या नगर जिल्ह्य़ातील शिखराच्या खालोखाल उंचीच्या बाबतीत साल्हेरने बाजी मारलेली आहे. या दुर्गसम्राटाच्या मस्तकावर भगवान परशुराम दिमाखाने विराजमान झाले आहेत.साल्हेरवरून दिसणारे सह्य़ाद्रीच्या अक्रोळविक्रोळ रांगांचे दृश्य केवळ अवर्णनीय! या नजाऱ्याला खरोखरच कसलीच तोड नाही.हा सारा आसमंत न्याहाळताना कोणत्याही अनुभवी गिर्यारोहकाची नजर क्षणार्धात एका डोंगरावर खिळते आणि त्याचं कुतूहल जागं करून जाते.अस्ताव्यस्त पसरलेल्या या पर्वताच्या मध्यभागी भलंमोठं नेढं दृष्टिक्षेपात येतं आणि अपरांत निर्माण करण्यासाठी भगवान परशुरामांनी साल्हेरवरून सोडलेला बाण याच पर्वताला आरपार भेदून गेल्याच्या आख्यायिके ची आठवण करून देतं. या डोंगराचा माग काढण्यासाठी तो शोध सुरू करतो आणि उत्तर मिळतं ‘पिंपळा दुर्ग’!
साल्हेरला गेल्यावर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे गिर्यारोहक साल्हेरजवळच्या सालोटा,मुल्हेर-मोरा-हरगड,न्हावी रतनगड या परिचित किल्ल्यांनाच भेट देतात.पण याच साल्हेरच्या परिघातील भिलाई,चौल्हेर इत्यादी उत्तमोत्तम किल्ल्यांकडे ट्रेकर्सचं दुर्लक्ष झालेलं आढळतं.पिंपळा हा याच परिघातला एक निखालस सुंदर दुर्ग. अनगड,अपरिचित, देखणा आणि अविस्मरणीय! पिंपळ्याला जाण्यासाठी ट्रेकर्सनी प्रथम नाशिकमार्गे कळवण गाव गाठावं.कळवणहून मोकभणगी गावाला जाण्यासाठी एस.टी व खासगी वाहनांची सोय आहे.तसेच सटाणा-डांगसौंदाणे मार्गेही मोकभणगीला जाता येईल.कळवण ते मोकभणगी हे अंतर अंदाजे तीस किलोमीटर आहे.पिंपळयाच्या पायथ्याला कात्रा व सावरपाडा अशी दोन गावे असून मोकभणगीमार्गे दोन्ही गावांपर्यंत पोहोचता येतं.कात्रा व सावरपाडा ही गावं एकमेकांपासून अगदी जवळ असून पिंपळयाला जाण्याची मळलेली वाट सावरपाडा गावातून आहे.सावरपाडयामध्ये पोहोचलो की उजवीकडे अस्ताव्यस्त पसरलेला पिंपळा किल्ला दिसतो आणि आपल्याला इथपर्यंत खेचून आणण्यात सर्वथा यशस्वी झालेलं त्याचं नेढंही देखणं दर्शन देतं.सावरपाडयातल्या मात्र बऱ्याच ग्रामस्थांना हा डोंगर एक किल्ला आहे याचा पत्ताच नसल्याने पिंपळया विषयी गावात विचारलं असता, ‘‘त्यो कंडाण्याचा डोंगूर हाये.देवी वसलीये कडयामंदी. पन त्ये छिद्र दिसतंय ना तितं जाता येतं ’’असं ‘टिपीकल’ उत्तर मिळतं. सावरपाडयाच्या हिरव्यागार शेतांच्या बांधांवरून मळलेली वाट पिंपळयाचा मागोवा घ्यायला धावली आहे.शेवटपर्यंत तिची सोबत असल्याने चुकायचा प्रश्नच येत नाही. पण गावातून एखादा माहितगार बरोबर घेतल्यास अधिक श्रेयस्कर. सावरपाडयातून निघाल्यापासून सुमारे एक दीड तासात आपण पहिली चढण संपवून एका विस्तीर्ण पठारावर येतो आणि इथून पिंपळयाचा चौकोनी कातळकडा मात्र आपले मनोहारी रूप पेश करतो. या पठारावरून वाहणाऱ्या भर्राट वाऱ्याचं बोट धरायचं आणि त्या कातळकडय़ाचा वेध घ्यायला पुढची वाटचाल सुरू करायची.पठारावरून गडाची वाट त्या चौकोनी कातळकडय़ाला उजवीकडून पूर्ण वळसा घालून गेली आहे.सावरपाडय़ापासून या विस्तीर्ण पठारापर्यंतच मुख्य चढण असून यानंतर किल्ल्याचा माथा गाठेपर्यंत आडवीच वाट असल्याने पुढचा मार्ग एकदम सोपा आहे.
पठारापासून अध्र्या तासात पिंपळयाच्या मुख्य कातळकडय़ाच्या बरोबर मागच्या बाजूला आपण आलो की जादूची कांडी फिरावी असा नजारा समोर येतो.उजवीकडे सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांचा बेभान पसारा तर डावीकडे आपलं मुख्य लक्ष्य असलेल्या पिंपळयाचं भव्य नेढं आणि त्याच्याशेजारची नेढयाइतकीच मोठी असलेली मुक्कामायोग्य गुहा. हा सारा नजारा मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे.सुमारे पंधरा वीस मिनिटात ही गुहा गाठता येते.पिंपळयाच्या या प्रचंड गुहेमध्ये एक भन्नाट प्रकार पहायला मिळतो.गुहेचं छत एका ठिकाणी आतल्या बाजूने गोलाकार खोदून एक भुयारसदृश काम करण्यात आलं आहे.या भुयारात एकावेळी एकच जण जाऊ शकतो आिंण आतही एका व्यक्तीपुरतीच जागा आहे.सदर गोष्टीचं प्रयोजन मात्र कळू शकत नाही.गुहेच्या शेजारीच पाण्याच्या तीन टाक्यांचा समूह आहे.ही गुहा डावीकडे ठेवत पिंपळयाच्या कातळकडयाला लगटून गेलं की गावातल्या लोकांनी उल्लेख केलेलं देवीचं कडय़ातलं छोटेखानी ठाणं लागतं.या ठिकाणी जाताना एका वळणावर कातळाच्या खुज्या उंचीमुळे रांगत जावं लागत असल्याने इथे योग्य ती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.पुन्हा वळून आपण गुहेपाशी आलो की आता आपण ज्यासाठी इतका अट्टहास केला आहे त्या नेढयाकडं मोर्चा वळवायचा आणि पाच मिनिटात नेढयात दाखल व्हायचं.ज्या दुर्गप्रेमींना राजगडर तनगड-कण्हेरा यांसारख्या किल्ल्यांवर असलेल्या नेढयांची भुरळ पडली आहे त्यांनी एकदा तरी पिंपळ्याला भेट द्यावी आणि या नेढयात बसण्याचा अनुभव घ्यावा.
नेढयांसाठी प्रसिद्ध असलेल्या या सर्व अतिरथी महारथी किल्ल्यांच्या नेढयांना अक्षरश: विस्मृतीत लोटून देईल इतकी जबरदस्त ताकद पिंपळयाच्या या नेढयामध्ये आहे.राजगड,रतनगडाच्या नेढयांपेक्षा दुपटीने विस्ताार असलेल्या या नेढयामध्ये सुमारे दीडशे माणसं सहज सामावू शकतात.या नेढयातून आरपार दिसणारं साल्हेर,सालोटा,भिलाई,टकारा सुळका या आभाळाला भिडलेल्या शिखरांचं दृश्य म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे.शब्दांच्या परिसीमा ओलांडून गेलेल्या या नेढयाची महती पिंपळयावर गेल्याशिवाय कळणं केवळ अशक्य आहे. सह्य़ाद्रीच्या रौद्रभीषण कडेकपाऱ्यांमध्ये मुक्त विहार करणाऱ्या थंडगार वाऱ्याशी दोन घटका हितगुज करावी ती फक्त इथं आणि इथंच बसून. साल्हेरहून भगवान परशुरामांनी सोडलेल्या बाणाने निर्माण केलेला हा चमत्कार आपल्याला एक जगावेगळा आनंद देत असतो. यासाठी परशुरामांचे आभार मानावेत तितके कमीच आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर जागा कोणती असेल तर पिंपळयाचं भान हरपायला लावणारं हे नेढ! इथून लवकर निघायची इच्छा झालेल्या मनुष्याने आपल्याला सह्य़ाद्रीच्या असीम सौंदर्याचा महिमाच कळला नाही असं समजावं.पिंपळयाचे सर्वात प्रमुख आकर्षण असलेल्या या नेढयाचा मन तृप्त होईपर्यंत आनंद घ्यायचा आणि नेढयाच्या डावीकडे असलेल्या सुमारे पंधरा फु टांच्या घळीतून किल्ल्याचा माथा गाठायचा.किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पाण्याची तीन कोरडी टाकी व जोत्यांचे अवशेष सोडले तर फारसं काही बघण्यासारखं नाही.माथ्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर नितांतसुंदर.पिंपळा किल्ल्यावर पाण्याची मात्र वानवा असल्याने पाण्याचा पुरेसा साठा ट्रेकर्सनी जवळ ठेवणे गरजेचे आहे.किल्ल्यावर पाण्याची मुबलक प्रमाणात सोय असती तर मुक्कामासाठी पिंपळयावरची गुहा आणि नेढं यांसारखी जागा शोधूनही सापडणार नाही. पिंपळा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल मात्र कागदपत्रांनी मौन बाळगले आहे.पण ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या चहूबाजूंनी ‘प्रभावळीतले किल्ले’ बांधले गेले आहेत त्याचप्रमाणे लष्करी वापरासाठी अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सह्य़ाद्रीतील सर्वोच्च किल्ल्याच्या म्हणजेच साल्हेरच्या प्रभावळीतील पिंपळा हा एक महत्त्वाचा किल्ला असावा.पिंपळयाच्या माथ्यावरून हाकेच्या अंतरावर दिसणाऱ्या साल्हेरकडे बघून या गोष्टीची खात्री पटू शकते.पिंपळ्याला भेट देण्यासाठी खरंतर वर्षभरात कधीही जाता येऊ शकते पण स्वत्व विसरायला लावण्याऱ्या या ‘दृष्टीआड सृष्टी’ चा खरा अनुभव घ्यायचा असेल तर जून ते ऑक्टोबर हा आदर्श कालावधी आहे.पिंपळयाच्या नेढयातला थंडगार वारा आणि सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर हिरवागार गालिचा पांघरणारा पाऊस अंगावर घेताना ‘जीना है तो इसी के लिये’ असं मनापासून वाटून जातं.आजही साल्हेरच्या सर्वोच्च शिखरावर उभं राहिल्यावर चारही बाजूंना नजर भिरभिरते.पुन्हा एकदा पिंपळयाच्या त्या नेढयावर जाऊन थांबते..त्या आगळया दुनियेचा मनस्वी वेध घेते आणि त्याच वेळी मनात आयुष्यातल्या काही अविस्मरणीय क्षणांची दाटी झालेली असते!