‘कास’चे पुष्पवैभव Print

भटकंतीचा सोबती
फिरस्ता - बुधवार, ३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आता काही वर्षांपर्यंत भटकंती म्हटले, की ऐतिहासिक स्थळे नाहीतर आव्हान देणाऱ्या पर्वतरांगा यांच्या हिशेबाने खेळ चालू असायचा. पण आता या छंद-खेळातही फिटनेसपासून फोटोग्राफीपर्यंत आणि बुरशीपासून नक्षत्रांपर्यंत अशा अनेक विषय सामावले आहेत. अशा या बहुआयामी भटकंतीत आता रानफुलांच्या शोधात फिरणारेही अनेक जण आहेत. याच भटक्यांसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक लिहिले आहे, डॉ. संदीप श्रोत्री यांनी - ‘पुष्प पठार कास’!
हे पुस्तक प्रसिद्ध कासच्या पठारावर उमलणाऱ्या रानफुलांविषयी असले, तरी यातील नव्वद टक्के फुले ही आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसत असल्याने हे पुस्तक सर्वच वाटांवर उपयुक्त पडते.
रानफुलांचे हे जग तसे सामान्यांपासून दूरचे. यातील अनेक फुले पाहिलेली देखील नसतात. किंबहुना यातील अनेकांचे अस्तित्वच मुळी सूक्ष्म असल्याने त्याकडे आपले लक्ष देखील जात नाही. मग त्यांची माहिती, कुतूहल, उपयुक्ततता आणि सौंदर्य या साऱ्या गोष्टी तर दूरच्याच ठरतात.
 कास पठाराला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेल्या या पुस्तकामध्ये इथे आढळणाऱ्या शेकडो प्रजातींची केवळ सचित्र माहिती नाही तर त्यामागचे विज्ञान आणि त्याभोवतीची संस्कृतीही डॉ. श्रोत्री यांनी  दिलेली आहे. पश्चिम घाट, त्यातील सह्य़ाद्रीचे महत्त्व, कास पठाराचे वैशिष्टय़ आदी सामान्य तपशिलापासून सुरू होणारे हे पुस्तक निसर्ग-पर्यावरण क्षेत्रातील मुशाफिरी करत फुलांच्या ताटव्याकडे वळते. कवल्या, वायतुरा, गेंद, जांभळी मंजिरी, सीतेची आसवे, तेरडा, सोनकी, तुतारी, भारंगी, कारवी अशी एकेका प्रकरणातून नवनव्या रानफुलाची कथा उमलत जाते. या प्रत्येक प्रकरणात त्या फुलाची शास्त्रीय माहिती, त्याची वैशिष्टय़ तर आहेतच शिवाय त्यांची पर्यावरणातील भूमिकाही इथे नोंदवलेली आहे. काही फुलांचे चमत्कारिक विज्ञान तर या विषयाची ओढ आणखी वाढवते. हत्तीची सोंड (हळुंदा), ओलीसनाटय़ (कंदीलपुष्प), पेव फुटले (पेव) दवबिंदूसी भुलला (दवबिंदू/ड्रॉसेरा) ही यातली काही उदाहरणे त्यांच्या शीर्षकातूनच या फुलांमध्ये गुंतायला लावतात. फुलांसोबतच आमरीचे (ऑर्किड) विविध प्रकारांचीही चर्चा या पुस्तकात केलेली आहेत.
फुलांच्या या माहितीसोबतच त्यांचा अभ्यास कसा करावा, निरीक्षणे कशी घ्यावीत, त्यांचे छायचित्रण कसे करावे याबद्दलच्या उपयुक्त मार्गदर्शनही या पुस्तकात आहे. रानफुलांच्या अशा पठारी कसे वागावे, काय करावे, काय करू नये याच्या सूचनाही डॉ. श्रोत्री यांनी या पुस्तकात दिलेल्या आहेत. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती देखील काढलेली आहे. ‘फिल्ड बुक’सारखा आकार, चांगली छायाचित्रे यामुळे भटकताना हे पुस्तक सोयीचे ठरते. फुलांसारख्या दुर्लक्षित विषयावर आपले मैत्र साधणारे हे पुस्तक या दिवसातील प्रत्येक भटकंतीत ‘सॅक’मध्ये ठेवलेच पाहिजे असे आहे. (अधिक माहितीसाठी डॉ. संदीप श्रोत्री - ९८२२०५८५८३)