सहय़गिरीला साज रानफुलांचा! Print

भाऊसाहेब चासकर - बुधवार, ३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पावसाळ्यातील भटकंतीत रानफुलांच्या वाटा पाहणे, अभ्यासणे हा अनेकांचा छंद असतो. शेकडो प्रजातींचा हा उत्सव या तीन महिन्यात साऱ्या सृष्टीला सजवून टाकतो. नाना रंग-नाना आकारांच्या या रानफुलांनी सध्या साऱ्याच रानवाटा सुंदर केल्या आहेत. या फुलांविषयीच या ‘ट्रेक-इट’मध्ये.
सहय़ाद्रीचे उत्तुंग पर्वतमाथे, डोंगरसुळके, उरात धडकी भरविणाऱ्या या खोल खोल दऱ्या, उभे तुटलेले कडेकपारी.. जैववैविध्यानं नटलेली समृद्ध वनसंपदा, ऋतुमानाप्रमाणे रंग धारण करणारा निसर्ग.. वर्षांऋतूत सहय़गिरीच्या कुशीत थबथबणारा जलोत्सव! पावसाळा संपता संपताच सहय़ाद्रीच्या पठारांवर, डोंगरउतारांवर बहरतो रम्य पुष्पोत्सव.. अनेकविध रंग, रूप, आकार घेऊन भेटीला आलेली आणि मनाला वेड लावणारी इवलीशी नाजूक रानफुलं.. त्यांचा तो भारून टाकणारा रानगंध..
किती किती फुलं? त्यांच्या प्रत्येकाच्या तऱ्हाही तितक्याच वेगळ्या. रंग, रूप, गंध, आकार, रचना असे प्रत्येकाचं आपलं
निराळं वैशिष्टय़. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक तर काही वास नसलेली.. काही औषधी गुणधर्म असलेली तर काही चक्क कीटकभक्ष्यी! पिवळीधमक सोनकी तर आठ-पंधरा दिवस रंगांची मुक्तहस्ते उधळण करत राहते. हिमालयाच्या खालोखाल देशभरात रानफुलांबाबत सहय़ पर्वताची ख्याती आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगडापासून कासच्या पठारापर्यंतचा परिसर जगभरातल्या १८ महत्त्वाच्या ठिकाणांपैकी (हॉट स्पॉट्स) समजला जातो. पावसाळय़ाच्या अखेरीस भाद्रपद महिन्यात येथील पर्वतपठारांवर, डोंगरमाथ्यावर, उतारांवर, कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपानं ही रंगांची उधळण सुरू असते. सध्या निसर्गानं हिरवा शालू परिधान केलाय. अजूनही निर्झर झऱ्याचं मंजूळ गाणं ऐकू येतंय. फुलांचा बहर फुलपाखरांना मेजवानीचं निमंत्रण देतोय. मधमाश्या फुलांना बिलगताहेत. वाऱ्यावर डोलणारी अगणित फुलं जणू भोवतीनं फेर धरून नाचताहेत. फुलांचे नानाविशेष. रंग, गंध, निळाई, हिरवाई असं सारं अद्भुतरम्य दृश्य पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जात आहोत.
वर्षभरात सहय़ाद्रीच्या कुशीत तब्बल पाचशेहून अधिक फुलं फुलतात. यात गवतफुलांचा भरणा मोठा असतो. दाटीवाटीनं उगवलेली वाऱ्यावर डोलणारी अगणित फुलं पाहिली, की नकळत आपणही ‘गवत फुला रे गवत फुला..’ असं गुणगुणू लागतो. दूपर्यंत पसरलेल्या सोनकीच्या पुष्पमळय़ांनी पर्वतपठारे पीतवर्णी होतात. तिच्यासोबत रानतेरडा, पानतेरडा, फांगळा, सीतेची आसवे, अग्निशिखा, बरका, तालीमखाना, पंद, उंबरी, लाजवंती, श्वेतांबरा, काळी मुसळी, हळुंदा, उन्हाळी, सापकांदा, आभाळी, नभाळी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी मंजिरी, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी कुसुंबी, विंचवी..अशी एक ना दोन! फुलांची ही दुनियाच अद्भुत आणि मनमोहक!