आंबा घाटमाथा Print

alt

अतुल साठे,
बाजी प्रभूंच्या बलिदानाने पवित्र झालेली विशाळगडाजवळची पावनखिंड आपणा सर्वाना शाळेपासून परिचयाची आहे. शिवकालीन इतिहासाच्या अशा स्फूर्तिदायी खाणाखुणा जागोजागी असलेल्या या भागाला सुंदर नैसर्गिक वारसासुद्धा लाभलेला आहे. आंबा घाटमाथ्यावरील या घनदाट जंगलाच्या प्रदेशात जायचा या वर्षी दोनदा योग आला आणि राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य यापैकी कोणतेही संरक्षण नसताना इथे टिकून असलेल्या वनवैभवाचा जवळून अनुभव घेता आला.

 

घाटमाथ्यावरील मावळ पट्टय़ातली सदाहरित, मिश्र सदाहरित व दमट पानझडी या तीनही प्रकारची जंगले इथे विविध टप्प्यांवर पाहायला मिळतात. रत्नागिरीच्या बाजूने आंबा घाट चढून आलं की प्रथम सदाहरित जंगल पट्टा लागतो, तर कराड किंवा कोल्हापूरच्या बाजूने आलं तर आधी दमट पानझडी जंगल लागतं. घाटमाथ्यावरील आंबा गावात राहण्याची सोय उपलब्ध आहेत व तिथे २-३ दिवस राहून आसपासचे जंगल सकाळ-संध्याकाळ बघायची चांगली संधी मिळते. अध्र्या दिवसात गावाजवळच्या माणोली बंधाऱ्याभोवतीच्या जंगलात फेरफटका मारता येतो तर सबंध दिवस असेल तर पावनखिंडीच्या वाटेवर जंगलात वाहनाने जाऊन मग पायी भटकता येते.
alt

आंबा गावापासून अगदी अध्र्या तासाच्या अंतरावर जंगल असल्याने अनेक पक्षी व त्यांचे मंजुळ आवाज आपल्याला वरांडय़ातूनच खुणावतात. मोर, पावशा (हॉक कक्कू), कुतुर्गा (ब्राऊन हेडेड बार्बेट), सुभग (आयोरा), लालबुडय़ा बुलबुल, दयाळ व शिंपी यांसारखे विहंग आपले स्वागत करतात. गावापासून हाकेच्या अंतरावर आम्हाला रस्त्यालगत अकेशियाच्या झाडांवर तीन करडे धनेश (ग्रे हॉर्नबिल) जवळजवळ १० मिनटे दिसले. छपरांवरून हनुमान लंगुर माकडांची मस्ती चालूच असते. रिसॉर्टच्या आवारात एका सरडय़ाला तोंडात पकडून चाललेली धामण दिसली तर जवळच गावकऱ्यांनी त्यांच्या अंगणात मारलेला विषारी मण्यार दिसला. पावसाळ्यात रात्री सर्व बाजूच्या शेतातून बेडकांचे व झाडांवरून निरनिराळ्या प्रकारच्या वृक्षबेडकांचे (ट्री फ्रॉग) आवाज एक मस्त गूढ-रम्य वातावरण तयार करतात.
माणोली बंधारा परिसर सकाळी किंवा संध्याकाळी मस्त पायी फिरत नजीकच्या माणोली बंधाऱ्यावर जाता येते. वाटेत पांढऱ्या छातीचा खंडय़ा, पांढऱ्या भुवईचा धोबी, लांब शेपटीची भिंगरी (वायर टेल स्वालो), वेडा राघू व पाकोळी यासारखे पक्षी हमखास दिसतात.
बंधाऱ्याच्या एका बाजूस शेती असून, बाकी तिन्ही बाजूस घनदाट मिश्र सदाहरित जंगल आहे. तलावाच्या काठाकाठाने जाताना प्रथम थोडा मोकळा भाग लागतो. पूर्वी इथे सुद्धा जंगल असणार याचा अंदाज काही उरलेल्या झाडांवरून येतो. पाण्याच्या काठी काटेरिंगणी जागोजागी उगवलेली दिसते. पाण्याच्या पृष्ठभागावर उडत जाणारे पाणकावळे मधेच एखाद्या खडकावर ध्यानस्त बसतात. थोडं पुढे गेलं की जंगल सुरू होतं व जांभूळ, आंबा, हिरडा यांसारखे उंच वृक्ष सभोवार दाटीवाटीने उभे असतात. आम्हाला याच ठिकाणी शेकरूचा आवाज पानांच्या दाटीतून ऐकू आला. थोडय़ा वेळाने समोरच्या काठावरील जंगलातून मलबार धनेशचा आवाजसुद्धा ऐकू आला! पावसाळ्यात हा सगळा परिसर धुकं व ढगांनी भरून जातो व रिमझिम पावसात ही भटकंती एक वेगळाच अनुभव देते. मात्र या ऋतूत जळवा लागण्याची शक्यता लक्षात घेऊन मीठ किंवा तंबाखू सोबत ठेवलेली बरा.
पावनखिंडीच्या वाटेवर
alt
पूर्ण एक दिवस असेल तर पावनखिंड, विशालगड व वाटेवरील अरण्यात भटकण्याची खूप संधी आहे. गाडीरस्त्याने पायी चालले तर काही वन्यजीवन दिसण्याची शक्यता अधिक आहे. पहिल्या खेपेला थंडीत आम्हाला येथील जंगलात निळ्या डोक्याचा कस्तूर (ब्लू-कॅप रॉक थ्रश) दिसला होता. अलीकडे चिंब पावसात दुसऱ्यांदा भटकताना चक्क शेकरू दिसलं! तांबूस तपकिरी रंगाची ही साधारण दोन फूट लांबीची खार पावसात अंग चोरून उजवीकडच्या झाडाच्या फांदीवरून टुणकन उडी मारून डाव्या बाजूच्या झाडावर सरसर गेली. याच खेपेत मलबार कस्तूरची (मलबार विस्लिंग थ्रश) स्वर्गीय सुंदर शीळ वेळोवेळी कानांना सुखावत होती. कुंद ढगाळ वातावरण, पावसाची रिपरिप, मधेच सुटणारा गार वारा आणि ही कर्णमधुर शीळ! केवळ अप्रतिम. जंगलात अनेक ठिकाणी पांढऱ्या गळ्याचा सातभाई (पफ-थ्रोटेड बॅबलर) पावसाने जरा उघडीप घेतली की आपलं ‘गोपी गोपी, तुझी काळी टोपी’ चं गाणं सुरू करायचा. सोबतीला नाचण पक्ष्याचा चिवचिवाट होताच.
अंजनी, हिरडा, हाडक्या जांभूळ, लेंडी जांभूळ, आंबा, चांदण व बांबूच्या या सदाहरित जंगलात कोणत्याही ऋतूत एक सुखद शांत अनुभव मिळतो. धीरगंभीर वृक्षराजीतून चालताना आपण कोकणदर्शन पॉईंटवर येतो आणि ढग आणि धुके नसेल तर एक नयनरम्य दृश्य आपली नजर खिळवून ठेवतं. आपण सह्य़ाद्री घाटमाथ्यावर उभे असतो आणि खाली खोलवर ताशीव कडे थेट कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरात उतरतात. घटामाथा इथे अर्धवर्तुळाकार असून समोर पश्चिमेला त्यावरील विशालगड दिसतो.
आंबा घाटावरील हे जंगल हा एक महत्त्वाचा जंगल कॉरीडोर (दोन मोठय़ा जंगलांना जोडणारा पट्टा) आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे आणि इथे भटकंती केल्यावर आपल्याला हे लगेच लक्षात येते. दक्षिणेकडे बावडा मार्गे हे जंगल राधानगरी अभयारण्याला जोडलेले आहे, तर उत्तरेकडे चांदोली राष्ट्रीय उद्यान मार्गे थेट कोयना अभयारण्य व महाबळेश्वरला जोडलेले आहे. तसेच कोकणातील सह्य़ाद्री पायथ्याच्या साखरपा, मालेश्वर, गोठणे, लांजा यासारख्या ठिकाणच्या जंगलांनासुद्धा हे आंबाघाट मार्गे जोडलेले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या जंगलात बिबटय़ा, सांबर, भेकर, गवा यांच्याबरोबरच कधीकधी एखादा फिरस्ता वाघसुद्धा दिसतो! आज जंगल कॉरीडोर वाचवणे हे अभयारण्य वाचवण्याइतकेच महत्त्वाचे आहे, हे सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे. आंबा घाटमाथा व त्यासारखी सह्य़ाद्रीतील अनेक जंगले वाचवणे ही काळाची गरज आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे अनेक जंगल पट्टे हे पूर्वापार खासगी मालकीचे आहेत व आपल्या प्राचिन वेदिक संस्कृतीला अनुसरून लोकांनी ते आजवर टिकवले आहेत. शाश्वत विकासाकडे नेणाऱ्या रोजगार संधी उपलब्ध झाल्या, तर झटपट पैशाकरिता अशी जंगले तुटण्याचे टळेल. अशा कामी कृषी पर्यटन, जंगल पर्यटन, सेंद्रिय शेती यासारख्या पर्यावरणपूरक व्यवसायांना खूप महत्त्व आहे.
आंबा पुण्यापासून २५० किमीवर आहे, तर मुंबईपासून ३९०. चला तर मग आंबा घाटात आणि अनुभवा रौद्र सह्य़ाद्रीचे तितकेच लावण्यमयी रूप!