स्वराज्य तोरण Print

सुधीर जोशी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

‘‘स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे,’’ हे स्वराज्य तोरण मिरवणारे गडांचे दरवाजे अभिमानाने ऊर भरवून टाकणारे तर आहेतच; पण तितकेच मोहक आणि वैशिष्टय़पूर्णही आहेत.गडावर नजर ठेवणारा, आल्यागेल्याचे स्वागत करणारा, विजयी वीरांचे कौतुक करणारा़ तसेच,आगंतुकावर नजर ठेवणाराही गडाचा महादरवाजा. महाराष्ट्रातील काही भावलेल्या़,काही देखण्या तर काही वैशिष्टय मिरविणाया दुर्गद्वारांचा परिचय करून देण्याचा हा एक प्रयत्न.
एके  काळी पाण्याने गच्च भरलेला खोल खंदक; त्या खंदकाला पार करणारा दिमाखदार झुलता पूल़ पलीकडे एक प्रवेशद्वार भुईकोट किल्ल्याचे.अगदी स्वप्नासारखे वाटणारे दृश्य़  पण हे दृश्य प्रत्यक्षातील आहे. हे आहे अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याचे मूळ प्रवेशद्वार.सध्या हे वापरात नाही. पुलाच्या लाकडी फळ्याही मोडल्या आहेत पण बाकी यंत्रणा शाबूत आहे. पुलाच्या एकात एक कडय़ा अडकवून केलेल्या लोखंडी साखळयांचे जोड दिसतच नाहीत वा त्यांना गंजही आलेला नाही. किल्ल्यामध्ये कोणालाही सहज प्रवेश करता येऊ नये म्हणून याची योजना. हा पूल यांत्रिक करामतीने उचलला जाई ज्या योगे किल्ल्यामध्ये प्रवेश बंद.अन्य प्रकारे खंदक ओलांडण्याचा प्रयत्न झाल्यास बुरूजांवरून होणाऱ्या बंदुकांच्या़,तोफांच्या माऱ्याला तोंड द्यायला हवे. या पुलाची योग्य डागडुजी करून तो वापरता केल्यास पर्यटकांसाठी एक आकर्षण नक्कीच ठरेल.
अशाच काही आगळ्या दुर्ग प्रवेशांचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. दाट झाडीने वेढलेल्या इवल्याश्या गोरखगडाचा प्रवेश. सहज लक्ष गेल्यास वाटते डोंगरातील गुहेत एखादे छोटेसे देऊळ असाव़े थोडा अनगड चढ पार करून जवळ गेल्यावरच कळते की हा दरवाजा आहे. त्यातून एक सहज न कळणारी भुयारी वाट गडावर जाते.
alt
त्रिंबकेश्वर येथील भांडारगड हा खजिना जडजवाहिऱ्यांची साठवण करणारा गड. गडाकडे जाणारी वाट अति बिकट़  ती पार केल्यावर पासष्ट पायया उतराव्या लागणार; मग एक भुयारी दरवाजा़  तो सरपटत पार केल्यावर  सुमारे दोन अडीचशे फूट लांबीची कातळ भिंत़. या भिंतीवरून कोणत्याही आधाराशिवाय पलीकडे गेल्यावर एक सरपटत जावे लागणारा भुयारी दरवाजा़ तो पार केल्यावर मग पासष्ट पायऱ्या. आणि मगच दुर्गात प्रवेश.
सातवाहनांच्या दुर्गबांधणीचे वैशिष्टय म्हणजे एकापुढे एक सात दरवाजे. याचे मुख्य प्रयोजन संरक्षण. शत्रूला सात ठिकाणी तोंड देता देता नाकी नऊ यावेत. परंतु आज योग्य देखभालीअभावी बहुतेक किल्ल्यांचे दरवाजे नष्ट झाले आहेत अथवा मोडकळीस आले आहेत. सुदैवाने शिवनेरीला सातही दरवाजे आजही शाबूत आहेत. साल्हेर मुल्हेरला जरी सर्व दरवाजे शाबूत नसले तरी त्यांचे महत्त्व नक्कीच जाणवते. मुल्हेरचे शाबूत दरवाजे तर अतिशय सुंदर आणि बुलंद आहेत.
देवगिरीला किल्ल्याच्या दारातून प्रवेश केल्यावर एक अंधारी बोगद्यातील वाट लागते. अक्षरश: डोळयात बोट घातले तरी कळणार नाही असा अंधाऱ आणि नागमोडी लांब वाट. रस्ता माहिती नसेल तर दरीत कोसळण्याशिवाय पर्यायच नाही.आग्रय़ाच्या तसेच राजपूत शैलीच्या बऱ्याच किल्ल्यांमध्ये प्रवेशद्वारानंतर एक लांबलचक वळणाकार रस्ता असे. हा पार केल्याशिवाय किल्ल्यात प्रवेश नाही. या मार्गात वरील बाजूस दुतर्फा सशस्त्र सैनिक असत.
रतनगडचा कोकण दरवाजा एका अखंड कातळात कोरून काढलेले भव्य लेणेच आहे.भलामोठा दरवाजा आणि त्यापुढे दूरवर गेलेल्या प्रशस्त सुंदर कोरीव दगडी पायऱ्या.या स्वत:च अनुभवायला हव्यात. त्रिंबक गडाचा दरवाजा आणि दगडी कोरीव पायऱ्या पण अशाच आहेत. हर्षगडाला खडय़ा कातळात खोदलेल्या शंभर सव्वाशे पायऱ्या चढून गेल्यावर लागणारा दरवाजा. पन्हाळ्याचा ‘तीन दरवाजा’ म्हणजे स्थापत्य शास्त्राचा एक अनोखा आविष्कारच आहे. आपल्या सिंहगडाचा कल्याण दरवाजा; असे अनेक दरवाजे त्यांच्या वैशिष्ठय़ांसह आपणास आढळतील.
alt
आता आपण शिव कालातील खास विशेष गोमुखी दरवाजे पाहू. कोणत्याही किल्ल्यावर शत्रूचा हल्ला होई तेंव्हा प्रथम मुख्यद्वार फोडण्याचा प्रयत्न होई. हे दरवाजे भक्कम सागवानी लाकडी दारांचे असत. त्यांना कडय़ा-कोयंडे, जाडजूड अडणे असत.कु लपे लावण्याची सोय असे.आणि बाहेरील बाजूंना भाल्यासारखे अणकु चीदार खिळे लावलेले असत. असे दरवाजे आता अभावानेच आढळतात. बहुतेक ठिकाणी कालान्वये ऊन-पाऊस खाऊन लाकडी दरवाजे कु जून नष्ट झाले. काही ठिकाणी लाकू ड, तसेच तांब़, पितळ, लोखंड चोरी करण्याच्या कामात नष्ट झाले. असे काही मोजके पण सुस्थितील दरवाजे अहमदनगर,मालेगाव़, शनिवारवाडा, परंडा इ.ठिकाणीच पाहता येतात.अहमदनगरचा भुईकोट किल्ला केवळ लष्कराच्या ताब्यात असल्यामुळेच सहिसलामत आहे. जर दरवाजा उघडय़ावर असेल तर त्याच्यावर तोफांचा मारा करून अथवा लांबलचक ओंडके  वेगात धडकवून  किंवा हत्तीची धडक देऊन दार तोडले जात असे. हे टाळण्यासाठी गोमुखी दरवाजाची योजना असे. यात, दरवाजा समोरून सहज दिसेल असा न ठेवता तो थोडी तटबंदी बांधून, थोडेसे नागमोडी वळण घेऊन आतल्या बाजूला असे. यामुळे थोडे चक्रोकार फिरूनच प्रवेश करावा लागे. त्यामुळे वरील उपायांनी दरवाजा फोडणे अशक्य होई. शत्रूसैन्याने आत घुसण्याचा प्रयत्न केल्यास तटबंदीवरचे सैन्य त्यांचा फडशा पाडायला सज्ज असेच. उत्तम गोमुखी दरवाजे रायगड, सुधागड, अहमदनगर, जंजिरा-मुरूड येथे पाहता येतात.
या शिवाय किल्ल्यांना अन्य दरवाजेही असत. पण किल्ल्यांना अनेक प्रवेश असणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असे आणि कमी दरवाजे असणे श्रेयस्कर असे.
आणिबाणीच्या वेळी पलायन करणे वा बाहेरील मदत मिळविण्यासाठी चोर दरवाजेही अत्यावश्यक असत. राजाराम महाराजांना रायगडाला पडलेल्या वेढय़ातून वाघ दरवाजामुळेच सुरक्षित निसटून जाता आल़े तसेच, शिवाजी महाराजही पन्हाळ्यावरून सहिसलामत बाहेर पडू शकले. त्याउलट, एकही पर्यायी मार्ग नसल्याने देवगिरीचा पाडाव झाला.
रायगडावर वाघ दरवाजाशिवाय अन्यही चोरवाटा आहेत. सुधागडावरही सुरेख चोरदरवाजे आहेत.येथील लक्षात न येणारा चोरदरवाजा आपल्याला अलगद गडाबाहेर नेतो. धुळे, नाशिक जिल्ह्य़ांच्या सीमेवरील गाळणा किल्ल्यावरही एक अप्रतिम गुप्तवाट आहे. पण झालेल्या पडझडीने या वाटेचीच वाट लागली आहे.जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंहगड इ. अनेक गडांवर चोर दरवाजे आढळतात. घोसाळगडाचा चोर दरवाजाही नमुनेदार म्हणता येईल.सुवर्णदुर्ग, जंजिरा इ. जलदुर्गांतही सहज न समजू शकणारे चोरदरवाजे आढळतात.
हे सर्व दरवाजे पाहताना जाणवते की संरक्षणदृष्टय़ा़,तसेच स्थापत्यशास्त्र, डौल, आवश्यक तेथे गुप्तता या सर्वांचा विचार करून हे दरवाजे निर्माण केले गेले. या शिवाय या दरवाजांवर व्याल, शरभ, व्याघ्र इ. प्रतिमाही आढळतात. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. तसेच, खूप ठिकाणी द्वार देवताही आढळतात. तसेच राजघराण्याची मानचिन्हेही असतात. घराबाहेर पडलात तर आपल्यालाही काही नवीन गवसू शकेल.