सायकलिंगच्या प्रेमापोटी Print

मिलिंद ढमढेरे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
alt

सकाळची बोचरी थंडी, घाट पार करताना येणारे प्रतिकूल वारे, खडबडीत रस्ता याला न जुमानता चाळिशी ओलांडलेल्या अनेक हौशी सायकलपटूंनी डोणजे ते सिंहगड ही खडय़ा चढाईची शर्यत पार केली. केवळ सायकलिंगच्या प्रेमापोटीच वाटेल ते अडथळे पार करण्यास हौशी लोक तयार असतात याचा प्रत्यय या शर्यतीत दिसून आला. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर परप्रांतांमधील खेळाडूंनीही या शर्यतीत भाग घेत आव्हानात्मक सायकलिंगचा आनंद घेतला.
लाईफसायकल मॉलतर्फे गेली तीन वर्षे डोणजे ते सिंहगड ही आव्हानात्मक सायकल शर्यत आयोजित केली जात आहे. महाराष्ट्रात कामानिमित्त येणारे परदेशी हौशी खेळाडूही या शर्यतीत भाग घेत सिंहगडची खडी चढण कशी असते हे अनुभवण्याचा प्रयत्न करतात. यंदाही या शर्यतीत भारतातील अनेक ठिकाणच्या खेळाडूंनी भाग घेतलाच पण त्याचबरोबर अमेरिका, रशिया, इस्रायलमधील हौशी खेळाडूंनी भाग घेतला. शर्यतीत भाग घेतलेल्या १८० खेळाडूंपैकी जवळ जवळ दीडशे खेळाडूंनी ही शर्यत पूर्ण केली, यावरूनच सायकलिंगची क्रेझ किती दर्जात्मकरीत्या वाढत चालली आहे याचा प्रत्यय आला. खरंतर या शर्यतीचे अंतर केवळ बारा किलोमीटरचे असले तरी शर्यतीमधील बहुतांश मार्ग म्हणजे खडी चढणच असल्यामुळे व्यावसायिक खेळाडूंचाही येथे कस alt
लागतो. शर्यतीत भाग घेतलेल्या खेळाडूंमध्ये हौशी खेळाडूंचाच अधिक सहभाग होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे अनेक तज्ज्ञ, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक असे उच्च शिक्षितांचे प्रमाण त्यामध्ये जास्त होते. त्यापैकी अनेक जण सुट्टीच्या दिवशी भरपूर सायकलिंग करणारे होते. काही जणांनी लडाख, मनाली, खारदुंगला आदी हिमालयीन परिसरात सायकलिंग केले आहे. सायकलिंगची लोकप्रियता वाढली आहे आणि हौसेकरिता सायकलिंगवर भरपूर खर्च करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. शर्यतीत सहभागी झालेल्या बऱ्याचशा स्पर्धकांच्या सायकली वीस हजार रुपयांपेक्षा जास्त कि मतीच्या होत्या.
शर्यतीच्या वेळी अतिशय थंड हवा होती व घाटात बोचरे वारे होते. तरीही खेळाडूंचा उत्साह अवर्णनीय होता. सध्या या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे शर्यतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूपच खराब रस्ता होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खणलेले होते व माती होती. काही ठिकाणी कच्चा रस्ता होता. सुरुवातीच्या टप्प्यात एकत्रित बरेचसे खेळाडू असतात. त्यामुळेच अशा खडबडीत व अरुंद टप्प्यामधून वाट काढणेदेखील आव्हानात्मक होते. खेळाडूंनीही अहमअहमिका न दाखविता आणि अन्य खेळाडूंना त्रास होणार नाही याची काळजी घेतच सायकली चालविल्या. शर्यतीत सहभागी झालेल्यांमध्ये १५ वर्षांखालील पंधरा खेळाडूंचा समावेश होता. पन्नाशी उलटून गेलेल्या १५-२० स्पर्धकांचा उत्साह तरुण खेळाडूंना लाजविल असाच होता. या शर्यतीत ४० व ५० वर्षांवरील स्पर्धकांकरिता वेगळे गट ठेवले होते तरीही ६१ वर्षीय विजय माने यांनी खुल्या गटात तरुण खेळाडूंच्या बरोबरीने भाग घेतला. वयाचे अर्धशतक ओलांडलेल्या काही महिलांनीही अव्वल दर्जाची कामगिरी करीत हम भी कुछ कम नही याचा प्रत्यय घडविला. शर्यतीत भाग घेतलेल्या खेळाडूंपैकी काही जणांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, फुटबॉल आदी क्रीडाप्रकारांमध्ये भाग घेतला होता आणि आता निरोगी जीवनासाठी शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्याच्या दृष्टीने हे खेळाडू सायकलिंग करत आहेत. अशोक कॅप्टन हा तर बुजुर्ग सायकलपटू आहे. गेली ३०-३५ वर्षे तो सायकलिंग करीत आहे. त्याने मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक अशा अनेक शर्यतींमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे. तो स्वत: सायकल शर्यतीच्या संयोजनात सक्रिय असतो. संयोजनाची जबाबदारी सांभाळून त्याने आपल्या वयोगटात विजेतेपद मिळवित अन्य तरुण खेळाडूंपुढे आदर्श ठेवला आहे.
हौशी खेळाडूंचा उत्साह लक्षात घेऊन अशा लोकांकरिता शर्यती आयोजित करण्याचे प्रमाण वाढले आहे. पर्यावरणपूरक व निसर्गाच्या संवर्धनाकरिता अशा शर्यती आवश्यक होऊ लागल्या आहेत. सुदैवाने त्यांना चांगले पुरस्कर्तेही मिळू लागले आहेत. सिंहगडच्या शर्यतीकरिता चार लाख रुपयांपेक्षा जास्त पारितोषिके ठेवण्यात आली होती. हे लक्षात घेता सायकलिंग शर्यतींकरिता एक-दोन पुरस्कर्त्यांवर अवलंबून न राहता वस्तुरूप विशेषत: सायकलपटूंकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांचे पुरस्कर्ते मिळविल्यास चांगली शर्यत आयोजित केली जाऊ शकते हे सिंहगड शर्यतीच्या संयोजकांनी दाखवून दिले आहे. अशा शर्यतींचे प्रमाण वाढले तर निश्चितच पर्यावरण रक्षणास मोठय़ा प्रमाणावर हातभार लावला जाऊ शकेल.