मुशाफिरी : सवतसडा Print

अभिजित बेल्हेकर ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

सारे कोकणच खरेतर निसर्गाचा खजिना! कोकणच्या कुठल्याही वाटेवर स्वार झालो, की हा निसर्ग जागोजागी थांबवतो. चिपळूणची वेस ओलांडून एकदा परशुराम घाटाच्या दिशेने निघालो होतो आणि घाट सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताच्या अशाच एका स्थळाने पाय खेचून घेतले- सवतसडा!
वर्षां ऋतूचे प्रेम कोकणाच्या बाबतीत थोडे जास्तच. ज्येष्ठ-आषाढातल्या पहिल्या सरीपासून सुरू होणारा हा सोहळा पुढे चार महिने साऱ्या कोकणाला भिजवत राहतो. पाऊस पडू लागतो, सारा मुलुख हिरवागार होतो. या हिरवाईवरून असंख्य जलधारा वाहू-धावू लागतात. यातलीच एक मोठी जलधार- सवतसडा!
मुंबई-गोवे महामार्गालगतचा हा धबधबा चिपळूणहून ५ किलोमीटरवर. परशुरामाच्या डोंगरावर पडणारा सारा पाऊस इथे या धारेतून खाली कोसळतो आणि वाशिष्ठीला जाऊन मिळतो. भोवतीने घट्ट झाडी आणि मधोमध एका उंच उघडय़ा कातळावरून कोसळणारी ही शुभ्र धार. जणू या शुभ्रतेला हिरवाईचेच कोंदण! सवतसडय़ाचे हे पहिले दर्शनच मोहात पाडते.
मुख्य रस्त्यावरून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक चांगली पाऊलवाट बांधली आहे. या वाटेच्या सुरुवातीलाच सवतसडय़ाची ओळख सांगणारी एक शासकीय पाटी येते. पण तिच्यावर अगदी सुरुवातीलाच ‘‘.. ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ’ असा उल्लेख येतो. पर्यटन स्थळांच्या विकासासाठी त्यांची अ, ब, क, अशी प्रतवारी केलेली आहे. त्यानुसार त्या त्या स्थळांवर खर्च केला जातो. पण या वर्गवारीचा उल्लेख असा जाहीर पाटीवर करत शासनाने जणू आपल्या लेखन अभिरुचीचे प्रदर्शनच मांडले आहे.
मोठाल्या वृक्षराजीतून ही वाट धबधब्याकडे सरकते. वाटेत झाडांच्या फांद्यांची कमान घेत हा धबधबा वेगवेगळय़ा कोनातून दिसतो. जवळ जाईपर्यंत त्याचे ते विस्तीर्ण रूप आणि रोरोवणारा आवाज मन व्यापून टाकतो.
alt
शेपाचशे फूट उंचीचा तो कडा, मात्र त्याचे पोट खपाटीला गेल्याने वरून निघालेली ती धार थेट जमिनीकडे झेपावते. असंख्य धारांमधून तो पाण्याचा पदर वाटतो. जणू एखाद्या सुंदर स्त्रीने तिचे लांबसडक केस मोकळे सोडावेत, त्याप्रमाणे!
आपण असे या भावमग्नतेत असतानाच कुणीतरी सांगू लागते, ‘‘..त्या तिथे वर धबधब्याच्या कडय़ाच्या टोकाशी त्या दोघी सवती बसल्या होत्या. एक राजाची आवडती, तर दुसरी नावडती. नावडती आवडतीला तिची वेणी घालून देते असे म्हणते. तिच्या बोलण्यातील काळेबेरे लक्षात आल्याने आवडती आपला पदर हळूच नावडतीच्या ओच्याला बांधते. वेणी होते, आवडती उठणार तोच नावडती तिला कडय़ावरून खाली ढकलते. पण तिच्याबरोबर नावडतीदेखील खाली कोसळते..’’
सवतीमत्सराची गोष्ट सांगणारा हा धबधबा ‘सवतसडा’ हे नाव घेत कोसळत असतो.
गेली अनेक वर्षे कोसळत असलेल्या या धबधब्याने इथे एक मोठा डोहच तयार केला आहे. त्यात पडणारी ही धार दूपर्यंत तिचे तुषार उडवते. सवतसडय़ाचे हे सौंदर्य पाहता पाहता या तुषारांमध्येच भिजायला होते. सवतसडय़ाला मनात साठवावे आणि पुढे निघावे तो घाटात आणखी एक सौंदर्य विसावा वाट पाहात असतो.
वाशिष्ठी दर्शन
alt
उंच उंच जाण्यात पायथ्याचे जग, देखावा पाहण्याचे मानसशास्त्र दडल्याचे सांगितले जाते. परशुराम घाटाच्या डोंगराला असाच एक निसर्गदर्शनाचा कोन आहे. त्याला कुणी वाशिष्ठी दर्शन नाहीतर कुणी विसावा पॉइंट असे म्हणते.
परशुराम घाटाचे शेवटचे वळण पार पाडत गाडी सर्वोच्च स्थानी आली, की रुंदावलेल्या या रस्त्यावरून एकदम डावीकडच्या दरीकडे सगळय़ांचेच लक्ष जाते. वाशिष्ठी नदीचे खोरे सुजलाम् सुफलाम् होऊन अवतरते.
डोंगरदऱ्यांच्या आश्रयाने, हिरवाईला सोबत घेत वाशिष्ठी मार्ग काढत असते. समोरच्या गोवळकोटला चंद्राकृती वळण घेणारी ही जणू चिपळूणची चंद्रभागाच! तिचे हे भरलेले पात्र, भोवतीची हिरवाई, भातशेतीचे पट्टे सारे काही मन मोहरून टाकते. कधी संध्याकाळी इथे आलो तर या साऱ्या निसर्गदृश्यावर मावळतीचे गहिरे रंग अवतरलेले असतात. इथल्या झाडांच्या कमानीतून हे सारे पाहताना जीव गुंतून जातो. मुशाफिरीचे हे असे गहिरे रंगच मग नव्या प्रवासाची उमेद ठरतात!