सजीवांची विकास प्रक्रिया उलटी फिरवणारे जादूगार! Print

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
शिन्या यामानाका व सर जॉन बी. गुरडॉन

सजीवांना होणाऱ्या दुर्धर आजारांचे मूळ त्यांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या दोषांमध्ये असते, पण या सदोष पेशी बदलून तेथे अगदी नवीन पेशी प्रत्यारोपित केल्या तर तो रोग दूर होतो. त्यामुळे मूलपेशी हा आज बराच चर्चेचा विषय बनला आहे. या विषयावरील क्रांतिकारी संशोधनासाठी ब्रिटनचे जॉन गुरडॉन व जपानचे शिन्या यामानाका यांना यंदा वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे १० डिसेंबरला त्यांना हा पुरस्कार स्टॉकहोम येथे प्रदान केला जाणार आहे.
संशोधनाचे महत्त्व काय?
मूलपेशींच्या मदतीने रोगग्रस्त अवयवांना नवसंजीवनी देता येते यात वाद नाही, परंतु त्या मूलपेशी या गर्भातून मिळवाव्या लागत होत्या. मग त्यासाठी निकामी गर्भ घेऊन त्यातील मूलपेशी वापरण्याबाबत नैतिकतेचे मुद्दे उपस्थित करण्यात येऊ लागले. एखाद्या रुग्णाला जीवदान देण्यासाठी गर्भातील मूलपेशी वापरणे हे भ्रूणहत्येच्या समान मानले जाऊ लागले. मग आता मूलपेशी मिळवायच्या कशा तर त्यासाठी एक मार्ग म्हणजे नाळेतील रक्त त्या व्यक्तीच्या जन्मानंतर अतिशीत तापमानाला साठवून ठेवणे हा आहे. पण ही आर्थिकदृष्टय़ा सगळ्यांना परवडत नाही. त्यामुळे नैतिकता तर पाळायची पण मूलपेशीही वापरायच्या, या चक्रव्यूहातून मार्ग काढण्यासाठी यामानाका यांनी रुग्णाच्या शरीरातील परिपक्व पेशींपासून मूलपेशी तयार करण्याचे तंत्र शोधून काढलेत्यासाठी कुठलेही मानवी गर्भ वापरावे लागत नाहीत.
जीवनप्रवास-मूलपेशी-परिपक्व पेशी
आपण सगळे जे जन्माला आलो आहोत ते अंडपेशी फलनाच्या प्रक्रियेतून. जीवनाच्या सुरुवातीच्या प्रवासात गर्भधारणेनंतरचा काळ महत्त्वाचा असतो. यात अपरिपक्व पेशी तयार होतात, त्याच मूलपेशी असतात. त्यांच्यापासूनच पुढे प्रत्येक अवयवाच्या विशिष्ट पेशी बनतात. त्यातून संपूर्ण शरीराची निर्मिती होते. या मूलपेशी ‘प्लुरीपोटेंट’ असतात म्हणजे त्यांच्यात कुठल्याही अवयवाची निर्मिती करण्याची क्षमता असते. मूलपेशीपासून विशिष्ट अवयवांच्या पेशी तयार होण्याची ही प्रक्रिया एकमार्गी आहे असे मानले जात होते, पण यात परिपक्व पेशींपासून मूलपेशी बनवता येतात असा उलटा मार्ग शोधून काढण्यात आला. परिपक्व पेशीत एकदा बिघाड झाला की संपले, कारण त्यामुळे शरीरात रोगनिर्मिती होते. मग मरणानेच सुटका होणार हा समज जॉन बी. गुरडॉन यांनी खोटा ठरवला. परिपक्व पेशीत डीएनए असतो. त्यात विविध पेशींचे नियंत्रण करणारी माहिती असते. त्या माहितीचा वापर करून परिपक्व पेशीचे रूपांतर पुन्हा बहुक्षमता असलेल्या मूलपेशीत करता येईल असा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला.
सुखद न्याय वर्तुळाचा
मूलपेशीपासून परिपक्व पेशी बनतात, त्यापासून वेगवेगळे अवयव बनतात. मग पुन्हा परिपक्व पेशीपासून मूलपेशी तयार करता येणार नाहीत का? या प्रश्नाचे व्यवहार्य उत्तर शिन्या यामानाका यांनी दिले. त्यापूर्वी मार्टिन इव्हान्स यांनी उंदराच्या गर्भातून बहुअवयव निर्मितीक्षम मूलपेशी वेगळ्या केल्या होत्या. त्यांना २००७ मध्ये नोबेल मिळाले होते. यामानाका यांनी त्यांच्या संशोधनात अशी जनुके शोधली जी एखाद्या पेशीला मूलपेशी म्हणजे अपरिपक्व पेशीच्या रूपात ठेवतात. या जनुकांच्या वापराने पेशींचे प्रोग्रॅमिंगच बदलता येते. यामानाका यांनी फायब्रोब्लास्टमधील अशी जनुके परिपक्व पेशीत टाकली  तेव्हा त्यांना मात्रा लागू पडल्याचे दिसले.  
वैद्यकीय उपयोग
अल्झायमर, पार्किन्सन यांसारखे दुर्धर आजार हे पेशीतील बिघाडांमुळे होतात. पण या नादुरुस्त पेशींच्या नवीन पेशी तयार करून त्या प्रस्थापित केल्या तर तो रोग दूर करता येतो. रुग्णाच्याच त्वचेच्या पेशी घेऊन त्यांचे रूपांतर मूलपेशीत करता येते.पेशींचे रीप्रोग्रॅमिंग करणे शक्य झाल्याने कर्करोगाची प्रक्रियाही रोखता येते.     

शिन्या यामानाका
शिन्या यामानाका यांचा जन्म जपानमधील ओसाका येथे १९३३ मध्ये झाला. १९८७ मध्ये ते कोबे विद्यापीठातून एमडी झाले. नंतर त्यांनी अस्थिशल्यविशारद म्हणून प्रशिक्षण घेतले व नंतर ते मूलभूत संशोधनाकडे वळले. यामानाका यांनी १९९३ मध्ये ओसाका सिटी विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी.) घेतली. नंतर त्यांनी सॅनफ्रान्सिस्को येथील ग्लॅडस्टोन इन्स्टिटय़ूट येथे संशोधन केले. जपानमधील नारा इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतही त्यांनी काही काळ संशोधन केले. क्योटो विद्यापीठात ते सध्या प्राध्यापक आहेत.

सर जॉन बी. गुरडॉन
सर जॉन बी. गुरडॉन यांचा जन्म १९३३ मध्ये इंग्लंडमधील डिपेनहॉल येथे झाला. १९६० मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत गेले.  १९७२ मध्ये ते परत मायदेशी आले व केंब्रिज विद्यापीठात संशोधन सुरू केले. मॅगडॅलीन महाविद्यालयात त्यांनी पेशीविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. सध्या ते केंब्रिज येथे त्यांनीच स्थापन केलेल्या गुरडॉन इन्स्टिटय़ूट येथे संशोधन करीत आहेत.