चिरंतन शिक्षण : कानाने बहिरा, मुका परि नाही.. Print

डॉ. विजया वाड, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२

‘कानाने बहिरा, मुका परि नाही’ असे एक गीत दूरदर्शनवर काही वर्षांपूर्वी सतत वाजे. त्यामुळे जनजागृतीस फार मोठी मदत होई. ते मूल बहिरे आहे म्हणून बोलत नाही. त्याला ऐकण्यासाठी बाहेरून मदत करा, ते बोलू लागेल.
श्रवणयंत्राच्या मदतीने जी मुले ऐकू शकतात ती कर्णबधिरत्वावर मात करतात हे मी स्वत: डोळ्यांनी विकास विद्यालय या कर्णबधिरांसाठी असलेल्या शाळेत बघितले आहे. ‘स्पीच थेरपी’ हा जरी कष्टसाध्य नि वेळखाऊ प्रकार असला तरी जादूभरा आहे. आपल्या ओठांच्या हालचालीवरून मुलांना शब्दांचे आकलन व्हावे आणि त्यांनी शब्दोच्चार करावा यापरता आनंद तो कोणता?
विकास विद्यालय ही जानकी शिक्षण संस्थेची कर्णबधिरांसाठी असलेली दादरच्या आगाशे पथावरली एक वैशिष्टय़पूर्ण शाळा. रोहिणीताई लिमये त्याच्या संस्थापक आहेत. ही संस्था १९६६ या वर्षांत रोहिणीताईंनी सुरू केली आणि गुणात्मकदृष्टय़ा या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे. दरवर्षी कर्णबधिरांची एक बॅच शालान्त परीक्षेला पाठवणारी ही शाळा वर्षांनुवर्षे शंभर टक्के रिझल्ट आणते. शाळेतले प्रत्येक मूल नव्या दिशा, नव्या संधी, नव्या वाटा शोधते.
काही कर्णबधिर मुलांनी तर नॉर्मल मुलांच्याही पुढचे असे असामान्य यश संपादन केले आहे. नितेश मन्नाची निवड फुटबॉलकरिता मुंबई टीममधून झाली आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये स्टेट चॅम्पियन्ससाठीही नितेशने मोलाची कामगिरी केली आहे. त्याच्याचप्रमाणे पवन हाकेही अगदी हीच कामगिरी बजावून
शाळेचा चमकता सितारा झाला आहे. करिश्मा बाळकृष्ण लोळे ही गोड मुलगी राष्ट्रीय पातळीवर जलतरणपटू म्हणून चमकते आहे. तिचे आईवडील आणि तिचे क्रीडा प्रशिक्षक या कामासाठी तनमनधन वेचून प्रयत्न करीत असतात. करिश्माचे वडील तर मला म्हणाले, ‘‘करिश्मा माझी पाण्यातली मासोळी आहे. तिचा विकास हे माझे एकमेव ध्येय आणि एकमेव छंद आहे. माझे जीवन मी तिच्या प्रगतीसाठी वाहिले आहे. करिश्मा जेव्हा पदक जिंकते तेव्हा आम्हाला किती आनंद होतो म्हणून सांगू? करिश्मा बोलू शकत नाही, पण आपला आनंद तिला व्यक्त जरूर करता येतो. आपले मूल नॉर्मल असावे असे प्रत्येक पालकाला वाटते. अपंग मूल झाले की पालक दैवाला दोष देतात. माझे त्यांना एवढेच सांगणे आहे की, निराशा झटका. गंडेदोरे, उपास-तापास न करता आहे त्या सत्याचा स्वीकार करा. तुमच्या मुलात जेव्हा देव एखादी कमतरता निर्माण करतो तेव्हा एखादी कला डिस्टिंगशनमध्ये देतो. तिचा शोध घ्या म्हणजे मग तुम्हाला सुखाची खिडकी उघडायला मदत होईल. करिश्मा उत्तम पोहोते हे समजल्यावर आम्ही त्या दिशेने झेपावलो. आपले मूल धावणे, गोळाफेक, चित्रकला, शिल्पकला, नृत्य, संगणक, कशात छान आहे? ओळखा नि लागा कामाला.’’ करिश्माच्या वडिलांचे हे उद्गार प्रत्येक पालकाने लक्षात ठेवण्याजोगे आहेत. मग त्यांचे मूल अपंग असो की अभंग!
विकास विद्यालयाचा संगणक कक्ष अतिशय अद्ययावत आहे. प्राचार्य नीलिमा गुप्ते या कसोशीने मुलांच्या विकासाकडे दक्ष लक्ष ठेवून असतात. विजूताई भागवत, आशा थत्ते, लताताई पाटकर, डॉ. बाळकृष्ण खरे हे शाळेच्या सर्वागीण विकासासाठी झटत असतात. विकास विद्यालयात मूल एक उत्तम माणूस बनावे यासाठी प्रयत्नशील असतात.
नुकतीच विकास विद्यालयातील मुलींनी राजभवनात राज्यपाल शंकरनारायणन यांच्या शुभ हस्ते स्कॉलरशिप घेतली. प्रेरणा या त्यांच्या शिक्षिकेला राज्यपालांनी आस्थेने काही प्रश्न विचारले, कारण त्यांना अशा मुला-मुलींबद्दल विशेष आत्मीयता आहे. मुलींनीही आपली ओळख येईल तितकी ‘बोलकी’ करून दिली व आपण स्वत: काढलेली चित्रे राज्यपालांना भेट दिली. अगदी वाकून नमस्कार करून आशीर्वादही घेतला. त्यांना राज्यपालांनी चॉकलेट दिली. छानसा नाश्ता दिला व त्यांच्या पालकांना विशेष मार्गदर्शन करा असा मला सल्ला दिला. मुलींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव होता.
लवकरच त्यांचे चित्र व हस्तकला प्रदर्शन भरणार आहे. दादरमध्येच मुले खाद्यजत्राही भरवत आहेत. आपण जरूर या जत्रेस भेट द्या, हे शाळेतर्फे आग्रहाचे निमंत्रण.
डॉ. विजया वाड
मानद अध्यक्ष,
विकास विद्यालय (कर्णबधिरांसाठी),
मेहता अपार्टमेंट, कॅ. आगाशे पथ, दादर (पश्चिम).
०२२-२४२२८९६६.

कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आपल्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे  उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७  
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it