शंभर कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्यांना आता शिक्षण क्षेत्रात मुक्त प्रवेश Print

प्रतिनिधी , पुणे
उद्योग क्षेत्र आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांमध्ये असलेली दरी भरून काढण्यासाठी आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) पावले उचलली असून सलग तीन वर्षे शंभर कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या उद्योगांना शिक्षण संस्था काढण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय ‘एआयसीटीई’ ने घेतला आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तूनिर्माण, शहर नियोजन, हॉटेल मॅनेजमेंट या विद्याशाखांचे शिक्षण देणाऱ्या इन्स्टिटय़ूशन सुरू करण्यास एआयसीटीईने मान्यता दिली आहे. या इन्स्टिटय़ूटना इतर इन्स्टिटय़ूटपेक्षा जवळपास दुप्पट विद्यार्थी क्षमतेला परवानगी देण्यात येणार आहे. प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी अशा प्रकारच्या संस्था सुरू करू शकणार आहे. मात्र, या एखाद्या विद्याशाखेतील एकच अभ्यासक्रम अथवा एखाद्या थीमवर आधारित अभ्यासक्रम ही संस्था सुरू करू शकणार आहे. पदवी, पदविका आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम चालवण्यासाठी या संस्थांना परवानगी देण्यात येणार आहे. या बाबत एआयसीटीईचे संचालक डॉ. एस. एस. मंथा यांनी सांगितले, ‘‘तंत्रशिक्षणाची पदवी घेऊनही उद्योगक्षेत्राच्या गरजेप्रमाणे उमेदवार मिळत नसल्याची तक्रार उद्योग क्षेत्रामधून नेहमी होते. उद्योग क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शंभर कोटींची उलाढाल असलेल्या कंपन्या आता शिक्षणात थेट गुंतवणूक करू शकतात.’’ या बाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले, ‘‘राज्याच्या पातळीवरही उद्योगांनी उच्च व तंत्रशिक्षणामध्ये गुंतवणूक करावी, सहभागी व्हावे, यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. उद्योग क्षेत्रांनाही शिक्षण क्षेत्रात येण्यामध्ये रस आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.’’